एक कवी दुसऱ्या कवीला पत्र लिहितो तेव्हा

१४ डिसेंबर २०२०

वाचन वेळ : १२ मिनिटं


बालाजी मदन इंगळे हे आजच्या पिढीचे उमदे कवी. ‘मातरं’ आणि ‘मेलं नाही अजून आभाळ’ या दोन कवितासंग्रहांनंतर आता त्यांचा या परावलंबी दिवसांत हा तिसरा संग्रह प्रकाशित झालाय. यातल्या कवितांच्या निमित्ताने ज्येष्ठ कवी इंद्रजीत भालेराव यांनी इंगळे यांना लिहिलेलं एक पत्र फेसबुकवर टाकलं होतं. मागच्या पिढीतला कवी या पिढीतल्या कवीशी नेमका काय संवाद साधतो हे पाहणं उत्सुकतेचंच आहे.

प्रिय,
बालाजी,
स.न.

तुला पत्र लिहिण्याची ही पहिलीच वेळ. याआधी कधी तशी गरजही पडली नाही. पण आज तुला सविस्तर पत्र लिहायला बसलोय. तू आणि तुझी कविता माझ्यासमोर वाढत गेलात. पण तुझ्यावर लिहायचं राहून गेलं होतं. अगदी पंचवीस वर्षापासून मी तुला पाहतोय. तुझ्यासारखा गंभीर, संयमी, प्रगल्भ कवी पंचवीस वर्षे तिळमात्र संशय आडवा न येता आपल्यासोबत आहे ही मला माझ्या आयुष्याची कमाई वाटते. भोवतीची किल्मिषं पाहताना, केवळ स्वार्थापुरतेच संबंध ठेवणारा भोवताल पाहताना या गोष्टीचं महत्त्व मला आणखीनच जास्त वाटत आलेलंय.

पंचवीस वर्षांपूर्वी मराठवाड्यातले आपण दोघं पार तिकडं कोकणात एका साहित्य संमेलनात भेटलो. आणि मग भेटतच राहिलो. तू तुझी कवितांची वही घेऊन पार परभणीपर्यंत महाविद्यालयात मला भेटायला आलास. नंतर तुझ्या 'मातरं' या पहिल्या कवितासंग्रहाच्या प्रकाशनाला मी उमरग्याला आलो. आणि नंतर मग आपण एकमेकांच्या ओढीने एकमेकांकडे येत जात राहिलो. ते सगळे क्षण आठवतात. पण मला आज लिहायचं आहे ते तुझ्या नव्हे तर तुझ्या कवितेच्या संदर्भात.

तुझी कविता मला नेहमी माझीच कविता वाटत आलीय. तुझ्यामुळे माझ्या आयुष्यात आलेला तुझा एक सज्जन मित्र प्रमोद माने ही माझा जिवलग होऊन गेला तो लिहिण्यातल्या चांगुलपणामुळं आणि स्वभावातल्या सज्जनपणामुळं. निमित्त मिळालं आणि प्रमोदच्या कवितेवर मला लिहिता आलं. पण तुझी कविता राहूनच गेली. त्याचं कारण तुझ्या पहिल्या संग्रहाचं प्रकाशच माझ्या हस्ते झालं. तिथे मी बोलल्यामुळे व्यक्त झालो.

२०१० ला तुझा दुसरा संग्रह आला. तो तू मलाच अर्पण केल्यामुळं न लिहिण्याचं एक नैतिक बंधनच माझ्यावर आलं. आता २०२० मधे तुझा तिसरा कवितासंग्रह आला आणि वाटलं आता लिहिलं पाहिजे. पंचवीस वर्ष एखाद्याला कुठल्या निमित्ताने का होईना टाळणं योग्य नाही असं वाटलं आणि लिहायला बसलो.

