महाराजा सयाजीराव गायकवाड : स्त्री सुधारणेचे आधारस्तंभ

२१ मार्च २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


महाराजा सयाजीराव गायकवाड बडोदा संस्थानाचे महत्त्वाचे राजे. स्त्री ही समाजजीवनात पुरुषांइतकीच महत्वाची आहे हे महाराजांनी ओळखलं. म्हणूनच त्यांनी स्त्रीशिक्षणाचे हुकुम काढून ऐतिहासिक निर्णय घेतले. महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रे साधने प्रकाशन समिती’ कडून सयाजीरावांवर नुकतेच ५० ग्रंथ प्रसिद्ध केलेत. त्यातला सयाजीरावांच्या स्त्रीविषयक सुधारणांवर प्रकाश टाकणाऱ्या ग्रंथाची ओळख करून देणारा हा लेख.

सर्वोत्तम प्रशासकांमधे सयाजीरावांचा क्रमांक फार वरचा लागतो. महाराजा सयाजीराव हे थोर समाजसुधारक, विचारवंत, तत्ववेत्ते, द्रष्टे प्रशासक होते. त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात केलेल्या पायाभूत कामाचा परिचय करून देण्याचं काम माननीय बाबा भांड आणि महाराष्ट्र शासनाची ‘महाराजा सयाजीराव गायकवाड चरित्रे साधने प्रकाशन समिती’ करत आहे.

या समितीने महाराजा सयाजीरावांच्या कार्याची माहिती देणारे पहिले १२ खंड २०१७ मधे प्रकाशित केले. पुढचे १३ खंड मिळून आतापर्यंत २५ खंडामधे एकूण ६२ ग्रंथांची निर्मिती या समितीने केली आहे. यापैकी डॉक्टर सुनिता बोर्डेलिखित ‘स्त्रीसुधारणा’ हा २१५ पृष्ठांचा ग्रंथ महाराजांच्या स्त्रीसुधारणाविषयक उभा केलेल्या डोंगराएवढ्या कामावर प्रकाश टाकतो.

या पुस्तकात सयाजीरावांच्या स्त्रीसुधारणा कार्याचा आढावा घेताना १५ प्रकरणामधे मुद्देसूद मांडणी करून सयाजीरावांच्या कार्याला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. पहिल्या प्रकरणामधे महाराजांचा थोडक्यात अल्पपरिचय करून दिलाय. महाराजांनी केलेल्या सामाजिक सुधारणांविषयी चर्चा करताना स्त्रीशिक्षण, बालविवाह, विधवा पुनर्विवाह, जातीभेद निर्मुलन या बाबी महत्वाच्या आहेत.

हेही वाचा: महाराजा सयाजीरावांच्या मदतीने घडले अनेक राष्ट्रपुरुष

स्त्रीसुधारणांचा सर्वंकष विचार

या ग्रंथात महाराजांच्या स्त्रीसुधारणाविषयक कार्याबद्दलची दूरदृष्टी विस्तृतपणे मांडलीय. भारतीय स्त्रीसुधारणा चळवळीविषयक चर्चा करताना प्राचीन काळातल्या स्त्रियांच्या स्थितीपासून ते एकोणिसाव्या शतकातल्या स्त्रियांच्या स्थितीबद्दल सविस्तर चर्चा या ग्रंथात केलीय.

स्त्री ही समाजजीवनात पुरुषांइतकाच महत्त्वाचा घटक आहे हे महाराजांनी ओळखलं होतं. म्हणूनच त्यांनी स्त्रीशिक्षणाचे हुजूर हुकुम काढून ऐतिहासिक निर्णय घेतले. स्त्रिया शिकल्या तरच सामाजिक जीवनात सकारात्मक बदल होतील, घराघरात मुले शिकू लागतील या भूमिकेतूनच महाराजांनी शालेय शिक्षणात मुलींसाठी अनेक अभिनव प्रयत्न केले.

महाराजांचे स्त्रीविषयक सुधारणा कायद्याचे वेगळेपण हेच होते की, त्यांनी त्या सुधारणा फक्त स्त्रीसुधारणा म्हणून स्वतंत्रपणे पाहिल्या नाहीत. तर सामाजिक, राजकीय, आर्थिक, मानसशास्त्रीय आणि समाजशास्त्रीय अशा सगळ्या बाजूंनी अत्यंत सर्वंकषपणे स्त्रीसुधारणांचा विचार केला. स्त्रियांनी रूढी आणि अंधश्रद्धा यातून बाहेर पडावं आणि शिक्षण घ्यावं कारण शिक्षण हाच त्यांच्या सगळ्या समस्यांवरील रामबाण उपाय आहे हे महाराजांनी वेळोवेळी स्त्रियांना संबोधित करताना सांगितला होता.

