लता मंगेशकर: जीवन समृद्ध करणारं गाणं

१७ फेब्रुवारी २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


लतादीदींचा एकूण जीवनपट पाहिला तर त्याचं वर्णन आवाजाचा  चमत्कार असं अधिक समर्पक ठरेल. पण, त्या चमत्काराला अफाट कष्टाचं पाठबळ होतं. लताजींनी कधीच हार मानली नाही. लताजींच्या गाण्यातली लय, सुरेलपणा, आवाजातलं माधुर्य, सगळ्या सप्तकांत फिरणारा त्यांचा आवाज हे सगळं विलक्षण होतं. आजच्या तरुणपिढीनं लताजींची १९४५ ते १९६० या काळातली गाणी आवर्जून ऐकली पाहिजेत.

स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांच्या निधनामुळं एका युगाचा अंत झालाय. आपल्या सर्वांच्या अतिशय जवळचा सुरेल सूर हरपलाय. त्यांच्या जाण्यानं प्रत्येक जण हळहळण्याचं कारण म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत या-ना त्या रूपानं आपल्या कानावर लतादीदींचे अवीट सूर येतात आणि आनंदानं आयुष्य घालवायला ते मदत करतात.

३६ भाषांमधे गायली गाणी

१९४२ ते २०१५ या ७० वर्षांच्या काळात २५ हजार गाणी लताजींनी गायली. हे जगातलं आश्चर्यच आहे. एका गाण्यासाठी तीन-चार तास रिहर्सल, रेकॉर्डिंगसाठीचा वेळ याचा हिशेब घातला तर अख्खं आयुष्य कमी पडेल. पण, लताजींनी यातली कित्येक गाणी ‘वन टेक’मधे गायलीत. अगदी अलीकडच्या काळात त्यांनी एका नॉर्वेजियन इंडो पाक समलिंगी सिनेमासाठी ‘जीना क्या है जाना मैने’ हे गाणं गायलं. त्यावेळी त्यांचं वय होतं ८४ वर्ष. २०१९ला ‘सौगंध मुझे इस मिट्टी की...’ हे भारतीय जवानांना समर्पित असणारं गाणं गायलं.

लताजींना पहिला ब्रेक दिला १९४८ला गुलाम हैदरनी. त्यापूर्वी सुरैया, नूरजहाँ, शमशाद या गायिका सिनेमाविश्वात प्रस्थापित झालेल्या होत्या. लताजी सिनेमाविश्वात दाखल झाल्या तेव्हा सुरवातीला आवाज बारीक असल्यानं त्यांना नाकारण्यात आलं. ही मुलगी कशी टिकून राहणार, असं त्यांच्याकडे पाहिलं गेलं.

हिंदी भाषेची जाण असली तरी त्यांचं उर्दू फारसं चांगलं नव्हतं. अनिल विश्वासनी दिलीप कुमारांशी लताजींची ओळख करून दिली आणि ही पुढं जाऊन चांगली गायिका बनेल असं सांगितलं तेव्हा दिलीपकुमारनं महाराष्ट्रीय गायकांना उर्दू उच्चार जमत नाहीत असं म्हणून लताजींच्या गायकीबद्दल साशंकता व्यक्त केली होती. ही गोष्ट दीदींना खूप लागली असावी. त्यामुळं त्यांनी उर्दू शिकून घेतली आणि नंतरच्या काळात अनेक गझल आपल्या स्वरांनी अजरामर केल्या. इतकंच नाही तर पुढच्या आयुष्यात त्यांनी एकंदर ३६ भाषांमधे गाणी गायली!

हेही वाचा: लतादीदींनी मुजरा गाण्यासाठी होकार दिला, कारण खय्याम

भक्तिगीतांतून लोकमानस घडलं

आपल्या गोड गळ्यानं लाखो रसिकांना मोहीत करत असतानाच ‘साधी माणसं’, ‘राम राम पाव्हणं’, ‘मोहित्यांची मंजुळा’, ‘मराठा तितुका मेळवावा’ यांसारख्या मराठी सिनेमांसाठी लतादीदींनी संगीतही दिलं. लताजींच्या गायन कारकिर्दीचा काळ मोठा असल्यानं त्यांनी बहुतांश गायकांबरोबर ड्युएट गायली.

