उद्धव ठाकरे: जनतेच्या पालकत्वाचं भान असलेला कुटुंबप्रमुख

२७ जुलै २०२१

वाचन वेळ : ७ मिनिटं


महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस. बाळासाहेब ठाकरेंनंतर उपहासाच्या, उपरोधाच्या, दुर्लक्षाच्या, कोंडी करणार्‍या सर्व लाटांना समर्थपणे तोंड देत त्यांनी संघटनेवर पकड बसवली. कोरोनासारख्या अनेक संकटांचा सामना करत ते महाविकास आघाडीचं सरकार चालवतायत. याकाळात संकटमोचक, कुटुंबप्रमुख म्हणून त्यांचा प्रवास नेमका कसाय ते सांगतायत शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत.

मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची
तू चाल पुढं तुला रं गड्या भीती कशाची

या कवितेच्या ओळी शोभतील असं आजच्या राजकारणातलं व्यक्तिमत्व म्हणजे उद्धव ठाकरे. त्यांनी आपल्या वर्तनातून हे सिद्ध करुन दाखवलं. मी या कवितेच्या ओळी उद्धृत केल्यानंतर प्रत्येक वाचकाला हे खरं आहे का, असं वाटणं साहजिक आहे; पण स्वच्छ दृष्टीनं पाहिलं तर लक्षात येईल की, ते खरं आहे.

१२ नोव्हेंबर २०१२. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांचं देहावसानं झालं आणि त्यानंतर शिवसेनेचं काय होईल, असा प्रश्न विचारला जाऊ लागला. अनेकांना आनंदाच्या उकळ्याही फुटल्या असतील. एक मृदू स्वभावाचं व्यक्तिमत्त्वं शिवसेनेच्या शीर्षपदी आल्यामुळं त्याला राजकारणात सहजगत्या गुंडाळता येईल अशी अनेकांनी भाकितंही केली. काहींनी मनातल्या मनात तशी अढी धरली.

इतकंच नाही तर आता शिवसेना संपणारच अशा आविर्भावात तोंडाच्या वाफा दवडणं सुरू झालं. पण यानंतर १५ दिवसांनी उद्धवजी एक वाक्य बोलले, ‘आता रडायचं नाही, लढायचं.’ लढायचं म्हणून ते घरी बसून राहिले नाहीत; तर त्यांनी उभा महाराष्ट्र पालथा घालायला सुरवात केली.

हेही वाचा: उद्धव ठाकरेः मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वीमोलाची

बाळासाहेबांनंतर संघटनेवर पकड

मुळात, माँ साहेबांच्या स्वभावामुळे उद्धवजींमधे करुणेचा भाग मूलतःच आहे. मृदूता, कारुण्य हे त्यांच्या रक्तात भिनलेलं आहे; पण याच जोडीला आदरणीय शिवसेनाप्रमुखांचा कणखरपणाही त्यांच्यात आहे.

शिवसेनाप्रमुखांच्या उतरत्या काळात, त्यांच्या आजारपणाच्या काळात राज ठाकरे शिवसेना सोडून गेले; पण तेव्हाही उद्धवजींनी संघटनेकडे ज्या पद्धतीने पाहिलं, लक्ष दिलं आणि ज्या धीरोदात्तपणे उभे राहिले त्याची नोंद इतिहासाला घ्यावी लागेल.

किल्ल्यांचे बुरुज ढासळावेत, तटबंदी उभी आहे की काय असं वाटावं आणि तीसुद्धा एखाद्या वार्‍याच्या झुळुकेनं उडून जाईल असंही काहींना वाटलं असावं; पण ती कणखरपणानं उभी राहिली, लाटांना तोंड देत. त्या लाटा होत्या उपहासाच्या, उपरोधाच्या, दुर्लक्षाच्या, कोंडी करणार्‍या. या सर्व लाटांना समर्थपणे तोंड देत हा हा म्हणता उद्धवजींनी संघटनेवर पकड बसवली.

