साडेसातशे वर्षांपूर्वीचे संत गोरा कुंभार आजही थोर का आहेत?

०२ मे २०१९

वाचन वेळ : ११ मिनिटं


आज चैत्र वद्य त्रयोदशी. महाराष्ट्राला घडवणाऱ्या संत गोरा कुंभारांची आज परंपरेनुसार पुण्यतिथी. महाराष्ट्राच्या संतपरंपरेचा सामाजिक सांस्कृतिक मागोवा घेणाऱ्या रिंगण या वार्षिकाने २०१८ला संत गोरा कुंभार विशेषांक काढला होता. त्याचे संपादक सचिन परब यांनी गोरा कुंभारांचं नेहमीची चाकोरी सोडून गोरा कुंभारांची थोरवी शोधण्याचा प्रयत्न केलाय.

कधी विचार यायचा. माती निर्गुण निराकार. मडकं मात्र सगुण साकार. पण मातीच खरी. कारण मडक्याचीही शेवटी मातीच होणार. आकार कधी ना कधी संपणार.

नंतर वाटू लागायचं. असं असलं तरी मडकंही महत्त्वाचं. कारण नुसती माती काय कामाची. रोजच्या जगण्यात निराकाराला आकार हवाच.

हळूहळू कळू लागलं. माती काय, मडकं काय, शेवटी एकच. सगुण निर्गुण एकच. साकार निराकार एकच.

असाच विचार करत करत संत गोरा कुंभार आपल्या कामात तल्लीन होत असावेत. माती तयार करावी. पायाने रगडून त्याचा एकजीव चिखल करावा. एका लयीत चाक फिरवावं. मातीच्या गोळ्याला हवा तसा आकार द्यावा. हे सगळं करण्यासाठी जिवाच्या आकांताने एकाग्र व्हावं. कामाच्या त्या एकांतातच विचारांचंही चक्र सुरू असावं. जगण्याच्या गाठी आपसूक उलगडत जाव्यात. तसंच कधीतरी विचारांच्या डोहात खोल खोल उतरत जाताना गोरोबांना सगुण निर्गुणाच्या पेचाचाही सहज उलगडा झाला असेल. तितक्याच सहज त्यांना कुंभारकामात पांडुरंग भेटला असेल.

तसा पांडुरंग गोरोबांच्या जन्माच्या आधीपासूनच त्यांच्या घरात होता. त्यांचे वडील महादूबुवा वारकरी होते, असा उल्लेख त्यांच्या जवळपास सगळ्या चरित्रांत सापडतो. एकटे गोरोबाच नाहीत. त्यांच्या बरोबरीच्या सगळ्याच संतांच्या घरात पांडुरंग त्यांच्या आधीपासूनच फतकल मारून बसलेला होता. पांडुरंग घरात एकटा शिरत नाहीच. तो भक्तीचा विचार घेऊन येतो. भक्तीही एकटी येत नाही.

निती असेल तिथेच भक्तीला अर्थ असतो. नितीची साधना सोपी नाही. त्यासाठी पांडुरंग जगण्याची एक लाईफस्टाईल देतो. ही लाईफस्टाईल प्रेमाची आहे. तेवढीच खऱ्याची आहे. त्यात सातत्य टिकवण्याची आहे. त्याच संस्कारांतून संत घडले असतील. नाहीतर साथीचा रोग आल्यासारखे जवळपास प्रत्येक जातीतून संत निर्माण व्हावेत. तेही सगळे एकाच काळात. तीन चार वर्षांच्या फरकाने तेराव्या शतकात जन्म घ्यावेत. तेही भूगोलाच्या एकाच पट्ट्यात. हा काही योगायोग नक्कीच नाही.  

तेराव्या शतकात महाराष्ट्राच्या मोठ्या भागावर देवगिरीच्या यादवांचा अंमल होता. पण साम्राज्याच्या पार उतरणीचा काळ सुरू झाला होता. नावापुढे भिल्लम आणि नावानंतर यादव लावणाऱ्या सेऊण नावाच्या गवळ्याच्या पोरानं नवव्या शतकात देवगिरीच्या साम्राज्याचा पाया रचला. त्यानंतर जवळपास चार शतकं राजवट सुरू होती. कित्येक पिढ्या ऐश्वर्यात लोळण्यात गेल्या. राजांवरचे कष्टाचे संस्कार कधीचेच संपले. आता राजांना स्वतःचं महात्म्य सिद्ध करण्यासाठी पुरोहितांची सर्टिफिकेटं महत्त्वाची वाटू लागली.