तुझ्या पहिल्या कवितासंग्रहातल्या कविता तू नंतरच्या दोन संग्रहात समाविष्ट केलेल्या दिसल्या. तो संग्रह आता माझ्याजवळ नसल्यामुळे हुरहुर वाटत होती. पण पहिल्या संग्रहातल्या आठवणीत राहिलेल्या काही कविता यात दिसल्यामुळं बरं वाटलं. या दोन संग्रहात मिळून तुझी एकूण कविता समोर आहे. त्यातून तुझी सगळी कवितावैशिष्ट्ये समोर आलीयत.

२०१० साली प्रकाशित झालेला 'मेलं नाही अजून आभाळ…' आज पुन्हा वाचला. हा संग्रह लिहून आता एक दशक उलटून गेलंय. हिंदीवाले तर कविता दशकातच मोजतात. आणि मागच्या दशकातली कविता जुनी समजतात. शतकात कविता मोजायची सवय असलेल्या आपल्या मराठीलाही आता दशकांची लागण झालेली आहे. तुझा हा कवितासंग्रह मात्र पुलाखालून पुष्कळ पाणी वाहून गेलेलं असलं तरी ताजा आणि टवटवीत वाटला आणि मला खूप समाधान वाटलं.

संग्रह मला अर्पण केलास तो तुझा प्रामाणिकपणा तुला महागात पडला असण्याची शक्यता आहे. कारण माझे सगळे शत्रू तुझ्या कवितेलाही शत्रू वर्गात सामील करून गेले असणार. त्यामुळे इच्छा असूनही त्यांनी तुझं कौतुक केलं नसणार, तुझी पुरस्कारासाठी शिफारस केली नसणार. हा सगळा गमतीचा भाग सोडून दे. तू तुझा इतका महत्त्वाचा कवितासंग्रह मला अर्पण केलास म्हणून मी आज तुझे जाहीर आभार मानून टाकतो.

तुझ्या या संग्रहातली तांत्रिक तपशीलात कवितेच्या जागा शोधण्याची तुझी लकब नंतर अनेकांनी अंगिकारलेली दिसते. 'दूर राहिला गाव' या माझ्या संग्रहातल्या सुरुवातीच्या काही कवितात मी या लांबीचा थोडाफार वापर केला होता. तू तो जास्त ठळकपणे केलास. लोकांना कवितेत तांत्रिक तपशील आवडत नाहीत. म्हणूनही कदाचित तुझ्या कवितेकडे वाचकांनी दुर्लक्ष केलं असावं. हे तांत्रिक रूक्ष तपशील विसरण्यासाठी तर शेतकरी कायम उदास भावनेने जगत आला आहे.

बळीराजा ही अशीच एक उदास कल्पना. म्हणूनच त्याच्या राजवाड्याच्या शिवारात कुठेच काही खाणाखुणा सापडत नाहीत असं तू एका कवितेत म्हणतोस ते योग्यच आहे. कारण लोकसाहित्यात असं सगळं उदात्त, भव्यदिव्य असतं. झोपडीत राहणाऱ्या माणसाच्या मुखात ही आठशे खिडक्या नऊशे दारं असलेलं घरच असतं. शेती वास्तव फार कडवट आहे म्हणून त्याला कायम उदासतेचा लेप लावून समोर मांडलं जातं.

हेही वाचा : करण्याचे दिवस, कळण्याचे दिवस : मानसिक आरोग्य मोजण्याचा थर्मामीटर

निकामी, स्टार्ट आणि आणखी काही कवितातून येणारं शिकलेल्या तरुण बेकारांचं त्यांच्याच परिभाषेतलं चित्रण प्रत्ययकारी झालंय. 'मातरं' सारखी कविता मला वाटतं आधीच्या संग्रहातली असावी. त्यात आलेलं शेतमजुराचं चित्रण तेव्हा तरी मराठी कवितेला नवं होतं. आज नामदेव कोळी सारखा कवी ते समग्र विश्व घेऊनच मराठी कवितेत आला. या कवितेतून मजुराच्या आयुष्यासाठी वापरलेला 'मातरं' हा शब्द त्याचं समग्र आयुष्य वाचकांसमोर उभं करतो.

