भाद्रपदातल्या गणपतींची जुनी परंपरा आहे, तशी माघातल्या गणपतींचीही आहे. पण भाद्रपदातल्या गणपतीचा गणेशोत्सव झाला, तसा माघातल्या गणपतीचा झाला नव्हता. मात्र गेल्या दहाएक वर्षांपासून मुंबईत माघी गणेशोत्सवाचं प्रमाण वाढलंय. त्याचा थाटमाटही वाढलाय. त्यांचं कारण फक्त मुंबईच्या उत्सवप्रियतेत नाही, तर राजकारणातही आहे.
भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थी होऊन सहा महिने लोटायच्या आधीच मुंबईकरांना वेध लागतात ते माघी गणेश जयंतीचे. म्हणजे तसं बघायला गेलं तर, गणपती विसर्जनाच्या दिवशी ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ ही गणपती बाप्पांना भक्तांनी मोठमोठ्याने केलेली विनंती आजकाल बाप्पा फारच सिरीयसली घेऊ लागलाय. कारण लगेचच सहा महिन्यात भक्तांच्या भेटीसाठी बाप्पा हजर होतात.
आजही आपल्यासारख्या बऱ्याच भक्तांना भाद्रपद गणेश चतुर्थी आणि माघी गणेश जयंतीमधला फरक विचारला तर सांगता येणार नाही. पण गुगलबाबा आपल्याला मदतीला येतो. गुगल नेहमीची आख्यायिका सांगते, पार्वती मातेची आंघोळ, शरीरातील मळाचा गणपती, भगवान शंकर रागावतात, त्याचं शिर उडवतात, चूक कळल्यावर त्याजागी हत्तीचं डोकं लावतात. तो दिवस माघ शुक्ल चतुर्थीचा होता म्हणे. पण अनेकदा भाद्रपदातल्या गणपतीचीही तीच गोष्ट सांगतात.
फेसबूकवर दिनविशेष सांगणारे संजीव वेलणकर त्याविषयी समजवतात, `गणपतीने राक्षसांना मारण्यासाठी तीन वेळा अवतार घेतला, असं म्हटले जाते. पहिली वेळ म्हणजे वैशाख शुक्ल पौर्णिमा, त्याला पुष्टिपती विनायक जयंती म्हणतात. या दिवशी पिठाचा गणपती करून त्याचे पूजन केलं जातं. दुसरी वेळ म्हणजे भाद्रपद शुक्ल चतुर्थी जी गणेशचतुर्थी म्हणून ओळखली जाते. या दिवशी मातीच्या मूर्तीचं पूजन केलं जातं. हे पूजन म्हणजे एक प्रकारे पृथ्वीची पूजा असते. भाद्रपद महिन्यात शेतात धान्य तयार होत असते. त्याविषयी कृतज्ञता म्हणून पृथ्वीची पूजा केली जाते.`
वेलणकर पुढे सांगतात, `तर तिसरा दिवस म्हणजे माघ शुक्ल चतुर्थी. या दिवशी धुंडीराज व्रत करण्यास सांगितलंय. त्याबाबत स्कंद पुराणात एक कथा आहे. या दिवशी गणेशाने नरांतक राक्षसाला ठार मारलं. त्यासाठी त्याने कश्यपाच्या पोटी विनायक नावाने अवतार घेतला. म्हणून ही माघी गणेश जयंती म्हणून सर्वत्र साजरी केली जाते. या दिवशी उपवास करून धुंडीराज गणेशाला तीळ आणि साखरेचे मोदक करून अर्पण करायचे असतात. एक वेळ उपाशी राहून या दिवशी जागरण करायचं असतं.`
लोकमान्य टिळकांनी या उत्सवाचा उपयोग समाजप्रबोधन करण्यासाठी करावा म्हणून घरगुती गणपतींना सार्वजनिक उत्सवाचं स्वरुप दिलं, हे आपल्या सगळ्यांना शाळेच्या धड्यातून माहीत झालंयच. परंतु घराघरात प्रामुख्याने दीड दिवस साजरा करण्यात येणाऱ्या माघी गणपतीला सार्वजनिक उत्सवाचं स्वरूप कुणी दिलं आणि का दिलं, याविषयी मात्र कुणी कुठे सांगितलेलं नाही. ते मुळातूनच शोधावं लागेल.
