लॉकडाऊनः कोकणात हापूस घरातच पडून, युरोपात फळं खायला मिळेनात

२८ मार्च २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


कोरोना वायरसमुळे जगभरातलं अर्थकारण बदलतंय. युरोपातल्या फळं आणि भाज्यांच्या बाजारपेठा ठप्प झाल्यात. राज्यातला हापूस उद्योगही संकटात आहे. बाजारातल्या उत्पादनावर एक मोठी साखळी अवलंबून असते. त्यात उत्पादक ते मजुरापर्यंत सगळ्यांचा समावेश असतो. लॉकडाऊनमुळे ही साखळीच मोडकळीस आलीय.

कोरोना वायरसमुळे जगभरात चिंतेचं सावट आहे. वेगवेगळ्या बाजारपेठाही मोडकळीस आल्यात. युरोपमधे फळ आणि शाकाहारी पदार्थांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालाय. कोविड १९ आणि त्यातही लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रातला हापूस उद्योग पूर्णपणे मोडकळीस आलाय. लाखो लोकांना रोजगार मिळवून देणारा हा व्यवसाय मोडकळीस आल्यामुळे अनेकांच्या कुटुंबाची वाताहत होईल. या महत्त्वाच्या मुद्याकडे लक्ष वेधणारं विश्लेषण न्यूजक्लिक आणि रॉयटर्स या न्यूजपोर्टलनी केलंय.

ऐन हंगामात हापूस उद्योगावर संकट

न्यूजक्लिकवर अमेय तिरोडकर यांची एक स्टोरी आलीय. त्यानुसार, महाराष्ट्रातले रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन जिल्हे भारतातल्या आंबा उत्पादनापैकी ९५ टक्के उत्पादन घेतात. पेट्यांमधे आंबे पॅक करून ट्रक किंवा टेम्पोद्वारे ते नवी मुंबईच्या बाजार समितीमधे विक्रीला पाठवले जातात. पण सध्या या दोन जिल्ह्यांमधल्या आंबा व्यावसायिकांसोबतच या व्यवसायाशी जोडलेल्या प्रत्येकाला लॉकडाऊनमुळे फटका बसलाय. जगभरातल्या बाजारपेठाही याला अपवाद नाहीत.

२१ मार्चला महाराष्ट्रात लॉकडाऊन सुरू होण्याआधी एक दिवस जवळपास ८,००० आंब्याच्या पेट्या नवी मुंबईच्या कृषी उत्पन्न बाजार समिती अर्थात एपीएमसी मार्केटमधे पोचल्या होत्या. एका पेटीत ५ डझन आंबे असतात. ही या हंगामाची खरंतर सुरवात होती. २१ मार्चला प्रत्येक पेटीचा भाव हा ३००० रुपये इतका होता. ८ हजार पेट्या या एपीएमसीमधे उतरल्या याचाच अर्थ या दिवशी ४०,००० डझन आंबे मुंबईत विक्रीला आले.

आंब्याचा हंगाम हा साधारण मेच्या शेवटपर्यंत चालतो. एप्रिल आणि मे त्यादृष्टीने महत्वाचा काळ. या हंगामात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यातून दिवसाला २० हजार आंब्याच्या पेट्या एपीएमसी मार्केटमधे विक्रीसाठी येतात. मात्र मार्केट बंद असल्याने ऐन हंगामाच्या काळात हापूस उद्योगावरचं संकट गहिरं झालंय.

हेही वाचा : कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

आंबा व्यवसायाशी जोडलेल्यांची स्थिती भीषण

न्यूजक्लिक या पोर्टलवर महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः कोकणातल्या आंबा उत्पादनाच्या संदर्भात एक सविस्तर रिपोर्ट आलाय. हापूस आंब्याच्या उत्पादनावर आलेलं संकट या व्यवसायाशी जोडलेल्या प्रत्येकासाठी जीवघेणं आहे.

रत्नागिरीचे प्रसिद्ध आंबा उत्पादक शेतकरी संदेश प्रभुदेसाई यांनी आपली आंब्याची जावक पूर्णपणे बंद केलीय. 'मुंबईत आंबे पाठवण्यासाठी सरकार काही सूट देईल अशी अपेक्षा आहे. असं झालं नाही तर या उद्योगाला तोट्यातून सावरण्यासाठी कमीत कमी तीन वर्ष लागतील.' प्रभुदेसाई यांनी सांगितलेला धोका वेळीच समजून घ्यायला हवा. त्यांच्याकडे ५० मजुरांची जबाबदारी आहे. हे मजूर ६ महिने त्यांच्या शेतात काम करतात. यात आंबे तोडणी, खत आणि रसायनांची फवारणी अशी कामं त्यांना करावी लागतात. त्यांचं काय होईल हा प्रश्न त्यांना भेडसावतोय. जवळपास प्रत्येक आंबा उत्पादकाची हीच स्थिती आहे, असे न्यूजक्लिकच्या या स्टोरीत म्हटलंय.

अंकुश राणे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या देवगड तालुक्यातले. तिथलं मोंड हे त्यांचं मूळ गाव. ते भूमिहीन शेतकरी आहेत. दुसऱ्यांच्या शेतावर मजुरी करून कुटुंबाचा गाडा हाकतात. उन्हाळ्यात काजू आणि आंब्याच्या बागांमधे तर पावसाळ्यात इतर शेतात काम करतात. उन्हाळ्यात तर सकाळी साडे सहा वाजल्यापासून रात्री आठ पर्यंत शेतात राबतात. त्यांना दिवसाला ४५० रुपये मजुरी मिळते. सध्या त्यांना घरी बसून रहावं लागलंय. लॉकडाऊन कधी संपतोय याचीच ते वाट पाहतायत. 'गरीबाकडे बघायला कुणी नाही. सरकार तांदूळ आणि गहू देईल. पण आमच्या इतर खर्चाचं काय?' असा हताश होऊन प्रश्न राणे विचारतात.