'मेमरी कार्ड' आणि आणखी काही कवितांमधून मोबाईल या यंत्राच्या नव्या परिभाषेचा उपयोग तू फार छान केलास. एका अर्थानंतू या यंत्रातून नव्या प्रतिमाच शोधल्या आहेत. नंतर अनेकांनी अशा प्रतिमांचा फॅड वाटावा इतका उपयोग केला आणि त्याला पांचट करून टाकलं. 'वधु पाहिजे' आणि पुढच्या आणखीही काही कवितातून तपशिलात भरपूर उपहास भरून काव्यात्मक उपहासिका सिद्ध करण्याची तुझी एक खास पद्धत आहे. दुःखातीरेकाच्या वेळी माणूस उपहासातच बोलत असतो. जेव्हा दुःख देणाऱ्याला आपणच दुःखदाते आहोत याची जाणीवच होत नाही; तेव्हा उपहास आणखीनच तीव्र होतो.

वावरात कुल्ळवत असणाऱ्या 
बापाच्या डोक्यावर 
पसरलेलं असतं 
असं की मोबाईल कंपन्यांच्या 
नेटवर्कचं जाळं 
बाप मात्र 
कामाच्या धबडग्यात 
बाजुच्याच तुकड्यात 
खुरपणाऱ्या आईशी 
दिवस-दिवस बोलू शकत नाही.

अशा काही कवितांतून तू निर्माण केलेली प्रतिमा अगदीच नवी तरी खूप खूप प्रत्ययकारी आहे. या कवितेतल्या सातही तुकड्यातून अशाच शब्दांचा खेळ मांडून जणू काय तू नव्या पिढीच्या तोंडची भाषा दहा पंधरा वर्षांपूर्वीच कवितेत आणली होतीस.

शेती प्रश्नावर कवितेतूनही बोंब ठोकण्याची लाज वाटावी इतका हा प्रश्न आता चिघळलेला आहे. कधी पिकाला पाणीच नाही, तर कधी इतकं पाणी की धानाला कोंब फुटतात. अशी परस्पर विरुद्ध चित्र दिसतात. 'बोंब' सारख्या कवितेत तू ते नेमकेपणानं मांडला आहेस.

याच बाबतीतली तुझी 'परिवर्तन' नावाची कविता मात्र मला तुझ्या एकूण आशयातला विक्षेप वाटला. सुधारणा सोबत शेतकऱ्याचं मरणही गावात आलं. शेतकऱ्यांचं बोंबलणं एका अर्थी स्वतःच्या चुका झाकून दुसरीकडे बोरट दाखवणारा असा या कवितेचा अर्थ होतो. या कवितेमुळं इतर कवितेत तूच मारलेल्या बोंबा खारीज होतात. या कवितेतली परिस्थिती सर्व शेतकऱ्यांच्या बाबतीत खरी नाही. पण आपण जेव्हा असं काही कवितेतून मांडतो तेव्हा ते प्रातिनिधिक ठरत असतं. कारण वाचकांनी आपल्या वर विश्वास टाकलेला असतो.

आपण कवितेतून एवढं महत्त्वाचं काहीबाही लिहून जातो. पण मला कधीकधी शंका येते की लोक कविता गांभीर्याने घेतात का? जे लिहितानाच गंभीर नसतात अशा कवींचं आपण सोडून देऊ. पण व्रतासारखं कवितालेखन करणारांना तरी लोक गांभीर्याने घेतात का? लोक लक्षपूर्वक बारकाईने कविता वाचतात का? समीक्षक तरी कितपत शहाणे असतात? (इथे काही अपवाद वगळून) विचारवंतांना तर कवितेची गरजच वाटत नाही. आणि कवी तरी इतर कवींच्या आधीच्या पिढीतल्या कवींच्या कविता नीट वाचतात का? कवितेतल्या पुष्कळ गोष्टीकडे कोणाचं लक्षही जात नाही. आपलं आयुष्य संपत आलं तरी आपल्या कवितेतल्या काही गोष्टी अजूनही कोणाच्याच लक्षात आल्या नाहीत. असं आता मला वाटू लागलंय. तुझाही कदाचित तोच अनुभव असेल.

