चला, आयडिया ऑफ इंडियाचे चौकीदार होऊया!

०४ जून २०१९

वाचन वेळ : ७ मिनिटं


मोदी सरकार १.० च्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या गळचेपीचा मुद्दा वेळोवेळी ऐरणीवर आला. विवेकवाद्यांच्या हत्या, मॉब लिंचिंग या साऱ्या प्रकरणात सरकारने चुप्पी साधल्याने साहित्यिक, कलावंतांनी पुरस्कार आंदोलन केलं. आता मोदी सरकार २.० च्या काळात आयडिया ऑफ इंडियाचे चौकीदार होण्याची गरज आहे, हा मुद्दा अधोरेखित करणारा हा लेख.

निवडणुका संपल्या. मोदी सरकार पुन्हा निवडून आलं. पण लढाई संपलेली नाही. २०१४ मधे भारताच्या राजकीय प्रक्रियेशी विसंगत आणि संवैधानिक नैतिकतेच्या विरोधी सरकार बहुमतासह सत्तेत आलं. आणि अवघ्या काही वर्षांत विवेकवाद्यांच्या हत्या, अल्पसंख्यांक आणि दलित समुदायातल्या व्यक्तींच्या झुंडींनी केलेल्या हत्या, स्वायत्त संस्थावरचे हल्ले, सार्वजनिक संस्थांचं अधःपतन, बेसुमार खासगीकरण, शैक्षणिक अभ्यासक्रमांमधे बदल, नोटबंदी, जीएसटी अशा अनेक बाबींनी खडतर आव्हान निर्माण झालंय.

मोदी-शहांची पोलादी पकड असलेल्या या कालखंडात सत्यासाठी सत्तेच्या विरोधात उभं राहणं हे कमालीचं धाडसाचं काम होतं. १९५२ च्या लोकसभा निवडणुकांनी भारतात लोकशाही निर्माण होऊ शकते काय, या प्रश्नाचं सकारात्मक उत्तर दिलं. २०१९ च्या निकालाने लोकशाहीच्या अस्तित्वावरच गंभीर पेच उभे केलेत. म्हणूनच या काळात मोदी सरकारच्या विचार, धोरण आणि कृतींना ठोस विरोध करणं याची तुलना कदाचित स्वातंत्र्यलढा, आणीबाणीविरोधी लढ्यातल्या सहभागाशी करता येऊ शकेल.

या अघोषित आणीबाणीच्या काळात अनेकजण निर्भीडपणे सत्तेविरोधात उभे राहिले. आणि त्यांनी इतरांनाही लढण्याची प्रेरणा दिली. त्यातल्या काहीजणांचा उल्लेख या लेखात आहे. या सर्वांप्रती कृतज्ञ राहून, सोबत राहून लढा मोठा करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या व्यक्ती एकेकट्या नाहीत. त्यांच्यासोबत आपण आहोत, हा विश्वास निर्माण करणंही गरजेचं.

हेही वाचाः ट्रम्पतात्यांचा दोस्त नरेंद्र मोदींना शपथविधीच्या दुसऱ्याच दिवशी झटका

१.    गणेश देवी

भाषातज्ञ म्हणून परिचित असलेल्या गणेश देवी यांनी या काळात मोलाची भूमिका बजावली. दाभोलकर-पानसरे यांच्या हत्यांनंतर देवींच्या पुढाकाराने ‘दक्षिणायन’ ही सामाजिक, सांस्कृतिक चळवळ सुरु झाली. कलबुर्गींच्या हत्येनंतर सत्ताधीशांनी ज्या प्रकारचा प्रतिसाद दिला ते पाहून अनेक साहित्यिक, कलावंतांनी पुरस्कार परत केले. 

उदय प्रकाश, नयनतारा सहगल यांनी सुरू केलेल्या या चळवळीत सक्रिय सहभाग घेत देवींनी विरोधाचा आवाज बुलंद केला. गौरी लंकेश हत्येच्या तपासानंतर महाराष्ट्र, कर्नाटकमधल्या तब्बल ३५ साहित्यिक कलावंतांना पोलीस सुरक्षा देण्यात आली. यातले बहुतांश लोक दक्षिणायनशी संबंधित असल्याचं दिसतं.

