आजवर भारतीय सिनेमात फार मोठमोठे संगीतकार होऊन गेले. तरी त्यात खय्यामांचं स्वतःचं स्थान होतं. ब्याण्णव वर्षांचं दीर्घ आणि समृद्ध आयुष्य जगलेल्या या सुरांच्या जादूगाराने जग जिंकलं. एक संगीतकार म्हणून त्यांनी स्वतःचा नवा रस्ता निर्माण केला. त्यांच्या या थोरवीची ओळख करून देणारा लेख.
सुप्रसिद्ध गायिका लता मंगेशकर यांना एकदा विचारण्यात आलं होतं की, त्यांचं कोणतं गाणं त्यांना नूरजहां यांच्या आवाजात ऐकायला आवडेल? लता मंगेशकर यांनी रजिया सुलतान सिनेमातील ‘ऐ दिल-ए-नादान’ गाण्याचा उल्लेख केला. मदन मोहन, रोशन यांच्यासह मोठमोठ्या संगीतकारांची हजारो गाणी ज्यांनी गायिली, त्या आघाडीच्या गायिकेने सर्व संगीतकारांमधून खय्याम यांच्या गाण्याची निवड केली.
मोहंमद जहूर हाशमी हे खय्याम यांचं मूळ नाव. त्यांच्याकडे संगीताची एक जादूच होती. त्या जादूनेच त्यांना ‘खय्याम’ बनविलं. २०१७ मधे प्रकाशित ‘धुनों की यात्रा’ हे पुस्तक आलं. हे पुस्तक हिंदी सिनेमातल्या संगीतकारांवर लिहिलंय. कवी आणि आएएस ऑफिसर पंकज राग हे याचे लेखक आहेत. त्यात राग म्हणतात, जेव्हा संगीत ऐकून समाधान हवं असतं, तेव्हा खय्याम आठवतात. धावपळीच्या जगात प्रचंड कोलाहल आणि अडचणींचा डोंगर समोर असणार्या व्यक्तीचे मन खय्याम यांच्या शांत, स्निग्ध संगीताने हलकं होऊन जातं.
जुन्या जमान्यातल्या ख्यातनाम संगीत दिग्दर्शक जी.ए. चिश्ती यांच्याकडे खय्याम एकदा काम मागायला गेले. त्यावेळी आपणच संगीतबद्ध केलेला एक तुकडा चिश्तीसाहेब विसरून गेले. ‘आपण परवानगी दिल्यास मी तो तुकडा म्हणून दाखवतो,’ असं खय्याम म्हणाले. आपणच तयार केलेला तुकडा जेव्हा खय्याम यांच्या तोंडून चिश्ती यांनी ऐकला. तेव्हा त्यांनी खय्याम यांना आपला सहायक म्हणून काम दिलं.
आर्थिक गरजा भागविण्यासाठी खय्याम यांनी बरंच काही केलं. लष्करात नोकरीही केली, १९५३ मधल्या ‘फूटपाथ’ सिनेमासाठी त्यांनी ‘शर्माजी’ नावाने संगीत दिलं. निर्माते चंदू लाल यांना ते खूप आवडले. आणि त्यांनी ‘खय्याम’ नावाने संगीत देण्याच्या अटीवर त्यांना करारबद्ध केलं. ‘शामे गम की कसम’ हे त्या सिनेमातलं गाणं इतकं लोकप्रिय झालं की या गाण्यात दिलीप कुमार यांनी अभिनय केला, हेदेखील लोक विसरून गेले. या गाण्यात इतके बारकावे आहेत की, लक्षपूर्वक ऐकल्यास त्यातील जादू समजून येते.
खुद्द खय्याम यांच्या मते पारंपरिक तालवाद्यांच्या ऐवजी स्पॅनिश गिटार आणि डबलबासच्या मदतीने ठेका तयार करण्यात आला होता, म्हणून ते लोकप्रिय झालं. ‘फूटपाथ’च्या यशामुळे खय्याम यांना फारशी कामं मिळू शकली नाहीत. पण जी कामं मिळाली तिथे त्यांनी कमालीचं संगीत दिलं.