नावापुढे मोठमोठ्या संस्कृत पदव्या लावणारा शेवटचा यादव राजा रामदेवराय कर्मकांडांच्या गर्तेत खोल बुडाला होता. पुरोहितांच्या ओंजळीने पाणी पिण्यात तो मश्गुल होता. त्याचा पंतप्रधान हेमाद्री पंडित म्हणजे हेमाडपंतच खरं राज्य चालवत होता. वर्षाकाठी हजारो व्रतवैकल्यं सांगणारे `चतुर्वर्ग चिंतामणी`सारखे ग्रंथ आजही त्याच्या नावावर उपलब्ध आहेत. ती सारी व्रतं फक्त त्याच्या जातीचं वर्चस्व निर्माण करण्याचा एककलमी कार्यक्रम राबवणारी होती.

पंडितांची फौज पोसून हेमाद्रीने इतिहासाचं भजं केलं. बोगस बखरी लिहिल्या. शेकडो वर्षं जुनी देऊळ बांधायची मराठी पद्धत स्वतःच्या नावावर खपवली. मोडी लिपी आणि बाजरीच्या पिकावरही स्वतःचे शिक्के मारले. त्यांचा जनक म्हणून आज इतिहासही हेमाडपंताचं नाव सांगतो. चातुर्वर्णाचं ढोंग करून त्याने साध्याभोळ्या लोकांच्या शोषणाची साखळी उभारली. स्वतःची सत्ता राबवण्यासाठी मातीचं सत्त्व आणि स्वाभिमान संपवण्याचं कारस्थान रचलं. पण त्यामुळे ती सत्ताच खिळखिळी झाली. कोणत्याही आक्रमणाला तोंड देण्याची यादव साम्राज्याची क्षमताच कायमची हरवली.  

थोडक्यात काळ मोठा भीषण होता. राजा आणि प्रजा स्वतःची ओळख विसरली होती. अशा काळात तेर नावाच्या व्यापारी शहरात गोरोबांचा जन्म झालाय. साल आहे इसवी सनाचं १२६७. `भक्तकथातत्व` नावाच्या मराठी ग्रंथात हे अधिक स्पेसिफिक सांगितलंय. शालिवाहन शके ११८९, प्रभव नावाचं संवत्सर, आषाढ शुक्ल दशमी, संध्याकाळी साडेसात. बहुजनांच्या घरात आता शंभर वर्षापूर्वीही लोकांच्या जन्मतारखा नसायच्या. शाळेच्या मास्तरांच्या कृपेने १ जून आणि ६ जून या जन्मतारखा आताआतापर्यंत होलसेलने असायच्या. असं असताना गोरोबांची सातशे वर्षांपूर्वीची इतकी तपशिलातली जन्मवेळ पाहून आश्चर्य वाटतं खरं.

आनंदाची गोष्ट म्हणजे गोरोबांची ही जन्मतारीख सगळ्यांना मान्य आहे. मुळात सांप्रदायिकांना संतांच्या जन्मतारखेशी काही घेणंदेणं नसतंच. कारण देवांची जयंती करायची आणि संतांची पुण्यतिथी, हा रिवाज. अभ्यासकांनीही दुसरा काही पर्याय नसल्याने ही तारीख स्वीकारलीय. ती इतिहासाच्या लॉजिकमधेही बसते.   

इतर संतांची सहजपणे उपलब्ध न होणारी गोरोबांची तपशिलातली जन्मवेळ आपल्याला सापडली. ते उपकार तेर या गावाचे आहेत. तेर एके काळची फार मोठी बाजारपेठ. दोन हजार वर्षांपूर्वी महाराष्ट्र घडवणाऱ्या सातवाहनांची पैठण ही मुख्य राजधानी होती. तर तेर ही व्यापारी राजधानी होती. सातवाहनांनंतर राष्ट्रकुल, चालुक्य, शिलाहार आणि यादव यांच्या काळात तेरची अधोगती होत गेली. व्यापार खुंटला. वैभवाला आहोटी लागली.