माझ्या 'बाप' या कवितेनं बाप म्हणजे शेतकरी हे समीकरण रूढ केलं होतं. तुझ्या कवितेतून ते दृढ केलं आहेस. तुझ्या कवितेत सर्वत्र तू 'बाप' हा शब्द शेतकरी या अर्थानंच वापरलेला आहे. त्यामुळे तुझ्या कवितेतला बाप हा केवळ तुझ्या पुरताच मर्यादित राहत नाही. तर तो प्रातिनिधीक होऊन जातो. तुला जळी- स्थळी- काष्टी- पाषाणी, चराचर सृष्टीत हा बाप दिसतो. त्यामुळे रोजच्या वैयक्तिक, सार्वत्रिक, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडीत तू बाप शोधत राहतोस. प्रत्येक घटनेचा अर्थ बापाच्या डोळ्यानंच लावतोस. प्रत्येक चौकटीत बाप ठेवून पाहतोस. एका अर्थाने तू त्या विषयाचा ध्यास घेतला आहेस.

'खडतर' कवितेतलं तुझं संवेदन विज्ञान युगात मागास ठरवलं जाईल. पण विज्ञान राक्षसाचं रूप घेणार असेल तर त्यालाही कुणाचं समर्थन असणार नाही. तुझघ एकूणच कविता अनुभवजन्य संवेदनेतून येत असली तरी ती विचाराकडे झुकणारी आहे. भला असो की बुरा तुझा, तुझा असा एक विचार आहे.

'सौंदर्य सल्ला' नावाची तुझी कविता ही एक भयंकर उपहासिका आहे. ही कविता कुणाला कळली की नाही माहित नाही. समजली असती तर अनेकांच्या उधृतातून ती यायला हवी होती. 'लय' सारख्या कवितेत सगळं व्याकरण चालवून दाखवलंस शेतकऱ्याच्या आयुष्यावर. आणि त्याची अबद्ध लय अधोरेखित केलीस. तर 'आंबा पिकतो' सारख्या कवितेत विडंबनातूनच शेती आणि शेतकऱ्यांचं झालेलं विडंबन मांडलंस. पुढे असंच एका भारुडाचही तू विडंबन केलंस. 'सगळं सगळं झालं' या कवितेत तू विचारलेल्या प्रश्नाला 'स्वतःपुरतं पिकवा' हे भयंकर असलेलं उत्तर मला सुचून गेलं.

'एकांत' ही तुझ्या या संग्रहातली एकमेव निखळ निसर्ग कविता. खरं तर त्यात हिरवळ नाही. तरी ती निसर्गकविता आहे. ती ही एका बुजगावण्यावर. मराठीत बुजगावण्यावर कविता नाही. जपानी भाषेत मात्र बुजगावण्यावर खूप छान छान हायकू आहेत, असं पूर्वी एकदा मराठीतले हायकूचे अनुवादक सुरेश मथुरे यांनी लिहिलेलं होतं. बापानं दावणीला बांधलेला बैल आणि व्यवस्थेने दावणीला बांधलेला बाप पण बापाचं बैलाशी माणुसकीनं वागणं आणि व्यवस्थेचा अमानुषपणा बापाच्या वाट्याला येणं हे सगळं तू 'फरक' या कवितेत फारच छान मांडलंस. संग्रहातली ही एक अप्रतिम कविता आहे.