भाद्रपद गणेश चतुर्थीचं तर खूप आधीच एका इवेंटमधे रुपांतर झालंय. गेल्या दहा एक वर्षांत तर माघी गणपतीच्या बाजारानेही चांगलाच उठाव घेतलाय. माघी गणेशजयंती ही अनेक घरी साजरी करण्यात येत होती. सिद्धिविनायकासारख्या देवळांतूनही दरवर्षी उत्साहात हा उत्सव साजरा होत होता. मुंबईभर गेली चाळीस पन्नास वर्षं सार्वजनिक उत्सव करणारी अनेक मंडळं आहेत. पण आता या उत्सवाचा पारंपरिकपणा हरवून त्याची जागा इवेंटगिरीने घेतलीय. घरातला गणपती आता माघातही रस्त्यारस्त्यांवर आलाय.
मुंबईत माघी गणेश साजरा करणाऱ्या मंडळाची संख्या साडेतीन हजाराच्या घरात पोचलीय. गेल्यावर्षीच्या तुलनेत यात दीडेक हजाराने वाढ झालीय. माघी गणपती साजरा करण्याचं कारणही खूप इंटरेस्टींग आहे. मूर्तिकार संतोष कांबळी यांनी महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटलंय, ‘अनेकांना भाद्रपद महिन्यात गणरायाची उपासना करणं शक्य होत नाही. त्यामुळे ते माघ महिन्यात ही इच्छा पूर्ण करतात. बहुतांश भाविक नवस म्हणून माघ महिन्यात गणरायाची प्राणप्रतिष्ठापना करतात.’
अमक्याचा सम्राट, तमक्याचा राजा अशी नावं सार्वजनिक मंडळांनी आपल्या माघी गणपतींना दिलीत. अगदी पाद्यपूजन सोहळा, आगमन सोहळा, विसर्जन सोहळा कसा वेगळ्या पद्धतीनं आणि दिमाखात साजरा करण्यासाठी कार्यकर्ते झटताना दिसतात. एखादा गणपती आगमन किंवा विसर्जनाधीश म्हणून प्रसिद्ध झाला तर त्याच्या दर्शनासाठी भाविकांच्या रांगाच रांगा लागतात आणि त्याचा थेट संबंध येतो, तो दानपेटीवर.
एखाद्या एरियातला गणपती नवसाला पावतो म्हणून प्रसिद्ध झाला तरी तर इतर गणेशमंडळांचं अर्थकारण बिघडतं. मग अशा शेजारील मंडळांना प्रसिद्ध व्हायची संधी असते ती नवरात्रौत्सवात किंवा आताआता सुरू झालेल्या माघी गणपती उत्सवाच्या काळात.
याचं एक उदाहरण म्हणजे भाद्रपद गणेश चतुर्थीची सर्वाधिक प्रसिद्ध गणेशमंडळं ही दक्षिण मुंबईमधे आहेत. गणेशोत्सवादरम्यान तिथे भाविकांच्या रांगाच रांगा लागतात. दक्षिण मुंबईमधे नवरात्रौत्सवाचीदेखील जवळपास हीच परिस्थिती असते. त्यामुळे तिथे माघातले गणपती फारसे दिसत नाही. त्याचवेळेस माघी गणेश साजरी करणारी मंडळं मुंबई उपनगर तसंच ठाणे, कल्याण, डोंबिवली इथेच जास्त आहेत.