हेमाडपंताच्या कृपेने धर्म हा सर्वात मोठा बाजार बनला होताच. गावात वेगवेगळ्या देवांची देवळं खूप होती. मग तेरला तीर्थक्षेत्र बनवण्याचा कारखाना पुढची काही शतकं जोरात चालला. तीर्थक्षेत्राचं महत्त्व वाढवण्यासाठी स्थानमहात्म्याच्या पोथ्या रचण्यात आल्या. त्याच्या कचाट्यातून गोरोबाही सुटले नाहीत. धर्माच्या दुकानदारांनी गोरोबांची लोकप्रियता लक्षात घेऊन त्यांना चमत्कारी देव बनवण्यासाठी प्रतिभा पणाला लागल्या. त्याचाच प्रभाव संतांची चरित्रं लिहिणाऱ्या उद्धव चिद्घन, दासो दिगंबर, महिपतीबुवा कांबळे – ताहराबादकर या जुन्या लोकांवर स्वाभाविकपणे झाला.

शिवाय गेल्या शतकातल्या दासगणू महाराजांनी तर चमत्कारांना मालमसाला टाकून अधिकच चमचमीत केलंय. तेरजवळच्याच पिंपरी गावच्या सदाशिव पाटील यांनी चाळीसच वर्षांपूर्वी गोरोबांचं ओवीबद्ध चरित्र लिहिलंय. त्यातही चमत्कारांनाच नमस्कार आहे. त्यामुळेच गोरोबांविषयी चमत्कार भारंभार सापडतात. पण गोरोबांच्या महात्म्याचं खरं वैभव असणारे अभंग मात्र अवघे तेवीसच उपलब्ध आहेत.

संत महापुरुषांना देवाचे अवतार बनवलं की आपली जबाबदारी संपतेच. ते देव, आम्ही साधी माणसं, असं म्हणून टांग वरून करून झोपता येतं. चमत्काराच्या फॅक्टरीने गोरोबांनाही यमाचा अवतार ठरवलंय. धर्म अधर्माचा निवाडा करणारा हा मृत्यूचा देव. त्याला मांडव्य नावाच्या ऋषीचा शाप मिळाला. म्हणून तो त्रेतायुगात रामाचा भक्त गंधमादन नावाचा वानरांचा सेनापती बनला. तसंच द्वापारयुगात कृष्णाचा भक्त महाज्ञानी विदुर आणि कलियुगात पांडुरंगाचे भक्त गोरोबा काका.

ही सारी अवताराची भानगड संतांना नंतर चिटकवलेली आहे, हे उघड आहे. संतांचे गुण पाहून त्यांच्याशी जुळणारी पुराणातली पात्रं शोधून त्यांना जोडलीत. त्यातून गोरोबांची लोकांमधली प्रतिमा कशी आहे ते कळतं. गंधमादन आणि विदुर हे दोघेही देवाचे जवळचे भक्त आहेत. विद्वान आहेत. प्रामाणिक आणि सात्विक आहेत. पण एक वानरकुळातला तर दुसरा दासीपुत्र. त्यामुळे त्यांची जोडी शूद्र कुंभारांशी जोडावी, ही क्षुद्र मानसिकता. शेकडो वर्षं कुणालाही त्यात वावगं वाटत नाही.

गोरोबांच्या नावाचीही अशीच बिनबुडाची कहाणी आहे. महादूबुवांना आठ मुलं झाली. एकही जगलं नाही. आठवं मूल मेलं म्हणून स्मशानाच्या गारीत पुरलं. तेव्हा पांडुरंगाला दया आली. त्याने साधूचं रूप घेऊन मुलाला जिवंत केलं. स्मशानातून म्हणजे गारीतून आला म्हणून गोरा. पण गोरा हे नाव वेगळं आहे. ते आधीही प्रचलित नव्हतं आणि नंतरही नव्हतं.

