चला यंदा इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करूया!

३१ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


गणेशोत्सव म्हटलं की ढोल, ताशे, मिरवणुका, भक्ती, जल्लोष हे सगळं आलंच. गणपती हा आपला लाडका बाप्पा. मग त्याच्यासाठी आपण प्रदूषण करणारे पीओपी गणपती आणि थर्माकोलचे मखर वापरू का? पर्यावरणाला धोका झाल्याने यंदा महाराष्ट्रात आलेला पूर बघता, आपण इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करूया. आपल्या पुढच्या पिढीवर पूर बघण्याची वेळ येऊ नये.

श्रावण महिन्यात आपल्याला वेध लागतात ते वेगवेगळ्या सणांचे. आता मराठी माणसाला गणेशोत्सवाचे वेध लागलेत. भाद्रपद महिन्यात येणारा गणेशोत्सव महाराष्ट्रात विशेषत: मुंबई, पुणे आणि कोकणात अगदी धुमधडाक्यात साजरा होतो. देश, विदेशातून लोक इथे गणपतीच्या दर्शनासाठी येतात. या गणेशोत्सवांवर हिस्ट्री टीवी, डिस्कवरीसारख्या चॅनलनी डॉक्युमेंट्री बनवल्यात.

यंदा महाराष्ट्रावर पुराचं संकट कोसळलंय. तरी गणेसोत्सव होणार आणि यंदा कमी खर्चात करणार. दानपेटीत जमलेला निधी पूरग्रस्तांसाठी देणार, अनेक मंडळांच्या मंडपात असे मदतीचे बोर्ड लागलेत. तसंच मंडळाच्या गणपती आगमन सोहळ्यांची दिमाखात सुरवात झालीय.

पीओपीचा वापर कंस्ट्रक्शनसाठी

घरगुती गणपतींच्या मुर्त्यांच्या फिनिशिंगचं कामही संपत आलंय. गणपतीची मूर्ती शाडू मातीवरून कधी प्लॅस्टर ऑफ पॅरिसची बनू लागली समजलंच नाही, असं आपली आजी नेहमी सांगते. पण प्लॅस्टर ऑफ पॅरिसमुळे गणपतींमधले आकार, नक्षीकाम मात्र छान छान बघायला मिळतं.

प्लॅस्टर ऑफ पॅरिसला आपण शॉर्टकटमधे पीओपीसुद्धा म्हणतो. पीओपी हे फक्त गणपतीसाठी वापरत नाहीत. ते आपल्या घऱातले सिलिंग, भिंती, शोभेच्या वस्तू, खडू तसंच फ्रॅक्चर झाल्यावर डॉक्टरकडून केलं जाणारं प्लास्टर  इत्यादी ठिकाणी वापरलं जातं. म्हणजे पीओपी इंटिरिअर कन्स्ट्रक्शनसाठी मोठ्या प्रमाणात वापरतात.

प्लॅस्टर ऑफ पॅरिस पॅरिसमधलंच

पीओपी हे शाडूच्या मातीसारखं डायरेक्ट नैसर्गिकरीत्या मिळत नाही. पीओपी हे मानव निर्मित आहे. पीओपीमधे जिप्सम नावाचा एक घटक मिसळला जातो. तो मात्र आपल्याला निसर्गातच मिळतो. या जिप्समला शास्त्रीय भाषेत हायड्रेटेड कॅल्शिअम सल्फेट असं नाव आहे.

जिप्सम ३२५ डिग्री सेल्सिअसला गरम केलं की ते पाणी सोडून ख्रिस्टलाईज होतं. आणि मग त्याची पेस्ट होऊन ते पुन्हा ड्राय होतं. उकळवून ड्राय झालेल्या जिप्समची पूड केली की आपल्याला बाजारात मिळतं तसं पीओपी तयार होतं.

प्लॅस्टर ऑफ पॅरिस हे काही फक्त नाव नाही. या प्लास्टरचा खरंच पॅरिसशी संबंध आहे. प्लॅस्टर ऑफ पॅरिसमधे वापरलं जाणारं जिप्सम हे पहिल्यांदा पॅरिसजवळ सापडलं, अशी माहिती द टेलिग्राफ वर्तमानपत्राने २००९ मधे आपल्या बातमीत म्हटलंय. आजही ही बातमी द टेलिग्राफ वेबसाईटच्या आर्काइवमधे उपलब्ध आहे.

हेही वाचाः अरुण जेटलींच्या मृत्यूचं कारण वेट लॉस सर्जरी?

पीओपीचा गणपती कसा बनवतात?

साधारण ४ हजार वर्षांपूर्वी पीओपीचा वापर इजिप्तमधे पिरॅमिड बनवण्यासाठी केला जायचा. सुरवातीच्या काळातले पिरॅमिड हे दगडांचे असत. नंतर पीओपीचा वापर वाढल्यावर त्यांनीसुद्धा पिरॅमिडमधे पीओपी वापरायला सुरवात केली. इसवी सन पूर्व ५मधे मंदिरं, इमारतींच्या इंटेरिअरसाठी पीओपी ग्रीस, इंग्लंडमधेही वापरलं जाऊ लागलं.

पुढे १९ व्या शतकानंतर पीओपीचा वापर मर्यादित झाला. फ्रॅक्चरचं प्लॅस्टर, सुशोभिकरण आणि कलेपुरताच मर्यादीत राहिला. याच ६५ कलांचा अधिपती म्हणजे आपला लाडका गणपती आपण याच पीओपीने बनवतो.

