रामसुंदर दास: कालीचरणला धर्मसंसदेतून खडेबोल सुनावणारे महंत

०२ जानेवारी २०२२

वाचन वेळ : ६ मिनिटं


भारतात हल्ली धर्मसंसद, धार्मिक परिषदांच्या नावानं विद्वेषाची बीजं पेरली जातायत. हरिद्वार आणि रायपूरमधली धर्मसंसद याचं ताजं उदाहरण आहे. स्वयंघोषित संत, महंत मंडळींची धर्माच्या नावावर चाललेली बजबजपुरी वाढतेय. अशा भोंदूंच्या मांदियाळीत खऱ्या धर्माचा अर्थ सांगू पाहणारी महंत रामसुंदर दास यांच्यासारखी मंडळी वेगळी आणि महत्वाची ठरतात.

हरिद्वार आणि रायपूरमधल्या धर्मसंसदेतून धार्मिक विद्वेष पसरवला गेला. सोशल मीडियातून त्याची चर्चा झाली. एकीकडे अल्पसंख्याक विरोधी भाषणं आणि दुसरीकडे कालीचरण नामक कुठल्या भोंदूनं महात्मा गांधींजींना केलेली शिवीगाळ. हे सगळं काही देशभर गदारोळाचं कारण ठरलं. मीडियालाही जाग आली. दुसरीकडे कालीचरणला अटक झाली. तर हरिद्वारमधल्या धर्मसंसदेत झालेल्या विखारी भाषणांच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली.

धर्मसंसद धार्मिक मुद्यांवरच्या चर्चेचं एक महत्वाचं ठिकाण आहे. यात वेगवेगळ्या मठांचे प्रमुख एकत्रित येत सखोल चर्चा करतात. सुधारणा, बदलांची अपेक्षा व्यक्त करतात. तसं करणंच अपेक्षित आहे. १८९३ला शिकागो इथं एक धर्मसंसद झाली होती. त्यात स्वामी विवेकानंद यांचं हिंदू धर्मातल्या सहिष्णुतेची मांडणी करणारं भाषण प्रचंड गाजलं होतं. सर्व धर्म सत्य आहेत असं म्हणताना त्यांनी भुकेनं मरणाऱ्या व्यक्तीला धर्माचा उपदेश करणं अपमान असल्याचंही म्हटलं होतं. धर्म संसदेतली ही थेट भूमिका होती.

भारतात हल्ली धर्मसंसद, धार्मिक परिषदांच्या नावानं विद्वेषाची बीजं पेरली जातायत. हरिद्वार आणि रायपूरमधली धर्मसंसद याचं ताजं उदाहरण आहे. स्वयंघोषित संत, महंत मंडळींची धर्माच्या नावावर चाललेली बजबजपुरी वाढतेय. अशा भोंदूंच्या मांदियाळीत खऱ्या धर्माचा अर्थ सांगू पाहणारी महंत रामसुंदर दास यांच्यासारखी मंडळी वेगळी आणि महत्वाची ठरतात.

अल्पसंख्याक विरोधी धर्मसंसद

उत्तराखंडमधल्या हरिद्वारमधे १७ डिसेंबर ते १९ डिसेंबर २०२१ला धर्मसंसदेचं आयोजन करण्यात आलं होतं. हिंदू संस्कृतीमधे धर्माचा अर्थ कर्तव्य असा होतो. त्यातल्या उणे-अधिक गोष्टींवरच्या चर्चेसोबत माणुसकीच्या दृष्टिकोनातूनही साधकबाधक चर्चा अपेक्षित असते. पण हरिद्वारमधल्या धर्मसंसदेनं धर्माच्या मूळ कल्पनेलाच गालबोट लावलं.

'इस्लामिक भारतात सनातनचं भविष्य' या बॅनरखाली धर्मसंसदेचं आयोजन झालं. यात अमृतानंद, सत्यव्रतानंद सरस्वती, नरसिंहानंद गिरी, परमानंद अशी ५०० स्वघोषित संत, महंत मंडळी सामील झाली होती. यासोबतच कोण्या सुदर्शन चॅनेलचा सुरेंद्र चव्हाणके, हिंदू महासभेच्या पूजा पांडे, उत्तरप्रदेश सरकारमधले मंत्री राजेश्वर सिंग अशी मंडळीही यात होती.

या धर्मसंसदेत मुस्लिमांचं शिरकाण करण्याच्या शपथा दिल्या गेल्या. हिंदू धर्माच्या रक्षणासाठी शस्त्र उचलण्याची, एका विशिष्ट जातीचा पंतप्रधान करायचा संकल्प, नथुराम गोडसेचं उदात्तीकरण अशी बरीच विखारी, बेताल बडबड करण्यात आली. अन्नपूर्णा, धर्मदास, आनंद स्वरूप अशी स्वतःला संत म्हणवून घेणाऱ्या मंडळींची भाषणं म्हणजे थेट धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडाच होता.

