२९ फेब्रुवारीला जन्मलेल्यांनी बड्डे कधी सेलिब्रेट करायचा?

२९ फेब्रुवारी २०२०

वाचन वेळ : ५ मिनिटं


आज २९ फेब्रुवारी.चार वर्षांतून एकदा येणारा दिवस. या दिवशी जन्मलेल्या लीपर्स मंडळींच्या गमतीजमती तुम्हाला माहीत आहेत का? लीपर्स ही जगातली सगळ्यात छोटी मायनॉरिटी आहे. तीन सख्ख्या बहिणी लीपर्स असण्याचा विक्रमही घडलाय. टास्मानियाचा एक अध्यक्ष याच दिवशी जन्मला आणि मेलाही. २९ फेब्रुवारीला प्रकाशित होणारं एक वृत्तपत्रंही आहे. अशा गमतीजमती सांगतोय एक लीप इयर बेबी पत्रकार. त्याला शुभेच्छा आजच देणार ना?

एका वर्षात ३६५ दिवस असतात हे आपल्याला चांगलं पाठ झालंय. पण यंदा एका वर्षात ३६६ दिवस आहेत. कारण २०२० हे लीप इअर आहे. आणि हा एक वाढीव दिवस म्हणजे आजची २९ फेब्रुवारी ही तारीख.

लीप इअर बेबीचा इतिहास

आजचा दिवस जगभरात ‘लीपर्स डे’ किंवा ‘लीप इअर डे’ म्हणून साजरा केला जातो. चार वर्षातून एकदाच ‘उगवणाऱ्या’ या दिवसाविषयी आपण बरंच काही ऐकलं-वाचलेलं असतं. जगभरातल्या काही देशांमधे हा दिवस ‘शुभ’ तर काही देशांमधे ‘अशुभ’ मानला जातो. या दिवशी जन्मलेल्या लोकांसाठी मात्र हा दिवस ‘खास’च खास असतो. ‘लीपलीग्ज’ किंवा ‘लीप इअर बेबी’ म्हणून ओळखली जाणारी ही मंडळी तब्बल चार वर्षांनंतर आपला बड्डे साजरा करणार असतात.

आपल्यापैकी बहुतेकांना वर्षभरातल्या ३६५ दिवसांपैकी एक दिवस ‘आपला’ दिवस म्हणून साजरा करायला मिळतो. पण या ‘लीपलीग्ज’ मंडळींना मात्र तब्बल चार वर्षानंतर येणाऱ्या वर्षातल्या ३६६ दिवसांपैकी एक ‘वाढीव’ दिवस खास ‘त्यांचा’ दिवस म्हणून ‘मिरवता’ येतं. त्यामुळे अर्थातच या बड्डेचं एरवीपेक्षा जरा जास्तच कोडकौतुक. लीपलीग्जनाही आणि त्यांच्या मित्रमंडळी आणि नातेवाईकांनाही.

हेही वाचा : दिशा कायदा लागू झाल्यास बलात्कारी पुरुषांचा २१ दिवसांत निकाल

जगातली सगळ्यात अल्पसंख्याक कम्युनिटी

जगभरात २९ फेब्रुवारी म्हणजेच आजच्या दिवशी जन्मणाऱ्या लोकांची संख्या अतिशय कमी आहे. आकडेवारीच्याच भाषेत सांगायचं तर ‘डेली मेल’ या ब्रिटश पेपरच्या वेबसाईटवर प्रकाशित बातमीनुसार जगाच्या एकूण लोकसंख्येच्या फक्त ०.६८ टक्के लोक या तारखेला जन्मलेली आहेत. एका अर्थाने ‘लीपलीग्ज’ मंडळी जगातली सगळ्यात छोटी मायनॉरीटीच आहे.

अगदी स्पेसिफिक सांगायचं झालं तर आजच्या तारखेला मूल जन्माला येण्याची शक्यता १४६१ पैकी १ अशी असते. त्यामुळेच असंही म्हटलं जातं की ‘लीपर्स’ असणं हे अगदी हाताला किंवा पायाला ११ बोटं घेऊन जन्माला येण्यापेक्षाही दुर्मीळ असतं. कारण असं मूल जन्माला येण्याची शक्यता सुद्धा ५०० पैकी एक म्हणजेच ‘लीपर्स’ जन्माला येण्यापेक्षा जवळपास तिपटीने अधिक असते.

