राम गांधीजींच्या प्रभावाखाली होता तोपर्यंत रामाच्या नावानं कधी सांप्रदायिक दंगे झाले नाहीत. पण हाच राम गांधीच्या प्रभावाखालून निसटला आणि अडवाणींच्या ताब्यात गेला, तेव्हा तो हिंसक झालेला, सांप्रदायिक दंगे घडवून आणणारा झालेला आपण अनुभवलाय. म्हणून गांधीजींचा राम आज समजून घ्यावा लागेल.
गांधीजी नुकतेच आफ्रिकेतून भारतात आले होते, तेव्हाची ही गोष्ट. गोखलेंच्या सांगण्यावरून त्यांचं भारतभ्रमण सुरू होतं. हिमालयाजवळच्या महात्मा मुन्शीरामच्या आश्रमात ते गेले. तेथे एका कट्टर हिंदू धर्मीयाने गांधींना शरीरावर हिंदुत्वाच्या खुणा बाळगण्याचा आग्रह केला. जानवं घालायला त्यांनी नकार दिला. कारण खालच्या जातींना ते धारण करण्याचा अधिकार नाकारला होता.
मात्र डोक्याच्या मागे हिंदू परंपरेनुसार शेंडी ठेवायला ते राजी झाले. कालांतराने त्यांनी ही शेंडीही काढून टाकली. पण हिंदू धर्माची धरून ठेवलेली शेपटी मात्र त्यांनी कधीच सोडली नाही. धर्माचा अवकाश व्यापण्यासाठी तर ही शेपटी धरून ठेवणं गरजेचीच असल्याची धारणा असावी. म्हणूनच गांधीजींच्या आयुष्यात राम दिसतो. रामनाम दिसतं. रामनामाचा जप दिसतो. पण रामाचं मंदिर गायब दिसतं. रामाची मूर्तीही दिसत नाही. एवढंच काय रामाचा साधा फोटोही दिसत नाही.
गांधींचा बारकाईने अभ्यास केला तर एक गोष्ट स्पष्ट होते. ती म्हणजे गांधी धर्माचा अवकाश अजिबात सोडायला तयार नाहीत. ही गोष्ट चांगली की वाईट यावर वादच नाही, तर वादंगही होऊ शकतो. गांधीजींना हा अवकाश तर घट्ट धरुन ठेवायचाच आहे. पण ज्या धर्मांधांनी या मोकळ्या जागेवर अतिक्रमण करुन त्यावर ताबा मिळवलाय, बळजबरी कब्जा मिळवलाय, त्यांना तिथून हुसकावूनही लावायचंय.
गांधी ईश्वर मानतात पण या ईश्वराच्या दर्शनासाठी कधी मंदिरात जावं, त्याची पूजाअर्चा करावी, असं त्याला वाटत नाही. बरं, बाहेर मंदिरात जात नसेल तर किमान आश्रमात देव्हारा असावा. त्यालाही त्यांची मान्यता नाही. प्रार्थना गांधीजींच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. तेव्हा आश्रमाच्या परिसरात किमान प्रार्थना मंदिर असावं, हेही त्यांना मान्य नाही.
हे ही एक वेळ ठीक आहे. पण ज्यांना असं वाटतं, त्यांनाही ते अशा प्रकारचं कोणतंही मंदिर आश्रम परिसरात बांधू देत नाहीत. देव आहे पण मंदिर नाही. मंदिर नाही म्हणून मूर्ती नाही. आणि मूर्ती नाही म्हणून त्याची पूजा नाही. पण हाच माणूस येरवड्याच्या तुरुंगात असतो. तेव्हा पत्रव्यवहारात मात्र येरवडा मंदिरातून असा उल्लेख आवर्जून करतो. म्हणजे हा माणूस तुरुंगालाच मंदिर मानतो किंवा बनवतो.