हेही वाचा: बुवाबाबा, साधू, महाराजांनाही संत म्हणावं का?

अर्ध्यावर शाळा सोडलेला कालीचरण

लगोलग २६ डिसेंबरला छत्तीसगडची राजधानी असलेल्या रायपूरमधल्या धर्मसंसदेत कालीचरण नावाच्या भोंदूनं महात्मा गांधींजींविषयी आक्षेपार्ह वक्तव्य आणि शिवीगाळ केली. नथुराम गोडसेने केलेल्या हत्येचं समर्थन केलं. विद्वेष पसरवणारं आणखीही बरच काही तो बरळला. त्याचा हा वीडियो सोशल मीडियातून वायरल झाला. महाराष्ट्र विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातही याचे पडसाद उमटले. शेवटी मध्यप्रदेशातल्या खजुराहो इथून छत्तीसगड पोलिसांनी  कालीचरणला अटक केली.

कालीचरण मूळचा महाराष्ट्रातल्या अकोल्याचा. त्याचं नाव अभिजित सराग. अकोल्याच्या शिवाजीनगर भागात त्याचं घर. त्याचे वडील एक मेडिकल स्टोअर चालवतात. लहानपणी झालेल्या एका अपघातातून तो बचावला आणि पुढे काली मातेचा भक्त बनला. स्वतःला कालीचरण म्हणवून घेऊ लागला. या भोंदू बाबाचं शिक्षण फार झालेलं नाही. त्याचे वडील धनंजय सराग यांनी एका न्यूज चॅनेलला दिलेल्या छोट्या इंटरव्यूमधे कालीचरणचं शिक्षण दहावीपर्यंत झाल्याचं म्हटलंय. तर कुणी तो आठवी नापास असल्याचं म्हणतं.

शाळेत इतर मुलांवरच्या कुरघोड्यांमुळे त्याला इंदूरला मावशीकडे पाठवलं गेलं. इथंच तो भय्यू महाराजांच्या संपर्कात आला. २०१७ला राजकारणात एण्ट्री करत त्याने अकोला महानगरपालिकेची निवडणूकही लढवली. पण लोकांनी त्याला नाकारलं. निवडणुकीत त्याचा मानहानीकारक पराभव झाला. त्याच्या अंगावरचे लाल रंगाचे कपडे आणि लाल भडक कुंकवाचा टिळा लक्ष वेधतो. त्याचा मध्यप्रदेशमधल्या शिवमंदिरात शिव तांडव स्तोत्र गातानाचा वीडियो सोशल मीडियावर वायरल झाला होता. पण खरंतर भाषणांमधून द्वेष पसरवणं हीच त्याची खरी ओळख आहे.

डॉक्टरकी केलेले रामसुंदर दास

रायपूरमधल्या धर्मसंसदेची चर्चा कालीचरणनं महात्मा गांधींवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांनी झाली. त्याच्या या वक्तव्यांवर टाळ्या आल्या. पण याच धर्मसंसदेत महंत रामसुंदर दास यांच्यासारखी व्यक्ती इथं उपस्थित असलेल्या साधू संतांना खडेबोल सुनावताना दिसली. थेट मंचावरून त्यांनी आयोजकांना काही प्रश्न केले. हा आपला धर्म असू शकत नाही असं म्हणत त्यांनी या धर्मसंसदेपासून स्वतःला वेगळं करत असल्याची घोषणा केली.

महंत रामसुंदर दास यांचा जन्म जांजगीर चंपा जिल्ह्यातल्या पिहरिद गावात झाला. बालपणीच ते रायपूरला आले. इथल्याच दुधाधारी मठात राहून त्यांनी पुढचं शिक्षण घेतलं. संस्कृत विषयात एमए केलं. 'रामायण काळातल्या ऋषी मुनींचा अभ्यास' या विषयात त्यांनी पीएचडीचं केली. पुढे दुधाधारी मठाच्या महंत वैष्णव दास यांचा विश्वास त्यांनी मिळवला. त्यांनी रामसुंदर दास यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केलं. वैष्णव दास गेल्यानंतर मठाची जबाबदारी त्यांच्याकडे आली.

महंत रामसुंदर दास यांनी २००३ला छत्तीसगडमधल्या पामगडमधून विधानसभेची निवडणूक लढवली होती. काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत ते विधानसभेत गेले. २००८ला जयजयपूर विधानसभा मतदारसंघातूनही त्यांनी विजय मिळवला. २०१३च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा फार कमी मतांनी पराभव झाला. विरोधी पक्ष असुदे नाहीतर सत्ताधारी प्रत्येक जण त्यांच्या शब्दाला प्रमाण मानायचे. सध्या ते छत्तीसगढच्या गौ सेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत.

