यवतमाळलाच नयनतारा सहगल यांचा समांतर कार्यक्रम करुया

०८ जानेवारी २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


नयनतारा सहगल या महाराष्ट्रापासून लांब असल्या तरी महाराष्ट्राची लेक आहेत. आपल्याच मुलीला घरी यायचं निमंत्रण द्यायचं आणि नंतर तिला येऊ नकोस असं सांगायचं. हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही. साहित्य महामंडळ झालं असेल लाचार, पण महाराष्ट्र लेचापेचा झालेला नाही. आणि विदर्भाचं आदरातिथ्य अजून पातळ झालेलं नाही. आपण मराठी माणसांनी मिळून नयनतारा सहगल यांचा समांतर कार्यक्रम आयोजित करायलाच हवा.

साहित्य महामंडळ म्हणजे काही महाराष्ट्र नाही आणि मराठी साहित्य विश्वही नाही. मराठी भाषा काही त्यांच्या ओंजळीने पाणी पित नाही. मराठी संस्कृती काही साहित्य संमेलनांची आश्रितही नाही. आपली मराठी या संमेलनांच्या अलीकडे पलीकडे खूप अथांग पसरलेली आहे. ती तुमच्या माझ्या आपल्या सर्वांची आहे. मराठी बोलणाऱ्या, वाचणाऱ्या, लिहिणाऱ्या, गाणाऱ्या, पाहणाऱ्या सगळ्यांचीच आहे. ती आपल्यामुळे आहे. आपण तिच्यामुळे आहोत. 

त्यामुळे आपल्या मराठी संस्कृतीची प्रतिष्ठा जपण्याचं काम आपलं आपल्यालाच करायचं आहे. मराठीची मिरास असण्याचा दावा करणाऱ्या साहित्य महामंडळाची ती कुवत नाही, हे आता सिद्ध झालंय. नयनतारा सहगल यांना साहित्य संमेलनाचं उद्घाटन करायला पाठवलेलं निमंत्रण त्यांनी मागे घेतलंय.  

हेही वाचाः लेखक, कवींनी बहिष्कार टाकला, संमेलनाध्यक्ष काय करणार?

नयनतारा सहगल यांना सन्मानाने निमंत्रण पाठवलं. पण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कोणत्या तरी उपाध्यक्षाने धमकी दिली, म्हणून नयनतारा सहगल यांचं निमंत्रण मागे घेतलं. त्या धमकी देणाऱ्याची औकात ती काय! आणि त्यासाठी नयनतारा सहगल यांच्यासारख्या लेखिकेचं निमंत्रण मागे घेतलं जातं, हे काही पटणारं नाही. त्याची खरं कारणं त्यांची त्यांनाच माहीत. पण आपल्या मराठीत निमंत्रण मागे घेणं असा कोणताही वाक्प्रचारच मुळात नाही. कारण तसा असंस्कृतपणा करणं, ही आपली संस्कृतीच नाही. तरीही महामंडळाने मराठी मातीशी बेईमानी करत माती खाल्लीच.

नयनतारा सहगल या मोठ्या लेखिका आहेत. त्या पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या भाची आहेत. त्यांची राजकीय भूमिका कोणत्या आहेत? या सगळ्या गोष्टी फारच नंतरच्या आहेत. त्या महाराष्ट्राची लेक आहेत, हे जास्त महत्त्वाचं आहे. त्यांचं आडनाव सहगल असलं. त्या उत्तरेतच लहानाच्या मोठ्या झाल्या असतील. तरीही त्यांचे वडील बॅ. रणजीत सीताराम पंडित हे मराठी होते. ते उत्तम साहित्यिक, अनुवादक होते. ब्रिटीश सरकारची माफी मागून तुरुंगातून सुटता येईल हे माहीत असूनही देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राण देणारे ते खरे स्वातंत्र्ययोद्धे होते. हे सारं आपल्याला सहगल यांच्या न झालेल्या भाषणामुळेच कळतंय. 

महाराष्ट्रापासून लांब राहून महाराष्ट्राशी आपला स्नेह जपणाऱ्या महाराष्ट्राच्या या लेकीला साहित्य महामंडळाने साहित्य संमेलनाचं निमंत्रण पाठवलं. सहगल यांनी ते आनंदाने स्वीकारलं. वयाच्या नव्वदीत असूनही उत्साहाने भाषण तयार केलं. पण अचानक त्यांचं निमंत्रणच आयोजकांकरवी मागे घेण्यात आलं. हे एक मराठी म्हणून लाज वाटायला लावणारं होतं. हे करणारे लोक आपल्या मराठी साहित्य जगताचं  नेतृत्व करतात, याची किळस वाटायला लावणारं होतं. त्यांच्या पाठीचा कणा इतका भुसभुशीत झालाय की किमान स्वाभिमान उरला नाही. त्यांचं मन इतकं कठोर झालंय की त्यात काहीच ओलावा उरला नाही. साधी नाती जपणं यांना जपत नाही. मग ते स्वतःला साहित्यिक कसे म्हणवून घेतात? 

साहित्य महामंडळाने केलेल्या नाकर्तेपणाचा धिक्कार कितीही केला तरी कमीच आहे. निषेध म्हणून संमेलनावर कुणाही लिहित्या माणसाने बहिष्कार टाकणं स्वाभाविकच आहे. पण झालं त्याने महाराष्ट्राची नाचक्की झालीय, हे मात्र नक्की. हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही. साहित्य महामंडळ झालं असेल लाचार, पण महाराष्ट्र लेचापेचा झालेला नाही. आणि विदर्भाचं आदरातिथ्य अजून पातळ झालेलं नाही. 