त्यामुळे गोरा हे नाव नसून विशेषण असावं, असाही एक तर्क आहे. गोरा म्हणजे विलायती, व्हाईट. तेरचा इराणपासून युरोपापर्यंत शेकडो वर्षं व्यापार होता. युरोपातल्या मॅगेरियन साच्याच्या पद्धतीची मडकी देशभरात फक्त तेरलाच सापडली आहेत. त्यामुळे युरोपियन कुंभारांची तेरला वस्ती असावी असा कयास आहे. गोरा या नावावरून गोरोबांना त्यांच्यातला एक ठरवणारेही जाणकार आहेत.

ही देखील फक्त जर तरची गोष्ट आहे. मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे केलेला कल्पनाविलास आहे. समजा हे खरं असेल तरी काय झालं? परदेशातून येऊन भारतात स्थायिक झालेल्यांचा इतिहास आपल्याला नवीन नाही. अशा शेकडो समाजांना इथल्या मातीने आपलंसं करून कधीचंच अस्सल भारतीय केलंय. आणि तसंही आमच्या सावळ्या विठुरायाची सावली पडली की कुणी व्हाईट उरत नाही.

ते काहीही असो, गोरोबांच्या जडणघडणीत तेरचं योगदान फारच महत्त्वाचं आहे. देशभरातले आणि देशाबाहेरचेही अनेक आध्यात्मिक विचारप्रवाह तिथे वस्तीला होते. सामाजिक विचार आणि आध्यात्मिक विचार असा फरकही तेव्हा नव्हता. तिथे शैव होते आणि वैष्णव होते, वैदिक होते आणि कर्मकांडी होते, शाक्त होते आणि भक्तही होतो. बुद्ध होते आण जैन होते. वारकरी होते आणि लिंगायत होते. महानुभाव होते आणि सुफीही होते. आजही या साऱ्यांच्या खुणा तेरमधे आहेत. झाडून सगळ्या जुन्या संप्रदायांची देवळं आहेत. भव्य बौद्ध स्तूप आहे. जैनांचं तीर्थस्थान आहे. योनिपूजनाची उदात्त परंपरा सांगणारी लज्जागौरीही आहे.

त्यामुळेच गोरोबांना कुणी खानदानी वारकरी ठरवतं. कुणी त्यांचे आईवडील लिंगायत असल्याचं सांगतं. कुणी त्यांना परदेशी म्हणतं. तर कुणी त्यांना नाथपरंपरेतलं मानतं. गोरक्षनाथ, गहिनीनाथ आणि रेवणनाथ या वेगवेगळ्या काळात होऊन गेलेल्यांना त्यांचं गुरू ठरवण्यात येतं. कदाचित यापैकी एकच खरं असेल. कदाचित सगळंच खरं असेल. एकतर त्या काळात संप्रदाय आणि धर्मांची आता आहेत तशी वॉटरटाईट कम्पार्टमेंट नव्हती. अशा सीमारेषा मानायला गोरोबा काही आपल्यासारखे तोकडे नव्हते. ज्ञानाचं वारं येईल तिथून स्वतःत खोलवर भरून घ्यावं. इतके ते खुले असणारच.

ते सेल्फमेड होते. त्यांनी मार्गदर्शन सगळ्यांकडूनच मिळेल तितकं शहाणपण घेतलं असणार. त्यामुळे कुणा एकाचंच डोळे झाकून स्वीकारण्याचा मठ्ठपणा केला नसणारच. त्यामुळे गोरोबांचा कुणी किंवा गोरोबांना कुणाचा गुरू ठरवण्यात काही हशील नाही. `तुझा तुचि दिवटा, होसिगा सुभटा` हे थेट `अत्त दिपो भव`ला शिवणारं वाक्य गोरोबांच्या कवितेत उतरलंय. ते उगाच नाही. म्हणूनच तर ते स्वतःच्या पलीकडे जाऊन जगाचा विचार करू शकले. जीवनाची मुक्ती म्हणजे `जग हे करणे शहाणे बापा` असं छातीठोक सांगू शकले.

