१०० बलात्काऱ्यांच्या मुलाखती घेणाऱ्या तरुणीचं म्हणणं ऐकायलाच हवं!

०४ डिसेंबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


‘निर्भया’ प्रकरणानंतर दिल्लीतल्या मधुमिता पांडे या तरुणीनं तिहार जेलमधल्या १०० बलात्काऱ्यांच्या मुलाखती घेतल्या. हा अनुभव तिच्यासाठी खूप वेगळा, गैरसमज मोडणारा होता. हैदराबाद घटनेनंतर पुन्हा एकदा सगळीकडे बलात्कार आणि त्याविरोधात काय केलं पाहिजे याची चर्चा सुरू झालीय. मधुमिताचा प्रबंध आणि त्यात तिला आलेले अनुभव यांचा विचार नक्की केला पाहिजे.

सात वर्षांपूर्वी म्हणजेच २०१२ च्या डिसेंबरमधे रात्री आपल्या मित्रासोबत सिनेमा बघून घरी परत येत असताना एका तरुणीला चार मुलांनी घेरलं. तिच्या मित्राला बेदम मार दिला. त्या तरुणीला बसमधे नेऊन चौघांनी तिच्यावर हवा तसा अत्याचार केला. दिल्लीतल्या या निर्भया बलात्कार प्रकरणानं सगळ्या देशाची झोप उडवली. त्यावर्षी जगातल्या जेंडर सर्वेमधे भारत महिलांसाठी असुरक्षित देश म्हणून पहिल्या क्रमांकावर होता. महिला पुरुषांशिवाय घराबाहेर पडू शकत नाहीत, असा कायदा करणाऱ्या सौदी अरेबियापेक्षाही भारत असुरक्षित असल्याचा शेरा जेंडर अभ्यासकांनी दिला. 

कुठल्याही माणसाला इतकं अमानुष कृत्य का करावंसं वाटतं असा प्रश्न पाडणारी केस पुन्हा एकदा हैदराबादमधे घडलीय. प्रियांका रेड्डी या तरुणीवर बलात्कार करून तिचा देह जाळण्यात आला. त्यानंतर परत एकदा बलात्कार, त्याची कारणं, मुलींनी कसं राहिलं पाहिजे, मुलांना काय  शिक्षण द्यायचं याची चर्चा सोशल मीडियावर होऊ लागलीय.

देशात दररोज १३२ बलात्कार होतात

गेल्या सहा महिन्यात देशभरात बलात्कार आणि लैंगिक हिंसाचार केल्याच्या २४,२१२ केसेस पोलिस ठाण्यात नोंदवल्या गेल्याचं समोर आलंय. ही आकडेवारी हवेतली नाही. हायकोर्ट आणि पोलिस प्रमुखांनी सुप्रीम कोर्टाला दिलेली ही आकडेवारी आहे. याचा अर्थ असा की देशात जिथे रोज १३२ बलात्कार होतात. बरं! ही तर फक्त नोंदणी केलेली आकडेवारी झाली. नोंद न केलेले अजून कितीत्तरी गुन्हे तसंच आहेत.

ही आकडेवारी कितीही चघळली तरी मुळात पुरुषांना बलात्कार करावासा का वाटतो, हा प्रश्न अनुत्तरीतच राहतो. याच प्रश्नाचं उत्तर मिळवण्यासाठी मधुमिता पांडे ही तरुणी गेल्या ९ वर्षांपासून दिल्लीतल्या तिहार जेलच्या चकरा मारतेय. उद्देश एकच! बलात्काराचा आरोप सिद्ध झालेल्या पुरुषांशी बोलायचं आणि त्यांना बलात्कार का करावासा वाटला, हे जाणून घ्यायचं.

निर्भया केस झाली त्या डिसेंबरमधे मधुमिता इंग्लडमधल्या एका युनिवर्सिटीत मास्टर्स डिग्री करत होती. मधुमिताचं बालपण दिल्लीतच गेलं. दिल्लीच्या रस्त्यारस्त्यांशी तिची खास दोस्ती होती. निर्भया केसनंतर आपल्या शहराकडे बघताना एक वेगळाच चष्मा मधुमिताच्या डोळ्यावर आपोआप येऊन चढला.

