झारखंडच्या लिटमस पेपरवर मोदींचं यशापयश मोजावं लागणार

२० डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


झारखंडमधे आज २० डिसेंबरला शेवटच्या टप्प्यात १६ जागांसाठी मतदान होतंय. संथाल परगणा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या भागात भाजपने कलम ३७०, राम मंदिर आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा हे राष्ट्रीय मुद्दे लावून धरले. एका अर्थाने ही निवडणूक लिटमस टेस्ट आहे.

झारखंड विधानसभेसाठी संथाल परगण्यातल्या १६ जागांवर मतदान होतंय. हातातून निसटलेली बाजी पलटवण्याची ताकद या जागांमधे आहे. त्यामुळे या भागात कमजोर असलेल्या भाजपने आपली सारी ताकद लावलीय. भाजपने अगदी करो या मरो टाईप फाईट दिलीय.

पाचव्या टप्प्याचं महत्त्व

भाजपने आपले स्टार प्रचारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाचव्या टप्प्यात दोन सभा घेतल्या. या दोन्ही सभा हेमंत सोरेन लढत असलेल्या जागांवर घेतल्या. दुसरीकडे काँग्रेसने शेवटच्या दिवशी प्रियांका गांधी यांना मैदानात उतरवून आपल्याकडचं ट्रम्प कार्ड खेळत ही लढाई आणखी प्रतिष्ठेची केलीय. यावरून झारखंडमधे सत्ता समीकरण बनवण्याबिघडवण्यामधे पाचव्या टप्प्याचं महत्त्व अधोरेखित होतं. 

१६ पैकी ७ जागा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. ९ जागा खुल्या प्रवर्गासाठी आहेत. दुमका, बरहेट, जामा, महेशपूर, लिट्टीपाडा, शिकारीपाडा आणि बोरियो हे मतदारसंघ राखीव आहेत. गेल्यावेळी भाजपने दुमका आणि बोरियो मतदारसंघ जिंकून झामुमोच्या बालेकिल्ल्याला धक्का दिला होता.

सध्या सातपैकी पाच जागा झामुमोकडे आहेत. यावेळी या राखीव जागा आपल्याकडे खेचून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कारण या जागा ताब्यात आल्यावर कुणालाही संथाल परगण्यात आपलाच बोलबाला आहे, हे डंके की चोट पर सांगता येतं.

संथाल परगण्यात १८ जागा येतात. त्यापैकी देवघर आणि मधुपुर या जागांवर चौथ्या टप्प्यातच मतदान झालंय. २००९ मधे झामुमोने १८ पैकी १० जागा जिंकल्या होत्या. २०१४ मधे मात्र झामुमोला सात जागांवरच समाधान मानावं लागलं. भाजपलाही सात जागा मिळाल्या. काँग्रेसला तीन तर बाबुलाल मरांडी यांच्या झारखंड विकास मोर्चाने दोन जागा पटकावल्या. यावेळी झामुमो आणि काँग्रेस हे महागठबंधनच्या बॅनरखाली निवडणूक लढवत आहेत.

हेही वाचा : काँग्रेसने शेवटच्या टप्प्यात प्रियांकास्त्र बाहेर काढण्यामागची चार कारणं

झामुमोचा बोलबाला

झारखंड मुक्ती मोर्चाचे सर्वेसर्वा शिबू सोरेन यांचा या पट्ट्यात मोठा प्रभाव आहे. गुरूजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सोरेन यांच्याबद्दल संथाल आदिवासींमधेही आदराची भावना आहे. सोरेन गुरुजी सभेला येऊन फारसं बोलतही नाहीत. तरीही त्यांनी निव्वळ उपस्थिती दर्शवावी, यासाठी महागठबंधनच्या उमेदवारांतून डिमांड राहिली.

भाजपही हेमंत सोरेन यांच्यावर सडकून टीका करताना शिबू गुरूजी यांच्याबद्दल पडती भूमिका घेतंय. एवढंच नाही तर मोदी, शाह यांच्या टीकेचा भर आपल्या सभांमधे महागठबंधनमधला दुय्यम घटक असलेल्या काँग्रेसवरच आहे.  झामुमो किंवा सोरेन यांच्यावर टीका करायचं टाळलं जातंय. चुकून आदिवासी अस्मिता दुखावली जाणार नाही याची पुरती काळजी घेतली जातेय.

