अजय देवगण बड्डे स्पेशलः नैंटीजची लवइष्टोरी

०२ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ९ मिनिटं


नाईण्टीचं दशक आलं आणि तो दोन बाईकवर उभा राहून आला. आता एकविसाव्या शतकात सिंघम झालाय. त्या अजय देवगणचा ५१वा बड्डे आहे. त्याच्यात स्वतःला शोधणाऱ्या एका पिढीचे केस आता पिकू लागलेत. तरीही नाईण्टीजच्या लवस्टोरी अजूनही त्याच्याभोवती फिरताहेत. प्रत्येक गावात एक अजय देवगण आणि काजोल नाईण्टीजमधेही होते आणि आजही असावेत. अशाच एका गावातली ही खरीखोटी लवस्टोरी.

त्याला तसं लहानपणापासून बघत आलो होतो. गाव फार मोठं न्हवतं त्यामुळे कुणाशी ओळख नसली तरी माणूस बघून माहिती असायचा. तो आमच्यापेक्षा बऱ्यापैकी मोठा. पण त्याच्या ग्रुपसोबत ग्राऊंडवर क्रिकेट खेळताना दिसायचा.

त्यावर्षी मात्र तो गावात अचानक फेमस झाला. इंद्रायणी थेटरवर अजय देवगणचा ‘फूल और कांटे’ लागला आणि त्याचं आयुष्यच बदलून गेल!

‘फूल और कांटे’ची गाणी भयंकर फेमस. प्रत्येक सलून, पानटपरी, सोडावाला, अंडाभुर्जीची लारी सर्वीकडे एकच, `कोई जन्नत की वों हूर नहीं, मेरे कोलेज की एक लड़की हैं`. आणि एक दिवस याला कोणीतरी सांगितलं, `पिंट्या, तू हुबेहूब त्या हिरोंना मायक दिसस!`

मग काय गडी चेकाळला. अजय देवगणचा अभ्यासच सुरू केला त्यानी. सेम हेअर स्टाईल, सेम जीन्स, ज्याकेट, शूज. भाई फूल ऑन तयारीला लागला. मोटारसायकल आधीच येत होती. हिरो होंडा फोर एस. वर काळा गॉगल. त्यानंतर मात्र ‘इंद्रायणी’ असो नायतर ‘रत्नदीप’, देवगणच्या प्रत्येक पिच्चरला हा सर्वात पुढे.

हेही वाचा : बॉलिवूडच्या सिनेमात कधी आनंदी दलित पाहिलाय का?

इतरांना असतात तसे याचेही मित्र महानालायक. झाडावर चढवायला पुढे. तिकडे पडद्यावर देवगणनी डायलॉग मारला की इकडे मित्र याला खांद्यावर घेऊन शिट्या मारत.      

‘फूल और कांटे’चा फिवर संपतो न संपतो अजय ‘जिगर’ घेऊन आला. आणि पिंट्या देवगणवर दडपण आलं. उजव्या हाताच्या पंज्यानी वरच्या वर अंड्याचा अर्धा भाग फोडणं म्हणजे खायचं काम न्हवतं. पण पिंट्याच्या मित्रांनी हेही शिवधनुष्य लीलया पेललं. न्यू इंग्लिश स्कूलच्या ग्राउंडवर प्रॅक्टिस सुरू झाली. पिंट्या देवगणला रोमँटिक सोबतच ऍक्शनमधेपण पारंगत होणं महत्वाचं वाटू लागलं.

पिंट्या हिरो होंडा फोर एसवर स्टंट मारायला शिकला. मित्र बाईक चालवायचा आणि हा मागे सीटवर उभा. मोटारसायकल ह्यांडबॉलच्या गोल पोस्टमधे घुसायची आणि पिंट्या वरच्यावर पोल पकडायचा. आम्ही कोपऱ्यात उभं राहून हे बघायचो. पिंट्याला दुरून दादही द्यायचो.