२. रवीश कुमार

इलेक्ट्रॉनिक मिडीया सत्ताधाऱ्याचा पूर्णतः बटीक झालेला असताना रवीश कुमारांची पत्रकारिता हा या काळात आश्वासक किरण होता. एका बाजूला प्रचंड उन्मादी प्रपोगंडा सुरु असताना रवीश यांनी शांत, संयत प्रकारे प्राइम टाइम शोज केले. त्यातून मूलभूत प्रश्न समोर तर आलेच, पण त्यासह भारतीय मतदारवर्ग अधिक जागरुक आणि समंजस बनण्याची शक्यताही निर्माण झाली.

एनडीटीवीवर एक दिवसाची बंदी आणण्याचा प्रयत्नही मोदी सरकारने केला. मात्र या दमनशाहीला न जुमानता संपूर्ण टीवी स्क्रीन काळी करत रवीश कुमार यांनी सर्जक शो केला. २०१७ पासून रवीश यांच्या शोमधे भाजप प्रवक्त्यांचं येणं बंद झालं. रवीश यांनी टिपिकल टॉकशो ऐवजी निरनिराळे प्रयोग करत भारतीय पत्रकारिता जिवंत ठेवली. 

न्या. लोया यांच्या संशयास्पद मृत्यूविषयीच्या खटल्याविषयी रवीश यांनी ४ शोज केले. राष्ट्रीय मिडियात याविषयी शो करणारे रवीश हे कदाचित एकमेव पत्रकार असतील. ‘फ्री वाईस’ या आपल्या पुस्तकातून रवीश यांनी आपल्याला भीतीतून बाहेर येत आपला सदसदविवेक जागृत ठेवण्याचं आवाहन केलं. एनडीटीवी या वृत्तसमूहाने रवीश यांना सहकार्य केलं, ही बाबही विशेष नोंद घेण्यासारखी आहे.

३. राणा अय्युब

राणा अय्युब यांनी वेषांतर करुन २००२ मधली गुजरात दंगल आणि त्यानंतरच्या एनकाउंटर्समधे सहभागी असणाऱ्या अनेकांच्या भेटी घेतल्या. त्यांच्यासोबत संवाद साधला. छुप्या कॅमेऱ्यांनी या संभाषणाचे विडीओ फुटेज तयार केलं. त्याचं शब्दांकन करत ‘गुजरात फाइल्स’ हे पुस्तक लिहिलं. ते स्वतः प्रकाशित केलं. अक्षरशः जीव पणाला लावून राणा यांनी केलेलं धाडस निव्वळ कौतुकास्पद आहे.

या पुस्तकानंतर राणा अय्युब यांना ट्रोल केलं गेलं. धमक्या दिल्या गेल्या. राणा यांच्या जिवाला धोका आहे, त्यांचं संरक्षण करणं ही भारत सरकारची जबाबदारी असल्याचं पत्रक संयुक्त राष्ट्र संघटनेनं काढलं. यातूनच याचं गांभीर्य आपल्या लक्षात येईल. राणा यांच्या धाडसी कर्तृत्वाला सलाम करत ही लढाई अधिक व्यापक करणं आपलं कर्तव्य आहे.

हेही वाचाः रवीश कुमारः नजर पैदा करणारा पत्रकार

४. निरंजन टकले

सोहराबुद्दीन एनकाउंटर खटल्याचे अधिपत्य करणाऱ्या न्या. ब्रजगोपाल लोया यांच्या संशयास्पद मृत्यूची स्टोरी निरंजन टकले यांनी केली. यासाठी द वीकसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातकीर्त माध्यमसमूहातल्या आपल्या नोकरीचा राजीनामा त्यांनी दिला. द कॅरवान या मॅगेझिनने पत्रकारितेची प्रतिष्ठा राखत लोया प्रकरणाबाबत सुमारे २५ हून अधिक स्टोरीज प्रसिद्ध केल्या. या खटल्यानंतरच सुप्रीम कोर्टातल्या ४ न्यायाधीशांनी पत्रकार परिषद घेतली आणि भारतीय लोकशाही धोक्यात असल्याचं सूतोवाच केलं.

