परभणी, हिंगोलीः बालेकिल्ले असूनही शिवसेनेची शेवटपर्यंत कोंडी

१८ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ५ मिनिटं


परभणी आणि हिंगोली हे शिवसेनेचे मराठवाड्यातले पक्के गड बनलेत. वारंवार प्रयत्न करूनही दोन्ही काँग्रेसला तिथे जिंकण्यासाठी तोडगा साडपलेला नाही. पण या दोन्ही मतदारसंघात यावेळेस टफ फाईट सुरू आहे. शिवसेनेच्या दोन्ही किल्लेदारांना आपापले बुरुज राखण्यासाठी सगळी ताकद लावावी लागतेय.

गेल्या तीस वर्षांपासून परभणी मतदारसंघावर शिवसेनेने एकहाती वर्चस्व राखलंय. दरवेळी उमेदवार बदलूनही विरोधकांना शिवसेनेच्या हा बालेकिल्ला भेदता आला नाही. गेल्यावेळी तर हिंदू-मुस्लिम मतांच्या धुव्रीकरणात शिवसेनेला विजयी होणं सहज शक्य झालं. यंदा इथे शिवसेनेचे संजय उर्फ बंडू जाधव आणि राष्ट्रवादीचे राजेश विटेकर यांच्या लढत होतेय. वंचित बहुजन आघाडीमुळे मात्र इथल्या विजयाची गणितं बदललीत.

उमेदवार बदलण्याची परंपराच बदलली

परभणी लोकसभा मतदारसंघात परभणी, जिंतूर, गंगाखेड, पाथरी यांच्यासोबतच जालना जिल्ह्यातल्या परतूर आणि घनसावंगी विधानसभा मतदारसंघ येतात. जिंतूर, गंगाखेड आणि घनसावंगीमधे राष्ट्रवादीचा आमदार आहे. परभणीत शिवसेना, तर परतूरमधे भाजपचा आमदार आहे. पाथरीत अपक्ष उमेदवाराला आमदारकी मिळाली. २०१४ मधे परभणी आणि घनसावंगी मतदारसंघातूनच राष्ट्रवादीला लीड मिळाली होती.

कधीकाळी काँग्रेसचा गड राहिलेल्या परभणी मतदारसंघावर आता शिवसेनेने आपली पकड मजबूत केलीय. १९९८ चा अपवाद वगळल्यास गेल्या तीस वर्षांत शिवसेनेला इथे कुणी हरवू शकलं नाही. एवढंच नाही गेल्या काही निवडणुकीत तर इथला विद्यमान खासदार ऐन निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी करत दुसऱ्या पक्षात जातो. त्यामुळे शिवसेनेवर ऐनवेळी आपला उमेदवार बदलण्याची पाळी येते. तरीही मतदार पुन्हा शिवसेनेच्या पारड्यातच आपलं मत टाकतात.

यंदा मात्र शिवसेनेने दोनदा आमदार आणि विद्यमान खासदार असलेल्या संजय उर्फ बंडू जाधव यांनाच उमेदवारी दिलीय. बंडखोरीच्या तयारीत असलेल्या भाजपमधल्या बोर्डीकर गटालाही सोबत घेतलंय. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही सभा घेतल्या. त्यासोबतच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सभा घ्यायला आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी मत हा शिवसेनेच्या यंदाच्या प्रचारातला महत्त्वाचा मुद्दा राहिला. शिवसेनेने जालना जिल्ह्यातल्या दोन विधानसभांची जबाबदारी भाजप नेते, पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्यावर सोपवलीय.

राष्ट्रवादीची जोरदार तयारी

शिवसेनेचा प्लस पॉईंट ओळखून राष्ट्रवादीने यंदाच्या निवडणुकीची तयारी केलीय. सामान्य मराठा कुटुंबातून येणाऱ्या विटेकर यांचं उमेदवारी भरण्यासाठी खुद्द शरद पवार परभणीत हजर होते. यावरून राष्ट्रवादीने परभणीची जागा किती प्रतिष्ठेची केलीय हे ध्यानात येईल. पवारांनी विटेकर यांच्यासाठी निवडणुकीची स्थानिक समीकरणं ठरवण्याचंही काम केलं.

मुस्लीम, दलित मतं आपल्याकडे राखण्यासोबतच राष्ट्रवादीने मराठा मतंही आपल्या उमेदवारालाच कशी मिळतील, यासाठी मोर्चेबांधणी केलीय. आघाडीतल्या बिघाडीचा दरवेळी बसणारा फटका ओळखून यंदा राष्ट्रवादीने काँग्रेसच्या नेत्यांना सुरवातीपासूनच सोबत घेतलंय. वातावरण निमिर्तीसाठी पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, धनंजय मुंडे यांच्या सभाही झाल्या.

राष्ट्रवादीने मतदारसंघात हिंदू-मुस्लीम असं मतांचं धुव्रीकरण होणार नाही यासाठी खूप मेहनत घेतलीय. विधानसभेला राष्ट्रवादीच्या उमेदवारामागे राहणारी मतं लोकसभा निवडणुकीतही आपल्याला मिळतील, यासाठी जमिनीवरची गणितंही राष्ट्रवादीने पक्की करण्याचा प्रयत्न केलाय.