खय्यामांच्या चालींमधे तोचतोपणा असल्याचं बोललं जाऊ लागलं. ती टीका खरी असेलही पण संगीतातल्या गोडव्याचा विषय येतो. तेव्हा मात्र खय्याम यांनी पहाडी आणि यमन रागात संगीतबद्ध केलेल्या रचना आठवल्याशिवाय राहत नाही. याच दरम्यान ‘शगुन’ सिनेमातील गाणी लोकप्रिय ठरली. जगजित कौर यांनी गायिलेलं ‘तुम अपना रंजो-गम’ प्रचंड लोकप्रिय झालं. मोहंमद रफी यांनी गायिलेलं ‘पर्वतों के पेडों पर शाम का बसेरा’ हेही गाणे अप्रतिम झालं होतं.
हेही वाचा: टॉलस्टॉयची बायको मेल्यावर आपल्या डायरीमुळे झाली लोकप्रिय
राज कपूर यांनी समाजवाद मध्यवर्ती ठेवून बऱ्याच सिनेमांची निर्मिती केली. रशियन कादंबरीकार फ्योदोर दोस्तोयेव्स्की यांच्या ‘क्राइम अँड पनिशमेंट’ या कादंबरीवर आधारित ‘फिर सुबह होगी’ सिनेमाची निर्मिती त्यांनी केली. सिनेमा समाजवादावर असल्यामुळे त्यांनी साहिर लुधियानवी यांना गीतकार म्हणून पाचारण केलं.
संगीतकाराची निवड करण्याची वेळ आली तेव्हा राज कपूर यांनी खूप विचार केला. हसरत जयपुरी आणि शंकर-जयकिशन ही जोडी कोणत्याही राजकीय विचारधारेला बांधील नव्हती. राज कपूर यांच्या सिनेमात ते दोघे हमखास असायचे. आणि खूपशी गीतं सिनेमाच्या कथानकाशी मेळ साधणारी असत. मात्र मध्यवर्ती विचारांशी त्यांचा मेळ बसत नसे. साहिर यांना ही गोष्ट माहीत असल्यामुळे त्यांनी संगीतकार वेगळाच असावा, असा आग्रह धरला.
साहिर आणि खय्याम यांनी ‘शगुन’मधे एकत्रित काम केलं होतं. आणि सिनेमा आपल्या मनाजोगा हवा ही दोघांचीही अट असे. रमेश सहगल यांनी राज कपूर, खय्याम आणि साहिर यांची बैठक घडवून आणायचं ठरवलं. खय्याम राज कपूर यांच्या घरी गेले, तेव्हा राज यांनी त्यांना लता मंगेशकर यांच्याकडून मिळालेला तानपुरा भेट दिला. आणि काहीतरी ऐकविण्याची विनंती केली. दुपारची वेळ असल्याने खय्याम यांनी राग पूरिया धनश्री आळवायला सुरुवात केली.
राज कपूर यांनी त्यांना सिनेमाच्या टायटलसाठी धुन तयार करायला सांगितलं, तेव्हा खय्याम यांनी पाच सुरावटी तयार केल्या. एवढं झाल्यावर राज कपूर रमेश सहगल यांना घेऊन दुसर्या खोलीत गेले. खय्याम यांना वाटले की काम होणार नाही. थोड्या वेळाने दोघे बाहेर आले. तेव्हा सहगल यांनी खय्याम यांना मिठी मारली. आणि पुढे काय, ‘फिर सुबह होगी’ची गाणी एकाहून एक हिट झाली. मात्र, साहिर आणि खय्याम यांची जोडी पुन्हा कधीच आरके स्टुडिओशी जोडली जाऊ शकली नाही.
हेही वाचा: मी देशभक्त का नाही?
आजमितीस बॉलीवूडमधल्या दोनपैकी एका सिनेमात पंजाबी थीम असलेलं संगीत दिसतं. हा ट्रेंड सुरू करण्याचं श्रेय यश चोपडा, साहिर लुधियानवी आणि खय्याम यांनाच द्यावे लागेल. या ट्रेंडची सुरुवात जिथून झाली, तो सिनेमा होता ‘कभी कभी’. पंजाबी पार्श्वभूमीवरील प्रेमाचा त्रिकोण यश चोपडा यांनी पडद्यावर आणला. पंजाबी ढोलकची थाप, टप्पे तसंच गिद्दा आणि भांगडा या पारंपरिक नृत्यांचा ठेका गाण्यांमधे संगीतकाराने आणला.