गणपतीच्या आकाराचा एक रबराने साचा बनवला जातो. यात साच्यात पीओपी पावडर आणि पाण्याचं मित्रण ओतून ते सुकवतात. सुकल्यावर गणपतीचा साचा बनतो. या साच्यातून बरेच गणपती बनवता येतात. हे गणपती आतून पोकळ असतात. म्हणून त्यांना आधार देण्यासाठी नारळाच्या वरचा ब्राऊन भाग त्यात भरतात. पण मोठ्या आकाराच्या मूर्तींमधे हे करता येत नाही, अशावेळी त्याला आतून तारा लावल्या जातात, असं चित्रकार आणि नेपथ्यकार कोळी यांनी 'कोलाज'शी बोलताना सांगितलं.

समुद्र नष्ट झाला, तर आपणही नष्ट होऊ

नारळाचा ब्राऊन भाग, पीओपी, तारा, केमिकलयुक्त रंग इत्यादी गोष्टी पाण्यात पटकन विरघळत नाहीत. यातल्या काही गोष्टी विरघळल्या तरी समुद्र आणि समुद्री जीवांसाठी हानीकारक ठरतात. ज्या देवाची आपण पूजा करतो तोच देव कचरा म्हणून समुद्री किनारी पडलेला असतो. तसंच हे केमिकलयुक्त घटक समुद्री माशांद्वारे आपल्या शरीरात गेले की किडनी, हार्ट, पोटाच्या आतड्यांना त्रास होतो. वेगवेगळे आजार होऊ शकतात.

समुद्रातले जीवन नष्ट झाल्यावर आपणही नष्ट होऊ. गेल्या काही वर्षांत मुंबईत प्रदूषण खूप वाढलंय. गाड्या, कारखाने, छोटे उद्योगापासून बांधकामांपर्यंतच सर्व प्रदूषण हे समुद्र आपल्या पोटात घेत असतं. म्हणूनच आपली मुंबई दिल्लीच्या तुलनेत कमी प्रदूषित आहे. समुद्रातलं खनिजयुक्त पाणी हवेतले घटक चुंबकासारखे खेचून घेतं. आणि हवा शुद्ध ठेवण्यास मदत करतं, अशी माहिती आपल्याला सायन्स ऑफ ओशन या वेबसाईटवर सापडते. या वेबसाईटवर जगातल्या सर्व समुद्र किनाऱ्यांची माहिती दिलीय.

हेही वाचाः रिझर्व बँकेने सरकारला पावणे दोन लाख कोटी दिल्यावर मंदी संपेल?

थर्माकोलमुळे होतात आजार

पीओपी गणपतींबरोबर आपण गणपतीच्या आराससाठी थर्माकोल वापरतो. या थर्माकोलमधे थर्मोप्लॅस्टिक असतं. ज्याचं विघटन होत नाही. १८३९ला बर्लिनमधे एड्युर्ड सिमॉन यांनी पॉलिस्ट्रीन शोधलं. ज्याच्यापासून आपल्या थर्माकोलच्या शिट्स बनतात. आणि त्या आपण शाळेच्या प्रोजेक्टपासून, हस्तकला, सजावटीसाठी वापरतो.

जपानमुळे थर्माकोल जवळपास सर्वच देशात जाऊन पोचलं. त्यांनी याचा व्यवसाय सुरू केला. थर्माकोलच्या प्लेट या युज अँड थ्रो असतात. म्हणून फंक्शनमधे आपण त्या प्लेट ठेवतो. पण त्यात जेवल्यावर कालांतराने त्वेचेचे आजार, पोटाचे विकार होऊ लागतात. आपण जर थर्माकोलचा चुरा करून मातीत टाकलं तर मातीत विषारी घटक तयार होतात. आणि जर जाळलं तर त्याच्या धुराने आपल्याला आणि प्राण्यांना श्वसनाचे विकार होऊ लागतात.

थर्माकोलला पर्यायी मखर वापरूया

थर्माकोल विघटनशील नाही म्हणून याच्या वापरावर सरकारने बंदी आणली. आपल्याला आजारी पाडणाऱ्या या थर्माकोलचा वापर आपण आपल्या लाडक्या गणपती बाप्पासाठी कसा करणार? गणपतीला मखर साधं कोणतंही चालेलं पण हे विषारी नको, असं चाईल्ड स्पेशालिस्ट डॉ. विनिता झा यांनी 'कोलाज'ला सांगितलं.

थर्माकोल हानीकारक आहे, सरकारी बंदी आहे. तरीही बाजारात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. थर्माकोल स्वस्त, हलकं आणि ने-आण करायला सोप्पं असला तरी त्याला आपण आता बायबाय करण्याची वेळ आलीय. यंदाच्या गणेशोत्सवात आपण असा संकल्प करायला हरकत नाही. थर्माकोलऐवजी छान फुलांचे, प्लायवुडचे, पुठ्ठ्याचे, पैठणीचे असे वेगवेगळे मखर बाजारात आलेत. आपण त्यांचा विचार करूच शकतो.

चर मग चला यंदा आपण इकोफ्रेंडली गणेशोत्सव साजरा करूया.

हेही वाचाः 

पुढच्या वर्षी लवकर आलाय माघी मोरया

मुंबईच्या विकासात पर्यावरणाला धक्का लागणारच!

आषाढी वारीनिमित्त पसरलेल्या वायरल विठ्ठलाची गोष्ट

राज ठाकरेंच्या ईडी नोटीसमागे घोटाळा आहे की राजकारण?

नाना शंकरशेठ होते म्हणून मुंबई आंतरराष्ट्रीय ख्यातीचं शहर बनलं