मा. अण्णा, आता माघार नको, तुम्ही उपोषण कराच

१४ फेब्रुवारी २०२२

वाचन वेळ : ५ मिनिटं


महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केटमधे वाईन विक्रीला परवानगी दिली आणि वाद निर्माण झाला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी या निर्णयाला विरोध केलाय. तसंच या निर्णयाविरोधात १४ फेब्रुवारीला उपोषण करण्याचा इशाराही दिलाय. त्यावरून अण्णांचे एकेकाळीचे कार्यकर्ते आणि भ्रष्ट-आचार जनजागरण कृती समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील यांनी त्यांना पत्र लिहिलंय.

मा. अण्णा हजारे,
स. न. वि. वि.

महाराष्ट्र सरकारने सुपर मार्केटमधे वाईन विक्रीला परवानगी दिल्याच्या निमित्ताने आपण आपले अस्तित्व दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.

महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयाविरुद्ध आपण दंड थोपटून पुढे आलात, हे एकेकाळी आपले कार्यकर्ते राहिलेल्या माझ्या सारख्यांना खूप मोठा दिलासा देणारं आहे.

सध्या महाराष्ट्रात आपल्या ना आवडत्या पक्षाचे सरकार आहे; पण गेले अनेक दिवस ते तुम्हाला त्यांचा विरोध करण्याची संधीच देत नव्हते. आता तुम्हाला संधी मिळाली आहे. तसे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना पत्र पाठवून हा निर्णय मागे घ्यावा अशी सूचना केली आहे आणि निर्णय मागे न घेतल्यास आपलं ब्रह्मास्त्र बाहेर काढण्याचा म्हणजे उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.

तुमच्या पत्राला मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री साधं उत्तरही देत नाहीत हेही आपण सांगितलं. शिवाय पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीही आपल्या पत्राला उत्तर देत नाहीत असंही आपण सांगितलं. खरं तर किमान मा. नरेंद्र मोदी यांनी तरी आपल्या पत्राला उत्तर द्यायला हवं होतं. आपण नरेंद्र मोदी यांना ते पंतप्रधान झाल्यापासून त्यांना अनेक पत्र पाठवल्याचं सांगितलं; पण त्यांनी तुमच्या एकाही पत्राला उत्तर दिलं नाही.

हेही वाचा: महापोर्टलचा महाव्यापम घोटाळा सुनियोजित होता?

आपण २०१३ला दिल्लीत तेव्हाचे काँग्रेसचे पंतप्रधान मा. मनमोहन सिंग सरकार विरोधात आंदोलन आणि उपोषण केल्यामुळे काँग्रेसचं सरकार जाऊन मा. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले असं आपल्यासह अनेकांच्या तोंडून आम्ही ऐकलंय. असं एवढं मोठं आपलं योगदान असूनही मा. नरेंद्र मोदी साहेब आपल्या पत्राला साधं उत्तरही देत नाहीत हे ऐकून आम्हाला अतीव दुःख होत आहे.

आता देशाचे पंतप्रधानच आपल्या पत्राला उत्तर देत नाहीत तर आम्ही तरी का द्यावं, असं आपल्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना- उपमुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर त्याबद्दल आपण काय बोलावं?

बरेच दिवस महाराष्ट्र सरकारकडून तुमच्या पत्राला उत्तर येत नाही आणि तो निर्णयही मागे घेतला जात नाही हे पाहून आपण एकदाची उपोषणाची तारीख १४ फेब्रुवारी जाहीर केलीत ते बरं झालं. ही बातमी देत असताना काही आघाडीच्या न्यूजपेपरने ‘अण्णा हजारे यांचं १४ फेब्रुवारी पासून उपोषण?’ अशा हेडिंगने बातमी दिलीय. त्यांनी या बातमी पुढे प्रश्नार्थक चिन्ह टाकलंय. याचा अर्थ त्या न्यूजपेपरच्या बातमीदाराला आपण खरोखरच उपोषणाला बसाल का याबद्दल शंका वाटत असावी किंवा तो आपल्या या घोषणेकडे ‘लांडगा आला रे आला.’ म्हणून लोकांची फसवणूक करणार्‍या त्या शेळी राख्या प्रमाणे आपल्याला समजत असावा.

