माणसाच्या उत्पत्तीची सोपी गोष्ट सांगणारं ‘ओरिजिन्स’!

०१ मार्च २०२०

वाचन वेळ : ३ मिनिटं


ब्रिटीश लेखक लेविस डार्टनेल यांचं ‘ओरिजिन्स’ हे पुस्तक २०१९ मधे प्रकाशित झालेलं पुस्तक. पहिला माणूस का आणि कुठं तयार झाला आणि तिथून तो कुठं गेला याची वैज्ञानिक माहिती सोप्या शब्दांत सांगायची असेल तर लेविस यांच्या या पुस्तकाचं उदाहरण घ्यावं. पत्रकार अमेय तिरोडकर यांनी फेसबुकवर या पुस्तकाचा परिचय लिहिला होता. त्याचा हा संपादित भाग.

‘आजपासून २७ ते २५ लाख वर्षांपूर्वी, नंतर १९ ते १७ लाख वर्षांपूर्वी आणि मग ११ ते ९ लाख वर्षांपूर्वी वातावरणात टोकाचे बदल झाले. या काळातल्या जीवाश्मांचा अभ्यास करता करता संशोधकांना खूप इंटरेस्टिंग गोष्टी आढळल्या. जेव्हा जेव्हा होमिनीन म्हणजे माणसासारख्या दिसणाऱ्या, माणसाच्या जवळ जाणाऱ्या प्रजातींमधे लक्षणीय उत्क्रांती अथवा बदल झाले तोही काळ नेमका हाच म्हणजे या वातावरणाच्या टोकाच्या बदलांचा काळ आहे. माणसाच्या आजवर आपल्याला माहीत झालेल्या अथवा अंदाज आलेल्या एकूण १५ प्रजातींपैकी १२ प्रजाती या तीन वेगवेगळ्या कालखंडात त्यांच्या गुणवैशिष्ट्यांसहित अस्तित्वात आल्या.’

हा उतारा आहे लेविस डार्टनेल या ब्रिटीश संशोधकाच्या ‘ओरिजिन्स: हाऊ द अर्थ शेप्ड ह्युमन सोसायटी’ या अफलातून पुस्तकातला!

हेही वाचा : ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं

सोप्या शब्दातलं विज्ञान कुणी असं सांगावं!

विज्ञानाला लोकप्रियता मिळवून देण्यासाठी विज्ञानात झालेल्या संशोधनांची सोप्या शब्दांत मांडणी करावी असा आग्रह धरणाऱ्यांसमोर नेहमीच लेविस यांचं उदाहरण असतं. त्यांच्या द नॉलेज- हाऊ टु रीबिल्ड आवर वर्ल्ड फ्रॉम स्क्रॅच या अशाच एका भन्नाट पुस्तकाने जगातल्या जाणकार वाचकांना नवं आणि वेगळं काहीतरी वाचल्याचा आनंद दिलाय. त्यांचं ओरिजिन्स हे यंदा प्रकाशित झालेलं नवं पुस्तक.

पृथ्वीवर अनेक भौगोलिक, पर्यावरणीय बदल झाले. माणसाचा पूर्वज त्याच्या थोड्याशा स्वतंत्र गुणवैशिष्ट्यांसहित ७० लाख वर्षांपूर्वी चिंपाझीपासून वेगळा झाला असेल, असा अंदाज अनेक संशोधकांनी व्यक्त केलाय. तेव्हापासून ते आजवर या नैसर्गिक बदलांचा आपल्या जडणघडणीवर प्रचंड मोठा, निर्णायक परिणाम होत आलाय.

याचं उदाहरणच द्यायचं झालं तर पूर्व आफ्रिकेत माणसाच्या सुरवातीच्या वेगवेगळ्या प्रजातींना विकसित होण्याची संधी का मिळाली याचं उत्तर शोधता येईल. पहिला माणूस आफ्रिकेत तयार झाला असं म्हणतात. कारण तेव्हा तिथली भौगोलिक आणि पर्यावरणीय स्थिती माणूस तयार व्हायला पूरक होती. खरंतर पर्यावरण आणि भौगोलिक परिस्थितीत नंतर झालेले नकारात्मक बदल हेही माणसाच्या स्थलांतरासाठी कारणीभूत आहेत. म्हणूनच माणूस आफ्रिकेतून बाहेर आला आणि दुसरीकडे स्थलांतरीत होऊ लागला.

हेही वाचा : एक शून्य प्रतिक्रियाः जगणं आणि लिहिण्यातल्या शून्य अंतराची कविता

अंगावर रोमांचं उभं करणारं पुस्तक

हे सगळं लेविस अत्यंत सोप्या शब्दांत समजावून सांगतात. पण ते तिथेपर्यंतच थांबत नाहीत. ग्रीसमधेच लोकशाही का अस्तित्वात आली किंवा अमेरिकेतल्या मतदारांच्या मतदान पद्धतीवर भौगोलिक घटकांचा कसा थेट प्रभाव आहे, याचंही विस्मयचकित विश्लेषण ते करतात. आपल्या भोवतालच्या घटनांचा हा असा पूर्णतः स्वतंत्र शोध आणि मूलभूत विचार करणारं एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक लेविस यांनी आपल्याला दिलंय.

लेविस यांचं ओरिजिन्स हे पुस्तकंही इतिहास आणि भूगोल, पर्यावरण आणि राजकारण, मानववंशशास्त्र म्हणजे एन्थ्रोपोलॉजी आणि अर्थकारण, विज्ञान आणि मिथकं अशा टप्प्यात येणाऱ्या सगळ्या अंगांचा वेध घेत आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवर दर्जेदार संस्कार करतं. आणि हे करत असताना ते कुठंही क्लिष्ट किंवा अवघड वाटत नाही. अगदी सहज, सोप्या, रसाळ भाषेत गप्पा ठोकाव्यात तसं हे पुस्तक शेवटच्या पानापर्यंत आपल्या सोबत असतं!

इस्राईली लेखक युवाल नोवा हरारी यांच्या 'होमो सेपिअन्स' या प्रसिद्ध पुस्तकासारखंच लेविस यांचं ओरिजिन्स हे अंगावर रोमांचं उभं करणारं पुस्तक आहे,' असं 'संडे टाईम्स'च्या पुस्तक परीक्षणात लिहून आलं होतं. हे पुस्तक पूर्ण वाचून झाल्यावर आपल्यालाही तसंच वाटत राहतं!

हेही वाचा : 

२९ फेब्रुवारीला जन्मलेल्यांनी बड्डे कधी सेलिब्रेट करायचा?

आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू

अपना बाजारची गोष्टीः सक्सेसफूल सहकार मॉडेलची कहाणी

युगानुयुगे तूच : महामानवाच्या जीवनाचा ठाव घेणारी दीर्घकविता