राष्ट्रीय स्तरावर अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या रणजी स्पर्धेत मुंबईचा कायमच दबदबा राहिलाय. तब्बल ४१ वेळा अजिंक्यपद मिळवणार्या मुंबईकरांना तुलनेनं दुय्यम मानल्या गेलेल्या मध्यप्रदेशनं अंतिम फेरीत धूळ चारली. त्यांची ही कामगिरी प्रस्थापित टीमना धक्का देणारी आणि आत्मपरीक्षण करणारीच ठरलीय.
प्रत्येक खेळाडू कारकिर्दीत सर्वोच्च यश मिळवण्याचं स्वप्न पाहत असतो. हे स्वप्न साकारण्यासाठी तो अथक प्रयत्न करतो; मात्र काही वेळेला त्याचं हे स्वप्न साकार होत नाही. आपलं अपुरं राहिलेलं स्वप्न तो आपल्या मुलांद्वारे किंवा शिष्यांद्वारे साकार करण्याचा आटोकाट प्रयत्न करतो आणि त्यामधे त्याला यशही मिळतं.
मुंबईचे ज्येष्ठ क्रिकेटपटू आणि प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांच्याबद्दल असंच म्हणावं लागेल. मध्यप्रदेशचा कर्णधार म्हणून अपुरं राहिलेलं रणजी करंडकाचं स्वप्न त्यांनी मध्यप्रदेशच्या खेळाडूंना मार्गदर्शन करत यंदा साकार केलं. मध्यप्रदेशच्या खेळाडूंनी जिद्द, महत्त्वाकांक्षा आणि सांघिक कौशल्याच्या जोरावर ऐतिहासिक विजेतेपद मिळविलं आणि सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.
हेही वाचा: स्पर्श न करता खेळता येतं, म्हणून आपल्याकडे क्रिकेट वाढलं
राष्ट्रीय स्तरावर अतिशय प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या रणजी स्पर्धेत मुंबईचा कायमच दबदबा राहिलाय. तब्बल ४१ वेळा अजिंक्यपद मिळवणार्या मुंबईकरांना तुलनेनं दुय्यम मानल्या गेलेल्या मध्यप्रदेशनं अंतिम फेरीत धूळ चारली.
मुंबईबरोबरच कर्नाटक, पंजाब, दिल्ली इत्यादी टीमनी रणजी स्पर्धेत कायमच आपलं वर्चस्व निर्माण केलंय. त्यांच्या तुलनेत मध्यप्रदेश टीम विजेती होईल, अशी क्रिकेट पंडितांनी कधी फारशी अपेक्षा केली नव्हती.
वलयांकित आणि मातब्बर खेळाडूंचा अभाव असतानाही मध्यप्रदेशच्या खेळाडूंनी प्रत्येक सामन्यानंतर आपली कामगिरी उंचावत ‘रणजी कप’वर नाव कोरलं. त्यांची ही कामगिरी प्रस्थापित टीमना धक्का देणारी आणि आत्मपरीक्षण करणारीच ठरलीय.
रणजी स्पर्धा ही एकेकाळी भारतीय टीममधे स्थान मिळवण्यासाठी असलेली हुकमी स्पर्धा मानली जायची. या स्पर्धेत खेळण्यासाठी नवोदित आणि युवा खेळाडू कसोशीनं प्रयत्न करायचे. दुर्दैवानं मर्यादित षटकांच्या स्पर्धांमुळे रणजी स्पर्धेचं महत्त्व कमी झालं. त्यामुळेच की काय, रणजी आणि त्यासारख्या स्थानिक स्पर्धांकडे अनेक दिग्गज खेळाडू पाठ फिरवत असतात.
खेळपट्टीवर बॅटींग केली तर धावा मिळवण्याचं कौशल्य आत्मसात करता येतं. या स्पर्धेमधे वेगवेगळ्या प्रकारच्या खेळपट्ट्यांवर वेगवेगळं कौशल्य असलेल्या बॉलर आणि बॅट्समनसोबत खेळण्याची संधी मिळते. परिपूर्ण खेळाचं ज्ञान अशा स्पर्धेमुळेच आत्मसात करता येतं. राष्ट्रीय टीममधला एखादा खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर अपयशी होत असेल, तर त्याला रणजीसारख्या स्थानिक सामन्यांमधे खेळण्याचाही सल्ला दिला जातो.