काही असो अण्णा, पण तुम्ही एकदा उपोषणाला बसाच. बरेच दिवस झाले उपोषण करून, तेव्हा कारण कितीही छोटं का असेना; पण आता ही संधी तुम्ही सोडू नका. का कुणास ठाऊक पुढे हे आघाडीचे सरकार टिकेल ना टिकेल परत भाजपचं सरकार आलं तर आपली गोची होईल.

आपण भाजप विरोधात आंदोलन, उपोषण करत नाही असं अनेकांचं म्हणणं आहे आणि त्यात तथ्यही दिसतं. कारण केंद्रातल्या मोदी सरकारने अनेक चुकीचे निर्णय घेऊनही आपण त्या विरोधात ना आंदोलन केलं ना उपोषण. मग ते पीएम केअरचा हिशोब माहिती अधिकाराअंतर्गत न देणं असो किंवा राफेल घोटाळा असो, तीन काळे शेतकरी कायदे असो किंवा कोरोना महामारी व्यवस्थित हाताळली नाही म्हणून लाखो लोकांचे झालेले हाल असो.

फसलेली नोटबंदी असो किंवा पंतप्रधान स्वतःसाठी अनावश्यक कोट्यवधी रुपये करत असलेला खर्च असो. असे एक ना अनेक गंभीर विषय असूनही आपण केंद्रातल्या मोदी सरकार विरोधात अगदी 'ब्र' शब्दही उच्चारला नाही, पण आता दुधाची तहान ताकावर भागवण्याची संधी तुम्हाला मिळालीय.

हेही वाचा: खुळी न जनता फसेल आता, पुरे करा हे ढोंग!

आम्हाला माहिती आहे, आपल्याला दूध पोळतं म्हणून आपण ते पीत नाही; पण ताक थंड असतं शिवाय ते शरीराला अर्थात लोकप्रियतेला पोषक असतं तेव्हा अण्णा तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या या किमान आपल्याला वाटणार्‍या अत्यंत घातक संपूर्ण मानवजातीचा र्‍हास करणार्‍या या सुपर मार्केटमधे वाईन विक्री निर्णयाच्या विरोधात उपोषण कराच. जसं मोदी साहेबांनी महाराष्ट्र सरकारला कोरोनाचा सुपर स्प्रेडर बनवलं तसं तुम्ही या महाराष्ट्र सरकारला सुपरमार्केटमधे वाईन स्प्रेडर अशी उपमा देऊन या निर्णयाच्या विरूद्ध उपोषणाला बसाच.

लोक काय दोन्ही कडून बोलतात हो. उपोषणाला नाही बसले तरी, का नाही बसले म्हणतील शिवाय आपल्या आवडत्या पक्षाचे नेतेही तुमच्यावर नाराज होतील तेव्हा उपोषणाला बसाच. आता काही लोक म्हणतील हा काय एवढा गंभीर विषय आहे का? यापूर्वी काय वाईन विक्रीला बंदी होती का? का आता सुपर मार्केटमधे वाईन ठेवली म्हणजे ती काय फुकट मिळेल का? का वाईन विकत घेतल्या शिवाय किराणामाल मिळणारच नाही का? का दुसरी साधी दारू स्वस्त मिळत असूनही अधिक चढत असेल तर ही एवढी महाग दारू पितील का? असे एक ना अनेक प्रश्न लोक उपस्थित करतील कोणी म्हणेल वाईन विक्री अधिक झाल्याने शेतकर्‍यांना फायदा होईल.

असं कोणी काहीही म्हणो, अण्णा आता आपल्याला संधी मिळाली आहे ती सोडायची नाही. आणि हो अण्णा, काही जण असंही म्हणतील अण्णांना वाईनचा दारूचा एवढा तिरस्कार आहे तर त्यांनी मिलिटरीत असताना तिथे फुकट मिळणार्‍या दारू विरोधात का कधी आंदोलन केलं नाही.