ते राक्षस नाहीत, माणसं आहेत

लहान असताना आपण ज्या रस्त्यांवरून मनमोकळेपणानं फिरलो, भविष्याची सुंदर स्वप्न पाहिली आता त्याच रस्त्यावरून फिरण्याच्या कल्पनेनं असुरक्षित वाटावं? या विचारानं तिला स्वस्थ बसवत नव्हतं. विचार करून करून डोकं दुखू लागायचं. सगळ्या विचारांच्या शेवटी पुन्हा एकदा ‘या मुलांना असं करावसं वाटलंच का?’ हा प्रश्न डोकं वर काढायचा.

मास्टर्स झाल्यावर आपल्या पीएचडीसाठी हाच विषय निवडायचा असं मधुमितानं ठरवलं. वॉशिंटन पोस्टला दिलेल्या मुलाखतीत मधुमिता म्हणते, ‘नेमक्या कोणत्या परिस्थितीमुळं पुरुष असं बनतात? त्यांना असं बनवायला कोण कारणीभूत ठरतं? हे मला शोधून काढायचं होतं.’ त्यासाठी युकेमधल्या रस्किन युनिवर्सिटीच्या क्रिमिनोलॉजी डिपार्टमेंटमधून तिनं संशोधन सुरू केलं.

बलात्काराचा आरोप सिद्ध झालेल्या, जेलमधे शिक्षा भोगणाऱ्या पुरुषांशी मधुमिताला संवाद साधायचा होता. त्यासाठी तिनं दिल्लीतल्याच तिहार जेलची निवड केली. वयाच्या २२ व्या वर्षी मधुमितानं पहिल्यांदा जेलमधे पाऊल ठेवलं. एका बलात्काऱ्याशी बोलण्यासाठी, त्याचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी ती अनेक आठवडे घालवत असे.

त्याचं म्हणणं व्यवस्थित ऐकून घेणं हे तिचं पहिलं काम होतं. आणि तो आरोपी जे सांगतोय ते नुसतंच कानावर न पाडता ते आत आत रिचवून त्याला नेमकं काय म्हणायचंय हे समजून घेणं हे दुसरं काम. त्यासाठी तिला सगळ्यात पहिल्यांदा मनातले पूर्वग्रह बाजुला सारावे लागले. अशा १०० पुरुषांशी तिनं संवाद साधला. त्यांचं म्हणणं मनापासून ऐकून घेतलं. म्हणूनच त्या पुरुषांविषयी असणारा आपला दृष्टिकोन मधुमिता बदलू शकली.

हेही वाचा : सुरक्षेची जबाबदारी महिलांवर ढकलून बलात्कार थांबणार का?

सहमतीनं सेक्स म्हणजे काय करायचं?

वॉशिंटन पोस्टच्या मुलाखतीत मधुमिता म्हणते, ‘मी माझ्या संशोधनाला सुरवात केली तेव्हा हे पुरुष म्हणजे राक्षस आहेत असं मी म्हणत असे. या राक्षसांशी मी बोलले तेव्हा मला जाणवलं की हे राक्षस नाहीत तर अतिसामान्य माणसं आहेत. त्यांनी जे केलंय ते त्यांना लहानपणी मिळालेल्या शिकवणुकीमुळे आणि त्यातून तयार झालेल्या त्यांच्या विचारसरणीमुळेच.’

मधुमिता पुढे सांगते, ‘या पुरुषांबद्दल माझ्या मनात तिरस्कार भरलेला होता. पण त्यांच्याशी बोलून या तिरस्काराची जागा सहानुभूतीनं घेतलीय. हो. मला त्यांच्याविषयी सहानुभूती वाटते.’ मधुमिताचं बोलणं ऐकून कदाचित आपल्याला आश्चर्य वाटेल. सहानुभूती? बलात्कार करणाऱ्यांबद्दल कसली आलीय सहानुभूती? त्यांना तर भर चौकात मारलं पाहिजे. हात पाय तोडले पाहिजेत. लिंग कापलं पाहिजे, असे उपाय सध्या सुचवले जाताहेत.