सर्वसामान्य आंबा उत्पादक शेतकरी हा स्थानिक ट्रान्सपोर्टला पैसे देऊन आपल्या आंब्याच्या पेट्या मुंबईत विक्रीला पाठवतो. हंगामामधे कामाच्या हमीभावामुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मुंबईहून ट्रक आणि टेम्पो कोकणात जातात. एका ट्रकमधे ५०० बॉक्स असतात. त्यातून एका ट्रक मालकाला प्रति बॉक्स १५० रुपये मिळतात. तर मुंबईतल्या एका फेरीसाठी ७५,००० रुपये मिळतात. अशा महिन्यातून किमान १० फेऱ्या असतात. याचा अर्थ एका हंगामात २५ ट्रिप. अशा प्रकारे अडीच महिन्यांच्या काळात १५ ते १७ लाखांची कमाई होते. अनेक ट्रक चालक असे आहेत जे लॉकडाऊमुळे इएमआय भरू शकत नाहीत. त्यांचं नुकसान न भरून निघणारं आहे.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

कोरोनानंतर आपण वेगळ्याच जगात असणार आहोत

एकदा बरं झाल्यानंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग होतो का?

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

कोरोनाविरुद्धची लढाई भारताला सहा महिने लढावी लागेलः डॉ. जयप्रकाश

तर पुढचे तीन वर्ष गंभीर परिणाम

एक मोठी अर्थव्यवस्था या आंबा व्यवसायाशी जोडलेली आहे. आंबा उत्पादक ते मजूर, एपीएमसी एजंट आणि बाजारातल्या मजुरापर्यंत अशी मोठी साखळी यात काम करते. बाजारामधे उत्पादन कशा प्रकारे पोचतं यावर ही साखळी अवलंबून असते. लॉकडाऊनमुळे ही साखळी मोडकळीस आलीय.

सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यांत दरवर्षी ५०० कोटींची आर्थिक उलाढाल होत असते. फलोत्पादन आणि विशेषतः आंबा व्यवसायाने या जिल्ह्यांचा चेहरामोहरा बदलला. ४० वर्षांपूर्वी मुंबईत राहणाऱ्या कोकणातल्या मंडळींना गावाकडून मनिऑर्डर पाठवली जायची. त्यावर त्यांची गुजराण व्हायची. आज स्थिती सुधारली असली तरी लॉकडाऊनचा हा काळ त्यांना पुन्हा मागे घेऊन जाणारा आहे. यातून मार्ग निघाला नाही तर त्याचे गंभीर परिणाम पुढचे तीन वर्ष या सगळ्यांना सहन करावे लागतील, असे अमेय तिरोडकर लिहितात.

हेही वाचा : कोरोनाच्या धक्क्यानं पडलेल्या शेअर मार्केटमधे गुंतवणुकीची हीच ती वेळ?

युरोपात काय होतंय?

रॉयटर्स या आंतरराष्ट्रीय न्यूजएजन्सीनं युरोपातल्या फळं आणि भाज्यांच्या बाजारपेठेच्या सध्याच्या स्थिती संदर्भात एक रिपोर्ट केलाय. एकंदर जागतिक स्तरावरही स्थिती भीषण आहे.  युरोपच्या मार्केटमधे फळं आणि भाज्यांचा तुटवडा भासतोय. खरेदीवर निर्बंध लादले गेलेत. फळं आणि भाज्या पुरवणाऱ्या विक्रेत्यांच्या मते, ज्या ताज्या वस्तू आहेत त्याही सध्या बाजारात नाहीच्या बरोबर आहेत. स्पेनमधे युरोपातली फळभाज्यांची सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे. तिथं लॉकडाऊन करण्यात आलंय. केनिया देशात कडधान्याची बाजारपेठ आहे. तिथल्या अर्ध्या अधिक लोकांना घरी बसवण्यात आलंय.

मागणी कमी आहे अशातला भाग नाहीय. दक्षिण आफ्रिकेसारख्या देशांकडून ऑर्डर येतात. पण त्यांचा पूरवठा करणं शक्य होत नाही. याला दोन गोष्टी कारणीभूत आहेत. लॉकडाऊनमुळे ट्रक, ट्रक ड्रायवरची संख्या रोडावलीय. विमान सेवाही ठप्प आहेत. ज्या काही थोड्या सेवा चालू आहेत त्यांचे माल वाहून नेण्याचे चार्जेस भरमसाठ आहेत. विमानं अशा सेवांसाठी तीन पट जास्त पैसे घेतायत, असं रॉयटर्सच्या या बातमीत म्हटलंय.

खूप दिवस टिकणारी सीट्रससारखी फळंसुद्धा खराब व्हायला लागलीत. ज्या जहाजांनी या सगळ्याची वाहतूक चीनमधे व्हायची त्या शिपिंग कंटेनरची संख्याही कमी झालीय. जवळपास बंदच आहेत. स्थिती गंभीर आहे, असं रॉयटर्सचा हा रिपोर्ट सांगतो.

हेही वाचा : 

कोरोना जगाला एकत्र आणू शकतो: रघुराम राजन

सोशल मीडियात ज्ञानदा कोरोनापेक्षा जास्त वायरल का होतेय?

कोरोना वायरसः मोदींनी कुणाकडून घेतली जनता कर्फ्यूची आयडिया

कोरोनाः जग सारे मार्ग अवलंबतंय, मग मोदी घरीच राहायला का सांगतात?

विलगीकरण कक्षात डॉक्टर काय करतात, मुंबईची पत्रकार सांगतेय स्वानुभव