या सिनेमाचं संगीत खूपच गाजलं. ‘कभी कभी मेरे दिल में खयाल आता है’ या गाण्यासाठी मुकेश यांना मरणोत्तर फिल्मफेअर मिळालं. तीस वर्षांपासून संघर्ष करत असलेल्या खय्याम यांना या सिनेमाने आघाडीच्या संगीतकारांच्या रांगेत आणून बसविलं. त्यानंतर ‘चंबल की कसम’, ‘त्रिशूल’ आणि ‘खानदान’ हे सिनेमा त्यांना पाठोपाठ मिळाले.
‘शंकर हुसैन’ या सिनेमाचा उल्लेखही या ठिकाणी आवश्यक आहे. कमाल अमरोही यांच्या या सिनेमात तीन गीतकार होते. स्वतः अमरोही, जाँनिसार अख्तर आणि कैफ भोपाली. तिघांनीही एकाहून एक सरस गाणी लिहिली. शेवटच्या गाण्यात कैफ भोपाली यांचे शब्द, लतादीदींचा स्वर आणि खय्याम यांचे संगीत यांचं मिश्रण भारून टाकणारं.
त्यानंतर कमाल अमरोही आणि खय्याम ‘रजिया सुलतान’ सिनेमासाठी एकत्र आले. ‘ऐ दिल-ए-नादान’ व्यतिरिक्त कब्बन मिर्झा यांनी गायिलेलं ‘आई जंजीर की झंकार खुदा खैर करें’ आणि लता मंगेशकर यांनी गायिलेलं ‘जलता है बदन’ ही गाणी खूपच गाजली. लता मंगेशकर मुजरा हा प्रकार फारशा गात नाहीत, हे सर्वांना ठाऊक होतं. परंतु ‘जलता है बदन’ गाण्यासाठी त्या खय्याम यांना नकार देऊ शकल्या नाहीत.
हेही वाचा: मोहन भागवत आरक्षणावर बोलल्यावर वाद का होतो?
खय्याम यांच्या संगीतविश्वात सर्वात मोलाचा सिनेमा ठरला तो ‘उमराव जान’. शहरयार यांच्या गजल आणि रेखाचा अभिनय यांची जादू जबरदस्त चालली. आशा भोसले यांच्या गायकीत सर्वाधिक योगदान पंचमदांचे आहे. आणि त्यांच्यासाठी त्यांनी अनेक गाणी गायलीयत. पण या सिनेमातली खय्याम यांच्यासाठी गायलेली गाणी त्यांच्या इतर सर्व गाण्यांची बरोबरी करण्यास समर्थ आहेत.
आशा भोसले यांच्या आवाजाचा एक वेगळाच कंगोरा या सिनेमात समोर आला. खय्याम यांनी अगदी कमी चित्रपटांना संगीत दिलं. पण जेवढं संगीत त्यांनी दिलं, ते सर्व मैलाचे दगड ठरलं. कोणत्याही गोष्टीत त्यांनी तडजोडी केल्या नाहीत. कोणाची कधी नक्कल केली नाही.
एवढंच नाही. तर खय्याम हे अत्यंत दानशूर म्हणूनही सर्वांच्या लक्षात राहतील. काही वर्षांपूर्वी त्यांनी आपली संपूर्ण संपत्ती एका ट्रस्टला दान केली. खय्याम यांची संगीतयात्रा कायम स्मरणात राहीलच. पण त्यांच्या जाण्याने आपण एका चतुरस्र संगीतकाराबरोबरच एका चांगल्या माणसालाही मुकलो आहोत.
हेही वाचा:
‘मिशन मंगल’ सिनेमा बघून आपलं मंगलयानही आत्महत्या करेल!
कृत्रिम पावसाच्या प्रयोगाने पाऊस पडला तरी तो खरंच चांगला आहे?
फेसबूकर्स पूरग्रस्तांसाठी कशी मदत करतात, याचं कुबेर ग्रुप हे उदाहरण
(हा लेख दै. पुढारी मधून घेतलाय. आणि लेखिका अमृता साठे या गायिका आहेत.)