त्यामुळे रणजी स्पर्धा ही क्रिकेटचा आत्माच मानली जाते. असं असूनही अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडू वेगवेगळी कारणं देत स्थानिक स्पर्धांना कमी महत्त्व देतात. त्यांच्या या वृत्तीचा फायदा घेत, गेल्या चार-पाच वर्षांमधे अनेक दुय्यम मानल्या गेलेल्या टीमनी स्थानिक स्पर्धांमधे चमकदार कामगिरी केलीय आणि राष्ट्रीय निवड समितीच्या सदस्यांना आपल्या कामगिरीची गांभीर्यानं दखल घ्यायला लावलीय.
हेही वाचा: कमीत कमी सोयीसुविधा, तरीही अपंगाच्या भारतीय क्रिकेट टीमचं मोठं यश
‘चक दे इंडिया’ या सिनेमात कबीर खान हा हॉकी प्रशिक्षक भारतीय महिला हॉकी टीमची बांधणी करतो आणि भारताला वर्ल्डकप जिंकून देतो. या कबीर खानप्रमाणेच मध्यप्रदेशचे प्रशिक्षक पंडित यांनी अक्षरशः शून्यातून टीमची बांधणी केली आणि स्वप्नवत अजिंक्यपद पटकावलं. अर्थात त्यांची ही कामगिरी खूप काही सोपी नव्हती.
एक अशक्यप्राय आव्हानच त्यांच्यापुढे होतं. दोन वर्षांपूर्वी त्यांच्याकडे हे प्रशिक्षकपद सोपविण्यात आलं. क्रिकेटमधे खेळाडू आणि प्रशिक्षक या दोन्हींबद्दल पंडित यांनी चार पावसाळे पाहिलेत, असं म्हटलं तर ते फारसं वावगं ठरणार नाही. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई टीमनं २००२-०३, २००३-०४ तसंच २०१५-१६मधे रणजी करंडक जिंकला होता.
फारसे वलयांकित खेळाडू नसलेली विदर्भ टीम रणजी करंडकावर नाव कोरेल, असं कधी कोणी भाकितही केलं नव्हतं. पण पंडित यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली २०१७-१८मधे विदर्भ टीमनं सनसनाटी विजेतेपद मिळवलं. विजेतेपद मिळण्यापेक्षाही ते टिकवणं हे मोठं आव्हान असतं, असं नेहमी म्हटलं जातं. मात्र विदर्भ टीमनं पुन्हा २०१८-१९मधे रणजी स्पर्धा जिंकली.
पंडित यांच्याकडे मध्यप्रदेश टीमचं प्रशिक्षकपद सोपवण्यात आलं. कोरोनाच्या काळात त्यांच्याकडे ही जबाबदारी आल्यानंतर अनेक आव्हानं उभी राहिली होती. टीममधले खेळाडू निवडण्यापासून त्यांची शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती, त्यांच्यामधे आत्मविश्वास निर्माण करणं इत्यादी अनेक गोष्टींबाबत त्यांची कसोटी होती. मध्यप्रदेशमधल्या शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही त्यांनी नैपुण्य शोधमोहीम घेतली.
टाळी कधी एका हातानं वाजत नाही, असं म्हटलं जातं. त्याप्रमाणेच पंडित यांच्याकडे प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवताना मध्यप्रदेश क्रिकेट संघटनेनं त्यांना सर्वच गोष्टींबद्दल स्वातंत्र्य दिलं. एवढंच नाही, तर खेळाडूंसाठी आवश्यक असणार्या सर्व सुविधा दिल्या. त्यामुळे पंडित यांचं काम अधिकच सोपं झालं.
मध्यप्रदेशमधलं क्रिकेट पंडित यांच्यासाठी नवीन नव्हतं. सहा वर्षं त्यांनी या टीमकडून खेळाडू म्हणून प्रतिनिधित्व केलं होतं. सन १९९८-९९मधे त्यांच्याच नेतृत्वाखाली मध्यप्रदेशने रणजी स्पर्धेची फायनल गाठली होती, त्यावेळी त्यांना पहिल्या डावात आघाडी मिळूनही नंतर निर्णायक पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. या पराभवाची बोच कायमच पंडित यांना वाटत होती.