भारतातल्या मेनस्ट्रीम मीडियाने याविषयी वार्तांकन करणं टाळलं. टकले यांची निंदानलस्ती करणं, धमक्या देणं आदी प्रकार त्यांच्याबाबतही घडले. टकले यांनी केवळ याच प्रकरणाबाबत नाही तर त्याधी सावरकर, बजरंग दल, नक्षलवाद, पाकिस्तानातले युद्धकैदी, कोपर्डी प्रकरण आदींबाबत केलेल्या स्टोरीज विशेष उल्लेखनीय आहेत. निरंजन टकले हे सत्याच्या वाटेवरचे करारी धाडसी वाटसरु आहेत. असा माणूस आपल्यासोबत असणं ही आपल्यासाठी भूषणावह बाब आहे.

५. आनंद पटवर्धन

‘राम के नाम’, ‘जय भीम कॉम्रेड’, ‘वॉर ॲन्ड पीस’ अशा अत्यंत महत्त्वाच्या डॉक्युमेंट्रीजचे डायरेक्टर आनंद पटवर्धन यांनी समकाळाचा स्फोटक द्स्तावेज मांडणारी ‘विवेक’ ही डॉक्युमेंट्री आणली. युट्युबवर या डॉक्युमेंट्रीमधला भाग उपलब्ध करुन देऊन त्यांनी लोकांचा विवेक जागृत व्हावा, यासाठी मोलाचं योगदान दिलंय.

विवेकवाद्यांच्या हत्या, रोहित वेमुलाची आत्महत्या, जेएनयु प्रकरण, उना आणि हिंदुत्ववादी संघटनांची कारस्थानं या सर्व गोष्टींबाबत डोळ्यात अंजन घालणारी ही डॉक्युमेंट्री ऐतिहासिक आहे, हे निश्चित. स्वतः पटवर्धन यांची प्रामाणिक तळमळ या डॉक्युमेंट्रीतून दिसून येते. एबीवीपी किंवा इतर हिंदुत्ववादी संघटनांसोबत थेट भिडण्याची त्यांची जिगर विशेष दखल घेण्याजोगी आहे.

मनाची पाटी कोरी असलेल्या तरुण वर्गाची वैचारिक बैठक घडवण्यासाठी ही डॉक्युमेंट्री अतिशय उपयुक्त आहे. स्वतः पटवर्धन यांनीही राष्ट्रीय पुरस्कार परत करत कलाकारांनी पुरस्कार परत करावेत, म्हणून मोहीम चालवली.

हेही वाचाः राजकारणातल्यापेक्षाही इतिहासातली चौकीदारी जास्त इंटरेस्टिंग

६. कन्हैया कुमार

९ फेब्रुवारी २०१६ ला दिल्लीच्या जवाहरलाल नेहरु विद्यापीठात तथाकथित देशद्रोही घोषणा दिल्यावरुन वाद निर्माण केला गेला. त्यातून कन्हैया कुमारचं नेतृत्व पुढे आलं. पटियाला कोर्टहाउससमोर कॅमेऱ्यासमोर त्याला मारहाण झाली. धमक्या, मारहाण यांना न जुमानता कन्हैया कुमारने देशभर संविधानाचा, लोकशाहीचा जागरच केला. त्याने घोषणा दिल्याचा कुठलाही पुरावा समोर आला नाही. उलटपक्षी खोटे विडीओ तयार केले गेल्याचं निदर्शनास आलं.

अत्यंत सामान्य कुटुंबातून आलेल्या कन्हैयाने दाखवलेली राजकीय समज वाखाणण्याजोगी आहे. मोदी-शहा या जोडगोळीच्या विचारांचा धोका ओळखून कन्हैयाने वैचारिक लढा उभारण्याचा यशस्वी प्रयत्न केला. लोकसभा निवडणुकीत बेगुसरायमधून तो पडला असला तरी सर्वसामान्य भारतीयांची मनं त्याने जिंकली आहेत.

