महाराष्ट्रानं कुस्ती केसरीचं रिंगण ओलांडायला हवं

२२ जानेवारी २०२३

वाचन वेळ : ५ मिनिटं


पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेत्या मल्लांना ट्रॅक्टर, थार जीप यासोबत लाखांच्या पटीत रोख बक्षिसं देण्यात आली. मैदानी कुस्तीला होणारी गर्दी महाराष्ट्र केसरी सोडलं तर कोणत्याही स्पर्धेला नसते. यावरून महाराष्ट्र केसरीचं महत्व आपल्याला लक्षात येईल. पण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्र कुठे आहे याचाही विचार झाला पाहिजे.

महाराष्ट्र आणि कुस्ती हे नातं फार प्राचीन आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी उघड्यावर असणारे कुस्तीचे आखाडे चार भिंतींच्या आत बंद केले ज्याला तालीम म्हटलं जाऊ लागलं. या तालमीत पुढे लाठी काठी भाला तलवार अशी आयुधं आणि कुस्तीचा सराव केला जायचा.

राजर्षी शाहू महाराजांनी हीच कुस्ती आपल्या उदार आश्रयाखाली कोल्हापुरात वैभवाला आणली. नव्या तालमी बांधल्या. कुस्तीसाठी खासबाग मैदान बांधलं. पैलवानांना खुराक स्वतःच्या संस्थानातून सुरू केला. पुढे ठेकेदारी पद्धत येऊन कुस्त्या होऊ लागल्या. लाखो लोक तिकिटं काढून कुस्त्या बघायला जाऊ लागले.

हेही वाचा: ऑलम्पिकमधे उत्तेजक घेऊन खेळणाऱ्या खेळाडूंचं काय करायचं?

महाराष्ट्र केसरीला ऑलिम्पिक इतकं महत्व

देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि १९५२च्या हेलसिंकी ऑलिंपिकमधे महाराष्ट्राचे सुपुत्र खाशाबा दादासाहेब जाधव यांनी इतिहास रचला. देशासाठी पहिलंवहिलं पदक जिंकून महाराष्ट्रातल्या-देशातल्या मल्लांपुढं एक आदर्श निर्माण केला. खाशाबांच्या कामगिरीनंतर मामासाहेब मोहोळ या कुस्तीवेड्या अवलियाने महाराष्ट्राच्या मल्लांसाठी काहीतरी ध्येय असावं म्हणून पैलवानांची संघटना स्थापन केली ज्याला महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद नाव देण्यात आलं.

१९५२ ते १९६२ला तमाम पैलवान एकत्र येऊन मेळावे घेतले जाऊ लागले. १९६२ला या मेळाव्यांचं रूपांतर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत झालं. १९६२ पासून अव्याहतपणे ही स्पर्धा महाराष्ट्रात सुरू आहे. अनेक घराणी या स्पर्धेत खेळली, मोठी झाली. आज महाराष्ट्र केसरी स्पर्धेला ऑलिम्पिक इतकं महत्व महाराष्ट्रातल्या कुस्ती शौकिनांनी आणलंय.

नुकतंच पुण्यातल्या कोथरुड इथं झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत विजेत्या मल्लांना बुलेट मोटरसायकल, ट्रॅक्टर, थार जीपसह लाखांच्या पटीत रोख बक्षिसं देण्यात आली. ही बक्षिसांची पद्धत पाहता महाराष्ट्र केसरीचं महत्व आपल्याला लक्षात येईल. पण हे होत असताना महाराष्ट्राच्या कुस्तीगीरांच्या समोर महाराष्ट्र केसरी नंतर करियर संपलं की काय अशी परिस्थिती  होऊ शकते. राज्य स्तरच्या पुढे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय त्यातही मानाच्या इतर स्पर्धा ज्यात जगाच्या तुलनेत भारत आणि महाराष्ट्र कुठे याचा विचार व्हावा.

खाशाबांच्या नावे राज्य स्पर्धा?