शेतकऱ्यांसाठी स्वतःच्या सरकारविरोधात

२०१४ च्या लोकसभा निवडणुकांमधे शिवसेना भाजपाची युती झाली. दिल्लीत कारभार सुरू झाला; पण महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख नाहीत याचा फायदा घेऊ, असा विचार भाजपानं केला आणि एकनाथ खडसेंना पुढं करुन युती तोडली. कालांतराने पुन्हा आम्ही एकत्र आलो; पण दोन्हीही सरकारांमधे शिवसेनेला ज्या पद्धतीने वागवलं जात होतं, त्याचा बारकाईनं अभ्यास उद्धवजी करत होते.

त्यांचा स्वभाव शिवसेनाप्रमुखांसारखा नाही. त्यामुळं ते फारसे प्रतिक्रिया देत नव्हते; पण प्रतिक्रियेची तयारी मात्र मजबूत करत होते. केंद्रीय मंत्रीमंडळात शिवसेनेला नगण्य समजलं जात होतं. राज्यातही कारभार कुणी तरी हाकतंय आणि शिवसेना त्यामागून फरफटत चाललीय असा प्रकार सुरू होता. याची खूप मोठी किंमत पक्षाला द्यावी लागत होती.

शेतकर्‍यांचा प्रश्न बिकट बनला तेव्हा एनडीएचे घटक असलेले उद्धवजी आग्रह धरत राहिले की शेतकर्‍यांना कर्जमुक्ती द्या. पण शेतकर्‍यांचं कर्ज माफ करण्याबद्दल तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सातत्यानं टाळाटाळ करत राहिले. शेवटी उद्धवजींनी ‘आम्ही रस्त्यावर उतरू’ असं सांगितलं आणि प्रत्यक्षात उतरलेही. स्वतःच्याच सरकारच्या विरोधात. तेव्हा सरकारला झुकावं लागलं.

त्यावेळी कर्जमुक्ती न करता कर्जमाफी केली. त्यामधेही प्रचंड अटीशर्ती घातल्यानं गोरगरीब, अशिक्षित शेतकर्‍याला त्याचा लाभ मिळालाच नाही. वास्तविक, उद्धवजी नेहमी म्हणायचे की, शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी नको, कर्जमुक्ती हवी. कारण माफी ही गुन्हा करणार्‍याला केली जाते; माझा शेतकरी गुन्हेगार नाही. त्यामुळं त्याला कर्जाच्या विळख्यातून मुक्त केलंच पाहिजे, हा विचार त्यांनी दिला.

हेही वाचा: महाविकासआघाडीचं नवं सरकार पाच वर्षं चालेल की नाही?

सर्वसमावेशक भूमिका

उद्धवजी नेहमीच सर्वसमावेशक भूमिका घेतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘मी मुंबईकर'. काय होती ही संकल्पना? उद्धवजींचं म्हणणं होतं की, जी माणसं भलेही जन्मानं मुंबईकर नसतील; पण पिढ्यानपिढ्या इथं वास्तव्याला आहेत, त्यांचा मुंबईच्या जडणघडणीला, उभारणीला हातभार लागलेला आहे- मग तो कोणत्याही जातीधर्माचा का असेना- त्याला ही मुंबई आपली वाटली पाहिजे. मुंबई वाचली पाहिजे, असं त्यालाही मनोमन वाटलं पाहिजे, हा त्यामागचा विचार होता.

हा लढा कुठल्याही परप्रांतियांविरोधात नव्हता. मुंबईवर तिच्या क्षमतेपेक्षा अधिक बोजा टाकला जात असताना त्यासंदर्भात जेव्हा शिवसेना उभी राहते तेव्हा या सर्वांनी ‘मुंबईकर’ म्हणून उभं राहिलं पाहिजे आणि मुंबई वाचवली पाहिजे अशी त्यांची भूमिका होती. पण जाणीवपूर्वक त्याला मराठी-अमराठी असा रंग  दिला गेला. आज लक्षात येतंय की उद्धवजींची ती भूमिका सर्व पक्षांनी स्वीकारली असती तर मुंबईचं चित्र आज निश्चितपणानं वेगळं असतं.