पिंट्या मात्र आपल्या मस्तीत. एव्हाना बरेच स्टंट त्याला यायला लागले होते. पण अंड्याचं प्रकरण जरा कठीणच. पिंट्या अंड्यावर प्रहार बरोबर करायचा पण अर्ध्या ऐवजी अंड पूर्ण फुटायचं. पण प्रॅक्टिस चालू होती. आता पिंट्या ‘प्रति अजय देवगण’ म्हणून अख्ख्या ‘साक्री’ गावात वर्ल्डफेमस झाला होता. न्यू इंग्लिश स्कूल असो वा सिगो पाटील कॉलेज, पिंट्याला सर्वीकडच्या मुली ओळखायला लागल्या होत्या. पिंट्या देवगण फॉर्मात होता.

देवगणचे ‘विजयपथ’ आणि ‘दिलवाले’ एकाच वर्षी आले आणि दोघांचीही गाणी हिट झाली. त्यामुळे पिंट्याचं बरं चाललं होतं.

पण एक दिवस अचानक ती बातमी येऊन ठेपली. पिंट्या पांझरा कॉलनी समोरच्या नाल्यात पडला. पडला तर पडला, नाल्याची गटार झाल्यामुळे चिखलाने माखला. माखला तर माखला, समोरून ट्युशनला जाणाऱ्या ग्रुपमधल्या मुली त्याच्यावर फिदीफिदी हसल्या. हसल्या तर हसल्या. त्या सर्वात पुढे ‘कासार गल्लीतली काजोल’ही होती. इतर कुणी हसतं तर ठीक होतं. पण गेल्या सहा महिन्यापासून पिंट्याचा क्रश ठरलेली कासार गल्लीतली काजोलपण हसली. पिंट्या नाराज झाला.

त्या दिवसापूर्वी त्याला ती साक्रीच्या पोळा चौकात त्याच्या मागे मागे तब्बूसारखी ‘रुक रुक रुक अरे बाबा रुक, ओह माय डार्लिंग गिव मी अ लूक’ असं म्हणताना दिसायची. अर्थात स्वप्नातच.

आता मात्र  नाला प्रकरणानंतर त्याला तिच्यात `दिलवाले`ची बेवफा ‘रविना’ दिसायला लागली. तो `जिता था जिसके लिये, जिसके लिये मरता` हे गाणं गुणगुणायला लागला. उदास उदास राहायला लागला.

हेही वाचा : पटकथाकार जावेद अख्तरांचा स्ट्रगलही पटकथेएवढाच फिल्मी आहे

कासार गल्लीतली मुन्नी थोरातपण अशीच अचानक पिंट्यासारखी रातोरात साक्रीत वर्ल्डफेमस झाली होती. त्याच झालं असं, काजोलचा ‘बाजीगर’ हिट झाला आणि गावातला कन्हैया कुल्फीवाला आपल्या बासरीवर ‘बहारो फुल बरासाओ, मेरा मेहबूब आया है’ ऐवजी ‘मेरा दिल था अकेला, तुने खेल ऐसा खेला’ वाजवायला लागला. काजोल साक्रीत हिट व्हायला हे कारण पुरेसं ठरलं.

लोकमतच्या धुळे आवृत्तीच्या एका लेखात आलं होतं, ‘गल्लीबोळात दिसणारं सौंदर्य म्हणजे काजोल सौंदर्य’. मुन्नी लोकमतची पुरवणी रेगुलर वाचयची. शेजारच्या जोशीबाईंकडून आवर्जून मागून आणायची आणि वाचायचीच. मुन्नी थोरातला ‘मेरा दिल था अकेला’ आधीच आवडलेलं. त्यातली काजोल आणि आपल्यात साम्य आहे, असं तिने स्वतःशीच म्हटलेलं. पण पेपरच्या त्या बातमीने तिचा आत्मविश्वास वाढला. कारण मुन्नी थोरात देखील कासार गल्लीच्या बोळात वाढली होती!

घरी आरश्यात ती स्वतःला न्याहाळायला लागली. मैत्रिणीला हळूच बोलून दाखवलं तर तिने देखील दुजोरा दिला, `हा वं माय, तू बी ते काजोल नां मायक दिसस!`. तेव्हापासून मुन्नीची चाल बदलली. एक वेगळा आत्मविश्वास दिसायला लागला. गल्लीतल्या पोरांनी ते हेरलं असावं. कॉलेजच्या ग्यादरिंगमधे मुन्नीवर फिशपाँड पडला. `स्वताला समजते बाजीगरची काजोल, घरी खाते बिन तेलचं बेसन.`

बस्स! त्या दिवसापासून मुन्नी थोरात कासार गल्लीतली काजोल म्हणून आख्या साक्रीत फेमस झाली. सुरवातीला मुन्नी ऑकवर्ड व्हायची. पण हळू हळू तिला आवडायला लागलं सगळं.