हिंदकेसरी मारुती माने, हिंदकेसरी गणपतराव आंदळकर, रुस्तुम ए हिंद हरिश्चंद्र बिराजदार, रुस्तुम ए हिंद दादू चौगुले यासारखे मातीच्या कुस्तीत बलाढ्य असणारे महाराष्ट्राचे मल्ल पुढे राष्ट्रकुल, आशियायी,जागतिक कुस्ती स्पर्धेपर्यंत गेले. अशा मानाच्या स्पर्धेत त्यांनी पदकं मिळवली. त्यांचा आदर्श समोर ठेवत महाराष्ट्राच्या पुढच्या पिढीने मार्गक्रमण केलं पाहिजे.

इराण सारख्या ७० दशलक्ष लोखंसंख्येच्या देशात २० लाख नोंदणीकृत फक्त पैलवान आहेत. त्यातही पारंपरिक कुस्तीसह आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारणारे अनेक आहेत. हसन याझदाणी सारखा इराणी तर ऑलिंपिकमधे धुमाकूळ घालत आहे. ज्यावेळी खाशाबा जाधव यांनी हेलसिंकीमधे पदक मिळवलं त्याच वर्षी १९५२ला इराणी मल्ल घोलमिरझा तखती यांनीही पदक मिळवलं होतं. तखती साहेबांचा आदर्श इराणने ठेवत पुढे अनेक ऑलिंपियन घडवले. तखती कप नावाने जागतिक कुस्ती स्पर्धाही भरते.

आपण मात्र खाशाबाना विसरलो आणि त्यांना केवळ महाराष्ट्रात ठेवलं. त्यांच्याही नावे राज्यस्तरीय स्पर्धा का? ते जर देशासाठी पदक जिंकले होते तर किमान ही स्पर्धा राष्ट्रीय व्हायला हवी आणि कालांतराने खाशाबा जाधव जागतिक स्पर्धा झाली तरच आपला देश आदर्शवादी म्हणायला हरकत नाही. सध्यातरी याच्या विरुद्ध कृती घडताना दिसत आहे. महाराष्ट्राच्या कुस्तीगीरानी आपल्यासमोर घातलेलं महाराष्ट्र केसरीचं रिंगण लांघून आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मजल मारणं काळाची गरज आहे.

हरिश्चंद्र बिराजदार यांनी पुण्यात गोकुळ वस्ताद तालमीच्या माध्यमाने केवळ मातीतले मल्ल नाही तर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मल्ल घडवले. त्यांच्या शिष्यांनी ही परंपरा पुढे आणली. काकासाहेब पवार यांनी एशियन गेम्स, जागतिक आणि ऑलिंपिक असा प्रवास केला. त्यांचे दुसरे शिष्य राहुल आवारे यांनी राष्ट्रकुल, जागतिक, ऑलिंपिकपर्यंत मजल मारली.

हेही वाचा: दंगल आणि लीगपेक्षा तर राणादादाने कुस्तीला ग्लॅमर दिलं

कुस्तीची गोडी लावण्यासाठी

महाराष्ट्रात सध्या नक्कीच बदलाच्या उंबरठ्यावर आहे कारण पूर्वी वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत दीर्घ काळ एकही पदक महाराष्ट्रातल्या मल्लांसाठी दुरापास्त होते. मात्र यावर्षी महाराष्ट्रातल्या मल्लानी तब्बल १५ पदकं वरिष्ठ राष्ट्रीय स्पर्धेत मिळवली. ती सुद्धा अशावेळी ज्यावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद बरखास्त करुन इथं अस्थायी समिती काम करत होती.

अस्थिर कुस्ती संघटना असूनही महाराष्ट्राचे मल्ल पदक मिळवत असतील तर हे यश नक्कीच अशी दूरदृष्टी असणारे पालक, मल्ल, प्रशिक्षक, वस्ताद यांचं यश म्हटलं पाहिजे. कुस्ती संघटनांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे आणि कुस्तीत बदल घडवण्यासाठी नव्या दमाचे लोक पुढे आले पाहिजेत. ज्यांना खरच कुस्तीत काम करण्याचा मानस आहे.