मग या माणसाचा देव, ईश्वर, परमेश्वर आहे तरी कुठं? गांधीच मग कधीतरी आपल्याला हळूच पत्ता सांगतात. ‘कोट्यवधी मूक जनतेच्या हृद्यात आढळणाऱ्या परमेश्वराशिवाय मी दुसरा कोणताही परमेश्वर ओळखत नाही. या कोट्यवधी लोकांच्या सेवेतून मी सत्यरूपी देवाची सेवा करत असतो.’ आता हा दोघांचीही पंचाईत करून ठेवतो. देव मानणाऱ्यांची आणि देव न मानणाऱ्यांचीही.
मंदिरात देव नाही असं काहीसं सूचवून गांधीजी देवाच्या नावावर धंदा करणार्यांची पंचाईत करतात. तर देव न मानणाऱ्यांनी त्यांना तात्विक देव मानतो म्हणून आस्तिक कॅटेगरीत घ्यावं, तरी अडचण आणि त्यांना नास्तिक म्हणावं तरी पंचाईत.
हेही वाचाः कृतीच त्यांची भाषा होती
गांधीजींनी देवधर्माच्या नावाखाली किती लोकांना अडचणीत आणलं असेल, किती लोकांना गोंधळात टाकलं असेल, त्याचं त्यांनाच माहीत. गांधींनी देवधर्माच्या क्षेत्रात जेवढा धुडगूस घातला तेवढा कोणी घातला नसेल. पहिले तर गांधींनी देव या संकल्पनेलाच उलटं केलं. ‘परमेश्वर हेच सत्य’ म्हणजे गॉड इज ट्रूथ हेच खरं तर रुढ होतं. पण गांधीजींनी त्याला ‘सत्य हाच परमेश्वर’ म्हणजे ट्रूथ इज गॉड असं उलटं केलं. गांधीजींनी देवालाच उलटं केलं असेल तर त्याच्या धर्माला सहजासहजी थोडीच सोडणार आहेत.
हिंदू धर्माची व्याख्या करताना गांधी म्हणतात, अहिंसेच्या मार्गाने सत्याचा शोध घेणं म्हणजे हिंदू धर्म. तर ‘सत्य आणि अहिंसा’ ही गांधींची धर्मश्रद्धा. सत्याच्या शोधाची अविश्रांत साधना म्हणजे धर्म. गांधीच्या दृष्टीने ईश्वर म्हणजे सत्य आणि प्रेम. ईश्वर म्हणजे आचारधर्म आणि नैतिकता. निर्भयता म्हणजे ईश्वर. सद्सद्विवेक बुद्धी म्हणजे ईश्वर आणि आपल्या समाजाची आणि जनतेची सेवा हीच परमेश्वराची सेवा.
गांधीजींची यातली देवाधर्माची भाषा कोणत्याही अर्थाने धार्मिक वाटत नाही. गांधी स्वत:ला ‘मी सनातनी हिंदू आहे’ असंही म्हणतात आणि दुसऱ्याच वाक्यात, ‘पण मी वेदप्रामाण्य मानत नाही’ असंही म्हणतात. रूढ अर्थाने जो वेदप्रामाण्य मानत नाही, तो हिंदूच असू शकत नाही. गांधी तर म्हणतात, ‘मी सनातन हिंदू आहे.’
बरं हा सनातनी हिंदू शंकराचार्यांनाच उघड आव्हान देतो. म्हणतो, ‘वर्तमान शंकराचार्य आणि शास्त्री पंडितांनी हिंदू धर्माची खरी व्याख्या केली, असा त्यांचा दावा असला तरीही ती व्याख्या मी नाकारतो.’ त्यापुढे जाऊन ते म्हणतात, धर्माची कोणी कितीही पांडित्यपूर्ण व्याख्या केली तरीही माझ्या विवेकाला आणि नैतिक बुद्धीला जे पटणार नाही. अशा कोणत्याही गोष्टी मी स्वत:ला बंधनकारक मानत नाही, असंही सांगतात.