शेवटपर्यंत तुल्यबळ लढत सुरू

स्थानिक पत्रकारांच्या मते, वंचित बहुजन आघाडीनेही परभणीत जोरदार प्रचार केला. मतदारसंघातली साडेचार लाख मुस्लीम मतदारांची संख्या ध्यानात घेऊन आलमगीर खान या उच्चशिक्षित तरुणाला उमेदवारी दिली. वंचितच्या उमेदवारासाठी प्रकाश आंबेडकर यांनी सभा घेतल्या. पण वंचितच्या उमेदवाराला तितका प्रतिसाद मिळाला नाही. नवबौद्ध मतदार मात्र वंचितच्या उमेदवाराच्या पाठिशी बघायला मिळाले.

दुसरीकडे १९९८ चा अपवाद वगळता गेल्या तीस वर्षांपासून परभणीत शिवसेनेचा खासदार निवडून येतो. १९९८ मधे काँग्रेसच्या सुरेश वरपुडकर निवडून आले. पण वर्षभरातच लोकसभा बरखास्त झाली. नंतरच्या निवडणुकीत पुन्हा शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला. हा बालेकिल्ला राखण्यासाठी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी परभणीत उद्धव ठाकरे यांनी सभा झाली. त्यावेळी ठाकरे यांनी विरोधकांच्या ५६ पिढ्या एकत्र आल्या तरी कुणी परभणीवरचा भगवा खाली उतरवू शकणार नाही, असं सांगत आपल्या पारंपरिक मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला.

पण यंदा शिवसेनेच्या उमेदवाराविरोधात नाराजी आहे. परभणीत दोनवेळा आमदार आणि गेल्या वेळी खासदार अशी पंधरा वर्ष सत्तेत असलेल्या बंडू जाधव यांना प्रचाराच्या काळातही या नाराजीचा फटका बसला. याउलट राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या वर्षभरापासून तयारी सुरू केलीय. निवडणूक जाहीर झाल्यावर पहिल्या फटक्यातच उमेदवारही जाहीर केला. दरवर्षी बिघडणारं जाती, धर्माचं गणित बिघडणार नाही, याचीही काळजी घेतलीय. त्यामुळे बालेकिल्ल्यातच शिवसेनेला शेवटच्या क्षणापर्यंत कसरत करावी लागली.

हिंगोलीत आलटून पालटून संधी

हिंगोलीत २८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. यामधे शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील आणि काँग्रेसचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्यात थेट लढत होतेय. मात्र या दोघांच्या विजयाचं गणित वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मोहन राठोड यांच्यावर अवलंबून आहे. पण हिंगोलीत वंचितच्या उमेदवाराला तितकासा प्रतिसाद मिळाला नाही, असं स्थानिक पत्रकारांनी सांगितलं.

गेल्यावेळी काँग्रेसचे राजीव सातव अवघ्या सोळाशे मतांनी निवडून आले होते. पण यावेळी त्यांनी गुजरातमधे पक्षाची जबाबदारी असल्याचं कारण सांगत निवडणूक लढवण्यास नकार दिला. त्यामुळे गेल्यावेळी सेनेचे उमेदवार असलेले वानखेडे यंदा काँग्रेसची माळ गळ्यात घालून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. हिंगोलीत यंदा १७ लाख मतदार आहेत.

मतदारसंघात शिवसेनेला मानणारा मतदार खूप मोठ्या संख्येने आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवाराने इथे सुभाष वानखेडे यांच्याविरोधात गद्दाराला धडा शिकवा असं म्हणत प्रचार सुरू केलाय. शिवसेनेने नांदेड मतदारसंघातल्या व्यक्तीला उमेदवारी दिल्याने काँग्रेसला प्रचारासाठी मुद्दा मिळालाय. काँग्रेसने मतदारांच्या अस्मितेला चुचकारण्याचा प्रयत्न चालवलाय. बाहेरचं पार्सल परत पाठवा असा प्रचार केला. 

हिंगोलीत भारिप बहुजन महासंघाचीही चांगली ताकद आहे. २००९ च्या निवडणुकीत भारिपच्या माधवराव नाईक यांनी ५२ हजार मतं घेतली होती. २००९ मधे शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांनी तब्बल ७५ हजार मतं घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सूर्यकांता पाटील यांचा पराभव केला. त्यावेळी बसपाच्या उमेदवाराने तब्बल एक लाखाहून जास्त मतं घेतली होती. तर भारिपच्या माधवराव नाईक यांनी ५२ हजार मतं मिळवली.

गद्दार विरुद्ध बाहेरचं पार्सल

२०१४ मधे आघाडीच्या जागावाटपात राष्ट्रवादीने ही जागा काँग्रेसला दिली. त्यात काँग्रेसचे राजीव सातव ४८ टक्के मतं मिळवत सोळाशे मतांनी विजयी झाले. त्यावेळी सुभाष वानखेडे नावाचे तीन अपक्ष उमेदवार रिंगणात होते. त्याचा शिवसेनेला फटका बसला. बीएसपीनेही २५ हजार मतं घेतली. यावेळी सुभाष वानखेडे नावाचे पाच उमेदवार आहेत.

हिंगोलीमधे वसमत, कळमनुरी, हिंगोली यासोबतच नांदेडमधल्या किनवट आणि हदगाव, तर यवतमाळमधल्या उमरखेड विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. १९९६ पासून गेल्या सहा निवडणुकीत हिंगोलीने दरवेळी खासदारीसाठी शिवसेना, काँग्रेसला आलटून पालटून संधी दिलीय. यंदा दोन्ही पक्षांनी जोर लावलाय. त्यात मतदार मोदींसाठी मत मागणाऱ्या शिवसेनेच्या पाठिशी राहतात की आपली परंपरा मोडीत काढत काँग्रेसला विजयी करतात हे मात्र वंचित बहुजन आघाडीला मिळणाऱ्या मतांवरच अवलंबून आहे.