विशीतला तरुण सांगतोय, ग्रामपंचायत निवडणुकीचा जांगडगुत्ता

१५ जानेवारी २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


राज्यभरात आज ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. गेले १० दिवस उमेदवारांनी जोरदार प्रचार केलाय. प्रस्थापित राजकीय पक्षांच्या सोबतीने गावपातळीवरची वेगवेगळी पॅनेलही मैदानात उतरलीयत. तरूणांचा या निवडणुकीतला लक्षणीय सहभाग ही त्यातली विशेष गोष्ट! पार्ट्या आणि बाटल्या या पलिकडे जाऊन हे तरूण निवडणुकीकडे पाहतायत. हा सगळा जांगडगुत्ता एका तरूणाच्या नजरेतून पहायलाच हवा.

ग्रामपंचायत निवडणुकांचा धुमाकूळ सध्या महाराष्ट्रात सुरूय. एकूण १४ हजार पेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका महाराष्ट्राच्या ३४ जिल्ह्यात पार पडतायंत. देशाच्या तळागाळातल्या लोकांपर्यंत लोकशाहीची पाळंमुळं रुजावीत आणि स्थानिकांना स्वतःच्या विकासासाठी प्रत्यक्ष सहभागी होता यावं हा स्थानिक स्वराज्य संस्था आणि पंचायत राज व्यवस्था उभी करण्यामागचा प्रामाणिक हेतू होता.

प्रत्येक पाच वर्षांप्रमाणे यंदाही ग्रामविकास, परिवर्तन आणि बळीराजा यांसारख्या पॅनलचे जाहीरनामे जाहीर झालेत. वार्ड, प्रभागाप्रमाणे उमेदवार उभे करण्यात आले. मळे, खळे, फार्म हाऊसमधे जय्यत पार्ट्या, प्रचाराची रणनीती, गावच्या पारावर चर्चासत्र रंगल. कुठं डोकं फोडाफोडी तर कुठं मनधरणी. निवडणुकांच्या निमित्ताने नको ते राजकारण सुरू झालं. पुन्हा एकदा राजकारण बदनाम झालं.

या सगळ्या संकट आणि आव्हानांना तोंड देऊनच लोकशाही विजय होईल. निवडणुका होतील, विजयाचा गुलाल चौकाचौकात आणि महापुरुषांच्या पुतळ्यांजवळ सांडलेला दिसेल. हार-तुरे, मिरवणूक! झाली एकदाची निवडणूक.

हेही वाचा: आता निवडणुकीच्या राजकारणात फडकतोय ‘सतरंगी’ झेंडा

कायम प्रस्थापितांची मक्तेदारी?

निवडणूक कुठलीही असुदेत. ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत. एक मुद्दा नक्कीच लोकांच्या, मतदारांच्या नैतिकतेला आव्हान देत राहतो. तो म्हणजे मत विकणं किंवा पैसे घेऊन मतदान करणं. उमेदवाराच्या निवडणूक खर्चात हा मुद्दाही ऐरणीवर असतोच. नाशिकच्या देवळा तालुक्यातलं उमराणे एक गाव. तिथं तर म्हणे सरपंच पदासाठी बोलीच लागली आणि दोन कोटी पाच लाखाला सरपंच पदाचा लिलावही झाला.

पण या गावपातळीवरच्या म्हणा किंवा चढत्या क्रमाने लाल किल्ल्यापर्यंतच्या सर्वच संस्थांच्या निवडणुकीत प्रस्थापितांची मक्तेदारी दिसून येते. कायम तेच लोक आणि त्यांची घराणेशाही. प्रजासत्ताक म्हणवल्या जाणाऱ्या लोकांचीच ही व्यवस्था आहे का थांगपत्ताच लागत नाही. निवडणूक म्हटली की खर्च आलाच. खर्च पेलण्याची ताकद आहे त्यानेच तो विडा खुशाल उचलावा. राखीव जागा असतील त्यासाठी त्या त्या समूहातल्या उमेदवाराने.