गोरोबा कामात वाकबगार असणारच. ते त्यांच्या अभंगांमधे दिसतं. चरित्रात आढळतं. ग. दि. माडगूळकरांनी `संत गोरा कुंभार` सिनेमात लांबून लांबून लोक गोरोबांची मडकी घेण्यासाठी येत, असं दाखवलंय. खरंच असेल ते. तेरसारख्या समृद्ध गावातलं कुंभाराचं वतन घरात होतं. त्यामुळे अगदी फाटकं दारिद्र्य घरात नसावंच. घऱ खाऊन पिऊन सुखी असावं.

तेव्हाच्या पद्धतीने टीनएजमधे गोरोबांचं लग्न झालं असणार. शेजारच्या ढोकी गावची संती गोरोबांच्या घरची लक्ष्मी बनली. त्यांचा संसार सुखाचाच असावा. पण संतांच्या बायकांना भांडखोर दाखवण्याची आपल्याकडे पद्धत आहे. शांत नवरा आणि कैदाशीण बायको असा कॉण्ट्रास्ट कथेत रंग भरण्यासाठी बराच असतो. मग खऱं काहीही असो.

गोरोबांना लग्नानंतर बारा वर्षांनी मुलगा झाला. मकरेंद्र त्याचं नाव. त्यानंतर एका रेषेत चालणाऱ्या गोरोबांच्या जीवनकहाणीत मोठा ट्विस्ट आला. त्यानंतरचेही चरित्रातले लटके झटके एकावर एक कडी करणारे आहेत. आजच्या कोणत्याही टीवी सिरियल्सना लाजवेल इतका मसाला त्यांच्या आयुष्यात आलाय. दोन बायका, मुलाचा मृत्यू, विरहाच्या वेदना, चमत्कार, जादू, मैत्री, प्राणीप्रेम, गीत संगीत, मेलोड्रामा, लव्ह, सेक्स ड्रामा, आनंदी शेवट. काय नाही गोरोबांच्या गोष्टीत.

गोरोबांच्या आयुष्यातला तो टर्निंग पॉइंट आपल्याला माहीत आहेच. ते विठ्ठलाचं नाव घेत चिखल तुडवत असतात. संती रांगणाऱ्या मकरेंद्राला त्यांच्या भरवशावर ठेवून पाणी भरायला जाते. पण गोरोबांना काहीच माहीत नसतं. मकरेंद्र रांगत रांगत मातीत तल्लीन होऊन नाचणाऱ्या, उड्या मारणाऱ्या वडलांच्या दिशेने जातो. त्यांच्या पायाखाली सापडतो. रडतो. ओरडतो. पण गोरोबा भानावर येत नाहीत. ते आपल्या पोटच्या गोळाला पायाने तुडवत राहतात. त्यात त्याचा चेंदामेंदा होतो.

ही कहाणी संत गोरा कुंभारांची ओळख बनलीत. त्यांची कोणतीही मूर्ती असो वा चित्र. त्यात गोरोबा माती तुडवण्याच्या पोझमधेच असतात. त्यांच्या पायाशी छोटं बाळ असतं. अनेकदा त्या चिखलात लाल रंगाने रक्तही दाखवलेलं असतं. हे सारं अमानुष आहे. बाप आपल्याच मुलाला पायाने तुडवून मारतो. यात भयंकर क्रौर्य आहे. कितीही पटवून घेण्याचा प्रयत्न केला, तरी ते पटणारं नाही.

गोरोबांचे अभंग वाचले, की कळतं  हा माणूस किती संवेदनशील आहे. ते खेचरी मुद्रा लावून अवकाशाच्या पार विश्वाशी नातं जोडत होते. जगाच्या दुःखाने आक्रंदत होते. ज्यांना देव दिसतो, त्या गोरोबांना आपल्या पायाखालचा पोर दिसत नाही. हे काही पटत नाही. नामस्मरणातल्या एकाग्रतेसाठी सांगितलेली ही कथा असल्याचं माहीत असलं तरी पटता पटत नाही.  

