यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपची सुरवात क्रिकेटप्रेमींना आश्चर्याचा धक्का देत झाली. बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला धूळ चारली आणि नंतरची एकही मॅच दक्षिण आफ्रिका जिंकू शकली नाही. त्यामुळे आफ्रिका काही फायनल जाऊन क्वाटरपर्यंतही पोचणार नाही, असं आपण गृहीत धरलंय. पण यंदा मॅचच्या राउंड रॉबिन फॉरमॅटमुळे आफ्रिका वर्ल्डकप जिंकू शकते. कारण तसा इतिहास आहे.
आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप सुरु होऊन जवळपास आठवडा लोटलाय. राउंड रॉबिन फॉरमॅटमधे खेळवण्यात येत असलेला हा वर्ल्ड कप सुरुवातीच्या काळातल्या लढतींवरून थोडासा स्लो झाल्यासारखा वाटू लागलाय. पण बांगलादेशसारख्या कमजोर समजल्या जाणाऱ्या टीमने दक्षिण आफ्रिकेसारख्या संभाव्य विजेत्या टीमला धोबीपछाड दिली. स्पर्धेत यापुढेही असे अनेक हादरे देण्यासाठी आपण तयार आहोत, असा जणू इशाराच दिलाय.
क्रिकेटप्रेमी आणि विश्लेषकांकडून देखील इंग्लंडला स्पर्धेचा संभाव्य विजेता म्हणून पसंती दिली जातेय. कारण ही टीम कागदावर तरी सर्वात बलाढ्य दिसते. पण इंग्लंडला सुद्धा पाकिस्तानने पराभवाचा धक्का दिला. म्हणून उगाच क्रिकेटला अनप्रेडिक्टेबल म्हणत नाहीत. विशेष म्हणजे वर्ल्डकपपूर्वी पाकिस्तानने इंग्लंडमधे सपाटून मार खाल्लाय. म्हणूनच पाकिस्तानने इंग्लंडमधल्या त्या पराभवाची सव्याज परतफेड करत जेतेपदासाठी आपली दावेदारी पेश केलीय.
इंग्लंड खालोखाल भारत, वेस्ट इंडीज, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडकडेसुद्धा संभाव्य विजेते म्हणून बघितलं जातंय. या पाचही टीम्सनी आपापल्या लौकिकाला जागत दिमाखदार सुरवात केलीय. त्यामुळे स्पर्धेत रंगत आलीय. स्पर्धा सध्या पहिल्याच फेजमधे असल्याने पुढे नेमकं काय होईल, हे आताच सांगता येत नाही. पण स्पर्धा जसजसी पुढे सरकेल तसतसं चित्र अजून स्पष्ट होईल.
हेही वाचा: भारत उगाच वर्ल्डकप खेळत नाही, तिथे घसघशीत कमाईही होते
१९९२ मधे वर्ल्डकप स्पर्धेत खेळायला सुरुवात केलेल्या दक्षिण आफ्रिकेची टीम दरवेळी अजिंक्यपदासाठी हॉट फेवरिट राहिली. पण स्पर्धेपूर्वी प्रचंड संतुलित भासणाऱ्या या टीमने प्रत्येक वर्ल्डकपमधे ऐन मोक्याच्या वेळी कच खाल्ला. त्यामुळे त्यांना आतापर्यंत एकदाही वर्ल्डकप जिंकता आलेला नाही. म्हणूनच या टीमवर ‘चोकर्स’ हा शिक्का बसलाय. दरवेळी चोकर्सचा शिक्का पुसणं हेच आफ्रिकेसमोरचं पहिलं आव्हान असतं.
स्पर्धेच्या आतापर्यंच्या इतिहासात २००३ सालचा अपवाद वगळता दरवेळी आफ्रिकेच्या टीमने सेमी फायनल किंवा क्वार्टर फायनलपर्यंत मजल मारलीय. पण सेमी फायनलचं चक्रव्यूह भेदण्यात मात्र ते अपयशी ठरलेत. यावेळी तर दक्षिण आफ्रिकेची सुरवातच खूप वाईट झालीय.
हेही वाचा: कुणाच्या खिजगणतीतही नसणाऱ्या बांगलादेशने दक्षिण आफ्रिकेला कसं हरवलं?
आफ्रिकेने आतापर्यंत खेळलेल्या तीनही मॅचेस त्यांनी गमावल्यात. त्यामुळे पॉइंटस टेबलमधे अद्याप त्यांचं खातंही उघडाचंय. पण असं असलं तरी दक्षिण आफ्रिकेसाठी अजूनही सगळं काही संपलेलं नाही. ही टीम अजूनही कमबॅक करून विश्वविजेतेपदाची ट्रॉफी उंचावू शकते. त्यासाठी त्यांना राउंड रॉबिन फॉरमॅटचा मोठा फायदा होईल.
राउंड रॉबिन फॉरमॅटचं वैशिष्ट्य असं की या फॉरमॅटनुसार स्पर्धेतील प्रत्येक टीम एकमेकांच्या विरोधात एक मॅच खेळते म्हणजे खेळतेच. त्यामुळे कुठल्याही टीमची स्पर्धेची सुरवात खराब झाली, तरी ही टीम तात्काळ स्पर्धेतून बाहेर पडत नाही. एखाद्या अनपेक्षित निकालामुळे महत्वाच्या टीमवर स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढावत नाही. चांगली कामगिरी करून कमबॅक करण्याची समसमान संधी हा फॉरमॅट प्रत्येक टीमला देतो.