या संग्रहाच्या दुसऱ्या भागात तू शेतकरी आत्महत्येचं संवेदन सर्वांगानं दाखवलं आहेस. या विषयाचे सगळे कंगोरे धुंडून एकेक कोपरा उजागर केलास. खरं तर तुझ्यासमोर 'टाहो'चं आव्हान होतं. पण तू ते ताकतीनं पेललंस. 'एक्झिट' सारख्या कवितेतून तू शेतकऱ्यांची मानसिक आंदोलनं नेमकेपणानं पकडली आहेस. मानसिक आंदोलनं नेमकेपणानं पकडण्यासाठी लागणारा तपशीलही तुला नेमकेपणानं सापडला आहे. कवितेतून तू जितक्या ताकतीने उपहास मांडतोस तितक्याच ताकतीने तुला लयीतल्या कविता मात्र पेलत नाहीत. पुढच्या संग्रहातून तू थोडा लईला सरावल्यासारखा वाटतोस. कदाचित तुझी प्रकृती त्यासाठी योग्य नसावी. 

'हिशोब' सारख्या कवितेत आत्महत्येच्या मानसिकतेत असलेल्या शेतकऱ्याच्या मुलाची मानसिकता देखील तू छान पकडली आहेस.

आता 'मेलं नाही अजून आभाळ…' या संग्रहातला तिसरा आणि शेवटचा विभाग आशा जागवणारा आहे. नाहीतर गडद अंधाराच्या कवितेतून पुन्हा अंधारच गडद करत नेला तर आशेच्या किरणाअभावी नकारात्मक भावच वाढीला लागला असता. हा आशावाद म्हणजे पलायन आहे का? तर नाही. तो एक मार्ग देखील आहे. प्रकाशाकडे जाण्याचा.

'हुबेहूब' या कवितेत शेती करताना शेतकऱ्यांच्या अंगी असलेले उपजतच गुण त्याच्या प्रत्येक हालचालीत कसे जाणवतात त्याचं दर्शन घडवणारी आहे. अशा काही कवितामुळं तुझी कविता एकसुरीपणापासून वाचली आहे. आधीच्या कवितातून जसा वाट हरवलेला बाप येतो तसा या विभागातला बाप हरवलेल्या गावाची वाट होऊन येतो.

'पंडीत भीमसेन जोशी' ही कविता स्वतः त्यांनी ऐकायला हवी होती. आपल्या सुरांचा हा अनोखा परिणाम पाहून त्यांनाही आनंद वाटला असता. या विभागातल्या सगळ्याच कवितांत विपरीतातून मार्ग काढत सकारात्मकतेकडे निघालेला शेतकरी बाप दिसतो.

'मुरडण' कवितेतून तू आपल्या स्त्रीकडे दुर्लक्ष झालेल्या शेतकऱ्यात जागृत झालेली जाणीव फार सूचकपणे मांडली आहेस. या संग्रहातील शीर्षक कविता तर मी पाच वर्षे वर्गात शिकवली. आणि अएक चांगली कविता शिकवण्याचा आनंद घेतला. हे कविता मला 'शिक बाबा शिक' याचं परिष्कृत रूप वाटली. मेधा पाटकरांचीही ही कविता आवडती होती हे मला माहित आहे. संग्रहातली शेवटची 'स्वप्न' ही कविता. कोणाही शेतकऱ्याच्या पोरांनं असं स्वप्न पाहणं अगदी स्वाभाविक आहे‌. तो जर खर्याद बापाच्या पोटचा असेल तर! इथं तुझ्या 'मेलं नाही अजून आभाळ…' या संग्रहवरची माझी प्रतिक्रिया संपली.