लोकांनी एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करून योग्य पात्रतेच्या उमेदवाराला आपला प्रतिनिधी म्हणून निवडणं नक्कीच योग्य असेलही. पण असं कुठंही होताना दिसत नाही. एका जिवंत समाजाचं लक्षण म्हणजे त्या समाजानं एकत्र येऊन विचारांची देवाणघेवाण करणं, समाजाची कशी प्रगती होईल याचा विचार करणं. ध्येयधोरणं ठरवणं आणि त्यासाठी सगळ्यात मोठी संधी म्हणजे निवडणुका. ती मिळवण्यासाठी कुठलाही समूह धजावत नाही ही मोठी शोकांतिका.

तरुणांच्या जाणीवेतून जागरूकता

जो समाज एकत्र असतो, संघटित असतो, ज्याची दिशा ठरलेली असते तो समाज प्रगती करतो. त्या समाजातले लोक प्रगती करतात. त्यासाठी निवडणुका सुवर्णसंधी असते. पण त्याच्या अगदी उलट परिस्थिती आपल्याला बघायला मिळते. समाजानं एकत्र येणं, विचार करणं गरजेचं असतं. पण फक्त निवडणुकीच्या काळात गटातटात एकत्र येऊन, मळ्या खळ्यात नियोजन करून भावकीच्या राजकारणातले समझोते केले जातात.

या सगळं कुणाच्याच हिताचं नाही. मग यासाठी उपाय काय? शिक्षित आणि नेहमीच नव्या कल्पनांचा ध्यास घेत असतो तो तरुण वर्ग. पण तोही राजकारणाच्या बाबतीत कुठंतरी उदासीन दिसतो. या तरुण वर्गाच्या प्रत्यक्ष सहभागाने नक्कीच एक मोठा बदल काळाच्या क्षितिजावर घडून येईल. जनजागृतीसाठी वेगळे उपक्रम आणि प्रयत्न केले पाहिजेत. त्याशिवाय पर्याय नाही. मग जागरूकता कशी निर्माण होईल? तर जाणिवेतून.

हे सगळं नेमकं कशासाठी? हे तर माझ्यासाठी चाललंय असं समजलं तर नक्कीच त्याच्या जाणीवेच्या कक्षा रुंदावतील आणि हक्क, अधिकार आणि कर्तव्याची जोड दिली तर मग सत्यनारायण सफल झालाच समजा! मग ही तरुण मंडळी ग्रामसभांमधे स्वतःच्या समस्यांसाठी प्रश्न विचारेल तेव्हा नक्कीच त्या पदाला जबाबदार व्हावं लागेल.

हेही वाचा: वसंतराव नाईक यांचे राजकारणापलिकडचे किस्से

प्रश्न विचारत रहायला हवेत

गावच्या विकास कामांचा, आलेल्या निधीचा वापर कशाप्रकारे केला जातो? गावातल्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाच्या सोयी सुविधा, शिक्षण संस्थांचा दर्जा उंचावण्यासाठी आणि एकूणच जे उद्याचं भविष्य आहे त्यासाठी काय प्रयत्न केले जातात? आरोग्य सुविधा, स्वच्छता, पिण्याचं पाणी, रस्ते, पायाभूत सुविधा, जीवनावश्यक सेवा सुविधा, रोजगार निर्मिती, आदिवासी पाडे, वस्त्या इत्यादीचे प्रश्न.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुदृढ भविष्यासाठी व्यायामशाळा आणि ग्रंथालय यावर प्रश्न विचारत रहायला हवेत. त्याचवेळी सरपंचपद अधिक जबाबदार आणि लोकाभिमुख बनवण्यात आपलं मोलाचं योगदान असेल. आणि अशाप्रकारे सुदृढ लोकशाही व्यवस्था शाश्वत ठेवण्यासाठी मदत होईल. गाव पातळीवर विचार केला तर क्रीडा आणि शिक्षण क्षेत्राकडे दुर्लक्ष झालेलं दिसतं.

उदाहरणार्थ एका गावाची समस्या होती की, शाळेत जाणाऱ्या मुलींची छेड काढली जाते, रस्त्यावर काही तरुणांकडून टवाळखोरीचे प्रकार घडतात. ग्रामसभेत या विकृतीला आळा घालण्यासाठी उपाय सुचवण्यात आले. कडक शिक्षा केली जाईल, पोलिसात दिलं जाईल, तर कोणी म्हणे सीसीटीवी लावा.