पण सगळ्या चरित्रकारांनी हा प्रसंग रंगवलाय. गोरोबांचे खास दोस्त असणाऱ्या संत नामदेवांच्या नावावर ७० अभंग असे आहेत, ज्यात त्यांनी गोरोबांच्या चरित्राचं वर्णन केलंय. आता सर्वात ऑथेंटिक मानल्या जाणाऱ्या सरकारी गाथेने हे अभंग प्रक्षिप्त ठरवलेत. मात्र सांप्रदायिकांना प्रिय साखरे महाराजांच्या प्रतीत त्या अभंगांचा समावेश आहे. गोरोबांच्या नंतर दोनशे वर्षांनी झालेल्या एकनाथ महाराजांनीही गोरोबांच्या चरित्राचे तीसेक अभंग लिहिलेत. त्यातही हा प्रसंग आहे. त्यामुळे पटलं नाही तरी त्यांचा विचार करावाच लागतो.

संत नामदेव हे पहिले संतचरित्रकार होते. त्यांनी आपल्या सोबतच्या प्रत्येक संताविषयी काही ना काही लिहून ठेवलंय. त्यात चमत्कारही होते. पण या चमत्कारांच्या गोष्टी पुराणांमधल्या चमत्कारांपेक्षा वेगळ्या होत्या. खरं तर त्या अनाचार आणि अंधश्रद्धांना खतपाणी घालणाऱ्या पुराणांतल्या गोष्टींना पर्याय म्हणून उभ्या राहिल्या होत्या.

खऱं तर संतांनी धर्माच्या नावाने चाललेल्या अधर्मालाच नवा पर्याय दिला होता. इथे संत देवांपेक्षा महत्त्वाचा होते. त्यांच्याच नावाचा गजर होत होता. त्यांच्याच पालख्या काढल्या जात होत्या. संत नवा आदर्श घडवत होते. श्रुतीस्मृती दाखवून धर्माचे कंत्राटदार अत्याचार करत होते. त्यामुळे संतांना वेदांच्याही मर्यादा सांगणं गरजेचं होतं.

संतांनी वेद न नाकारताही त्यांची सडेतोड चिकित्सा केली. वेदांपेक्षा देव मोठा आणि त्याचा आमच्याशी घरोबा आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला देवाविषयी काही सांगू नका. वेदांविषयी तर नकोच नको. तुम्ही आम्हाला वेद शिकण्याचा अधिकार देत नसाल तर आमचे रेडेही तुमचे सोवळे वेद म्हणतील, असा दणका ते देत होते. त्यांचा हा सारा व्यूह सनातन्यांना तोडणं कठीणच होतं.

संतांनी जानव्याला तुळशीच्या माळेचा पर्याय दिला. यज्ञयागाला नामस्मरणाचा पर्याय दिला. माणसा माणसातल्या भेदाला जिव्हाळ्याचा पर्याय दिला. मग त्यांनी परंपरागत देवालाही पर्याय उभा केला. वेदांमधे कुठेही नसणाऱ्या, नवसाला न पावणाऱ्या, हाती शस्त्र नसणाऱ्या पांडुरंगालाही नव्याने घडवलं. त्याने जनाबाईंची धुणीभांडी केली. चोखोबांची मेलेली गुरं ओढली आणि गोरोबांसाठी त्याने मडकीही बनवली.

संतांच्या चमत्काराच्या कथा त्यातून आल्यात. जातीभेदांचं वर्चस्व मोडण्यासाठी हे चमत्कार आलेत. वर्णभेदांचा फोलपणा सिद्ध करण्यासाठी हे चमत्कार आलेत. खऱ्याची पाठराखण करण्यासाठी हे चमत्कार आलेत. त्या साऱ्या प्रक्रियेतले गोरोबा एक महत्त्वाचे आणि आघाडीचे नेते होते, हे समजून घ्यायला हवं. मग त्याचं चमत्कारांमधे हरवलेलं लखलखीत चरित्र उजागर होतं.

त्यासाठी गोरोबांची गोष्ट तर पूर्ण करायला हवी. त्यासाठी संत एकनाथांनी सांगितलेल्या चरित्राचा आधार घेता येतो. त्यानुसार गोरोबांच्या पायाखाली मुलगा मेल्याचं पाहून संतीमधली आई कासावीस होते. भडकते. अद्वातद्वा बोलते. पण भजनात दंग असलेल्या गोरोबांना काहीच माहीत नसतं. भजनात व्यत्यय आणला म्हणून ते रागावतात. बायकोला मारायला धावतात. आधीच रागावलेली संती सांगते, मला हात लावाल, तर विठोबाची शपथ आहे. त्यामुळे गोरोबा भानावर येतात. विठोबाची शपथ पाळण्यासाठी बायकोला स्पर्श करणं सोडून देतात.