पण मधुमिता म्हणते, ‘एक बाई म्हणून तुम्ही असंच फिल करता. एका पॉईंटला तर ही माणसं बलात्काराच्या आरोपाखाली इथं आलीयत हेच आपण विसरून जातो. या माणसांना आपण बलात्कार केलाय म्हणजे काय केलंय हेच कळत नाही. सहमतीने सेक्स करायचा म्हणजे काय करायचं हेच माहीत नसतं, असा माझा अनुभव आहे.’

या संदर्भात मधुमिता घरातल्या स्त्री-पुरुष नातेसंबंधांवर बोलते. घरात आपली आई आपल्या बाबांना काय नावानं हाक मारते? ‘अहो’, ‘ऐकताय ना?’ किंवा आपल्या मुलाचं नाव घेऊन अमक्या अमक्याचे बाबा असं. म्हणजेच बायकोनं नवऱ्याचं पहिलं नाव घ्यायचं नाही असं चित्र आपल्याला घराघरात दिसतं. दिसताना ही गोष्ट फारच छोटी वाटते. त्यात काय एवढं असं आपल्याला वाटू लागतं. त्याचा आणि बलात्काराचा संबंधच काय असंही वाटतं.

शंभर पैकी फक्त तिघांनाच झालाय पश्चाताप

त्यातून मधुमिताला जी गोष्ट दाखवून द्यायची आहे ती फार मोठी आहे. ती म्हणते ‘अशा छोट्या छोट्या घटनेतूनच पुरुषत्वाच्या भंपक संकल्पना पुरुषांच्या मनात रुजतात. आणि आपण सबमिसीव असतो हे महिला शिकतात.’ बलात्कार करणारे पुरुष हे दुसऱ्या ग्रहावरून आलेले नसतात. ती इथंच जन्मलेली, इथंच वाढलेली आणि याच समाजामुळे निर्माण झालेली माणसं आहेत.’

तिहार जेलमधे आरोपींशी बोलताना घरात सहजपणे स्वीकारल्या जाणाऱ्या या छोट्या छोट्या गोष्टींची मधुमिताला सतत आठवण होत होती. तिच्या स्वतःच्या घरीही हेच झालं होतं. या आरोपींबद्दल बोलताना अनेक धक्कादायक गोष्टी मधुमिताला उलगडल्या. त्यातले अनेक पुरुष तिला आपल्या वागण्याची कारणं देत होते. आपण कसं बरोबर होतो हे पटवून देण्याचा प्रयत्न करत होते. तिची कशी सहमती होती, तिने कसे इशारे दिले हेच त्यांना सांगायचं होतं. काहींचं तर आम्ही बलात्कार केलाच नाही, असं म्हणणं होतं.

मधुमिता सांगते, संपूर्ण शंभर आरोपींपैकी फक्त तीन ते चार आरोपींना आपण केलेल्या कृत्याचा पश्चाताप झाला होता. पण बाकींच्याना तो झाला नाही. त्याचं कारण काय? मधुमिताच्या मते याचं एकच कारण असू शकतं आणि ते म्हणजे भारतात लैंगिकतेविषयी मोकळा संवाद नसणं. सेक्स, लैंगिकता याकडे बघण्याचा भारतातला दृष्टिकोन अतिशय मागासलेला आहे.

शाळेत, कॉलेजमधे लैंगिक शिक्षण देणं म्हणजे पाप आहे. इथल्या परंपरा आणि संस्कृतींना हे शोभत नाही, असं म्हटलं जातं. ‘पालक आपल्या मुलांशी बोलताना लिंग, योनी, बलात्कार किंवा सेक्स असे शब्द उच्चारत नाहीत. जर हे विषय एवढे गुप्त ठेवले तर त्याबद्दल मुलांना त्यांच्या चुका दाखवून द्यायच्या कशा?’ असा सवाल मधुमिता विचारते.