७. जिग्नेश मेवानी

रोहित वेमुला प्रकरण आणि गुजरातमधलं उना दलित अत्याचार प्रकरण या दोन्हींविरोधातल्या चळवळीतून जिग्नेशची चर्चा मीडियामधे होऊ लागली. लॉ ग्रॅज्युएट असलेल्या जिग्नेशने कॉलेजमधे असल्यापासूनट चळवळीत भाग घेतलेला आहे. कनिष्ठ समजल्या जाणाऱ्या जातीत जन्माला आल्यामुळे त्याने स्वतः भेदभावपूर्वक वर्तणुकीचा अनुभव घेतलाय. या अनुभवांमधून त्याची वैचारिक बैठक पक्की झाली असावी, असं दिसतं.

मेलेल्या गुराढोरांच्या कातडीचे काम करणं सोडून कनिष्ठ जातींनी आपला विकास करावा, यासाठी तो प्रयत्नशील राहिलाय. दलित राजकारणाला अस्मितेत अडकवण्याचा प्रयत्न होत असताना जिग्नेशसारखा तरुण ‘मन की बात’ नाही तर ‘मुद्दे की बात’ करतो, हे अधिक महत्त्वाचं. बाबासाहेबांचे पुतळे आणि बुध्दाची नावं देण्यापलीकडे भौतिक प्रश्नांविषयी त्याला आस्था असल्याचं वारंवार दिसून आलं.

गुजरात विधानसभेसाठी त्याने वडगावमधून निवडणूक लढवली. त्याला काँग्रेस, आप आणि स्वराज इंडियासह अनेकांनी पाठिंबा दिला. मोदींच्या गुजरातेत जिग्नेशने पहिल्याच निवडणुकीत विजय मिळवणं ही आश्वासक सुरवात आहे.

हेही वाचाः डॉ. पायल तडवीः मेडिकल कॅम्पसमधल्या जातीव्यवस्थेचा बळी!

८. ध्रुव राठी

अवघ्या २३ वर्षांच्या ध्रुव राठीने युट्युब विडीओजच्या माध्यमातून मोदी सरकारची पोलखोल केली. २०११-१२ पासून राजकारणामधे रस घेऊ लागलेल्या ध्रुवला २०१४ मधे मोदी सरकार आल्याने भ्रष्टाचारास आळा बसेल, मोदी पर्यायी राजकारण उभं करतील, अशी आशा होती. मात्र मोदी सरकार भयंकर चुकीच्या दिशेने देशाला नेत असल्याचं बघून प्रचंड वैफल्यातून त्याने एक विडीओ युट्युबवर पोस्ट केला. पुढं तो प्रचंड व्हायरल झाला.

अनेक समकालीन मुद्द्यांवर त्याचे विडीओज जनमत घडवण्यात महत्त्वाचे ठरले. भाजपने ध्रुव राठीचा आवाज बंद व्हावा म्हणून खोटी पोलिस तक्रार केली. त्याचं फेसबुक पेज बंद पाडण्याचा प्रयत्न केला. पण त्यातून ध्रुवची लोकप्रियता वाढतच गेली. कोट्यवधी रुपये जाहिरातींवर खर्च करणाऱ्या भाजपच्या फेसबुक पेजेसहून ध्रुवला अधिक पसंती मिळत गेली.

९. प्रतीक सिन्हा 

२०१२-१३ पासून भाजप आयटी सेल प्रचंड प्रमाणात फेकन्यूज पसरवून जनमत तयार करतंय. ट्रोल करणारी एक मोठी सेनाच यांनी निर्माण केली असल्याचं ‘आय एम अ ट्रोल’ या स्वाती चतुर्वेदींच्या पुस्तकातून समोर आलं. जेएनयु प्रकरण, अमेरिकेतली राष्ट्राध्यक्ष निवडणूक, ब्रेक्झिट आदी बाबींनंतर फेकन्यूजचा रोल सर्वांच्या ध्यानी येऊ लागला. अशा वेळी प्रतीक सिन्हा यांनी पोस्टस, मेसेजेस, बातम्या यांची पडताळणी करण्यासाठी Alt News नावाची वेबसाईट सुरु केली. 