हेही वाचा: वाचा स्वामी विवेकानंदांचं जग जिंकणारं भाषण

विखार आमचा धर्म नाही

धर्मसंसदेत भारत हिंदूंची भूमी आहे असं म्हणत १८५७च्या स्वातंत्र्ययुद्धाची आठवण करून दिली गेली. हिंदूंना १० पोरं जन्माला घालायचे सल्ले देत युद्धाची घोषणा झाली. मुस्लिमांचं शिरकाण करायच्या शपथा दिल्या गेल्या. २० लाखांना मारण्यासाठी १०० सैनिक उभे करायची भाषा केली गेली. खरंतर धर्माच्या नावावर सर्वसामान्य तरुणांना भडकवण्याचा हा प्रकार आहे. अशा धार्मिक आयोजनांमधून त्याला खतपाणी मिळतं.

ज्या महात्मा गांधीजींवर आक्षेपार्ह वक्तव्य केली त्यांनी सांगितलेला हिंदू धर्म अहिंसेच्या मार्गाने सत्याचा शोध घ्यायला सांगतोय. तीच अनेकांची श्रद्धा आहे. पण धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा राबवणाऱ्यांना ही गोष्ट बोचत राहते. त्यामुळेच ते धर्माची विखारी मांडणी करतात. इतर धर्म त्यांच्यालेखी गौण असतात. मुस्लिम, ख्रिश्चन त्यांचं सॉफ्ट टार्गेट आहे. कालीचरण नावाचे भोंदू बाबा याचा फायदा उठवतात.

स्वामी विवेकानंद जो हिंदू धर्म आणि त्यातली सहिष्णुता सांगू पाहतायत तो खरा हिंदू धर्म. गांधीजींचा हिंदू धर्मही हिंदू मुस्लिम सौहार्दाची भाषा करतो. हेच सौहार्द पुढं घेऊन जाण्याचं काम महंत रामसुंदर दास यांच्यासारखी मंडळी करतायत. त्यामुळेच ते धर्मसंसदेच्या मंचावरून थेट आयोजकांना फैलावर घेऊ शकले. त्यांनीच खऱ्या हिंदू धर्माची आठवण आयोजकांना करून दिली.

धार्मिक ध्रुवीकरणाला राजाश्रय

धर्माच्या नावावरचा बाजार वाढत चाललाय. कालीचरणला अटक झाली, हरिद्वारमधे अल्पसंख्याकविरोधी भाषणं करणाऱ्या १० तथाकथित संत, महंतांवर गुन्हा दाखल झालाय. पण मोदी सरकार घटना घडल्यापासून सावध पवित्र्यात राहिलं. उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या सगळ्याला सरकारनं खतपाणी घातलं. दुसरीकडे उत्तराखंडच्या पोलीस प्रशासनानेही सुरवातीला बघ्याची भूमिका घेतली होती.

हे सगळं थांबवता आलं असतं. पण सरकारने ते केलं नाही. रायपूरमधल्या धर्मसंसदेच्या आयोजनात काँग्रेसचे स्थानिक नेतेही आघाडीवर असल्याची तपशीलवार बातमी न्यूज लॉण्ड्री या वेबसाईटनं दिलीय. तसंच राष्ट्रवादीचा पदाधिकारीही प्रमुख आयोजकांमधे होता. छत्तीसगढ काँग्रेसचे आमदार सत्यनारायण शर्मा आणि विकास उपाध्याय स्वतः या आयोजनात होते. इतकंच नाही तर कालीचरण गांधीजींवर शिव्यांची लाखोली वाहताना ही मंडळी तिथं उपस्थित होती. पण त्यांनी कालीचरणला थांबवलं नाही.

उजव्या संघटना सातत्याने धार्मिक ध्रुवीकरणाचा अजेंडा सेट करतायत. त्याला मतांच्या राजकारणासाठी राजाश्रय दिला जातोय. त्यातून अशा प्रकारच्या संविधानविरोधी कारवायांना अधिकच पाठबळ मिळतं. हिंदू धर्मात बदलांची अपेक्षा करणारा स्वामी विवेकानंद ते अरविंद, महात्मा गांधी ते पुढं फुले, पेरियार, आंबेडकर हा सुधारणा, चिकित्सा आणि समन्वयाचा मार्ग खोडून काढायचा प्रयत्न अशा विखारी धर्मसंसदेतून होतोय.

हेही वाचा: 

वारी म्हणजे मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन

माझे जिवीची आवडी, पंढरपुरा आकाशमार्गे नेईन गुढी

वारी परंपरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेली पाहिजे

धर्माची नव्यानं व्याख्या करण्याची गरजः सयाजीराव महाराज

परिवर्तनशील जगात धर्माची जागा सांगणारं सयाजीरावांचं भाषण