भाद्रपदातल्या गणेश चतुर्थीत ‘लालबागचा राजा’भोवती आकर्षणाचं वलय तयार झालंय. तसंच वलय माघी गणपतीत ‘चारकोपच्या राजा’ला आलंय. दरवर्षी लालबागच्या राजाची मूर्ती जशी असते, त्याचीच प्रतिकृती चारकोपच्या राजाकडेही असते. यंदा या मंडळाचं हे चौदावं वर्ष आहे. यानिमित्त तिथे दरवर्षी वेगवेगळे उपक्रम राबवले जातात.
चारकोपच्या राजाचा उत्सव सुरू केलाय, निखिल गुडेकर या युवासेनेच्या तरुण पदाधिकाऱ्याने. शिवसेनेच्या ज्येष्ठ नगरसेविका शुभदा गुडेकर यांचे ते मुलगा आहेत. असे युवासेनेचे अनेक पदाधिकारी माघी गणेशोत्सव करताना दिसतात. कारण शिवसेनेच्या सिनीयर नेत्यांनी आधीच भाद्रपदातल्या मेन गणेशोत्सवावर आपलं वर्चस्व निर्माण केलंय.
आधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवसेनेच्या थेट स्पर्धेत उतरून भाद्रपदातच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं सुरू केली. पण शिवसेनेचीच तरुण आघाडी असणाऱ्या युवासेनेच्या तरुणांना ते भांडण शक्य नव्हतं. त्यामुळे त्यांनी माघी गणपतीचा मार्ग स्वीकारला. त्याचबरोबर युती तुटल्यापासून मुंबईत शिवसेनेपुढे तगडं आव्हान उभं करणाऱ्या भारतीय जनता पक्षानेही माघी गणपतीत रस घेतलाय. भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे मंडप आता मुंबई आणि शेजारच्या शहरांत पाहायला मिळतात. त्यातून माघी गणपतींची संख्या गेल्या काही वर्षांत अतोनात वाढलीय.
भक्तिभाव वगैरे सगळं ठीक आहे. तरीही सण उत्सव पाहिले की अफूची गोळी आहे की काय असं वाटायला लागतं. कारण या उत्सवांत सगळ्यात जास्त फायदा होतो तो राजकारणी आणि जाहिरातदार यांचा. नव्याने उदयास येणाऱ्या नेतृत्वासाठी लोकांमधे प्रसिद्ध होण्यासाठी, पब्लिसिटीसाठी हा सण म्हणजे जणू पर्वणीच असते. त्यात असे दहा-अकरा दिवस साजरे होणारे उत्सव म्हणजे त्यांच्याकरिता सोने पे सुहागा.
या सणांदरम्यान अगदी गणपती मंडपाच्या बाहेर मोठाच्या मोठा बॅनर किंवा होर्डिंग लावले की झालं. भाविकांनी आधी या उमद्या, उद्याच्या नेतृत्वाचं दर्शन घेऊन मग गणपतीचं दर्शन घ्यायचं. मंडळात एखादा कार्य़क्रम केला की आपसूक कार्यकर्त्यांची फळी त्याच्या दिमतीला तयार होते.
अशा या गणेशोत्सवादरम्यान भक्तिभावापेक्षाही मोठी समीकरणं असतात ती चढाओढ, राजकारण, अर्थकारण यांची. त्यामुळे गणपती बाप्पा, तू भक्तांची पुढच्या वर्षी लवकर या, ही आर्त हाक ऐकून लवकर येतोस खरा. पण तुझ्या अशा अगदी वर्षातून दोनदा होणाऱ्या विजिटमुळे भक्तांच्या मनातला भक्तिभाव तेवढा कमी करू नकोस. निदान स्वतःच्या या माघी गणेशोत्सवाला तरी चढाओढ, राजकारण, अर्थकारण यापासून दूर ठेव. स्वतःचा इवेंट तेवढा होऊ देऊ नकोस. हीच प्रार्थना. पण आता ते तुझ्या चार चार हातांत तरी आहे, की नाही माहीत नाही.