गावातली खरी गुंतवणूक

हे सर्व उपाय तात्पुरते ठीक आहेत; पण त्या घटनेच्या मागचा कार्यकारणभाव समजून घ्यायचा प्रयत्न कुणी केलाय? ती सर्व तरुण मंडळी बेकार होती, बेरोजगार, प्रेरणेचा अभाव आणि ध्येयाचा अभाव या सगळ्या गोष्टींमुळे त्यांचं कृष्णलीलांकडे वळणं स्वाभाविकच. रोजगार, ध्येय आणि प्रेरणा या गोष्टींपैकी फक्त कोणती तरी एक द्या. तो तरुण वर्ग आपोआप व्यस्त होईल. गावात व्यायामशाळा उघडा, स्पर्धा घ्या, वेगळे उपक्रम राबवा ज्यातून तरुणांना प्रेरणा आणि ध्येय मिळेल.

अशाच प्रकारे ग्रंथालय सुरू करा, मंदिर आणि मदिरालयांपेक्षा ग्रंथालयाची नितांत गरज आहे. वाचनाची प्रेरणा निर्माण करून वाचनसंस्कृती वाढवा. मग हेच वाचनानं घडलेलं मस्तक कोणाचंही हस्तक होणार नाही. पुढं हीच गुंतवणूक गावच्या विकासाला वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल. जिथं नवीन नेतृत्व उभं राहील. विवेकनिष्ठ समाज तयार होईल. नैतिकता आणि नीतिमत्ता कायम राहील. आणि त्यातूनच आदर्श समाजाची तयार होईल.

हेही वाचा: बहुजन समाजाने सत्तेत राहिलं पाहिजे, असं यशवंतराव चव्हाण का म्हणाले?

भविष्याची सोनेरी पहाट दूर नाही

जिथं मटण पार्ट्या आणि खायला मिळणारं समाधान यांच्या पलीकडचा विचार होईल; ५ वर्षांसाठी मत विकून टाकण्यापलीकडे जाता येईल; जिथं उमेदवार पंचायतीचा पैसा कसा खायचा यापलीकडे जाऊन विचार करेल तेव्हा समाजाच्या कल्याणाच्या प्रामाणिक भावनेतून निवडणूक लढवली जाईल. मतांची फोडाफोडी आणि गटातटांवर कात्री लावून जनकल्याणाची जिथं जंत्री असेल असं सर्वसामान्यांतून नेतृत्व उभं राहील. त्यावेळी आपल्या लोकशाहीचा आणि विकासाचा मार्ग उन्नत होईल.

येणाऱ्या काळाची हाक लक्षात घेऊन असे आमूलाग्र बदल घडायला हवेत. ते फक्त तुम्हा, आम्हा तरुणांच्या प्रत्यक्ष सहभागावर अवलंबून आहेत. जातीच्या आधारानं होणाऱ्या मतदानाची पाळंमुळंही आपल्याला उखडुन टाकायची आहेत. ही आव्हानं पेलूयात आणि आपल्या पुढच्या पिढीसाठी एक आदर्श आणि शाश्वत प्रगतीचा मार्ग अवलंबुया. मतदानासारखं पवित्र कर्तव्य नागरिक म्हणून जबाबदारीचं भान देतं. आपली भविष्याची सोनेरी पहाट दूर नाही. आशावादी राहून लोकशाही अधिक मजबूत आणि सक्षम करूयात.

हेही वाचा: 

पानिपत: महापराक्रमी मराठ्यांचा रणयज्ञ

बर्ड फ्लू नव्या आर्थिक संकटाची नांदी ठरेल?

आम्हाला गुजरात ऐवजी केरळ मॉडेलच हवंय!

बायकांच्या सणात पुरुषी विचारांची लुडबूड कशाला?

दिल्लीवाली आतिशी: सावित्रीमाईलाही वाटलं असतं हीच माझी लेक

आपण मतदान केलं नाही तरी शरद पवार राज्यसभा खासदार बनतात कसं?