अशोक चव्हाण माजी मुख्यमंत्री आहेत. सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मागच्या लोकसभा निवडणुकीत राज्यभर काँग्रेसचं पानिपत होत असताना त्यांनीच लाज राखली होती. तरीही यंदा मात्र त्यांना नांदेडमधून हलता येत नाही. त्यांचे जिल्ह्यातले विरोधक प्रताप पाटील चिखलीकर यांनी शिवसेना सोडून भाजपमधून निवडणूक लढवताना त्यांच्या नाकीनऊ आणलेत.
लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी गुरुवारी १८ एप्रिलला मतदान होतंय. यात महाराष्ट्रातल्या दहा मतदारसंघातही मतदान आहे. मराठवाड्यातल्या सहा मतदारसंघातून तब्बल ११९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यापैकी नांदेडची लढत खूप चुरशीची लढत होतेय. थेट काँग्रेस विरुद्ध भाजप असा सामना रंगलाय.
दुसऱ्या टप्प्यातल्या सगळ्यांत टफ फाईटमधे नांदेडचं नावं घेतलं जातंय. भाजपने शिवसेनेचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना मैदानात उतरवल्याने काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासाठी मोठं आव्हान निर्माण झालंय. त्यातच वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार चालत असल्याने चव्हाण यांच्या डोकेदुखीत वाढ झालीय. नांदेडमधे १४ उमेदवार रिंगणात आहेत. यापैकी निम्मे सात जण अपक्ष आहेत.
भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा घेतलीय. तसंच मुख्यमंत्र्यांच्याही तीनेक सभा झाल्या. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल यांनी सभा घेतल्या. प्रचारसभांचा सपाटा लावत भाजपने अशोक चव्हाण यांना घेरण्याचा प्रयत्न केलाय. अख्ख्या राज्याची जबाबदारी असलेल्या चव्हाणांना नांदेडमधेच अडकवून ठेवण्यात भाजपला यश आलंय. त्यामुळेच चव्हाण हे भावनिक होत नांदेडचा विकास, घराण्याची पुण्याई सांगत फिरताहेत.
हेही वाचाः लातूरः प्रत्यक्ष लढत अमित देशमुख आणि संभाजीराव निलंगेकरांमधेच
नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण विधानसभेतलं संख्याबळ बघितल्यास तसं दिसत नाही. जिल्ह्यात शिवसेनेचे चार, काँग्रेसचे तीन आमदार आहेत. शिवसेनेचे आमदार चिखलीकर आता भाजपमधे जाऊन चव्हाण यांना आव्हान देताहेत. पण स्थानिक स्वराज्य संस्थांमधे मात्र काँग्रेसची चांगली पकड आहे. नांदेड महापालिकेत तर काँग्रेसची एकहाती सत्ता आहे. नांदेडमधे भोकर, बिलोली, नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण, नायगाव आणि देगलूर हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात.
जिल्ह्यातली धनगर, हटकर समाजाची मोठी संख्या ध्यानात घेऊन वंचितने इथे प्रा. यशपाल भिंगे यांना मैदानात उतरवलंय. भिंगेंसाठी प्रकाश आंबेडकर यांनी अख्खा मतदारसंघ पिंजून काढलाय. देगलूर आणि मुखेड तालुक्यात धनगर, हटकर समाजाची खूप मतं आहेत. जिल्हाभरात दीडेक लाखाच्या वर मतदार आहेत. तसंच मुस्लिम मतदारांची संख्याही दोन अडीच लाखांच्या घरात आहे. नवबौद्ध मतदार दीडेक लाख आहेत, अशी माहिती पत्रकार जयपाल गायकवाड यांनी दिली.
नवबौद्ध समाज भिंगेंच्या पाठिशी दिसतोय. दुसरीकडे जिल्ह्यातला धनगर, हटकर समाज गेल्या काही काळात भाजपच्या पाठिशी राहिलाय. पण तो यावेळी भिंगे यांना पाठिंबा देताना दिसतोय. जिंकून येण्यासाठी भाजपला हे मतविभाजन टाळण्याकडे लक्ष द्यावं लागणार आहे.
हेही वाचाः सोलापुरात रंगलीय दिग्गज उमेदवारांची तीन पायांची शर्यत
मातंग समाजही दीडेक लाखाच्या घरात आहे. वंचित बहुजन आघाडी या सगळ्यांच्या बळावर आपली मोर्चेबांधणी करतेय. पण जिल्ह्यातला मातंग समाज वंचितसोबत किती जाईल, याबद्दल शंका आहे. कारण काँग्रेसने जिल्ह्याच्या राजकारणात मातंग समाजाला प्रतिनिधित्व दिलंय. २००९ मधे देगलूरचे रावसाहेब अंतापूरकर आणि मुखेडचे अविनाश घाटे काँग्रेसच्या तिकीटावर आमदार झाले. याआधी घाटे यांचे वडील मधुकरराव घाटे हेही आमदार होते. नंतरच्या काळात अविनाश घाटे हे भाजपमधे गेले.
