लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर तीन मतदारसंघातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल आलेत. हे निकाल सत्ताधाऱ्यांसोबतच विरोधकांसाठीही डोकेदुखीचं कारण ठरलेत. मतदारांनी संमिश्र कौल देत भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना कामाला लावलंय. वंचित बहुजन आघाडीसाठीही या निकालाने आशादायी वातावरण निर्माण केलंय.
लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतच गेल्या रविवारी राज्यात काही ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी मतदान झालं. मुंबईला लागून असलेल्या पालघर नगरपरिषदेत शिवसेनेला एकहाती बहुमत मिळालं. अधिकाराचं नगराध्यक्षपद मात्र पालघरकरांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यात टाकलंय. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर असा फिफ्टी फिफ्टी कौल देऊन मतदारांनी सत्ताधारी आणि विरोधकांना बुचकळ्यात पाडलंय.
इथला निकाल आल्याच्या दुसऱ्याच दिवशी पालघरची जागा शिवसेना लढवणार की भाजप हे चित्रही स्पष्ट झालं. तसंच शिवसेनेचा उमेदवार कोण असणार हेही कळालं. यावरून लोकसभेची राजकीय गणितं ठरवण्यासाठी पालघरची निवडणूक किती महत्त्वाची होती, हे लक्षात येईल. नगरपरिषदेच्या निवडणुका स्थानिक मुद्द्यांवर लढल्या जात असल्या तरी लोकसभेच्या तोंडावर मतदान झाल्याने या निकालाला आपोआप महत्त्व आलंय.
भाजपने ही जागा शिवसेनेला देत आपल्या खासदारालाही धनुष्यबाणावर लढायला दिलंय. पोटनिवडणुकीत पराभव करणाऱ्या राजेंद्र गावीत यांनाच शिवसेनेने इथे उमेदवारी दिलीय. गेल्या दोन-तीन दिवसांपासून गावित यांना शिवसेनेचे तिकीट मिळणार असल्याच्या चर्चेला या निकालामुळे आज पूर्णविराम मिळाला. इथे शिवसेनेतल्या बंडखोर उमेदवाराने पाच हजाराच्या घरात मतं घेतली. त्यामुळेत शिवसेनेच्या अधिकृत उमेदवाराचा हजार मतांनी पराभव झाल्याचं सांगितलं जातंय.
पालघरसोबतच बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा आणि लोणार इथेही नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक झाली. इथेही मतदारांनी सगळ्यांची फिरकी घेणारा कौल दिलाय. दरवेळी आपले कारभारी बदलणाऱ्या लोणारकरांनी यंदा मात्र आपलीच परंपरा खंडित केलीय. लोणारकरांनी पुन्हा काँग्रेसकडेच सत्तेची चावी दिलीय. इथे शिवसेनेचा उमेदवार थेट तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारी दुसरा क्रमांक मिळवला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभेचे उमेदवार तसंच सिंदखेडचे माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे आणि शिवसेनेचे आमदार शशिकांत खेडेकर यांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. पण मतदारांनी मात्र शिंगणे यांना कामाला लावलंय. शिवसेनेने नगराध्यक्षपदासह ७ जागांवर विजय मिळवलाय. राष्ट्रवादीला आठ जागा मिळाल्यात. भाजप आणि अपक्षाला प्रत्येकी एक जागा मिळालीय. शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि लोकसभेचे उमेदवार प्रताप जाधव यांनीही या निवडणुकीसाठी आपली ताकद लावली होती.
दुसरीकडे वर्धा जिल्ह्यातल्या जवळपास ३०० ग्रामपंचायतींसाठीही रविवारी मतदान झालं होतं. यामधे वर्धा लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या जिल्ह्यातल्या वर्धा, आर्वी, देवळी आणि हिंगणघाट या चार तालुक्यातले निकाल दोन्ही पक्षांच्या डोकेदुखीचं कारण ठरलेत. वर्धा लोकसभा मतदारसंघात अमरावती जिल्ह्यातले मोर्शी आणि धामनगाव रेल्वे हे दोन विधानसभा मतदारसंघही येतात.
दैनिक लोकमतमधे आलेल्या बातमीनुसार, हिंगणघाटमधे काँग्रेसने अनपेक्षितपणे मुसंडी मारलीय. अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच काँग्रेसचे सरपंचपदाचे उमेदवार उमेदवार निवडून आलेत. निकालानंतर मात्र दोन्ही पक्षांनी आपणच अव्वल असल्याचा दावा केलाय. हिंगणघाटमधल्या ५६ ग्रामपंचायतीसाठी मतदान झालं. यात काँग्रेसने १५ सरपंच निवडून आणले. इथे राष्ट्रवादी काँग्रेसने २८ आणि भाजपने १८ तर शिवसेनेने आपले ६ सरपंच निवडून आल्याचा दावा केलाय.
खासदार दत्तक ग्राम असलेल्या तरोडा सर्कलमधल्या सगळ्या आठही ग्रामपंचायती काँग्रेसने आपल्या ताब्यात घेतल्यात. तालुक्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे चांगलं संघटन असताना नेतृत्वहीन काँग्रेसने चांगलीच मुसंडी मारलीय.
आर्वी तालुक्यात २२ ग्रामपंचायतीसाठी निवडणूक झाली. यात काँग्रेसने ११ ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवला. दुसरीकडे भाजपने नऊ ठिकाणी विजय मिळवला. तालुक्यात भाजपच्या ताब्यात असलेल्या अनेक ग्रामपंचायतींवर काँग्रेस आणि अपक्षांनी आपला झेंडा फडकवलाय, असं लोकमतच्या बातमीत म्हटलंय.
देवळी तालुक्यातला ४६ ग्रामपंचायतींमधे काँग्रेसने २२ जागांवर यश मिळवलंय. भाजपला १३, तर राष्ट्रवादीला ४ आणि शिवसेनेला एक ग्रामपंचायतीवर समाधान मानावं लागलं. जिल्ह्यातल्या सगळ्यात मोठ्या नाचणगाव पंचायतीवरही काँग्रेसने झेंडा रोवलाय. वर्धा मतदारसंघात येत्या ११ एप्रिलला पहिल्या टप्प्यात लोकसभेचं मतदान होणार आहे.
यवतमाळ वाशिम मतदारसंघात येणाऱ्या कारंजा तालुक्यातल्या १९ ग्रामपंचायतींत भाजपला यश मिळालंय. काँग्रेसला १२, शिवसेनेला २ तर अपक्षाला १ सरपंचपद मिळालंय.
ग्रामपंचायतीतल्या निकालाने भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस यांना लोकसभा निवडणुकीआधीच झटका बसलाय. त्यांना मतदारांची नाराजी दूर करण्यासाठी खूप काम करावं लागणार आहे. दुसरीकडे काँग्रेसला या नाराजीचा फायदा उठवण्याची संधी आहे. काँग्रेसने इथे चारुलता टोकस यांना उमेदवारी दिलीय. येत्या काळात दोन्ही पक्ष या निकालापासून धडा घेऊन कशी खेळी खेळतात यावर विजयाची गणितं अवलंबून राहणार आहेत.