माढा, अहमदनगरः जुनी घराणी विरुद्ध नवे राजकारणी या संघर्षाची कहाणी

२३ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


माढ्यातल्या विजयसिंह मोहिते पाटलांच्या आणि अहमदनगरमधल्या राधाकृष्ण विखे पाटलांच्या बंडखोरीने राज्यभरातल्या निवडणुकीचं वातावरण ढवळून काढलं. ही दोन्ही बंडं शरद पवारांच्या विरोधात होती. सहकार, सत्ता आणि संस्थांच्या बळावर संस्थानांचं राजकारण पोसणारे हे दोन्ही मतदारसंघ तर त्यामुळे हादरलेच. तरीही शरद पवारांचे उमेदवार निवडणूक अटीतटीने लढवत आहेत. कारण हा संघर्ष वाटतो तितका सोपा नाही.

राष्ट्रवादी काँग्रेसने या लोकसभा निवडणुकीत भलताच जोर लावलाय. शरद पवारांनी गेल्या पाच वर्षांत स्ट्रॅटेजी आखून आपल्या चर्चेत नसणाऱ्या जागाही जिंकण्यापर्यंत खेचल्यात. त्यामुळे शिवसेनेशी युती करून महाराष्ट्रातून अधिकाधिक जागा जिंकण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना खीळ बसली. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सगळेच भाजपचे नेते शरद पवारांवर तुटून पडलेत.

दोन पाटलांनी दिला पवारांना धक्का

पण पवारांच्या या सगळ्या राजकारणाला दोन मतदारसंघांमधे मोठा धक्का बसला. पहिला मतदारसंघ माढा. इथे तर पवार एकदा खासदार बनले होते. सत्तरच्या दशकात पहिल्यांदा मंत्री बनल्यापासून त्यांचं पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्ह्याशी नातं तयार झालंय ते आतापर्यंत. पण विजयसिंह मोहिते पाटलांनी खुलेआम बंडखोरी करून माढा या पवारांच्या गडाला खिंडार पाडलंय.

हेही वाचाः महाराष्ट्रातली सर्वात टफ फाईट औरंगाबादेत होतेय

तिकडे अहमदनगर लोकसभा मतदारसंघातही सुजय विखे पाटील राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढायचं ठरत होतं. पण नेमकं काय झालं हे कळण्याच्या आतच सुजय भाजपचे उमेदवार झालेदेखील. त्यामुळे शरद पवारांसाठी अहमदनगरची सीटही प्रतिष्ठेची झालीय. मात्र या दोन्ही जागांवर दोन दिग्गजांच्या बंडखोरीनंतरही अत्यंत चुरशीची लढाई सुरूय. कधी वारं या बाजूने वाहतं, कधी त्या बाजूने.

विजयसिंह मोहिते पाटलांची ताकद अफाट

साखर कारखाने, संस्था, बँका असा सगळा पसारा अडचणीत असला तरीही विजयसिंह मोहिते पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणातलं मोठं प्रस्थ आजही आहेच. कधीकाळी राज्यातला वसंतदादा पाटील गट सांभाळणारे विजयदादा राष्ट्रवादीत असतानाही आपली ताकद बाळगून होते. पण पश्चिम महाराष्ट्रातल्या मराठा नेतृत्वावरच्या वर्चस्वासाठी अजित पवार विरुद्ध विजयसिंह असा पक्षांतर्गत संघर्ष बरीच वर्ष चालला. त्याची परिणती या बड्या बंडात झालीय.

विजयसिंह मोहिते पाटील आपलं सर्वस्व पणाला लावून लढताहेत. मोहितेंचं राजकारण सोलापूर जिल्हा आणि आसपासच्या परिसरात खोलवर रुजलंय. शिवाय पै पाहुण्यांचा गोतावळा गोळा करून राजकारण करण्याचा मराठा नेत्यांचा पिढीजात पॅटर्नही आहे. आता अस्तित्वाची लढाई समजून मोहिते पाटील कामाला लागलेत. त्यातून त्यांची कुणाच्या ध्यानीमनी नसलेलीही छुपी ताकद दिसू लागलीय. याच ताकदीच्या बळावर त्यांनी मोदी लाटेचा यशस्वी सामना केला होता.

उमेदवार म्हणून संजयमामा लोकप्रिय

मात्र त्याचबरोबर जिल्ह्याच्या ग्रामीण भागाचं राजकारण गेली किमान २५ वर्षं त्यांच्याभोवती फिरत असल्यामुळे त्यांचे विरोधकही आहेतच. या सगळ्या विरोधकांची मोट बांधण्यात शरद पवार यशस्वी झालेत. त्यांनी ही लढत प्रतिष्ठेची केलीय. भाजप शिवसेनेच्या पाठिंब्यावर जिल्हापरिषद अध्यक्ष बनलेले संजय शिंदे यांच्यावर पवारांनी डाव लावलाय. ती त्यांची सगळ्यात मोठी जमेची बाजू बनलीय.