वंश टिकावा म्हणून संती आपल्या छोट्या बहिणीशी, रामीची गोरोबांचं लग्न लावून देते. तेव्हा पुन्हा घोळ होतो. सासरे विठोबाची शपथ घालतात, मोठ्या मुलीशी वागलात तसेच धाकटीशीही वागा. गोरोबा रामीलाही स्पर्श करत नाहीत. कंटाळून दोघीही कट करतात. एक दिवस त्या दोघी गोरोबांच्या शेजारी झोपून त्यांचे हात आपल्या अंगावर ठेवतात. पण गोरोबा चाळवत नाहीत. वैराग्याचा मेरू शोभावेत असे गोरोबा आपला निश्चय ढळू देत नाहीत. उलट हाताने चूक केली म्हणून हात तोडून टाकतात.

आपल्यामुळे आपल्या भक्ताची झालेली स्थिती पाहून पांडुरंग हेलावतो. भक्ताची लाज राखण्यासाठी स्वतः वेश बदलून विठू कुंभार बनतो. रुक्मिणी कुंभारीण बनते आणि गरुड गाढव बनतो. तिघे गोरोबांचे नोकर म्हणून काम करतात. गोरोबांच्या घरात आबादीआबाद करतात. इथे आषाढीची एकादशी जवळ येते. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई इतर संतांसह पंढरपूरच्या दिशेने निघतात. वाटेत गोरोबांकडे तेरला येऊ लागतात. ज्ञानदेव आपल्याला ओळखणार हे पाहून पांडुरंग सहकुटुंब पुन्हा पंढरपुरात निघून जातो.

इथे ज्ञानदेव देवाने घडवलेली मडकी कानाला लावतात. त्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज येतो. सगळे गोरोबांच्या भक्तीचं कौतूक करतात. गोरोबा देवाच्या प्रेमाने हेलावून जातात. रुक्मिणीच्या अंगाला तुळशीचा गंध का यायचा, याचा संतीला उलगडा होतो. इतर संतांसोबत ते पंढरपुरात जातात. तिथे नामदेवांचं कीर्तन सुरू असतं.

नामदेव विठ्ठलनामाचा गजर करून टाळ्या वाजवायला सांगतात. हात नसलेले गोरोबा टाळ्या वाजवू शकत नाहीत. तरीही नामदेव त्यांना आग्रह करतात. टाळ्या वाजवण्यासाठी गोरोबा हात उंचावतात. आणि काय चमत्कार! गोरोबांना पुन्हा एकदा हात येतात. जमलेल्या श्रोत्यांमधून मेलेलं मूलही संतीकडे दुडूदुडू धावत येतं. सारा आनंदी आनंद होतो.

गोरोबांच्या आयुष्यातली आणखी एक महत्त्वाची घटना म्हणजे संतपरीक्षा. पण नामदेव आणि एकनाथ या दोघांनीही लिहिलेल्या गोरोबांच्या चरित्रात त्याचा उल्लेख नाही. अर्थात नामदेवांनीच आत्मचरित्रात मात्र त्याचं सविस्तर वर्णन केलंय. हाती अनुभवाचं थोपाटणं असलेल्या गोरोबांनी सगळ्या संतांचं डोकं तपासलं. तेव्हा नामदेवांचं मडकं कच्चंच राहिल्याचं त्यांना आढळलं. अशी गोष्ट आहे.

त्यावर सविस्तर चर्चा कायम होते. इथेही करता येईल. पण संतपरीक्षेचा थोडक्यात अर्थ असा काढता येऊ शकतो. सगुणातच अडकलेल्या नामदेवांना सगुण निर्गुणाविषयी अधिकाधिक क्लॅरिटी यावी यासाठी सगळ्या संतांचा आग्रह होताच. गोरोबांना तर सगुण निर्गुण हा विषय तळहाताइतका स्पष्ट होता. त्यांनी त्यासाठी नामदेवांचं मन वळवलं. मग नामदेव औंढ्या नागनाथाला विसोबा खेचरांकडे गेले. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून नामदेवांना या विषयाची महत्त्वाची समज आली. मग ते पंढरपूर सोडून बाहेर पडले ते पडलेच. त्यांनी सगळा देश पायाखाली घातला. पंजाबमधे आपल्या कामाची गरज आहे, हे लक्षात घेऊन तिथेच राहिले. देशभर वारकरी विचारांची पताका फडकवली.