`इंद्रायणी` आणि `रत्नदीप` थेटर म्हणजे साक्रीचं सांस्कृतिक वैभवच. गावात नवीन पिच्चर आला की पोरं ताश्याच्या गजरात गावभर पिच्चरची पाटी फिरवून आणायचे. आता काजोलचा पिच्चर लागला की पाटीवाले कासार गल्लीत जरा जास्त जोर लावून ताशा वाजवायला लागले.

मुन्नी थोरात धावत बाहेर यायची नि पाटी बघून खुश व्हायची. शेजारच्या शीलाकडे बघून डोळा मिचकावून आज रात्री लवकर जेवण करून थेटरात जायचंच असं ठरवून टाकायची. ओपन थेटरात अंधार पडल्या शिवाय पिच्चर लागत नाही. हिवाळ्याच्या दिवसात सूर्य लवकर मावळतो. त्यामुळे पहिला शो लवकर लागतो.

त्या दिवशी ‘रत्नदीप’च्या गेट वर पिंट्या उर्फ पोळा चौकातला अजय देवगण आणि मुन्नी थोरात उर्फ कासार गल्लीतली काजोल यांची पहिल्यांदा नजरा नजर झाली. पिंट्या आख्या गावात आधीच फेमस होता त्यामुळे मुन्नीला तो माहिती होता. पण  पिंट्या मुन्नीविषयी फक्त ऐकून होता. आज पहिल्यांदाच पाहत होता आणि पाहताच त्याला खात्री पटली, हीच माझी हीरोईन. तब्बू, रविना, करिष्मा हे सर्वे वरवरचे चेहरे. आतून हीच खरी माझी काजोल.

हेही वाचा : सैरंध्री : पहिल्या मेड इन इंडिया सिनेमाची शंभरी

त्या दिवसापासून पिंट्याच्या कासार गल्लीत चकरा वाढल्या. गल्ली तशी बऱ्यापैकी अरुंद. पण तिथं पिंट्या लीलया मोटारसायकल स्टंट करू लागला. कासार गल्लीत राहणारा बधीर अव्या आता त्याचा जवळचा मित्र झाला. अव्याच्या अंगणात पाणी पिण्याच्या बहाणे पिंट्या हळूच मुन्नीच्या घराकडे डोकवायचा. मुन्नीने मात्र अजून पिंट्याकडे खास लक्ष दिलं न्हवत.

आणि अचानक त्या दिवशी पिंट्या नाल्यात पडला आणि मुन्नी त्याच्यावर फिदीफिदी हसली. प्रपोज व्हायच्या आताच ब्रेकअप झाल्याची फिलिंग पिंट्याला आली. त्याला `दिलवाले`ची सर्व गाणी तोंडपाठ झाली. आता थेटरात पिंट्याचं लक्ष लागेना. मोटारसायकलचे स्टंट चुकू लागले. पिंट्याचा काळा गॉगल हरवला. पिंट्या उदास उदास राहू लागला.

तिकडे बधीर अव्याने, शीलाला आणि शीलानी मुन्नी थोरातला पिंट्याची हकीकत सांगितली. पिंट्या देवगण आपल्यावर मरतो याची कल्पना मुन्नीला होतीच. पण त्यावर तिचं उत्तर होतं, मैंने कभी तुम्हें उस नजर से देखा ही नहीं. तेव्हाच्या सर्व हिरोईनी असंच सांगायच्या.

या उस नजरचा पिंट्याला प्रचंड राग होता. त्यामुळे त्यानेपण कासार गल्लीतला वावर कमी केला. मित्रांमधे पिंट्या देवगण आता ‘सुलझा हुआ कॅरेक्टर’ म्हणून ओळखला जाऊ लागला. ‘गोल्डी’वर चहा पिताना पिंट्या डावा हाथ केसांवर फिरवत म्हणायचा, `हमें तो अपनों ने लुटा, गैरों में कहा दम था, मेरी कश्ती डूबी वहां, जहां पानी ही कम था.` पोरं वाह वाह करत आणि हळूच कश्तीऐवजी मोटरसायकल नाले में कैसे डूबी विचारत. पिंट्या अजून उदास होई.