हेही वाचाः दक्षिण महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या अस्तित्वाची लढाई

संजयमामा हे सर्वसामान्य कार्यकर्त्यात मिसळणारे जमिनीवरचे नेते आहेत. त्यामुळे जिल्ह्यातले सर्व गटतटातले कार्यकर्ते त्यांच्या प्रेमात आहेत. राष्ट्रीय पातळीवरचं राजकारण करण्याइतपत गांभीर्य नसूनही ते निवडणुकीच्या मैदानात उत्तम उमेदवार ठरताहेत. त्याचवेळेस मोहिते पाटलांना डाव लावण्यासाठी तितके चांगले पत्ते आलेले नाहीत. भाजपने दिलेले रणजितसिंह नाईक निंबाळकर सोलापूर भागात ओळखीचेही नाही. लोकांना आपले वाटावेत असंही त्यांचं व्यक्तिमत्त्व नाही.

कार्यकर्ते राष्ट्रवादीकडे, नेते भाजपकडे?

रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी त्यांच्या फलटण विधानसभा मतदारसंघातून रामराजे नाईक निंबाळकरांचा प्रभाव मोडून काढत चांगली मतं मिळवली तर मात्र मोहिते पाटलांचं गणित जुळून येऊ शकतं. पवारांनी विजयसिंहांवर केलेल्या टीकेनंतर कदाचित माळशिरसमधून कमळाला तुफान मतदान होऊ शकतं. राष्ट्रवादीला जिंकायचं असेल तर त्यांना माढ्यातून तोडीस तोड मतदान मिळवावं लागेल.

उरलेल्या मतदारसंघांपैकी माणमधून जयकुमार गोरे आणि शेखर गोरे यांचा प्रभाव मतदानात किती उतरतो, हे फारच महत्त्वाचं ठरू शकेल. या लढतीतला दिसून न येणारा हात आहे तो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा. त्यांनी मोहिते पाटलांना जबरदस्त पाठिंबा दिलाय. उत्तम रसद पुरवलीय. आपल्या नावावर मतदारसंघातल्या अनेक नेत्यांना आपल्याकडे खेचून आणलंय. 

हेही वाचाः रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगडमधे राणे, तटकरेंच्या लीडरशीपची परीक्षा

पण राजकारणात एक अधिक एक बरोबर दोनच होतात, असं नाही. जिल्ह्यातले पहिल्या दुसऱ्या फळीतले नेते भाजपकडे पण कार्यकर्ते राष्ट्रवादीबरोबर अशी लढत झाली तर पारडं राष्ट्रवादीकडे झुकू शकतं. कार्यकर्ते नेत्यांबरोबर राहिले तर मात्र मोहिते पाटलांची इभ्रत टिकून राहू शकते.

आज्याचे गुण नातवात दिसताहेत

माढ्याइतकी नसली तरी अहमदनगरमधेही शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. विखे पाटलांनी बंड करताना पवारांना टार्गेट केलं. त्यामुळे पवार विरुद्ध विखे हे जुनं भांडण पुन्हा भरसभेत उगाळलं गेलं. बाळासाहेब विखे पाटील पवारांच्या विरोधात ठामपणे उभं राहिले. राधाकृष्ण यांचा स्वभाव नेमस्त असल्यामुळे त्यांनी वाद वाढवला नाही. पण आज्याचे गुण नातवात येतात, तसं सुजय यांनी पहिल्याच निवडणुकीत थेट पवारांशी पंगा घेतलाय.

आधीच्या तीन पिढ्यांची पुण्याई, मतदारसंघात अडीच वर्ष घेतलेली मेहनत, डॉक्टर असल्यामुळे चांगली प्रतिमा, तडफदार भाषणं आणि धडाडी यांच्या जोरावर सुजय विखे सध्या जोरात आहेत. त्यांची स्वतःची निवडणूक लढवण्याची यंत्रणा आहे. पण त्यांचा परंपरागत मतदारसंघ शिर्डी हा सध्या अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. त्यामुळे त्यांना अहमदनगर मतदारसंघातून लढण्याचा जुगार खेळावा लागलाय. १९९८च्या निवडणुकीत बाळासाहेब विखेंनी हा जुगार यशस्वीपणे जिंकला होता.

