गोड ऊस तोडणाऱ्या कामगाराचं कटू वास्तव मांडणारं पत्र

१८ डिसेंबर २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


चला हवा येऊ द्या हा झी मराठीवरचा लोकप्रिय कार्यक्रम. विनोदाचे षटकार मारणाऱ्या या कार्यक्रमात पोस्टमन काका पत्र वाचू लागतात तेव्हा मात्र सगळ्यांचेच डोळे पाणावतात. गेल्या मंगळवारी कार्यक्रमात ऊसतोड कामगाराच्या पोराने लिहिलेलं पत्र पोस्टमन काकांनी वाचून दाखवलं. ऊसाला डोळे असतात मग त्याची कृपादृष्टी आमच्यावर का होत नाही असा प्रश्न विचारणारं, ऊसतोड कामागारांच्या व्यथा सांगणारं अरविंद जगताप यांनी लिहिलेलं पत्र इथं देत आहोत.

'चला हवा येऊ द्या' हा झी मराठी या चॅनेलवर चालणारा खास कार्यक्रम. या आठवड्यात कार्यक्रमात पाहुणे म्हणून तरूण राजकीय नेत्यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. भाजपच्या राज्य सचिव पंकजा मुंडे, भाजपचेच खासदार सुजय राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यातल्या राजकीय जुगलबंदीसोबतच विनोदाची मजाही ही रंगत होती. 

अशा या हसत्या खेळत्या वातावरणात मंगळवारी डोळ्यात पाणी आणणारा एक कार्यक्रम पार पाडला. या तीन तरूण नेत्यांना उद्देशून एखा ऊसतोड कामगारांनं लिहिलेल्या पत्राचं पोस्टमनच्या भूमिकेत असणाऱ्या सागर कारंडे यांनी अभिवाचन केलं. अरविंद जगताप यांनी लिहिलेलं ऊसतोड कामगारांच्या व्यथा मांडणारं हे पत्र इथं देत आहोत.

प्रिय पंकजाताई, रोहितदादा, सुजयदादा

तुम्हा तिघांना एकत्र लिहितोय. एकत्र का? तुम्ही तिघंही राज्यातलं तरुण नेतृत्व आहात. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत. खरंतर तुमच्याकडून असलेल्या तुमच्या घरच्यांच्या राजकीय अपेक्षा तुम्ही पूर्ण केल्यात. इथून पुढंही त्यांचं स्वप्न पूर्ण करणार आहात. पण आज मला माझ्या स्वप्नाविषयी बोलायचंय. माझ्यासारख्या दहा बारा लाख ऊसतोड कामगारांविषयी बोलायचंय. तुम्हा तिघांशी बोलायलाच पाहिजे कारण तुम्ही तिघंही साखर कारखान्याशी संबंधित. बीड आणि नगर जिल्ह्यात सगळ्यात जास्त ऊसतोड कामगार राहतात त्याचे तुम्ही प्रतिनिधी.

तुमचं जन्मापासून ऊसाशी नातं आहे तसंच माझंही. गरोदर असूनही आई ऊसतोडणीसाठी आली होती. कोपीतच जन्म झाला माझा. पाचट लहानपणापासून सोबतीला. ते ऊसाचं पाचट आहे की आयुष्याला मारलेली पाचर आहे हे मला अजून ठरवता आलेलं नाही. ऊस तुमच्यासाठी जवळचा मित्र आहे. पण आम्हा ऊसतोडकामगाराच्या पोरांसाठी शत्रू. या ऊसामुळेच ऐन दिवाळीत आमचं गाव ओस पडलेलं असतं. तुम्हाला माहितीय? खूप लोकांना विश्वास बसणार नाही दोनशे घरांच आमचं गाव दिवाळीत सुतक पडल्यासारखं शांत असतं. 

घरातली कर्ती माणसं ऊसतोडणीला पश्चिम महाराष्ट्रात निघून गेलेली असतात. घरात फार फार तर म्हातारी माणसं आणि त्यांच्या भरवशावर मागे राहिलेली लहान पोरं. आजोबा होते तोपर्यंत मी पण गावातच रहायचो. आई वडील बैलगाडीत बसून ऊसतोडणीला निघायचे. लोक म्हणायचे टोळी निघाली.

ऊस तोडायला जाणाऱ्या लोकांना टोळी म्हणतात. खूप त्रास देतो तो शब्द जीवाला! दोन चार वर्षाच्या लेकरांना घरातल्या म्हाताऱ्या माणसाच्या हवाली करून बिचारे आई बाप सहा सहा महिन्यासाठी निघून जातात. पोटाची आग मिटावी म्हणून. चुलीतली आग पेटावी म्हणून! दरवर्षी सहा महिन्याचं ते पोरकेपण वाट्याला आलेल्या प्रत्येक पोराच्या डोक्यातली आग कुणी समजून घेऊ शकलेलं नाही.

हेही वाचा : कशी चालेल फाइव जीची जादू?

खरंतर आधी आजी आजोबाही ऊस तोडायला जायचे. अरे हो, तुमच्यात आणि आमच्यात अजून एक साम्य आहे. आधीच्या पिढीपासून तुमचे कारखाने आहेत. आणि आधीच्या पिढीपासून आम्ही ऊसतोड कामगार आहोत. खरंतर मी तुम्हाला मालक म्हणायला पाहिजे. पण तुमची तरुण पिढी मालक नोकर असे भेदभाव करणारी नाही हा विश्वास वाटतो.