इथे संथाली ही संवादभाषा आहे. आणि भाजपकडे संथाल परगण्यातून येणारा स्वतःचा प्रभाव असलेला संथाली बोलणारा नेता नाही. जे आहेत ते नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेपुढे झाकोळलेले नेते आहेत. केंद्रीय मंत्री अर्जून मुंडा यांनीही स्वतःला काही मतदारसंघांपुरतं मर्यादित करून घेतलंय. आणि हीच भाजपपुढची सगळ्यात मोठी अडचण आहे. झारखंडची उपराजधानी आणि संथाल परगण्याची राजधानी असलेल्या दुमका इथल्या सभेत नरेंद्र मोदी यांच्या भाषणाला सगळ्यात जास्त प्रतिसाद संथालीमधून नमस्कार चमत्कार केला त्यावेळी मिळाला. लोकांच्या चेहऱ्यावर मोठ्या आश्चर्याची भावना होती. 

भाजपची घर में घुस के मारेंगे स्ट्रॅटेजी

स्वतः माजी मुख्यमंत्री आणि झामुमोचे कार्यकारी अध्यक्ष हेमंत सोरेन दुमका आणि बरहेट या दोन जागांवर निवडणूक लढवताहेत. भाजपने या दोन्ही जागांवर अगदी घर में घुस के मारेंगे पद्धतीने मोर्चेबांधणी केलीय. 

झामुमोनेही आपला गड, आपल्या जनाधाराला सुरूंग लागू नये म्हणून आपले सारे पत्ते ओपन केलेत. शेवटच्या टप्प्यात महागठबंधनकडून हेमंत सोरेन यांच्या नावाने 'संथाल परगणा यावेळी आमदार नाही तर मुख्यमंत्री निवडून देणार आहे,' असा प्रचार करण्यात आला.

प्रादेशिक अस्मितेला हात घालण्याचा झामुमोच्या म्हणजेच महागठबंधनच्या प्रचाराचा मतदारांवर प्रभाव पडताना दिसतोय. विद्यमान मुख्यमंत्री रघुवर दास हे गैरआदिवासी तसंच संथाल परगण्याबाहेरचे आहेत. 

१६ पैकी जवळपास सगळ्यांच जागांवर भाजप आणि महागठबंधन यांच्यातच थेट लढत होतेय. झारखंड विकास मोर्चा आणि ऑल झारखंड स्टुडन्ट युनियन यांनीही उमेदवार उभे केलेत. झाविमो आणि आजसू यांच्या उमेदवारांमुळे काही ठिकाणच्या लढती चुरशीच्या झाल्यात.

हेही वाचा : झारखंडच्या निवडणुकीत काय सुरू आहे?

राष्ट्रीय विरुद्ध स्थानिक मुद्दे

आदिवासी आणि मुस्लिम यांची मोठी संख्या असलेल्या या भागात भाजपकडून कलम ३७०, राम मंदिर आणि नागरिकत्व दुरुस्ती कायदा या मुद्यांवर प्रचार केला जातोय. दुसरीकडे महागठबंधनने बेरोजगारी, आदिवासींच्या जगण्यामरण्याशी संबंधित मुद्दे लावून धरलेत.

संथाल परगण्याची एक सीमा पश्चिम बंगालला लागून आहे. पाकूड, जामताडा, गोड्डा, देवघर आणि साहिबगंज या पाच जिल्ह्यांत मुस्लिमांचं प्रमाण लक्षणीय आहे. बंगालला लागून असलेल्या पाकूड आणि साहिबगंजमधे तर मुस्लिमांचं प्रमाण जवळपास एक तृतीयांश एवढं आहे.