उद्धवजींनी दुसरा विचार मांडला, तो म्हणजे शिवशक्ती आणि भीमशक्तीच्या एकजुटीचा. रामदास आठवलेंना उद्धवजींनी शिवसेनेसोबत आणलं. शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली तर राष्ट्रभक्ती, राष्ट्रशक्ती तयार होईल, असं त्यांचं म्हणणं होतं. दुर्दैवानं, ते फारसं यशस्वी झालं नाही.

उद्धवजींनी करून दाखवलं

२०१९ च्या निवडणुकांपूर्वी शिवसेनेचं एक महाशिबीर गोरेगावला झालं. तेव्हा त्यांनी आवाज दिला, ‘होय, युतीमधे आमची २५ वर्षं सडली आणि आता आम्ही यांच्यासोबत जाणार नाही. आम्ही एकाकी लढणार.’ त्यावेळी भाजपाला असं वाटलं की उद्धवजी एकटे काय करणार ! कारण रामदासजी आठवले, महादेव जानकर यांनीही शिवसेनेची साथ सोडली होती.

एकट्याच्या जीवावर उद्धवजींनी ६३ आमदार निवडून आणले. शिवसेनाप्रमुखांना त्यांनी वचन दिलं होतं की, मी शिवसेनेला दोन पावलं पुढं घेऊन जाईन. त्या वचनाची पूर्तता केली. मुंबई महानगरपालिका जिंकून दाखवली.

हेही वाचा: राज्यपालांनी उद्धव ठाकरेंना आमदार बनवणं, हे कायद्याला धरून आणि देशभक्तीलाही

भीतीमुळे अमित शहा मातोश्रीवर

२०१४ च्या विधानसभा निकालानंतर आम्ही विरोधी बाकावर बसलो होतो; पण भाजपानं आपण समविचारी असल्याचा सूर आळवत विनवण्या केल्यानं आम्ही पुन्हा एकत्र आलो. प्रमोद महाजन हयात असतानाही भारतीय जनता पक्षाचे नेते नेहमी म्हणायचे ‘शतप्रतिशत भाजपा’. याचा अर्थ सेनेची ताकद कमी करण्याचा डाव पूर्वीपासूनच होता.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या पूर्वी सबंध देशभरातल्या मीडिया, विश्लेषकांनी पुन्हा मोदींचं सरकार येणं कठीण असल्याचं किंवा आलं तरी काठावरच्या बहुमतानं येईल असं सांगायला सुरवात केली होती. त्या भीतीपोटी अमित शहा मातोश्रीवर आले. जो होगया सो हो गया म्हणत सेनेला गळ घातली.

शिवसेना दूर जायचं कारण

उद्धवजींवर, शिवसेनेवर, शिवसैनिकांवर बाळासाहेबांचा एक खूप मोठा संस्कार आहे, तो म्हणजे शब्दांना, वचनांना जागणं. वचन देणारी आणि वचनाला जागणारी अशी शिवसेनेची प्रतिमा आहे. त्यामुळंच उद्धवजींनी अमित शहांनी पुढं केलेल्या मैत्रीच्या हाकेला कसलाही आडपडदा न ठेवता सकारात्मक प्रतिसाद दिला.

खरं म्हणजे, हीच परिस्थिती उलटी असती तर भाजपावाल्यांनी चर्चेचं गुर्‍हाळ मांडलं असतं. अनेक विद्वान कागद-चिठ्ठ्या घेऊन आले असते. जागांवरुन चर्चा केली असती. पण उद्धवजींनी असलं काहीही केलं नाही.

महाराष्ट्रामधे भाजपा हा शिवसेनेच्या वटवृक्षावर वाढलेला वेल आहे. तो शिवसेनाप्रमुखांचा दिलदारपणा होता. लाखोंच्या गर्दीचं व्यासपीठं साहेबांनी मुंडे-महाजनांना उपलब्ध करुन दिलं. पण भाजपवाल्यांच्या मनात कपटीपणा होता. यांच्या तंबूत शिरुन तो तंबूच बळकवायचा ही धारणा घट्ट रुजलेली होती. त्यानुसार भाजप शिवसेनेच्या तंबूत शिरली आणि हा तंबूच उखडण्याचा प्रयत्न केला.