स्थानिक पत्रकारांनी दिलेल्या माहितीनुसार, मातंग समाजासारखंच मुस्लिम समाजही काँग्रेसविरोधात जाताना दिसत नाही. त्यामुळेच वंचित विकास आघाडीने प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुस्लिमबहुल देगलूर नाक्यावर एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांची सभा घेत मुस्लिमांना जवळ घेण्याचा प्रयत्न केला. या सभेलाही चांगली गर्दी झाली. तरीही ही गर्दी मतांत किती दिसेल हे अजून गुलदस्त्यातच आहे.
महत्त्वाचं म्हणजे दोनेक वर्षांपूर्वी झालेल्या महापालिका निवडणुकीत चव्हाण यांनी एमआयएमचं सगळं अस्तित्व संपवून टाकलं होतं. नांदेड शहरातल्या एमआयएममधे आठेक वर्षांआधीसारखी ताकद आता नाही. त्यामुळे एकगठ्ठा मत देणारा मुस्लिम समाज जिंकणाऱ्या उमेदवाराच्या पाठिशी राहिल असं दिसतंय.
हेही वाचाः नागपूरचं वाढलेलं मतदान असंतोषामुळे की संघटनेमुळे?
२००९ मधे काँग्रेसच्या भास्करराव खतगावकर यांनी भाजपच्या उमेदवाराचा ८५ हजार मतांनी पराभव केला होता. बीएसपीच्या मोहम्मद सलीम यांना ८५ हजार मत मिळाली होती. खतगावकर हे चव्हाण यांचे भावजी आहेत. २०१४ मधे याच खतगावकरांनी चव्हाणांविरोधात बंड करत भाजपमधे प्रवेश केला. भाजपच्या डी. बी. पाटील यांच्याविरोधात चव्हाण ८१ हजार मतांनी विजयी झाले. बहुजन मुक्ती पार्टीच्या राजरत्न आंबेडकर यांना २८ हजार आणि बीएसपीच्या हंसराज वैद्य यांना २३ हजार मतं मिळाली.
गेल्या वेळी मोदीलाटेतही लाखभर मतांनी जिंकलेल्या चव्हाण यांनीही सावध पावलं टाकत जिल्हाभर फिरत फिल्डिंग लावलीय. इतके दिवस दुरावलेल्या, आपल्यापासून दूर गेलेल्यांना जवळ घेण्याचं राजकारण सुरू केलंय. विळ्याभोपळ्याचं नातं असलेल्या महाआघाडीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पुढाऱ्यांना सोबत घेण्यात चव्हाण यांना यश येताना दिसतंय.
जिल्ह्यात शिवसेनेचाही मोठा प्रभाव आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नांदेड शहरातच हेमंत पाटील हे शिवसेनेचे आमदार आहेत. त्यांच्यामागे अशोक चव्हाण यांचीच ताकद असल्याचं बोललं जायचं. त्यामुळे आमदार पाटील हे चव्हाणांना मदत करतील, असं राजकीय जाणकारांनी सांगितलं. पण पाटील हेच हिंगोली मतदारसंघातून लढत आहेत. त्यांना तिथे भाजपकडून सक्रिय पाठिंबा हवा असल्यासं असं साटंलोटं करून ते स्वतः धोक्यात येतील असं दिसत नाही.
हेही वाचाः वर्धाः लोकसभेचा निकाल ग्रामपंचायतीच्या निकालात शोधता येईल?
चिखलीकरांचा लोहा विधानसभा मतदारसंघ नांदेडमधे येत नाही. त्यामुळे मीच तुमच्या कामाचा माणूस आहे, असं चव्हाण सांगताहेत. तसंच भाजप सरकारवर नाराज असलेल्या दलित, मुस्लिम समाजासोबतच शेतकरी वर्गाला मीच निवडून येणारा उमेदवार असल्याची खात्री पटवून देण्याचा प्रयत्न करताहेत. चव्हाण यांच्यासाठी स्वतःची वोटबँक आहे. याउलट चिखलीकर यांची अवस्था आहे. कारण आमदार चिखलीकर यांचा लोहा मतदारसंघ लातूरमधे येतो. चिखलीकरांना स्वतःला स्वतःचं मतही देता येत नाही.
वंचितचा उमेदवार चांगला चालत असल्याने चव्हाण यांचं गेल्यावेळी मिळालेलं लाखाचं मताधिक्य धोक्यात आलंय. त्यामुळे आजच्या घडीला नांदेडमधे भाजप आणि काँग्रेससाठी फिफ्टी फिक्टी शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत कोण कशी मोर्चेबांधणी करते, वंचितची वोटबँक फोडण्यात कुणाला यश, अपयश येतं त्यावरच चव्हाण आणि चिखलीकर यांच्या विजयाची गणितं अवलंबून आहेत.
हेही वाचाः