हेही वाचा : लोक आपापल्या सोयीपुरता स्त्रीवाद का मांडतात?

जेलमधून सुटल्यावर मी तिच्याशी लग्न करेन

मुलाखतीत मधुमितानं सांगितलेला एक किस्सा फारच इंटरेस्टींग आहे. जेलमधे एका ४९ वर्षांच्या पुरुषाशी मधुमिता संवाद साधत होती. एका ५ वर्षांच्या मुलीनं 'उत्तेजित' केलं म्हणून त्यानं तिच्यावर बलात्कार केला. आता त्याची शिक्षा तो भोगतोय. आपण केलेल्या कृत्याचा त्याला पश्चाताप झाला होता. ‘मी तिचं आयुष्य बर्बाद केलं. मला वाईट वाटतं. आता ती वर्जिन राहिलेली नाही. त्यामुळे कुणी तिच्याशी लग्न करणार नाही. मी जेलमधून सुटलो की मी तिचा स्वीकार करेन. मी तिच्याशी लग्न करेन.’ असं हा माणूस म्हणत होता.

‘आपण नेमके का चुकलोय, हेही त्या आरोपीला कळत नव्हतं. आणि वर तरुणपणाचा आव आणत त्याला तिच्याशी संसार थाटायचा होता,' मधुमिता सांगते. हा प्रसंग वाचल्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपींना जेलमधे टाकून काय साध्य होतं हा मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो.

आरोपीचं लिंग कापून, त्याचे हात पाय तोडून, त्याला भर चौकात फाशी देऊन आपण नेमके का चुकलोय हे त्यांना कळणार आहे का? आणि कळणार नसेल तर त्या शिक्षेचा उपयोगच काय? या प्रश्नांची उत्तरं शोधणं गरजेचंय. त्या आरोपीचं हे म्हणणं ऐकून मधुमिताला धक्का बसला आणि ती त्या ५ वर्षांच्या मुलीच्या शोधात निघाली. त्या आरोपीनं ती मुलगी कोण आहे, कुठे राहते वगैरे माहिती दिली. मधुमिता त्या मुलीच्या घरी गेली तेव्हा त्या ५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीला शिक्षा झालीय हेही त्या कुटुंबाला माहीत नव्हतं.

तिच्या या कामामुळे फरक पडणार का?

मधुमिताकडून एक एक कथा ऐकताना मन विष्ण्ण होऊन जातं. डोक्यात ना ना विचार घोळू लागतात. लवकरच युकेमधल्या एँजेला रस्किन युनिवर्सिटीकडून तिचा प्रबंध प्रकाशित होईल. तिचं हे काम धाडसाचं आहेच. पण त्यापेक्षा कित्तीतरी पटींनी महत्वाचंही आहे. या कामामुळे समाजात खरंच काही फरक पडणार आहे का हेही पहायला हवं.

बलात्काऱ्यांना फाशी देऊन किंवा त्यांच्यावर पुन्हा हिंसाचार करुन प्रश्न सुटणार नाहीत. तर या प्रश्नाच्या मुळाशी जायला हवं. बलात्कारविरोधी कायदे करताना आणि जेंडर अभ्यासाठी बलात्काराचा अभ्यास करताना तिच्या प्रबंधाचा उपयोग होईल, अशी आशा मधुमिताला वाटते.

हेही वाचा : 

पुरुषसत्तेचा धर्म उलथवणाऱ्या पेट्रूनियाची गोष्ट

गांधी घराण्यानं संन्यास घेणं देशाच्या हिताचं ठरेल

महाविकासआघाडीचं नवं सरकार पाच वर्षं चालेल की नाही?

आनंद कुंभारः एक क्लार्क शिलालेख अभ्यासक बनतो त्याची गोष्ट

महाराष्ट्रातल्या अपयशानंतर भाजपला झारखंड जिंकावंच लागणार!