म्हणून गोरोबा हे नामदेवांचे गुरू आहेत अशीही मांडणी होते. दुसरीकडे नामदेवांनाही गोरोबांचा गुरू ठरवलं जातं. पण दोघेही एकमेकांचे जवळचे दोस्त होते इतकंच खरं असावं. दोघे एकमेकांच्या मैत्रीत विरघळून गेले होते. दोघांनी एकमेकांविषयी भरभरून लिहिलंय. गोरोबांच्या बहुसंख्य अभंगांमधे त्या दोघांमधे झालेला संवादच आहे. त्यांच्या किती तासन्तास आणि वर्षानुवर्षं चर्चा झाल्या असतील, याचा अभंगांवरून आपण फक्त अंदाजच लावू शकतो. गोरोबांनी सांगितलंय तशी `शिष्यत्व बुडावें गुरुपण हारपले` त्या दोघांची स्थिती होती. अभंगांमुळे आपल्याला या दोघांमधला सख्यभाव कळतो.

पन्नास वर्षांचं समाधानी आयुष्य जगल्यानंतर गोरोबांनी १३१७ साली त्यांच्या गावी देह ठेवला. आजही त्यांची समाधी तेरमधे आहे. पण त्यांचं खरं स्मृतिस्थळ आहेत, ते त्यांचे अभंग. एका वेगळ्याच स्वतंत्र शैलीत, अनोख्या शब्दकळेसह त्यांनी ते लिहिलेत. त्यातला प्रत्येक शब्द त्यांचा अनुभव आहे. बंद्या रुपयासारखे ते खणकन वाजतात.

आर्किमिडिजला वस्तुमानाचं तत्त्व सापडलं तेव्हा तो `युरेका युरेका` ओरडत आला. तसं गोरोबा अनेकदा युरेका युरेका म्हणतायत की काय असं त्यांचे अभंग वाचताना वाटतं. ते अनेकदा एकच शब्द दोन दोनदा म्हणतात. `लखलखाट झाला, लखलखाट झाला`, `अनेकत्व सांडी, अनेकत्व सांडी`, `एकपणे एक, एकपणे एक`, `जय जय झनकूट,  जय जय झनकूट`. फक्त स्वतःच्या अनुभवातून मिळवलेलं ज्ञानच ते सांगतात. बाकी एक शब्दही नाही. एक अद्भूत अनुभूती आणि प्रेरणा देण्याचं सामर्थ्य त्यांच्या अभंगात आहे. आज आपल्याकडे वीस – तेवीसच अभंग आहेत. पण एक झाकावा आणि दुसरा काढावा इतके ते एकापेक्षा एक सरस आहेत.

`श्रवणे नयन जिव्हा शुद्ध करी` इतकाच गोरोबांचा सोपा उपदेश आहे. चांगलं ऐका, चांगलं पहा, चांगला बोला म्हणजेच चांगलं जगा इतकं त्यांचं सांगणं आहे. स्वतः स्वतःशी संवाद साधत स्वतःच स्वतःचा मार्गदर्शक होण्यासाठी त्यांचा आग्रह आहे. फक्त आपल्याला त्याच्यासाठी वेळ नाही, इतकाच प्रॉब्लेम आहे. कथा. चमत्कार सोडून कधीतरी गोरोबांच्या अभंगांच्या सावलीत जायला हवं. एकतर गोरोबा काही केल्या सापडत नाही. थोडे फार जरी सापडले तर सोडत नाहीत. मग युरेका, युरेका म्हणण्याची पाळी आपली असते.

(रिंगणचा संत गोरा कुंभार हवा असल्यास संपर्कः सुधीर शिंदे ९८६७७५२२८०, ९९६०३७४७३९)