आफ्रिकेने आतापर्यंत खेळलेल्या तीनही मॅच गमावल्यात. तरी त्यांच्याकडे अजून ६ मॅच बाकी आहेत. या सहाही मॅचमधे चांगली कामगिरी केली तर आपल्याला आफ्रिकेची टीम सेमीजमधे दिसेल. अर्थात आफ्रिकेसाठी यापुढचा मार्ग कठीण आहे. पण १९९२ मधे याच फॉरमॅटमधे खेळवण्यात आलेल्या विजेत्यांचा इतिहास बघितल्यावर गोष्टी आफ्रिकेच्या टीमसाठी सकारात्मक दिसतात.
हेही वाचा: पाकच्या टीमचं काय बिनसलंय, ते पुन्हा बाऊन्स बॅक करणार काय?
इम्रान खानच्या नेतृत्वाखालील पाकिस्तानच्या टीमने १९९२ मधे पहिल्यांदाच वर्ल्डकप जिंकला. पण पाकिस्तानचा ट्रॉफीपर्यंत पोचण्याचा प्रवास रंजक होता. ती स्पर्धा राउंड रॉबिन फॉरमॅटमधे खेळवण्यात आली होती. पाक टीमला पहिल्या पाच मॅचेसमधे फक्त दुबळ्या झिम्बाम्ब्वे विरुद्ध एकमेव विजय मिळाला होता.
पाकिस्तानची इंग्लंडविरुद्धची मॅच ड्रॉ झाली होती. आणि वेस्ट इंडीज, भारत, दक्षिण आफ्रिकेकडून त्यांचा पराभव झाला होता. त्यामुळे ५ मॅचेसनंतर त्यांच्या खात्यात फक्त ३ पॉइंटस जमा झाले. त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरोधातल्या मॅचेसमधे विजय पटकावला.
सेमी फायनलमधे पोचताना पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड मॅच ड्रॉ झाली. यात पाकिस्तानचा पराभव निश्चित होता. कारण त्यांची टीम ७४ रन्सवर ऑलआउट झाली होती. आणि ७५ रन्स चेस करणं हे इंग्लंडसाठीच काय कुठल्याही टीमसाठी मोठी गोष्ट नव्हती. पण पावसामुळे ही मॅच ड्रॉ झाली आणि त्यात मिळालेल्या एका पॉइंटमुळे पाकिस्तानला सेमी फायनलचं तिकीट मिळालं.
हेही वाचा: आजपासून क्रिकेट वर्ल्डकप, ‘या’ बॅट्समनवर असणार सगळ्यांची नजर
पॉइंटस टेबलवरील पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावरील ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजच्या टीमसुद्धा पाकिस्तान इतक्याच ४ विजयांसह ८ पॉइंटची कमाई केली होती. त्यामुळे ड्रॉचा फायदा पाकिस्तानला झाला. तसंच राउंड रॉबिन फॉरमॅटचा मिळालेला फायदाही झालाय आणि नशीबानेही साथ दिली.
पाकने पहिल्या सेमी फायनलमधे न्यूझीलंड आणि फायनलमधे इंग्लंडचा पराभव करत आपल्या पहिल्यावहिल्या विश्वविजेतेपदावर नाव कोरलं. सध्याची परिस्थिती काही फारशी वेगळी नाही. राउंड रॉबिन फॉरमॅटमधे ही स्पर्धा खेळवण्यात येतेय आणि पुढच्या मॅचेसमधे आफ्रिकेच्या टीमने चांगली कामगिरी नोंदवली आणि त्यांना नशिबाची साथ मिळाली तर दक्षिण आफ्रिका अजूनही ही स्पर्धा जिंकू शकते.
एकंदरीतच काय तर ‘राउंड रॉबिन है, तो मुमकिन है’ असाच काहीसा मंत्र दक्षिण आफ्रिकेला या स्पर्धेत तारू शकतो.
ता.क- नशीब या गोष्टीवर तुमचा विश्वास असो किंवा नसो, पण ‘वर्ल्डकप स्पर्धा आणि दक्षिण आफ्रीकेची टीम’असं समीकरण जेव्हा कधी आपल्या समोर असतं, त्यावेळी सच्चे क्रिकेटप्रेमी म्हणून नियतीने पुन्हा एकदा या टीम सोबत काही खेळ करू नये, असं कायमच वाटत राहतं, एवढं मात्र नक्की.
हेही वाचा:
आयट्यून बंद झालं, आता आपल्याला हे ३ पर्याय मिळणार
आपल्या मुलांसाठी डाएट प्लॅन गरजेचा की हेल्दी लाईफ प्लॅन?
प्रचंड बहुमताने जिंकलेल्या भाजपला हरवता येऊ शकतं, हे सांगणारा निकाल
वर्ल्डकपमधे तगड्या टीमला, लहान टीमने हरवण्याचा रेकॉर्ड भारताच्या नावावर