शिवसेना दूर गेली. पण या घटनेमुळं अमित शहांच्या येण्यानं एकत्र निवडणुका लढवण्याचं ठरलं. त्यानुसार लोकसभेच्या निवडणुका एकत्र लढलो आणि विधानसभा निवडणुकासंदर्भात सत्तापदांचं ५०-५० टक्के वाटप होईल, असंं आश्वासन दिलं होतं, हे त्रिकालाबाधित सत्य आहे.

हेही वाचा: बाळासाहेब ठाकरेंनी सेक्युलर पक्षांबरोबर २२ वेळा केली होती दोस्ती

म्हणून महाआघाडीचं सरकार आलं

आजही त्या वीडियो क्लिप उपलब्ध आहेत. उद्धवजींनी दिलदारपणा दाखवला; पण यांनी काय केलं? एकत्र लढलो तेव्हा पोलचा कयास होता की सेनेच्या ८५-९० जागा येतील. पण बरोबर राहून भाजपाने पाठीत खंजिर खुपसल्याने आमचा आकडा ५६ वर गेला. यामागं भाजपाचं कारस्थान होतं. याचं एकच उदाहरण सांगतो. ते म्हणजे दीपक केसरकर!

सावंतवाडीतून केसरकरांना उभं केल्यानंतर भाजपानं स्वाभिमानशून्य राणेंना सोबत घेतलं. केसरकरांविरोधात राजन तेलींना उभं करण्यात आलं. केसरकरांनी देवेंद्र फडणवीसांशी संपर्क साधूनही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी शेवटपर्यंत त्यांचा प्रचार केला नाही. उलट गोव्याचे मुख्यमंत्री आणि त्यांच्या पत्नी सावंतवाडीत येऊन केसरकरांना पाडण्यासाठी ठाण मांडून बसले होते. असा हा भाजपा.

निकालांनंतर उद्धवजींनी अमित शहांना दिलेल्या शब्दाची आठवण करुन दिली होती. पण तरीही ते महाराष्ट्रातील हा वाद सोडवण्यापेक्षा हरियाणाला गेले. यातच सारं काही आलं. भाजपानं दिलेलं वचन पाळलं नाही आणि महाविकास आघाडीचं सरकार आलं.

खरं हिंदुत्त्व दाखवलं

ज्यांनी महापालिका, जिल्हा परिषद, नगरपालिका काहीही पाहिलं नाही असे उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. शरद पवारांचं मार्गदर्शन मिळालं. काँग्रेस पक्ष सोबत आला आणि महाविकास आघाडी उभी राहिली. सरकार स्थापनेनंतरच्या पहिल्या भाषणात उद्धवजींनी विधानसभा जिंकली आणि दाखवून दिलं हिंदुत्त्व कशाला म्हणतात.

मुख्यमंत्री होताच उद्धवजी अयोध्येला गेले आणि आम्ही विचारधारा सोडलेली नाही, हे त्यांनी दाखवून दिलं. पाठीत खंजीर खुपसल्यामुळं कॉमन मिनिमम प्रोग्रॅम घेऊन आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत एकत्र येऊन सरकार स्थापन केलं आहे, हे ठणकावून सांगितलं. त्यावेळी उद्धवजींना आपण कमी लेखल्याचं भाजपाला कळून चुकलं.

हेही वाचा: प्रोटेम स्पीकरच्या नेमणुकीने फडणवीसांचे सत्तास्थापनेचे मनसुबे उधळले

कोरोनाच्या काळात महाराष्ट्राला सावरलं

आज उद्धवजी अतिशय सुंदरपणानं राज्यकारभार करत आहेत. सत्तेत आल्यानंतर लगेचच शेतकर्‍यांना कर्जमुक्त केलं. विशेष म्हणजे पेट्रोल पंपांवर फोटो लावून, लसीच्या प्रमाणपत्रावर फोटो छापून जसा गवगवा केला जातोय, असा कुठलाही प्रकार उद्धवजींनी केला नाही. समाजाप्रती असणारं कर्तव्य, वचनपूर्ती म्हणून मी हे काम केलं, असं ते सांगतात.