हेही वाचाः जळगाव जिल्ह्याचा कंट्रोल कुणाकडे हे ठरवणारी निवडणूक

याचा अर्थ सुजयना ही लढाई सोपी आहे, असं मात्र बिलकूल नाही. संपूर्ण मतदारसंघात राष्ट्रवादीचंही उत्तम नेटवर्क आहे. सध्याचे भाजपचे खासदार दिलीप गांधी नाराज आहेत. बाकीची आमदारमंडळीही एकदिलाने सोबत आहेत, असं चित्र नाही. शिवाय विखेंचा पराभव करण्यासाठी त्यांचे जिल्ह्यातले प्रमुख विरोधक बाळासाहेब थोरातांनी पवारांशी हातमिळवणी केलीय. विशेष म्हणजे सुजय यांना तोडीस तोड ठरेल असा खमका उमेदवार आमदार संग्राम जगतापांच्या रूपाने पवारांकडे आहे.

जगतापांच्या मदतीला भावकीचं राजकारण

अहमदनगर शहरातल्या राजकारणातलं एक बडं प्रस्थ असणाऱ्या अरुणकाका जगतापांची निवडणूक लढवण्याची इच्छा होती. अजित पवार यांचाही त्यांच्यासाठी आग्रह होता. पण त्यांना शिवसेना कार्यकर्ते संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांच्या खुनासाठी तुरुंगाची हवा खावी लागली होती. त्यामुळे त्यांच्याऐवजी त्यांचा मुलगा आमदार संग्राम जगताप हा पर्याय शरद पवारांना मान्य झाला.

अर्थात संग्राम जगताप काही सोवळे नाहीत. तालमी आणि व्यायामशाळांतून गुंड पोसून राजकारण करायचं. त्याच्या दहशतीच्या जोरावर फुगणाऱ्या शहरांचे सगळे फायदे ओरपून गब्बर व्हायचं. असा आजवर युपी बिहारमधेच दिसणारा पॅटर्न अरुण जगताप, शिवाजी कर्डिले आणि भानुदास कोतकर या एकमेकांच्या पाहुण्यांनी वेगवेगळ्या पक्षांत राहून यशस्वी करून दाखवलाय.

हेही वाचाः एक्झिट अंदाज: दुसऱ्या टप्प्यात कोण जिंकलंय, कोण हरलंय?

संग्राम जगताप हे अस्सल नगरी राजकारणाचं प्रोडक्ट आहेत. त्यामुळे काहीही करून जिंकून येण्यासाठी त्यांनी आपली ताकद पणाला लावलीय. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले हे अपेक्षेप्रमाणे आपल्या जावयासाठी पक्ष न पाहता मैदानात उतरले आहेतच. एका दिवसात मतदान फिरवण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. शिवाय विखे डोईजड झालेले ज्यांना नकोत, असे सगळेच जगतापांच्या सोबत आहेत. त्यामुळे सुजय विरुद्ध संग्राम या तरुणांच्या फाईटने अहमदनगरचं वातावरण ताईट केलंय.

पवारांसारखाच संघर्ष, पण कारणं वेगळी

मराठा समाजात तालेवार खानदानाशी नातं जोडण्याची खोड दिसते. ज्याचं वजन समाजात आहे, त्याच्याशी सलगी दाखवाण्यात शर्यत असते. विखे पाटील असोत किंवा मोहिते पाटील यांचा मराठा समाजातला मानमरातब मोठा आहे. त्यांच्या डबल आडनावांचा दिमाखही मोठा आहे. त्यांच्या संस्थांबरोबरच हा सन्मानही त्यांना राजकारणात मदतीला येतो.

मात्र त्याचबरोबर संग्राम जगताप आणि संजय शिंदे हे सर्वसामान्य मराठ्यांचं प्रतिनिधित्व करतात. गेल्या दशकभरात त्यांनी नव्याने पैसा कमावून स्वतःला राजकारणात सिद्ध केलंय. त्यांना घरंदाजपणाची वगैरे प्रतिष्ठा नाही. शिवाय राजकारणातल्या नको त्या प्रकारांमुळे ते काही केल्या शहरी प्रतिष्ठितपणाच्या चौकटीत बसू शकत नाहीत. मराठा समाजातल्या नेतृत्वाच्या दोन तऱ्हा आहेत. हा संघर्ष त्यातलाही आहे.

पवारांनी स्वतः महाराष्ट्रातल्या मातब्बर घराण्यांशी करियरच्या सुरवातीच्या काळात संघर्ष केला होता. आता जगताप, शिंदेही संघर्ष करत आहेत. पण त्यांचा मार्ग पवारांसारखा विधायक नाही. तरीही पवार या खानदानांच्या विरोधातल्या बंडखोरांच्या बरोबर आहेत. त्यामुळे तालेवार घराण्यांनाच बंड करावं लागतंय. त्यातला कुठला प्रवाह यशस्वी होतोय, हे या निवडणुकांत सिद्ध होईल. त्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातल्या एकंदरीतच मराठा राजकारणाची दिशाही ठरू शकेल.

हेही वाचाः भावा बहिणींनो, चौकीदार चोर नसूही शकतो!