तुझा तिसरा कविता संग्रह 'या परावलंबी दिवसात' नुकताच म्हणजे ऑगस्ट २०२० मधे प्रकाशित झाला. दोन संग्रहात दहा वर्षाचं अंतर योग्यच. तुझे दोन्ही संग्रह आशयानं आणि आकारानंही भरीव आहेत. पंधरा - वीस वर्षे सतत दखलपात्र कविता लिहीत राहणं ही साधी - सोपी गोष्ट नाही. जर कवी चिखलाचा असेल तर इतक्या दिवसात गळून पडतो. खराखुराच टिकतो इतके दिवस. तुझं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कवितेतल्या कोणत्याही लांड्यालबाड्या, वचवच, वखवख तू कधीही केली नाही. अशा प्रकारच्या भोवतीच्या प्रदूषणापासून तू नेहमीच स्वतःला दूर ठेवत आलास. सत्वानं जगलास आणि सत्वानं लिहिलंस. उतला मातला नाहीस.

तुझ्या या संग्रहाची अर्पणपत्रिका आणि लगेच सुरू होणारा पहिला विभाग हे नुसतेच अंतराने एकमेकांना जवळ नाहीत तर अंतरात्म्यानंही ते एकमेकांच्या खूप जवळचे आहेत. स्त्री हा तुझ्या आस्थेचा आणि चिंतनाचा विषय नेहमीच राहिलेला आहे. तुझी 'झिम पोरी झिम' ही कादंबरी तर तुला स्त्री शंभर टक्के समजली आहे हे सिद्ध करते. तुझ्या अर्पण पत्रिकेपासून सुरू होणारा या संग्रहातला 'सौभाग्याचे पाय तीचे' हा कविता समूह स्त्रीविषयक कवितेचा आहे. या कविता वाचताना मला सतत समकालीन हिंदी कवयित्रींनी लिहिलेली स्त्रीवादी कविता आठवत होती.

हेही वाचा : लाच न देण्याची चैन कुणाला परवडणार?

कुठल्याही स्त्रीवादी कवितेशी स्पर्धा करू शकणारी तुझी ही कविता आहे. इतर कवितेपेक्षा तुझ्या या कवितांना आणखी एक जास्तीचे परिमाण आहे, ते म्हणजे तुझ्या कवितेतील स्त्रीचा ग्रामीण परिवेश. याआधी बहिणाबाई आणि आता कल्पना दुधाळ यांना हा परिवेश लाभला आहे. आणि त्यांनी त्याचं सोनं केलं आहे. तसंच तुझंही झालेलं आहे. अनुभवाच्या तपशीलाला कल्पकता आणि चिंतनाची जोड देऊन काही अजोड कविता तू या विभागात लिहिल्या आहेस. या आधीच्या संग्रहातही तुझ्या अशा काही स्त्रीविषयक सुंदर कविता आहेत.

'या परावलंबी दिवसात' हा या संग्रहातला पुढचा कविता समूह म्हणजे 'मेलं नाही अजून आभाळ…' या आधीच्या संग्रहातलं संवेदन घेऊन पुढे जाणारा आहे. या विभागातल्या जास्तीत जास्त कविता आशावाद पेरणाऱ्या आहेत. संकटं तर आहेतच, पण त्यामुळं न खचणारा, धीर न सोडणारा सोशिक शेतकरी बाप तू इथं जास्त प्रमाणात साकारला आहेस. कारण या शेतकऱ्याला त्याच्यावरच्या संकटाबरोबरच त्याच्यातल्या सामर्थ्याची जाणीव करून देणं आवश्यक होतं. मोबाईलमधे रमलेल्या शेतीतल्या मुलांचे कृतक, आभासी जगणंही तू नेमकेपणी पकडलं आहेस.