हेही वाचाः मग संत नामदेवांना पंजाबने मान दिला, ते चुकलंच

हे सिद्ध करायचं असेल तर आता एकच उपाय आहे. आपण मराठी माणसांनी मिळून नयनतारा सहगल यांचा समांतर कार्यक्रम आयोजित करायलाच हवा. साहित्य महामंडळ गेलं तेल लावत. आपण सगळे मिळून आपल्या हिमतीवर एक कार्यक्रम सहज करू शकतो. त्यामुळे निदान आपण महामंडळाच्या निमंत्रण मागे घेण्याच्या पापातले सहभागी तर होणार नाही. आपण आपला कार्यक्रम करू. जो कोणत्याही एका संस्थेचा नसेल, तो मराठी माणसाचा असेल. मराठी माणसाची खरी अस्मिता जपण्याचा असेल. 

कोलाज डॉट इन kolaj.in अशा कार्यक्रमाचा हा एक आराखडा महाराष्ट्रासमोर ठेवतंय. तेही नियोजनाला आता अगदीच कमी दिवस उरलेत म्हणून. त्यामुळे त्याविषयीच हे तपशील मांडले आहेत. हे असंच व्हायला पाहिजे, असं बिलकूल नाही. फक्त कार्यक्रम व्हायलाच हवा.  

काय असू शकेल हा कार्यक्रम? 

नयनतारा सहगल यांनी उद्घाटक म्हणून केलेलं भाषण कळीचा मुद्दा ठरलंय, हे उघड आहे. ज्या भाषणासाठी त्यांचं निमंत्रण मागे घेतलं, ते ढोल ताशे वाजवत नाचत गाजत सन्मानाने झालंच पाहिजे. एक कार्यक्रम आयोजित करावा. त्यासाठी सहगल यांना बोलवावं. त्यांचं भाषण व्हावं. 

कधी असावा कार्यक्रम?

कार्यक्रम साहित्य संमेलनाच्या काळातच व्हायला हवा. नंतर करून काही मतलब उरणार नाही. ११, १२ आणि १३ अशा तारखा संमेलनाच्या तारखा आहेत. १३ तारखेला रविवार आहे. तो दिवस उत्तम आहे. आयोजनासाठी त्यामुळे थोडा वेळही मिळू शकेल. 

कुठे असावा कार्यक्रम? 

कार्यक्रम यवतमाळलाच व्हायला हवा. शहर छोटं आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या आयोजकांनी सगळेच महत्त्वाचे हॉल आणि लॉन्स आपल्या ताब्यात घेतले असणारच. अशावेळेस फक्त शाळा आणि कॉलेजांचे हॉल हाच पर्याय उरतो. किंवा मग एखाद्या मैदानात मंडप उभारावा लागेल. फक्त त्याच्यामुळे खर्च वाढेल. 

हेही वाचाः साहित्य संमेलनः चार घटकांसाठी कसोटीचे तीन दिवस

कार्यक्रमाचं स्वरूप काय असू शकेल? 

एका दिवसाचा कार्यक्रम असावा. नयनतारा सहगल यांनी भाषण करावं किंवा त्याच्या मराठी अनुवादाचं अभिवाचन व्हावं. त्यानंतर त्यांची मुलाखत होऊ शकते. वसंत आबाजी डहाके, नागनाथ कोतापल्ले, श्रीपाल सबनीस, लक्ष्मीकांत देशमुख यांच्यासारखे माजी संमेलनाध्यक्ष या भाषणावर आपली मतं मांडू शकतील. किंवा त्यांना विचारांच्या गळचेपीविषयी नेमके विषय वाटून देता येतील. नंतर एखादं कविसंमेलन होईल. बहिष्कार करणाऱ्या साहित्यिकांसाठी पर्याय देता येईल.  

आयोजन कोण करू शकेल? 

राजकारणाशी संबंधित नसलेली एखादी संस्था यासाठी पुढे आली तर तिला अग्रक्रम द्यायला हवा. शिवाय माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके हा एक चांगला पर्याय आहे. ते स्थानिक आहेत. ते दीर्घकाळ मराठीचे प्राध्यापक होते. मराठी साहित्याचा विशेषतः संतसाहित्याचा त्यांचा अभ्यास आहे. स्वभावाने ते नम्र आहेत. शिवाय राजकारणी असल्यामुळे कमीत कमी वेळात आयोजन करण्यात त्यांची मदत होईल. आर्थिक खर्चाच मात्र सर्वच उपस्थितांनी हातभार लावावा.  

नयनतारा सहगल यांच्याशी संपर्क कोण करू शकेल?

यासाठी गणेश देवी यांच्यासारखा देशपातळीवर काम करणाऱ्या भाषातज्ञाची मदत होऊ शकते. त्यांना झाला प्रकार नीट माहीत आहे. दक्षिणायनच्या चळवळीतून ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विश्वात विधायक हस्तक्षेप करतच आहेत. त्यांच्याशी संपर्क साधला तर ते सहगल यांच्याशी संपर्क साधू शकतील किंवा मार्ग तरी सांगू शकतील. शिवाय आयोजनातही दक्षिणायनची मदत होऊ शकते. इतरही कुणी सहगल यांच्या संपर्कात असतील, तर त्यांनाही सांगता येऊ शकतं. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात ते फारसं अवघडही राहिलेलं नाही. हे दिवस सहगल यांना राखून ठेवले असतील. त्यामुळे त्या येऊही शकतील.