राष्ट्र विकासाची साधनसंपत्ती

महाराज सयाजीराव गायकवाड हे स्त्रियांच्या सुधारणा चळवळीचे आधारस्तंभ होते. स्त्रियांच्या अनेक समस्यांच्या मुळाशी निरक्षरता आणि अज्ञान हेच मूळ कारण आहे. महाराजांनी हे ओळखून आपले लक्ष स्त्री शिक्षणावर केंद्रित केलं. महाराज स्त्रियांकडे राष्ट्र विकासातल्या मानवी साधनसंपत्ती अशा व्यापक दृष्टीने पाहत होते.

स्त्रियांना शिक्षणाचा लाभ न दिल्याने आपण आपल्या राष्ट्राची अर्धी संधी आपण गमावत आहोत ही महाराजांची भूमिका होती. सयाजीरावांनी १८८७ ला दोन कन्या शाळा स्थापन करून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. स्त्री शिक्षण हा सामान्य लोकांच्या पचनाच विषय नव्हता. पण हा विषय महाराजांनी खूप निष्णात आणि चिकित्सकपणे हाताळला. हे सगळे तपशील या पुस्तकाच्या माध्यमातून पुढे येतात.

हेही वाचा: महाराजा सयाजीरावः पहिले आणि एकमेव

मुलींसाठी विशेष शिष्यवृत्त्या

१९३७-३८ पर्यंत स्त्री शिक्षणाच्या बाबतीत बडोदा संस्थान प्रथम क्रमांकावर होते. या ग्रंथामधे  शाळांची तसेच तेथील विद्यार्थ्यांच्या आकडेवारीचे वस्तुनिष्ठपणे विश्लेषण केलंय. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराजांनी मुलींसाठी विशेष शिष्यवृत्त्या सुरू करण्याचं धोरण अवलंबलं.

महाराजांनी मुलांप्रमाणे मुलींनाही शारीरिक शिक्षण, खेळ, व्यायाम इत्यादीची संधी उपलब्ध करून दिली. मुलींसाठी व्यक्तीमत्व विकासाचे विविध उपक्रम राबवले जात होते. स्त्रीशिक्षणाचा अभ्यासक्रम हा आपल्या परिस्थितीस अनुसरून ठेवला पाहिजे अशी भूमिका घेऊन महाराजांनी स्त्रीशिक्षणाचा आशय निश्चित केला. पाश्चात्य देशातल्या सुशिक्षित स्त्रियांप्रमाणेच आपल्या देशातल्या स्त्रियांनीदेखील शिक्षण घेऊन राष्ट्र उभारणीस हातभार लावावा असा संदेश महाराज देत.

अस्पृश्य मुला मुलींच्या भेटी

सक्तीच्या प्राथमिक शिक्षणामुळे बडोद्यात प्राथमिक शाळांची संख्या वाढू लागली. तत्कालीन संस्थानिक राज्यांच्या तुलनेत बडोद्यात स्त्री साक्षरतेचे प्रमाण नक्कीच जास्त होते. प्राथमिक शिक्षणाबरोबरच पुढे माध्यमिक  आणि  उच्चमाध्यमिक शिक्षण द्यावं यासाठी अनेक प्रयत्न महाराजांनी केले. बडोदा संस्थानातल्या स्त्री शिक्षणात सर्वात महत्वपूर्ण ठरलेलं हायस्कूल म्हणजे ‘महाराणी गर्ल्स हायस्कूल बडोदा.’ हे हायस्कूल मिस निडहम यांच्या नेतृत्वाखाली १९१७ मधे सुरु झालं. विशेष म्हणजे हे हायस्कूल मुंबई विद्यापीठाशी संलग्नित होतं.

उच्च शिक्षणाबाबत समाज पुरेसा सकारात्मक नव्हता. त्यामुळे उच्च शिक्षण घेणाऱ्या स्त्रियांची संख्या फारच कमी होती. स्त्रियांच्या उच्च शिक्षणाच्या बाबतीत महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली बडोदा राज्य अग्रेसर होते. बडोद्यामधे उच्च शिक्षणासाठी १८८२ मधे बडोदा कॉलेजची स्थापना केली. एवढेच नव्हे तर अमेरिकन शिक्षिकेच्या मार्गदर्शनाखाली गृहविज्ञानशास्त्र आणि राजवाड्यातल्या नोकरदार वर्गाचे शिक्षण याविषयावरील विशेष अभ्यासक्रम सुरु करण्यात आले.