यातून भाजपची फेक न्यूज फॅक्टरी सर्वांसमोर आली. विरोधी पक्षांनी फेक न्यूज पसरवण्याचे केलेले प्रयत्नही प्रतीक यांनी उघडकीस आणले. निव्वळ फॅक्ट समोर आणण्याचं हे कामही मोठं जिकिरीचं होतं. अगदी आताच्या या निवडणुकीच्या काळात २०० हून अधिक ट्रेंडिंग न्यूजचा पर्दाफाश सिन्हा यांनी केला. यातल्या बहुतांश बातम्या भाजप आणि कंपनीने पेरल्या असल्याचं समोर आलं.

हेही वाचाः गांधी घराण्याशिवाय काँग्रेसचं चांगभलं होईल?

१०. राहुल गांधी

२०१४ मधे काँग्रेसला अवघ्या ४४ जागांवर समाधान मानावं लागलं. त्यानंतर राहुल गांधींना प्रचंड प्रमाणात ट्रोल करणं सुरु झालं. राहुल गांधी जणू पप्पू आहे, अशी निर्भत्सना केली गेली. २०१७च्या अखेरीपर्यंत राहुल गांधी यांनी काही बोलताच त्यांना पूर्णपणे बदनाम करण्याचं षड्यंत्र यशस्वी होत होते. घराण्याच्या वारशाचं ओझं, पक्षांतर्गत आव्हानं आणि विरोधी पक्षाकडून होत असलेली निंदानालस्ती या साऱ्याला तोंड देत राहुल यांनी ज्या तडफेने भाजप-आरएसएसला उत्तर दिली त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे.

भाजपच्या विखाराला विखाराने, द्वेषाने उत्तर न देता, प्रेमाची भाषा सांगत राहुल गांधींचा खऱ्या अर्थाने उदय झाला. संसदेत मोदींना मिठी मारुन राहुल यांनी लोकांची मनं जिंकली. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगढमधे काँग्रेसने विजय मिळवला आणि यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही राहुल यांनी शांत, संयत भाषेत प्रचाराचं नॅरेटिव आपल्या काबूत ठेवलं.

विरोधकांच्या प्रवृत्तीला आपला विरोध आहे, व्यक्तिगत त्यांना नाही, हे पुन्हा आपल्या उक्ती-कृतीतून दाखवून दिलं. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेससचा दारुण पराभव झाला असला तरी भारताची ‘आयडिया ऑफ इंडिया’ वाचवण्यासाठी राहुल गांधींनी उचललेली पावलं आश्वासक आहेत.

भारताच्या आत्म्यावरच घाव घातला जात असताना ज्यांनी आयडिया ऑफ इंडिया वाचवण्यासाठी प्रयत्न केले त्यातली ही काही उदाहरणं आहेत. कलाकार, साहित्यिकांपासून ते सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत अनेकजण या लढ्यात सामील आहेत. हे धर्मनिरपेक्ष, बहुसांस्कृतिक लोकशाही सांगणाऱ्या ‘आयडिया ऑफ इंडिया’चे खरेखुरे चौकीदार आहेत.  हा लढा अधिक व्यापक करण्यासाठीची प्रेरणास्थानंही.

मोदी सरकार अधिक संख्याबळासह पुन्हा निवडून आलं. तरीही हा देश प्रेमाच्या अधिष्ठानावर उभा आहे आणि असेल, याचा रिमाइंडर आपण सर्वांनी लावायलाच हवा. आणि त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठाही करायला हवी.

हेही वाचाः 

भावा बहिणींनो, चौकीदार चोर नसूही शकतो!

दोस्तांनो, आज सायकल डे, मग पुन्हा एकदा सायकल चालवूया?

कुणाच्या खिजगणतीतही नसणाऱ्या बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला कसं हरवलं?

(लेखक हे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात टीचिंग असोसिएट म्हणून कार्यरत आहेत.)