तो दिवस मात्र वेगळा होता. सप्टेंबरच्या महिन्यात साक्रीत थंडीला सुरवात होऊन जात असे. ताश्यावाले नवीन पिक्चरची पाटी घेऊन बाजार पट्टी, लक्ष्मी रोड, सुतार गल्ली व्हाया पोळा चौक ते राजवाडा, मोहल्ला करत करत कासार गल्लीत येऊन पोचले. पिक्चर होता `हलचल.` काजोल आणि अजय देवगण पहिल्यांदा एकत्र सिनेमात आलेले. त्याच्या महिनाभर आधीच लोकमत आणि आपला महाराष्ट्रला त्या दोघांच्या प्रेमाच्या बातम्या छापून आलेल्या.

संध्याकाळी मुन्नी थोरात शीलासोबत `इंद्रायणी`ला आलेली. कोपऱ्यावर पिंट्या देवगण मित्रांसोबत लारीवर तिखट बटाटा खात होता. मुन्नीला बघताच पिंट्याला ठसका लागला. लारीवाल्या नझीमनं तत्काळ पिंट्याला पाण्याचा मग दिला. मग पिंट्या भानावर आला. जाताजाता मुन्नी पिंट्याला स्माईल देऊन गेली.

तसा पिंट्या नेहमी थेटरात चार रुपये भरून वाळू वर बसायचा. पण आज गेटकीपर उत्तम पैलवानने स्वतः त्याला पाच रुपयेवाल्या खुर्चीच्या गेटनी आत सोडलं. पिंट्या मित्रांसोबत तर मुन्नी मैत्रीणीसोबत एकमेकांना सामोरासमोर दिसतील अशा अंतरावर बसले.

हेही वाचा : ‘थप्पड’च्या आरशात दिसणारा पुरुष आपण पाहिलाय का?

`हलचल` सुरु झाला. अजय देवगणच्या एण्ट्रीला पोरांच्या शिट्ट्या नि टाळ्या. पिंट्या मात्र चूप. मुन्नीला काजोल आणि अजय एकत्र बघून जाम भारी वाटत होतं. अधूनमधून ती पिंट्याकडेदेखील बघत होती. पिंट्या मात्र शून्यात. गाणं लागलं. थेटरवाल्यानं आवाज डबल करून दिला. पिंट्या अचानक शुद्धीवर आला. गाणं सुरू झालं होतं, `आय एम सिक्स्टीन, गोईंग ऑन सेवंटीन, दिल क्यूं ना धक धक करे.`

काजोल गाण्यात पुढाकार घेऊन अजयशी जवळीक साधत होती. तर इकडे मुन्नीला परवाच सतरावं पूर्ण झालं होतं. म्हणून शीला तिला कोपरा मारत चिडवत होती. मुन्नीचं लक्ष मात्र पिंट्याकडे. दोघांची शेवटी नजरानजर झालीच. गाणं पुढे सरकत होतं.

मिटादे दूरियां क्या हैं मजबुरियां,

ढूंढे दिल ये मेरा तेरी नजदीकियां

...रात हैं, रंग हैं, जिंदगी हैं

फिर भी ऐसा लगे कुछ कमी हैं

दिल क्यूं न धक धक करें

नेमक्या धक धक वर मुन्नीचे डोळे चमकलेले पिंट्यानी बघितले. मुन्नी जागेवरून उठली आणि सरळ बाहेर जाऊ लागली. जाता जाता पिंट्याकडे बघून स्माईल करून गेली.

पिंट्या अवाक. मुन्नी दाराबाहेर गेली. तसा पिंट्यादेखील जागेवरून उठला. `इंद्रायणी` थेटर गावच्या नदीजवळ. थेटरच्या मागे जरा चाललं की धबधबा लागतो. मुन्नी अंधारात त्या दिशेनी चालायला लागली. पिंट्या तिच्या मागोमाग. धबधब्याजवळ येताच पिंट्यानी देवगणसारखा केसांवर हाथ फिरवला. मुन्नीने पण काजोलसारखं नाकाजवळ बोट नेलं आणि पिंट्या ला काही बोलणार एवढ्यात...