गांधी एका बाजूला हिंदू धर्मग्रंथांवर विश्वास आहे, असंही म्हणतात. पण दुसर्या बाजूला त्यातील प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ मानलीच पाहिजे, असं मी मानत नाही, असंही बोलतात. त्यांनी वेदांच्या अनुषंगाने विचारलेला एक प्रश्न खोचक भोचक तर आहेच. पण परंपरावाद्यांच्या जिव्हारी लागावा असाही आहे.
हेही वाचाः खऱ्या गांधींच्या विसरत चाललेल्या आठवणी
ते म्हणतात ‘ब्राम्हण वेदांचे अध्ययन केल्यामुळे धर्मगुरू होत असतील, तर वेद जाणणारा मॅक्सम्युलर आमचा धर्मगुरू ठरला पाहिजे.’ शेवटी हा धार्मिक माणूस असंही म्हणतो की, हिंदूस्थानातील प्रत्येक गरीबाला आपण पोटभर अन्न आणि अंगभर वस्त्र देऊ शकत नाही, तोपर्यंत त्यांच्या दृष्टीने धर्माला काही अर्थ उरत नाही.
धर्माच्या नावावर केलं जाणारं शोषण, देवाधर्माच्या नावावरचं कर्मकांड, वाईट चालीरीती, परंपरा, अस्पृश्यता, उच्चनीच भेदभाव दूर करण्यासाठी धर्माचा अवकाश सोडून चालणार नाही, असं तर गांधी मानत होते? संतपरंपरेचीही हीच धारणा दिसते. तुकारामांनी धर्मावर, त्याच्या नावाने चालणार्या ढोंगबाजीवर कितीही कठोर प्रहार केले असतील. पण त्यांनी कधी विठ्ठल सोडला नाही.
‘तुमच्या देवावर काय कुत्रंही टांग करुन मुतते’ इतपत कठोर भाषा गाडगेबाबांनी वापरली असेल, पण ‘गोपाला’ सोडला नाही. तुकाराम तर आपल्या एका अभंगात स्पष्टपणे म्हणतात, ‘आहे ऐसा देव वदवावी वाणी। नाही ऐसा मनीं अनुभवावा।।’ हे सगळं माहीत असूनही विठ्ठल धरुन ठेवतात. गांधीही राम धरून ठेवतात. मी सनातनी हिंदू आहे. असं म्हणत धर्माची शेपटी मात्र सोडत नाही.
भारतीय विचार परंपरेत नकार देण्याच्या अनेक परंपरा आहेत, त्यात पोटात शिरून नकार देणं, ही एक मध्ययुगीन परंपरा आहे. भक्ती आणि संतपरंपरेने हीच पद्धत स्वीकारली, असं दिसतं. मी तुमचाच आहे असं म्हणत म्हणत त्यातली स्युडो प्रस्थापित व्यवस्था नाकारणं आणि नवा आशय देत राहणं, असं या पद्धतीमधे केलं जातं. गांधीही तसंच करतात की काय असं वाटतं.
तुम्ही देव, धर्म मानत नसाल तर कृपया तुम्ही आमच्या देवाधर्मावर बोलू नका, असं परंपरावादी धर्मांधच नाही तर सर्वसामान्य माणूसही म्हणवू शकतो. धर्म ही अफूची गोळी आहे, असं तुम्ही मानता ना, तर ठीक आहे. पण तुम्हाला आता आमच्या देवाधर्मावर बोलण्याचा काय अधिकार? तुम्ही आपला धर्म सोडला ना? दुसऱ्या धर्मात गेलात ना?
हेही वाचाः विनोबा भावे : सुळी दिलेले संत (भाग १)
‘गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला’ असं म्हणून धर्माचा अवकाश व्यापणारे संत गाडगेबाबाच ‘तुमचा देव काय, त्याच्यावर कुत्रंही मुतत.’ अस ठणकावून म्हणू शकतात. आणि ते त्यांच्या तोंडून सर्वसामान्यही ऐकून घेतात. त्यांच्या धार्मिक भावना दुखावत नाहीत. हेच वाक्य देवधर्म न मानणाऱ्याने उच्चारलं, तर ते कदाचित सहनही केलं जाणार नाही. ते वाक्य उच्चारणाऱ्याला लोक नाकारतीलही. हीच शक्यता अधिक आहे.