सरकार स्थापनेनंतर काही महिन्यांतच कोरोनाचं संकट आलं. जगाला या संकटानं व्यापलं. भलीभले देश गोंधळात होते. आपलं केंद्र सरकार संभ्रमात होतं. केंद्र काय किंवा राज्यं, सगळ्यांना नवीन होतं. महाराष्ट्रात संसर्गाचा आकडा मोठा होता; पण त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रानं काही लपवलं नाही. खोटे अहवाल सादर केले नाहीत. उलट या ऐतिहासिक संकटाविरोधात उद्धवजी निर्धारानं उभे राहिले.

ते देशातले एकमेव मुख्यमंत्री ठरले ज्यांनी फिल्ड हॉस्पिटल उभी केली. महाराष्ट्रात टेस्टिंग लॅबोरेटरी जेमतेम चार-पाच होत्या, त्यांनी ही संख्या ७०० वर नेली. महाराष्ट्रात वैद्यकीय क्षेत्रातल्या नावाजलेल्या डॉक्टरांचा टास्क फोर्स उभा केला. कोरोनाच्या संकटावर अत्यंत सूक्ष्मपणानं त्यांनी लक्ष ठेवलं आणि महाराष्ट्राला यातून सावरलं. निर्बंधांबाबत कुणी कितीही टिका केली तरी माणसं जगवणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे, असं सांगत निर्भयपणानं ते पार पाडलं.

कुटुंप्रमुख उद्धव ठाकरे

संकटाची साखळी संपली नाही. चक्रीवादळं आली, अतिवृष्टी झाली, दरड कोसळली; पण अत्यंत धीरोदात्तपणे उद्धवजी जनतेच्या पाठिशी उभे राहिले. यापूर्वी संकटांमधे काय मदत करायची याची नियमावली ठरवली जायची. पण उद्धवजींनी नियमांपलीकडे जाऊन मदत देण्याचं धोरण स्वीकारलं आणि ते पारदर्शीपणानं अमलात आणलं.

कोरोनाच्या काळात उद्धवजी सातत्यानं जनतेशी संवाद साधायचे. त्या संवादातून पाहता-पाहता लोक त्यांच्या अक्षरशः प्रेमात पडले. हे तर आपले कुटुंबप्रमुख वाटतात, अशी लोकांची भावना झाली. आपले आईवडील जशी मुलांची काळजी घेतात तसे हे मुख्यमंत्री पालकांच्या नात्यानं जनतेची मायेनं, ममत्वानं काळजी घेतात, हे लोकांना भावलं. आणि हा हा म्हणता, उद्धवजी लाखो-कोट्यवधी जनतेचे कुटुंबप्रमुख झाले.

पंतप्रधान आणि इतर देशांनीही महाराष्ट्राचं कौतुक केलं. किंबहुना, मुंबईतल्या उपाययोजनांच्या कार्यपद्धतीचं अनुकरण करावं असं सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं. याहून उद्धवजींच्या कामाची आणखी कोणती पावती हवी? असे हे संकमोचक उद्धवजी. महाभारताच्या काळात पांडवांना कृष्ण लाभावा तसे आजच्या एकामागून एक येणार्‍या संकटकाळात असे मुख्यमंत्री राज्याला लाभणं हे सद्भाग्य आहे. या सर्व संकटांवर मात करुन ते पुढे जातील यात तिळमात्र शंका नाही.

हेही वाचा: 

इंदिरा गांधीः गुंगी गुडिया ते देशाची दुर्गा

कॉमन मिनिमम प्रोग्रामः सत्तेसाठी एकत्र यायचं की विकासासाठी?

राष्ट्रपती राजवट हे राजकीय पक्षांचं नाही तर राज्यपालांचं अपयश!

हिंदूहृदयसम्राटांच्या भूमिकेत एक मुसलमान कसा स्वीकारला गेला?

अमित शाहांनी फडणवीसांचा, शरद पवारांनी अजितदादांचा केला गेम?

(लेखाचं शब्दांकन हेमचंद्र फडके यांनी केलं असून लेख दैनिक पुढारीतून साभार)