सख्ख्या तीन बहिणी लीपर्स

अशा वेळी एकाच कुटुंबातल्या तीन सख्ख्या बहिणी सलग चार वर्षांच्या अंतराने जन्मलेल्या ‘लीपलीग्ज’ असल्याचं कुणी सांगितलं तर? आश्चर्यकारक वाटत असलं तरी ही गोष्ट अगदी खरी आहे. विशेष म्हणजे या आगळ्यावेगळ्या गोष्टीची ‘गिनीज बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मधेसुद्धा नोंद आहे.

या गोष्टीचा सिलसिला सुरु होतो नॉर्वेमधील कॅरीन आणि हेन्री हेन्रीक्सन या दाम्पत्याच्या पोटी २९ फेब्रुवारी १९६० ला जन्मलेल्या हेईदीच्या रूपाने. हेन्रीक्सन दाम्पत्याने १९६० मधे हेईदीला आणि त्यानंतर १९६४ आणि १९६८ सालच्या २९ फेब्रुवारीला अनुक्रमे ओंलाव आणि लीफ मार्टिन यांना जन्म दिला. आणि एकाच कुटुंबातल्या तिन्ही बहिणींचा लीप इअर डेला जन्म होण्याचा हा आगळावेगळा विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला.

हेही वाचा : कॅलेंडर माणसाला वर्तमानात राहायला शिकवतं!

आईवडलांनी ठरवून दिला मुलींना जन्म

असाच किस्सा इस्ट दाम्पत्याच्या बाबतीतदेखील घडला. या दांपत्याने २००४, २००८ आणि २०१२ च्या लीप एअरमधे अनुक्रमे झेविअर, रेमिंग्टन आणि जेड यांना जन्म दिला. अर्थात याचीदेखील गिनीज बुकात नोंद झालीय. मजेशीर गोष्ट म्हणजे रेमिंग्टन आणि जेड यांच्या आईवडलांनीच आपलं मुल लीप डे दिवशी जन्मावं असं प्लॅनिंग केलं होतं. आम्ही प्लॅन केला आणि त्यात निसर्गाचीही साथ मिळाली, अशी प्रतिक्रिया इस्ट दांपत्याने केएसएल डॉट कॉमशी बोलताना दिली. सध्या तरी जगभरात अशा प्रकारची ही दोनच कुटुंबं आहेत.

टास्मानियाच्या राष्ट्राप्रमुखाची गोष्टच न्यारी

आई-मुलगी किंवा नवरा-बायको हे लीपलीग्ज असण्याचे किंवा लीप डेदिवशी जुळ्यांचा किंवा तिळ्यांचा जन्म झाल्याचेही काही रंजक किस्से वाचायला मिळतात. यात १८६९ ते १८७२ या काळात टास्मानियाचे सर्वेसर्वा असणारे सर जेम्स विल्सन यांची तर गोष्टच न्यारी. या व्यक्तिमत्वाला तर ‘गोल्डन लीपलीग्ज’ म्हणावं लागेल. कारण हा जगाला माहीत असलेला एकमेव माणूस होता, ज्याचा जन्म आणि मृत्यू असं दोन्हीही लीप डेच्या दिवशी झाला. २९ फेब्रुवारी १८१२ ला जन्मलेला हा ब्रिटीश शासक २९ फेब्रुवारी १८८० मधे जग सोडून गेला.