देव आणि धर्माचा आधार शोषकांनी घेत शोषण केलं. म्हणून देव, धर्म नाकारणाऱ्या परिवर्तनवादी चळवळी करणाऱ्यांपेक्षा, देवधर्म स्वीकारत ज्यांनी परिवर्तन घडवून आणण्याचा प्रयत्न केला तो जास्त परिणामकारक ठरलाय का? हे ही एकदा गांभीर्याने तपासलं पाहिजे. अखेर देव आणि धर्म ही समाजाची मानसिक गरजच असेल तर तिचा अव्हेर आपण कितपत करू शकू?
देवधर्माच्या बाबतीत गांधी म्हणतात, ‘लंगड्या माणसाला जोवर तुम्ही चालायला शिकवत नाही तोवर त्याच्या कुबड्या काढून घेण्याचा अधिकार नाही.’ देवाला निवृत्त करता करता अनेकजण निवृत्त झाले, पण देव काही निवृत्त होताना दिसत नाही. ज्या देवाला आपण समाजातूनच काय घरातूनही निवृत्त करू शकलो नाही, त्या देव आणि धर्माच्या मागे हात धुवून लागण्यापेक्षा त्याचा अवकाश व्यापून आपण त्याहून अधिक काही चांगलं करू शकू, ही धारणा गांधीजींची होती.
ती त्यांची भूमिका योग्य की अयोग्य यावरही बराच वाद होवू शकतो. परंतु राम गांधीजींच्या प्रभावाखाली होता तोपर्यंत रामाच्या नावानं कधी सांप्रदायिक दंगे झाले नाहीत. पण हाच राम गांधीच्या प्रभावाखालून निसटला आणि लालकृष्ण अडवाणींच्या ताब्यात गेला, तेव्हा तो हिंसक झालेला, सांप्रदायिक दंगे घडवून आणणारा झालेला आपण अनुभवलाय.
जी गोष्ट रामाची तीच गोष्ट गाईचीही आपण अनुभवलीय. गाय जोपर्यंत गांधींच्या खुट्याला बांधून होती, तोपर्यंत गाय हा पाळीव प्राणीच होता. पण हीच गाय आता हिंस्त्र पशू झाल्याचाही आपण अनुभव घेतोय. धर्माच्या बाबतीत तरी याहून वेगळं काय घडतंय?
गांधींच्या धार्मिक असण्याने पुरोगामी, डाव्यांचा पार गोंधळ उडाला असेल. परंपरावाद्यांनी मात्र हा आपला दुष्मन आहे, हे नीट ओळखलं होतं. त्यांच्या धार्मिक धुडगूसाने आपली दुकानदारी कायमची बंद होऊ शकते, हेही त्यांच्या ध्यानात आलं. हा संभाव्य धोका लक्षात घेऊन गांधीजींचा खून करून त्यांना आपल्या रस्त्यातूनच कायमचं हटवून टाकलं.
आज तर धर्माचा हा सारा अवकाश धर्मांधांनी, परंपरावाद्यांनी व्यापलाय. संत, महाराज, बुवा, बाबा, योगी, साधू, साध्वी यांचा धर्माच्या नावाने राजकारणातला प्रवेशही भयावह आहे. एका अर्थाने गांधीच यांना रोखू शकतो, पण त्यासाठी गांधी समजून घ्यावा लागेल ना?
(लेखक हे ज्येष्ठ संपादक आणि सामाजिक कार्यकर्ते आहेत.)
हेही वाचाः
गांधींच्या चातुर्वर्ण्याचं काय करायचं?