किशोर कुमार, मुकेश, मोहम्मद रफी, महेंद्र कपूर यांच्यापासून ते पंकज उदास, शब्बीर कुमार, शैलेंद्र कुमार, उदित नारायण, कुमार सानू, सोनू निगम, अदनान सामी, ए. आर. रहमान अशा जवळपास तीन पिढीतल्या गायकांच्याबरोबरीनं ही स्वरसम्राज्ञी गायली. कित्येक नवीन संगीतकारांच्या दिग्दर्शनाखालीही त्यांनी स्वर दिले.

लता आणि आशा यांनी गायलेली ड्युएटस् सुपरहिट ठरली. ती ऐकताना त्यातल्या आवाजाचा सुरेख मिलाफ स्तिमीत करून जातो. ‘मन क्यूं बहका रे बहका’, ‘सखी रे सून बोले पपीहा’ हे खमाज रागातलं गीत, ‘कर गया रे मुझपे जादू’ हे दरबारी रागातलं गीत, ‘मन भावन के घर गाये जोरी’ हे भैरवीतली गीतं अशी गाणी ऐकताना अक्षरशः तल्लीन व्हायला होतं.

मला आठवतं, पूर्वी घराघरांमधे रोजची सकाळ ही रेडिओवरची भावगीतं, भक्तिगीतं ऐकत उजाडायची. यातली लताजींची गाणी प्रचंड लोकप्रिय झाली. ‘जो आवडतो सर्वांना तोचि आवडे देवाला,’ ‘ मुकुंदा रुसू नको इतका..’, ‘रघुनंदन आले आले’, ‘शरण तुला भगवंता’, ‘श्रीरामा भगवंता...’, ‘श्रीरामा घनश्यामा’, ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरी’, ‘सुंदर ते ध्यान’ यांसारख्या भक्तिगीतांतून लोकमानसावर एक प्रकारचे संस्कार होत गेले.

मंत्रमुग्ध करणारी आवाजाची किमया

लताजींच्या गाण्यातली लय, सुरेलपणा, आवाजातलं माधुर्य, सगळ्या सप्तकांत फिरणारा त्यांचा आवाज हे सगळं विलक्षण होतं. आजच्या तरुणपिढीनं लताजींची १९४५ ते १९६० या काळातली गाणी आवर्जून ऐकावी असं मी सांगेन. कारण आज इतक्या वर्षांनंतरही ती ऐकताना जराही कंटाळवाणं होत नाही. ही त्यांच्या आवाजाची किमया आहे.

‘तुम क्या जानो तुम्हारी याद में’ हे पी. एल. संतोषी यांनी लिहिलेलं गाणं ज्या दर्दभर्‍या आवाजात लताजींनी गायलंय त्याला खरोखरीच तोड नाही. ‘सय्या’ सिनेमातलं ‘ये काली काली रात...’ हे गाणं सज्जाद हुसेन यांनी संगीतबद्ध केलं होतं. पण, त्यावेळी हा सिनेमा चालणार नाही असं वाटल्यानं तो तयार होऊनही प्रदर्शित केला गेला नाही.

एचएमवीनं त्या गाण्यांच्या रेकॉर्डस्ही काढल्या नाहीत. पुढं कोलकात्याला हा सिनेमा रीलिज झाला आणि तो एका महिलेनं पाहिला. त्यांनी एचएमवीला पत्र लिहिलं आणि इतकी सुंदर गाणी तुम्ही बाजारात का आणली नाहीत, अशी विचारणा केली. त्यानंतर एचएमवीनं ती रीलिज केली आणि त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. नंतरच्या काळात लता मंगेशकरांनी एक कार्यक्रम केला होता. त्यामधे ५० जुन्या गाण्यांचा मुखडा आणि पहिलं कडवं त्यांनी गायलं होतं. त्या कार्यक्रमात हे गाणं ऐकल्यानंतर सर्वजण अक्षरशः हादरून गेले होते.