पिंट्या पुढे होत मुन्नीचा हाथ हातात घेत विचारायला लागला, `क्यां तुम भी मुझसे उतना ही प्यार करती हो, जितना मैं तुमसे?` मुन्नीने मान हलवत पिंट्याला होकार दिला. पिंट्यानी मुन्नीला अलगद आपल्या मिठीत ओढलं. मुन्नीनेदेखील समाधानाने त्याच्या बाहुपाशात स्वतःला झोकून दिलं.

पाठीमागे थेटरात चालू असलेल्या ‘हलचल’चे डायलॉग ऐकू येत होते. अजय देवगणच्या संवादांना पिंट्या ओठ हलवत होता. तर काजोलच्या वाक्यांवर मुन्नी. दोघीही ‘कान’ नदीच्या त्या वाहत्या धबधब्याच्या साक्षीने आयुष्यभर एकमेकांवर असंच प्रेम करत राहण्याच्या आणाभाका घेत होते. 

आता या प्रसंगालादेखील मोठा काळ लोटून गेला. परवा अजय देवगण पन्नाशीचा झाला आणि पिंट्या देवगण पंचेचाळीशीचा. मागे एकदा त्याच्या दुकानावर चप्पल घ्यायला गेलेलो. त्यावेळी त्यानी ‘सिंघम’सारखी मिशी ठेवली होती. आता केस जरा उडालेत त्याचे पण स्टाईल आजही कायम आहे.

हेही वाचा : कादर खान: झीरोतून हीरो बनलेला लाखमोलाचा माणूस

दुकानात स्पीकरवर ‘दिलवाले’चं `जिता था जिसके लिये` चालू होतं. तीन चार जोडे ट्राय केल्यानंतर मी त्याला हळूच विचारलं, पिंट्या, मुन्नी भेटस का कधी?

त्यावर तो हसून अभिमानाने म्हणाला, `पुण्यामा रास पण अजूनभी आपलाच दुकान न्या चप्पल वापरस. वर्षातून एकदा हमकास दिवाळीला दुकानात येतेच. मी पण त्या वर्षाची सर्वात फेशानेबल जोडे काढून ठेवतो तिच्यासाठी. तेवढंच माहेरचं गिफ्ट.` हे म्हणताना पिंट्या देवगण मनमोकळा हसला. हसताना गुटख्याने पिवळे झालेले दात करुण दिसत होते.

‘हलचल’ रिलीज झाला त्याच्या पुढच्या वर्षी काजोलचा, ‘दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे’ आला होता. पिच्चर खूप हिट झाला, पण पिंट्याला तो आवडला नाही. कारण त्या पिच्चरमधे काजोलबरोबर अजय नसून शाहरूख होता. पिंट्या देवगण आणि मुन्नीच्या प्रेमाची खबर मुन्नीच्या बापाला कळली. त्याच वर्षी त्यांनी तिचं आपल्याच जातीतला मुलगा बघून लग्न लावून दिलं.

दिलवाला दुल्हनियां घेऊन पुण्याला सेटल झाला. आणि पिंट्या साक्रीत एकटा पडला. मुन्नीच्या लग्नावेळी पिंट्या एवढा रडला नसेल, जेवढा पुढे काही वर्षांनी रडला. तेव्हा अजय देवगण आणि काजोलच्या खऱ्या लग्नाची बातमी आली होती.

हे कोलाज स्पेशलही वाचा : 

सोशल कसलं, हे तर दिल्ली डिस्टन्सिंग! 

संत तुकाराम, महात्मा गांधी आणि कोरोनाची साथ

युद्धात जिंकणाऱ्या अमेरिकेला कोरोना का हरवतोय?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

भारत कोरोनाच्या दुसऱ्या स्टेजमधे गेलाय, म्हणजे धोका किती वाढलाय?

(लेखक सिनेमा दिग्दर्शक आहे. ते सांगतात की या कथेतली सगळी पात्रं काल्पनिक आहेत.)