गृहविज्ञानशास्त्रावर व्याख्यानमाला आयोजित करण्यात आल्या. सुशिक्षित महिला या केवळ कुटुंबाचाच नव्हे तर समाजाचा आणि राष्ट्राचा कणा आहेत. या दृष्टीकोनातून स्त्रियांच्या समग्र शिक्षणाकडे महाराजांनी विशेष लक्ष पुरवलं होतं. बडोदा कॉलेज, महिलांसाठी स्वतंत्र वाचनकक्ष, महाराजांचे अस्पृश्य स्त्रियांच्या शिक्षणाचे कार्य,महाराजांनी नेहमी सामाजिक विरोधाची परवा न करता अस्पृश्य मुला मुलींच्या भेटी घेतल्या.

हेही वाचा: परिवर्तनशील जगात धर्माची जागा सांगणारं सयाजीरावांचं भाषण

परिचारिकेसाठी केला दायी कायदा

राजवाड्यात सहभोजनाची व्यवस्था केली. हे त्यांनी उचललेले पाऊल खूप क्रांतिकारक होतं. १९३१-३२ पर्यंत राज्यात अस्पृश्य मुलींसाठी एकूण ३७ शाळा होत्या. अमरेली, बडोदा, धनाका, नवसारी, सोनगड, पाटण इथं अस्पृश्य आणि आदिवासी मुलींसाठी आणि सतिगृह स्थापन केली. तळागाळातल्या स्त्रियांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचं काम सयाजीरावांनी  केलं.

पडदा पद्धतीसारख्या अनिष्ठप्रथेतून स्त्रियांची मुक्ती करून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात सामील करून घेण्यासाठी झनाना शाळा सुरु केल्या. त्यापुढेही जाऊन स्त्रियांनी शिक्षण घेऊन आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावं यासाठी त्यांना व्यावसायिक, औद्योगिक प्रशिक्षणाची सोय केली. महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी फिमेल ट्रेनिंग कॉलेजची स्थापना केली.

परिचारिका तयार करण्यासाठी महाराजांनी राज्यात दायी कायदा केला. उद्योग प्रशिक्षण, चिमणाबाई स्त्री उद्योगालाय, संगीत  आणि  कला प्रशिक्षण, बालवाडी प्रशिक्षण, हस्तकलांचे प्रदर्शन या माध्यामतून महाराजांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केले.

स्त्री आरोग्याचं संवर्धन

महाराजांचा विधवा पुनर्विवाह आणि पडदा पद्धती विरुद्ध संघर्ष स्वतःच्या घरापासून होता. महाराणी चिमणाबाई यांनी पडदा पद्धतीचा त्याग करून स्त्री सुधारणेचा सहयोग दिला. स्त्रियांच्या आरोग्यविषयक सुधारणांचा अविभाज्य भाग म्हणून महाराजांनी जनजागृतीला प्राधान्य दिलं. त्यामधे व्याख्यानं, आरोग्य प्रदर्शने याच्या माध्यमातून आणि विविध संस्थांच्या  माध्यमातून महिलांच्या आरोग्य संवर्धनाविषयक कार्य करत होते.

महिलांना फक्त शिक्षण दिलं नाही तर त्यांना स्वावलंबी आणि स्वतंत्र बहाल केलं. महाराजा सयाजीराव हे महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. आंबेडकर, धोंडो केशव कर्वे, रमाबाई रानडे  आणि न्यायमूर्ती रानडे, पंडिता रमाबाई तर विठ्ठल रामजी शिंदे यांचे आधारस्तंभ होते. हे या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला समजते. सयाजीराव गायकवाडांच्या स्त्रीसुधारणा कार्याचा इतिहास समजून घेण्यासाठी या ग्रंथाचे वाचन अनिवार्य आहे.

हेही वाचा: 

'लाल श्याम शाह' हे पुस्तक मी का लिहिलं?

व्यवस्थेनं झोप उडवली असताना ‘निद्रानाश’ अटळ आहे!

मराठीला ज्ञान विज्ञानाची भाषा बनवावी लागेल : रंगनाथ पठारे

सयाजीराव गायकवाड महाराजः व्यवस्थापन शास्त्राचे दीपस्तंभ