हेही वाचा: आवाजाइतकीच रसरशीत आशा भोसलेंची जग गाजवणारी रेस्टॉरंट

लताजींच्या गाण्यातलं भावविश्व

लताजींच्या अशा असंख्य गाण्यांनी माझ्यासारख्या कोट्यवधी लोकांचं भावविश्व व्यापून टाकलं आहे. ‘अच्छा होता न दिल में तू आया न होता...’, ‘ ये दिल मचल मचल के यूं रोता है...’, ‘तेरा दर्द दिल मे बसा लिया’, ‘मैं अपने दिल का अफसाना सुनाऊं फिर चले जाना’, ‘आज मेरे नसीब में’ यांसारख्या गाण्यांतला लताजींचा आवाज ऐकताना अंग शहारून जातं. ‘हाय जिया रोये’ या गाण्यात त्यांचा वरच्या पातळीवर गेलेला आवाज ऐकून थक्क व्हायला होतं.‘लूट गयी उम्मीदोंकी दुनिया’ या गोरखकल्याण रागातल्या गाण्यात अतिशय पातळ झालेला लताजींचा आवाज केवळ अप्रतिम!

पंडित भीमसेन जोशी म्हणत की, लताचा गळा म्हणजे भारताला लाभलेली एक देणगी आहे. पु. ल. देशपांडे म्हणायचे, लता मंगेशकरांमुळे सुरेल संगीत म्हणजे काय हे भारताला कळालं. कुणी बेसूर झाला तर ते आपल्याला समजतं ते लताजींमुळेच! लताजींचं सर्वांत मोठं वैशिष्ट्य म्हणजे एखाद्या गाण्यातली भावना व्यक्त करायला कित्येक गायकांना बरीच मेहनत घ्यावी लागायची; पण त्या काही मिनिटांतच सर्व भावना आपल्या स्वरांतून अतिशय चपखलपणानं उतरवत असत.

संगीतातले राग गायले जातात तेव्हा त्यातून भावविश्व निर्माण होणं गरजेचं असतं. हे भावविश्व लताजींच्या प्रत्येक गाण्यात मला दिसतं. जुन्या गाण्यांमधे ते ओतप्रोत भरलेलं असायचं. खास करून १९५० ते १९६० च्या काळातल्या गाण्यांच्या इतकं प्रेमात पडायला होतं की, ती ऐकल्यानंतर त्या भावविश्वातून बाहेर पडणं कठीण होतं. बडे गुलाम म्हणायचे की लताजी कधीच बेसूर व्हायच्या नाहीत. हे अजब रसायन आहे ! अनेकांना हे माहीत नसेल, पण ‘नागीन’ सिनेमात ‘तेरे संग प्यार में...’ आणि ‘दिल तुझको दिया’ या सिनेमातलं ‘वादा न तोड’ ही लताजींची दोन गाणी ‘इटर्नल सनशाईन ऑफ द स्पॉटलेस माईंड’मधे घेण्यात आली आहेत.

आवाजात आपुलकीचा भाव

लतादीदींचा एकूण जीवनपट पाहिला तर त्याचं वर्णन आवाजाचा  चमत्कार असं अधिक समर्पक ठरेल. पण, त्या चमत्काराला अफाट कष्टाचं पाठबळ होतं. लहानपणीची गरिबी, बालवयापासून केलेले कष्ट, नाटकात केलेलं काम, सिनेमात केलेलं काम,  कुटुंब सावरण्याची जबाबदारी आणि हा सगळा संघर्ष करत असताना आपल्या आवाजाला रियाजाची, अभ्यासाची जोड देत पुढं जाणं हे मला अधिक महत्त्वाचं वाटतं.

यातून त्यांना ती उंची गाठता आली. लताजींनी कधीच हार मानली नाही, ही गोष्ट आपण सर्वांनी शिकली पाहिजे. सर्वोत्कृष्टपणा येण्यासाठी जितके कष्ट घ्यावे लागतील ते घेण्याची आपली तयारी असली पाहिजे. लता मंगेशकरांचा संपूर्ण काळ आठवताना मला त्यांच्या आवाजामधे माणुसकीचा, वात्सल्याचा, आशावादाचा, आपुलकीचा भाव आढळतो. ‘अल्ला तेरो नाम ईश्वर तेरो नाम’ म्हणणारी लता कालातीत होत्या.

हेही वाचा: 

आशाताई जेव्हा रहमानसाठी गातात

अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी

भारतातली विविधता बाजूला सारून देश एक कसा होणार?

टॉलस्टॉयची बायको मेल्यावर आपल्या डायरीमुळे झाली लोकप्रिय

(दैनिक पुढारीतून साभार)