शेतीतून बाहेर पडणारे शेतकऱ्यांचे पळपुटे वारसदार आणि त्यामुळे हळहळणारा बापही तू इथे मांडला आहेस. तसाच पोराला शेतीपासून तोडणारा बापही तू इथं मांडला आहेस. आशयात विरोधाभास असला तरी सध्या ग्रामीण वास्तव हेच आहे. सोबत मुलाला नोकरी लागेल या आशेवर जगणारा बापही इथं येतो. पोतराजानं स्वतःच चाबूक मारून घ्यावा तसं या कवितांचा बापाला अडचणीतून सोडण्यासाठी काय उपयोग? अशा प्रश्नांचा आसूडही तू स्वतःला मारून घेतोस. एकूणच या विभागातल्या कवितातून तू आधीपेक्षा शेती प्रश्नां चे नवे कंगोरे शोधले आहेस.

'लई झालं आता बंड पेरून टाक' हा या संग्रहाला तिसरा कविता समूह. इथे तू बंड पेरायला सांगतानाच पुन्हा एकदा शेतकऱ्याच्या मूळ प्रकृतीकडे वळला आहेस. नव्या तंत्रातून विरोधाभासी शेतकरी दर्शन घडवतानाच पाऊस पाण्याविषयीची आणखी काही संवेदनं इथं येतात. परस्परविरोधी स्थिती हा तर शेतीचा स्थायीभावच आहे. 'कधी सोनं तर कधी माती, दोन्ही घेते पदरात' असं मी आधीच लिहून ठेवलेलं आहे. त्यामुळे हा शेतीतला परस्पर विरोधाभास कवितेतही तीच स्थिती आणतो. तुझ्या या भागातल्या कवितातून पुष्कळदा या गोष्टीचा प्रत्यय येतो. समाज माध्यमावरच्या शेतीविषयक नोंदींचा विरोधाभासही तू दाखवलास.

'लिकीज' सारख्या कवितेतून काही वेगळी निरीक्षणं येतात. असे काही नवे वेगळे विषय शोधायला हवेत. म्हणजे कवितेत तेच ते येत राहणार नाही. हिंदीतले विनोदकुमार शुक्ल असं काही नवनवं शोधत राहतात. ते महत्वाचं आहे. तुझ्याच भाषेत सांगायचं झालं तर आपला 'सिझनेबल कवी' होऊ नये म्हणून खूप जपावं लागतं. आणि सतत नवनवं शोधावं लागतं. आधी बापाचे प्रश्न सोडवायला कविता उपयोगाची नाही म्हणणारा तू, या संग्रहातल्या शेवटच्या काही कवितांमधून कवितेचं नेमकं काम काय ते समजण्यापर्यंत पोहोचला आहेस. तुझ्या कविताविषयक कविता मला फार आवडून गेल्या. कवितेच्या कर्माची आणि कवीच्या धर्माची तुला इथं नेमकी जाणीव झालेली दिसते.

या कवितासंग्रहाची सुरुवात आणि शेवट कवी म्हणून झालेला तुझा विकास दाखवतात. नुसतंच मागल्या पानावरून पुढे असं झालेलं नाही. तुझे दोन्ही कवितासंग्रह चांगल्या प्रकाशकांनी आणि फार चांगले काढले आहेत. पण तुझ्या दोन्ही संग्रहाचे मुखपृष्ठ मात्र मला आवडली नाहीत. मला ती फारच प्राथमिक वाटली. तुझ्या कविता वाचून, तुझं संवेदन मुरवून साकार झालेलं चित्रच पुस्तकाला न्याय देऊ शकलं असतं. शिवाय संग्रहाची लांबलचक शीर्षकंही मला आवडत नाहीत. तुझी कविता वाचून जे जे मनात येत गेलं ते लिहीत गेलो. उणं पुरं करून घे. बाकी ठीक. 

तुझा
इंद्रजीत

हेही वाचा : 

दिवाळी स्पेशल कथा : ‘ब्याव’

सह्याद्रीला पुन्हा हिमालयाची हाक

आपले पूर्वज नॉनव्हेज खायचे, दारू प्यायचे का?

सत्तरीतल्या रजनीकांतची नवी राजकीय इनिंग कुणाच्या फायद्याची?