भाजपच्या भात्यातली अस्त्र

बांगलादेशच्या सीमेपासून सव्वाशे किलोमीटरवर असलेल्या झारखंडमधे भाजपने बांगलादेशी घुसखोर या मुद्द्याला हवा दिलीय. नागरिकत्व दुरुस्ती कायदा अर्थात सीएए आणि नॅशनल सिटिझन रजिस्टर म्हणजेच एनआरसी हे भाजपच्या भात्यातली महत्त्वाची अस्त्र आहेत.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शाह यांनी एका निवडणूक सभेत म्हटलं, '२०२४ मधे आपल्याकडे मतं मागायला येईन तेव्हा देशभरात एनआरसी लागू करून घुसखोरांना वेचून वेचून बाहेर काढण्याचं काम भाजप सरकार करेल,' असा दावा करत आपल्या पारंपरिक मतदारांना चुचकारलं. भाजपचे अनेक नेतेही एनआरसी लागू केल्यास त्याचा सर्वाधिक फायदा झारखंडलाच होणार असल्याचा दावा करतात. 

नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर देशभरात सुरू असलेल्या आंदोलनांबद्दल बोलताना मोदी म्हणाले, 'आग लावणाऱ्यांना त्यांच्या अंगावरच्या कपड्यांवरून ओळखता येतं.' दुसरीकडे शाह 'येत्या चार महिन्यांत भव्य राम मंदिर उभारलं जाणार आहे,' असं प्रचारात सांगतात.

शाह यांनी पाकूडमधल्या सभेत 'मीर जाफरसारख्या गद्दारांमुळे या भागात ब्रिटिश साम्राज्य पसरलं. सिद्धो, कान्हो यांना ब्रिटिशांविरोधात लढताना प्राण गमवावा लागला. आता पुन्हा मीर जाफर तुमचा प्रतिनिधी बनायला नको.' शाह यांनी मुस्लिम शासकाला नाव ठेवताना तथ्यांशी मोडतोड केलीय. मीर जाफरने बंगालचा नवाब मीर कासिमला धोका दिला होता. आणि महत्त्वाचं म्हणजे मीर कासिम आणि सिद्धो- कान्हो यांच्यात जवळपास शंभर वर्षांचं अंतर होतं.

हेही वाचा : शहरी भागात मोदी लाट असूनही भाजपची चिंता काही संपेना!

तर मोदी, शाह यांचा मोठा पराभव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही गोड्डा इथल्या सभेत बांगलादेशी घुसखोरांचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, 'घुसखोरांना एखाद्या वोट बँकेसारखं वापरून घेतलं जातंय.' यापुढे जाऊन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तर 'काँग्रेसचा इरफान अन्सारी तर अयोध्येत राम मंदिर बनवणार नाही ना,' असा सवाल केला.

भाजपने एका अर्थाने झारखंडची निवडणूक जिंकण्यासाठी आपल्या भात्यातली सगळी प्रभावी अस्त्र वापरलेत. हिंदूत्वाचा मुद्दा बाहेर काढलाय. महाराष्ट्राच्या निवडणुकीत जे काही कमी पडलं ती उणीव भरून काढलीय. पण महाराष्ट्र हातातून गेला तसं झारखंडमधे भाजपच्या हातून सत्ता गेली तर हा नरेंद्र मोदी, अमित शाह यांचा खूप मोठा पराभव ठरले.

कारण झारखंडमधे भाजपने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर केलाय. तरीही 'मोदी है तो किसी और के बारे में क्या सोचना' असा नारा देत भाजपने झारखंडची निवडणूक मोदींच्या नावाने लढलीय. आता येत्या सोमवारी २३ डिसेंबरला या नाऱ्यातला दम दिसणार आहे.

हेही वाचा :

झारखंडमधे नरेंद्र मोदींच्या सभेला लाखोंची गर्दी, पण

आदिवासीबहुल झारखंडमधे ओबीसी राजकारणाला अच्छे दिन

झारखंडमधे किंग नाही तर किंगमेकर होण्यासाठी ताकद पणाला

भाजपला सत्ता टिकवण्यासाठी कोयलांचल जिकावं लागणार, कारण

झारखंडचं भविष्य महिला ठरवणार, तिकीट देताना प्राधान्य मात्र पुरुषांना