शिवाय अण्णा मिलिटरीत असताना त्यांना दारू फुकट मिळूनही अण्णा बेवडे झाले का? असाही प्रश्न उपस्थित करतील शिवाय मिलिटरीत सैनिकांना फुकट दारू मिळत असल्याने अनेक सैनिकांना दारूचं व्यसन जडून मिलिटरीमधून रिटायर झाल्यानंतर अनेक माजी सैनिकाचं त्या व्यसनामुळे आयुष्य बरबाद झाल्याकडेही आपलं लक्ष वेधलं जाईल. मग अण्णा त्या केंद्रसरकारच्या सैनिकांना फुकट दारू देण्याच्या विरोधात का आंदोलन करत नाहीत असंही कोणी म्हणेल; पण अण्णा याच्याशी आपल्याला काही देणंघेणं नाही.

आपल्याला फक्त न आवडणार्‍या पक्षाविरोधात आंदोलन करायचं आहे. आता तर महाराष्ट्रात आपल्याला न आवडणार्‍या तीन पक्षाचं सरकार आहे तेव्हा एकाच दगडात तिन्ही पक्षाला धडा शिकवण्याची संधी उपलब्ध झाली आहे, ती आता सोडायची नाही.

हेही वाचा: आपली भूमिका इतिहासाची दिशा ठरवणार आहे

काय सांगावं तुमच्या या उपोषणामुळे कदाचित हे तीन पक्षाचं महाराष्ट्रातलं सरकार जाऊन भाजपला सरकार स्थापण्याची संधी मिळेल आणि असं झालं तर मागच्या अडीच-पावणे तीन वर्षांपासून येनकेनप्रकारे हे तीघाडीचं सरकार पाडण्यासाठी जिवाचा आटापिटा करणार्‍या भाजपच्या नेत्यांमधे आपली किंमत आणखी वाढेल आणि काय सांगावं आपल्याला आपल्या कार्यकर्त्या भाजपच्या कृपेने राज्यपाल झालेल्या, किरण बेदी यांच्यापेक्षाही अधिक काहीतरी मिळेल.

अण्णा आता ‘शेंडी तुटो वा पारंबी’ आपण आपल्या निर्णयावर ठाम रहा. आणि हो काही जण म्हणतील आता या वयात अण्णांनी उपोषण करू नये वगैरे; पण तुम्ही याची भीती बाळगू नका. तुमच्या जीवाची तुमच्यापेक्षा तुमच्या आवडत्या पक्षाच्या नेत्याला अधिक काळजी आहे. कारण त्यांना सत्तेत येण्यासाठी तुमची वारंवार गरज पडणार आहे. तेव्हा तुम्ही काळजी करू नका.

तसं काही तुमच्या जीवाला धोका वाटला तर तुमचे आवडते नेते देवेंद्र फडणवीस धावून येतीलच आणि केंद्र सरकारकडून या निर्णयाविरोधात बंदी घालू असं काहीतरी आश्वासन देऊन तुम्हाला उपोषण मागे घ्यायला कारण उपलब्ध करून देतील. शिवाय उपोषणानंतर पत्रकारांसमोर तुम्हाला ते बोलण्याचे श्रमही पडू देणार नाहीत कारण हल्ली त्यांना तुमच्या वतीने बोलण्याची चांगली सवय झाली आहे. तेव्हा अण्णा तुम्ही उपोषणाला बसाच. फक्त उपोषण सोडते वेळेस देवेंद्र फडणवीस जो फळाचा रस देतील त्यामधे वाईन नाही ना, तेवढं तपासून बघा आणि मगच ते प्या.

अण्णा, तुमच्या पुढील वाटचालीस अनेक शुभेच्छा. आपणास आरोग्यदायी शतकोत्तर दीर्घायुष्य लाभो ही सदिच्छा. धन्यवाद!

आपला माजी कार्यकर्ता,
राजकुमार धुरगुडे पाटील
अध्यक्ष, भ्रष्ट-आचार जनजागरण कृती समिती

हेही वाचा: 

टिळकांच्या हरवलेल्या पुतळ्याचा शोध कुठं घ्यायचा? 

ती १५ मिनिटं ठरवणार आपल्या चांद्रयानाचं भवितव्य

परदेशात जायचंय, मग स्वस्तातलं विमान तिकीट बुक कसं करणार? 

आग विझवण्यात मुंबईतला रोबोट अपयशी, मग जगभरात काय होतंय?

(लेख जागल्या वेबपोर्टलमधून साभार)