अजून एक मजेशीर गोष्ट म्हणजे जगभरातल्या जवळपास सर्वच ‘लीपलीग्ज’ना एक प्रश्न विचारला जातो. लीपर्सना त्यांच्या खऱ्याखुऱ्या बड्डेदिवशी ‘तुम्ही नेमके किती वर्षाचे होताय?’ ‘४ की २४, ७ की २८?’ हा प्रश्न गमतीत का होईना विचारला जातोच जातो. आणि हा प्रश्न इतका कॉमन की त्याचं स्वरूप ना भारतात बदलतं ना सातासमुद्रापल्याडच्या अमेरिकेत. या प्रश्नासोबतच जोडून येणारा उपप्रश्न म्हणजे ‘मग तुम्ही एरवी कधी वाढदिवस साजरा करता? २८ फेब्रुवारी की १ मार्च? हा ही प्रश्न तितकाच कॉमन.

हेही वाचा : नव्या वर्षात घराची सजावट करण्याआधी कलर ऑफ द इअर माहीत हवा

लीपमंडळी एरवी बड्डे कधी करतात?

खरं तर नॉर्मल वर्षात या लोकांनी कोणता दिवस वाढदिवस म्हणून साजरा करावा याविषयी वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या संकेतांचं पालन केलं जातं. ऑस्ट्रेलियन लोक १ मार्चला तर न्यूझीलंडवासीय २८ तारखेला ‘लीपर्स’ मंडळींचा बड्डे सेलिब्रेट करतात. बरेच ‘लीपलीग्ज’ या दोन्हींपैकी एका तारखेची वाढदिवसासाठी निवड करत असले तरी हार्डकोर ‘लीपलीग्ज’ मात्र २९ तारखेसाठी आग्रही असतात.

आपण ‘युनिक’ तारखेवर जन्मलोय, तर तो युनिकनेस जपायचा. त्याचं जनरलायझेशन कशाला करायचं, असा त्यांचा युक्तिवाद असतो. गेल्या काही वर्षात फेसबूकमुळे मात्र नवीनच ट्रेंड आलाय. फेसबुकवरून लीपर्सच्या मित्रमंडळींना २८ फेब्रुवारी आणि १ मार्च अशा दोन्हीही दिवशी वाढदिवसाचे नोटीफिकेशन्स जातात. त्यामुळे सलग दोन दिवस बड्डे साजरा करण्याची संधीही ‘लीपलीग्ज’ना मिळू लागलीय. अर्थात हे ही युनिकच म्हणावं लागेल.

जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने आणि परंपरांनी लीप एअर साजरं केलं जातं. या परंपरेचाच एक भाग म्हणून फ्रान्समधे ‘ला बुगी डी सेपूर’ (la Bougie du Sapeur) नावाचं वृत्तपत्र फक्त ‘लीप इअर डे’च्या दिवशी म्हणजे ४ वर्षातून फक्त एकदाच प्रकाशित केलं जातं. सगळ्यात पहिल्यांदा १९८० मधे प्रकाशित झालेलं हे वृत्तपत्र तेव्हापासून आजतागायत फक्त २९ तारखेलाच निघतं. २९ फेब्रुवारीला जन्मलेल्या सेपर्स कॅण्डल या कॉमिक कॅरेक्टरवरून वृत्तपत्राने आपलं नाव धारण केलंय. तर अमेरिकेततल्या टेक्सासच्या सीमेवरील ‘अॅन्थनी’ हे शहर जगाचं ‘लीप एअर कॅपिटल’ म्हणून ओळखलं जातं.

तर फ्रेंड्स ही झाली लीपर्स मंडळींची मजेदार हिस्ट्री. आपल्या माहितीत कुणी लीपर्स असेल तर त्यांना बड्डे विश करायला विसरू नका. दणक्यात हॅप्पी बड्डे सेलिब्रेट झाला पाहिजे. अगदी नादखुळा. हॅप्पी बड्डे माय डिअर लीपर्स!

हेही वाचा : 

गाथासप्तशती: प्रत्येक घरात असावा असा मराठीतला आद्यग्रंथ

दिल्लीच्या दंगलीत एका पत्रकाराने कसा वाचवला स्वतःचा जीव?

आपण वापरत असलेल्या कॅलेंडरला आहे हजारो वर्षांचा इतिहास

सावरकरांना भारतरत्नः भाजपला अडचणीत आणणारी राष्ट्रपुरुष यादी काय आहे?

 

(लेखक हे मुक्त पत्रकार आहेत.)