महाराष्ट्रात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पदकं जास्त न येण्याचं दुसरं कारण म्हणजे तांत्रिक कुस्ती, गुणात्मक कुस्ती याची फारशी माहिती नसणं. आजही कोणतंही कुस्ती मैदान असो किंवा स्पर्धा वयोवृद्ध कुस्तीप्रेमी ज्यांना मातीतली बेमुदत निकाली कुस्ती माहिती आहे असेच लोक गर्दी करतात. मैदानी कुस्तीला होणारी ही गर्दी महाराष्ट्र केसरी सोडलं तर कोणत्याही स्पर्धेला नसते. मातीतल्या कुस्तीत गोडी मानणारा वर्ग तांत्रिक कुस्तीत फारसा रस दाखवत नाही किंबहुना याची गोडी लागावी असे उपक्रम सुद्धा कुठे होताना दिसून येत नाहीत.

धोके तसंच संधीही

मैदानी कुस्तीत मिळणारा ताजा पैसा हा मल्लांच्या उपजीविकेचं माध्यम आहे. जिथं एका कुस्तीत जास्त पैसा मिळतो तिथं मॅट स्पर्धेत इतक्या कुस्त्या कोण करेल हा सुद्धा मुद्दा विचारात घेतला पाहिजे. दिल्लीत भारतीय कुस्ती महासंघाच्या अध्यक्षाविरुद्ध ऑलिंपियन मल्लांनी जंतर मंतर याठिकाणी आंदोलन केलं आहे. जर पैलवान अध्यक्षाविरुद्ध एकत्रित येत असतील तर अशा क्रीडा संघटना कितपत समाधानी आहेत याचाही विचार करणं गरजेचं आहे.

कुस्तीत क्रीडा संघटनांचं राजकारण हा मुद्दा जितका महत्वाचा वाटतो तसाच उत्तेजक द्रव्यांचा अतिरेकी वापर हा सुद्धा होय. अनेक लहान जोडीपासून ते मोठ्यापर्यंत आणि तालुका कुस्ती स्पर्धापासून ते राष्ट्रीयपर्यंत सर्रास स्टिरॉइड्स घेऊन खेळाडू खेळताना दिसतात. वेगवेगळ्या इंजेक्शनच्या सुया त्याठिकाणी दिसतात. यावर बंधनं घालणार्‍या उत्तेजक द्रव्य विरोधक संस्था आहेत मात्र त्यांची आरोपी पकडायची पद्धत वेगळी असते शिवाय राज्यस्तरीयला डोप टेस्ट होत नाही त्यामुळे बंधनं नसल्याने याचा अतिरेक होतो आणि खेळाडूंना याचे दूरगामी परिणाम पहायला मिळतात.

या सर्व गोष्टींचा विचार करुन कुस्तीसारख्या खेळात करियर करून पुढे जायचं असतं. त्यामुळे याचंही नियोजन पालक आणि वस्ताद यांनी केलं पाहिजे. येणार्‍या काळात भव्य ध्येय ठेवूनच कुस्ती हा खेळ करियर म्हणून घेतला तरच महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय स्तरावर गरुडभरारी मारेल यात शंका नाही.

हेही वाचा: 

कधीकाळी बालिश वाटणाऱ्या विराटची प्रगल्भ तिशी

सौरव गांगुली बीसीसीआयमधे दादागिरी करू शकेल काय?

फूटबॉलपटूच्या किकने बदलला मुस्लिमांकडे बघण्याचा दृष्टिकोन

महात्मा गांधींचं क्रिकेटशी नातं सांगणारे हे किस्से आपल्याला माहीत आहेत का?

(लेखक कुस्ती अभ्यासक असून त्यांचा लेख दैनिक पुढारीतून घेतलाय)