त्यामुळेच जेव्हा मध्यप्रदेशचं प्रशिक्षकपद त्यांच्याकडे आलं, तेव्हा त्यांनी या टीमला विजेतेपद मिळवून द्यायचा निर्धार ठेवला. खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यामधे द़ृढविश्वास आणि सुसंवाद असेल, तर आपोआपच खेळाडू आणि पर्यायानं टीमची कामगिरी सर्वोत्तम होते हे लक्षात घेऊनच, त्यांनी टीममधल्या खेळाडूंच्या क्षमतेवर विश्वास ठेवला आणि त्याप्रमाणे त्यांना मार्गदर्शन केलं.
हेही वाचा: क्रिकेट म्हणजे पुरुषांचा खेळ, हा समज खोटं ठरवणाऱ्या बायका
बॅटींगमधे दोन शतकांसह ६००हून अधिक धावा करणारा यश दुबे, पाच अर्धशतके आणि दोन शतके झळकावणारा रजत पाटीदार, तीन अर्धशतके आणि एक शतक केलेला अठरा वर्षीय खेळाडू अक्षत रघुवंशी, चार शतकांसह ६००हून अधिक धावा तसंच अंतिम सामन्यात यश दुबेच्या साथीत द्विशतकी भागीदारी करणारा शुभम शर्मा, सेमीफायनलमधे महत्त्वपूर्ण शतकी खेळी साकारणारा विकेटकीपर आणि ओपनर हिमांशू मंत्री यांनी मध्यप्रदेशच्या यशामधे सिंहाचा वाटा उचलला.
क्रिकेटमधे कारकीर्द करण्यासाठी उत्तर प्रदेशमधलं आपलं गाव सोडून आलेला कुमार कार्तिकेय हा उज्ज्वल भवितव्य लाभलेला बॉलर आहे. मुंबई इंडियन्सनं त्याला टीममधल्या खेळाडूंच्या सरावासाठी पाचारण केलं होतं. कार्तिकेयने यंदाच्या रणजी स्पर्धेत मध्यप्रदेश टीमकडून ३२ गडी बाद करत टीमच्या विजयास मोठा हातभार लावला.
त्याला गौरव यादव, पार्थ सहानी, सारांश जैन, अनुभव आगरवाल इत्यादी गोलंदाजांची महत्त्वपूर्ण साथ लाभली. आदित्य श्रीवास्तव यानं कर्णधारपदाची धुरा सांभाळताना प्रत्येक वेळी आपल्या सहकारी खेळाडूंवर सार्थ विश्वास ठेवला. त्यांना वेळोवेळी प्रोत्साहन देत त्यांच्याकडून टीमसाठी आवश्यक असणारी कामगिरी करून घेतली.
मध्यप्रदेश टीमनं मिळवलेल्या विजेतेपदाचा बोध घेत इतर टीमच्या खेळाडू, प्रशिक्षक आणि टीम व्यवस्थापकांनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे. विशेषतः मुंबई आणि महाराष्ट्र या टीमनी आपल्या कामगिरीबद्दल गांभीर्यानं विचार केला पाहिजे. या दोन्ही टीममधे आंतरराष्ट्रीय सामने आणि आयपीएलचा प्रदीर्घ अनुभव असलेले खेळाडू आहेत.
टीममधल्या खेळाडूंची निवड करताना त्यांची स्थानिक सामन्यांमधली कामगिरी, शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती याचाही सखोल अभ्यास त्यांच्या निवड समितीनं केला पाहिजे. रणजी स्पर्धा हीच खर्या अर्थानं क्रिकेटचा आत्मा मानली जाते. हे लक्षात घेऊनच महाराष्ट्र आणि मुंबईच्या क्रिकेट पदाधिकार्यांनी भविष्यातल्या टीम उभारणीसाठी योग्य रितीनं नियोजन केलं पाहिजे.
केवळ निवड चाचणी स्पर्धेवर अवलंबून न राहता, खेळाडूंना स्थानिक स्पर्धांमधला भरपूर अनुभव घेणं अनिवार्य केलं पाहिजे. एक मात्र नक्की की, गेल्या काही वर्षांमधे राजस्थान, विदर्भ आणि आता मध्यप्रदेशसारख्या फारशा चर्चेत नसलेल्या टीम रणजी स्पर्धेत वर्चस्व गाजवू लागल्या आहेत. कोणतीही टीम दुय्यम नसते. कधीनाकधीतरी ही टीमही सर्वोच्च स्थान घेऊ शकते, हेच मध्यप्रदेशनं दाखवून दिलंय.
हेही वाचा:
क्रिकेटचे लघुउद्योग सुटलेत सुसाट