हां, तर मी सांगत होतो आजोबा ऊस तोडायला जायचे. एका वर्षी असेच बैलगाडीतून जात असताना एका ट्रकनी धडक दिली. आजी ट्रक खाली आली. आजोबाचा एक पाय चाकाखाली आला. ट्रकवाला थांबलासुद्धा नाही. पण तुम्हाला सांगतो, मला त्या ट्रक वाल्याचा एवढा राग आला नाही. बोलून चालून गुन्हाच केला होता त्याने. पण रस्त्यात मोठ मोठ्याने ओरडणारे माझे आई बाप, शेवटच्या घटका मोजणारी आजी, आणि तुटलेला पाय घेऊन सरपटत आजीपाशी जाऊन धीर सोडू नको म्हणून पांडुरंगाचा हवाला देणारे माझे आजोबा.

दोन तास माझ्या आजीनी त्या रस्त्यावर मदत मिळायची वाट पाहिली. पण कुणी धावून आलं नाही. पहाटे पहाटे आजीनी त्या परक्या गावातल्या रस्त्यावर जीव सोडला. तिकडंच कुठंतरी जाळून टाकलं आजीला. तेव्हापासून अपंग झालेल्या आजोबासोबत मी गावात थांबायला लागलो. सहा सात वर्षांचा मी आणि एक पाय नसलेले आजोबा. कोण कुणाला सांभाळायचं माहीत नाही.

ऊसतोड मजुराला कळत नाही आयुष्यभर. कारखाना आपल्याला सख्ख्या आईसारखा जगवतोय का सावत्र आईसारखा वागवतोय. लहानपणी कधी झाडाला झोळी बांधायचे माझी. कधी बैलगाडीला. लहानपणापासून ऊसतोडमजुराच्या पोरांनी रडायचं नाही हे ठरलेलं असतं. मोठा भाऊ नाहीतर बहीणच आई होते लेकराची. कारण कोपीतल्या बायकांचं जगणं म्हणजे फक्त शोकांतिका असते. 

पहाटे थंडीच्या कडाक्यात आंघोळ उरकून दिवसभराचा स्वयंपाक करायचा. धुणीभांडी आवरायची. हातात कोयता घेऊन आपल्या नशिबाचा राग काढत ऊसावर सपसप वार करायचे. सुट्टीचं नाव काढायचं नाही. अगदी आजारी पडायचीही परवानगी नाही. हाडं गोठवणारी थंडी एवढी की आयुष्याची होळी करण्याची इच्छा व्हावी. हे सगळं तुम्ही बघत आला असणार. आम्ही जगत आलोय.

सांगायचं एवढंच आहे की लाकडी घाण्याच्या रसवंतीला असलेला बैल जसा एकाच जागी गोल गोल फिरत असतो तसे आम्ही वर्षानुवर्ष त्याच त्या कारखान्यासाठी, त्याच त्या शेतात राबत आलोय. ऊसाला भाव न मिळाल्यामुळे नाराज शेतकरी आणि तोंडाला पानं पुसल्यासारखी भाववाढ मिळालेले ऊसतोड मजूर.

हेही वाचा : फरक पंजाब आणि महाराष्ट्राच्या अस्मितेचा

खुपदा रसवंतीला बांधलेल्या घुंगराचा आवाज ऐकू येतो. खूप लोकांना तो मधुर वाटतो. माझ्या डोक्यात तिडीक जाते. कारण त्या रसवंतीच्या चाकात ऊसाच्या ऐवजी आमचं आयुष्य पिळून निघत असल्याचा भास होतो. पण लढायला तर पाहिजे! तुम्हीही. आम्हीही. शेतकऱ्याला भाव मिळण्यासाठी. शेतमजुराला भाव मिळण्यासाठी.

कधी बाभळीच्या, कधी लिंबाच्या झाडाला झोळी बांधलेली असायची आईने लहानपणी. आमच्या नशिबात लिंबोणीच्या झाडामागे लपलेला चंद्र नव्हता. झोळीत पडल्या पडल्या थेट सूर्याच्या डोळ्यात डोळे घालून बघत आलो लहानपणापासून. आम्ही पाचटात रांगलोय. ऊसाचे पाते तलवारीसारखे अंगावर वार करायचे. पण त्रास वाटला नाही. आम्हाला त्रास पुढारी शब्द फिरवतात तेव्हा होतो. यावेळी पुन्हा मजुरी वाढेल असं वाटलं. पण मनाजोगती वाढली नाही. 

कधी कधी असं वाटतं आम्ही वर्षाची नाही जन्माची उचल घेतलीय का काय? आयुष्यभर राबतच रहायचं का काय? आमची प्रत्येक पिढी हा कोयता पुढच्या पिढीच्या हातात द्यायचा नाही म्हणून दुप्पट जोमाने राबत असते. पोराला नोकरी लाऊन देण्यासाठी आयुष्यभर राबणारा बाप नकळत पोराच्या हातात कोयताच देऊन जातो खुपदा.

ऊसालासुद्धा डोळे असतात. पण ऊसाची कृपादृष्टी आमच्यावर का होत नाही काय माहीत? एकतर आमच्या हाताला योग्य दाम द्या नाहीतर आमच्या हातातला हा कोयता तरी कायमचा काढून घ्या. तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत म्हणून लिहिलंय. ऊस गोड असतोच. ऊसतोड कामगाराचे शब्दही गोड मानून घ्या.

तुमचाच 

हेही वाचा : 

बेरोजगारी कमी करण्यासाठी शेतीक्षेत्र खुलं करायला हवं!

संसद भवनाचा समजूतदारपणा आपल्यात झिरपत रहावा

मोफत पॅड देऊन स्कॉटलँडनं मासिक पाळीची गरिबीच दूर केलीय

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवायचे असतील तर बाबासाहेब वाचावे लागतील

शेतकरी संघटना आक्रमक झाल्यामुळे केंद्र सरकारची कोंडी झालीय?