दाढी वाढवून गुरुदेव होता येत नाही आणि खादी वापरून महात्मा

३० जानेवारी २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


गांधीजींना महात्मा म्हणायची सुरवात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी केली. तर टागोरांना गुरुदेव ही उपाधी गांधीजींनी दिली. त्यातून त्यांना एकमेकांबद्दल किती आपुलकी आणि कमालीचा आदर होता, हे लक्षात येतं. त्यांच्यात काही विषयांवर मतभिन्नता होती तरीही अपरंपार जिव्हाळा कायम राहिला.

गांधीजींना महात्मा म्हणण्याची सुरवात गुरुदेव रविंद्रनाथ टागोर यांनी केली. तर टागोर यांना गुरुदेव म्हणायचं गांधीजींना सुचलं होतं. दोघांचे संबंध जिव्हाळ्याचे होते. दोघांनाही एकमेकांबद्दल अतिशय आदर होता. काही बाबतीत तेवढेच मतभेदही होते. पण सत्य, अहिंसा, त्याग, देशभक्ती याबद्दल दोघांची एकवाक्यता होती.

दोघांना भारतीय संस्कृती बद्दल नेमकी समजून होती. अभिमानही होता. दोघेही भारतीय संस्कृतीचे खंदे पाईक ठरले. टागोर रसिक होते. त्यांची आवड साहित्य, नृत्य, नाटक, संगीत, चित्रकला अशा बऱ्याच गोष्टींमधे होती. विशेष म्हणजे देश स्वतंत्र झाल्यावर गांधीजी देशाचे राष्ट्रपिता झाले तर टागोर राष्ट्रगीताचे जनक.

एका ब्रिटिशाने घडवली भेट

दोघांची पहिली भेट एका ब्रिटिश व्यक्तीने घडवली होती. चार्ल्स अँड्र्यू याने. गांधीजी दक्षिण आफ्रिकेत संघर्ष करत असतानाच टागोर यांना त्यांच्याविषयी कुतूहल निर्माण झालं होतं. गांधीजी भारतात परतल्यावर चार्ल्सने त्यांना लगेच शांतिनिकेतनला भेट देण्याचं आमंत्रण दिलं. गांधीजींनी ते लगेच स्वीकारलंही. मार्च १९१५ ला गांधीजी शांतिनिकेतनमधे आले. तेव्हा टागोर तिथं नव्हते.

गांधीजींनी तिथले अभ्यासक, कार्यकर्ते, कर्मचाऱ्यांकडून आश्रमाची माहिती घेत पाहणी केली. नंतर ६ मार्चला मोठ्या दिवाणखान्यात दोघांची भेट झाली. टागोर उंच पुरे त्यांची ती सफेद लांबलचक दाढी मागे वळवलेले केस आणि त्यांचा तो लांब झगा यामुळे एखाद्या ऋषीसारखे ते दिसायचे. असं वर्णन त्यांचेच अनुयायी काकासाहेब कालेलकर यांनी केलंय. तर त्यामानाने किरकोळ शरीराचं धोतर, कुडत्यातले गांधीजी काहीसे विनोदी ठरावेत असेच दिसायचे.

टागोर आपल्या सोफ्यावर बसले होते. त्यांनी गांधीजींना आपल्या बाजूला बसायला सांगितलं. पण गांधीजी नम्रपणे खाली अंथरलेल्या जाजमावर बसले. गांधीजींची साधी राहणी माहीत असल्याने टागोर सुद्धा मग खाली बसले.

हेही वाचा : गांधी का मरत नाही: खरा इतिहास बघण्याचा चष्मा!

शांतिनिकेतनमधे गांधी दिवस

गांधीजींनी आश्रमाबद्दल मत व्यक्त करताना बऱ्याच पसंत न पडलेल्या गोष्टी सांगितल्या. त्यांना विद्यार्थ्यांच्या सेवेला सेवेकरी असल्याचं बिलकुल पटलं नव्हतं. सफाई करणारे, स्वयंपाक करणारे, पाणी आणून देणारे असा ताफा बघून गांधीजी नाराज झाले होते. त्यांचं म्हणणं असं या गोष्टी विद्यार्थी काय आणि शिक्षक काय ज्याला त्याला करता यायला हव्यात. 

टागोरांनी गुरुकुल संकल्पनेवर शांतिनिकेतन उभारलं होतं.निसर्गाच्या सान्निध्यात भिंती छप्पर न ठेवता त्यांची ही शाळा होती. गांधीजींना याचं कौतुक वाटलं. पण त्यांना जे खटकलं ते त्यांनी सांगितलं. टागोरांनी गांधीजींचं म्हणणं मान्य केलं. त्यांच्या सूचना लगेच अमलात आणायचं ठरवलं. १० मार्च पासून सूचनांची तालीम झाली. आणि विशेष म्हणजे त्यानंतर दर १० मार्च हा शांतिनिकेतनमधे गांधी दिवस पाळला जाऊ लागला.

मतभेद आणि मतभिन्नताही

गांधीजी आणि टागोर यांनी नंतर कायम पत्रव्यवहार सुरू ठेवला. मॅगझीनमधून लेख लिहून एकमेकांशी संवाद ठेवला. गांधीजींचे काही निर्णय पटायचे नाहीत तेव्हा टागोर सरळ त्यावर टीका करायचे. तसे लेख लिहायचे.

१९३४ मधे नेपाळ आणि बिहारमधे मोठा भूकंप झाला. त्यात मोठं नुकसान झालं. यावर गांधीजींनी भाष्य केलं. बिहारमधे अस्पृश्यता पाळली जाते. या पापाची शिक्षा भूकंपाच्या रूपाने देवाने दिली आहे. टागोर या मताशी सहमत झाले नाहीत.त्यांनी लगेच लिहिलं गांधीजीसारखी व्यक्ती असं अतार्किक आणि असमंजस विधान कसं काय करू शकतात?

त्यांच्या या विधानाला विज्ञानाचा आधार नाही. गांधीजी यावर वाद घालत राहिले नाहीत. पण त्यांनी टागोर यांना समजवण्याचा प्रयत्न केला की, माझ्या विधानाला आणि निरीक्षणाला मी पुरावे देऊ शकत नाही पण माणुसकी पाळली जात नाही तेव्हा अशा तऱ्हेचा नैसर्गिक प्रकोप झाल्याशिवाय राहत नाही. 
खर तर हे दोघं अस्पृश्यतेच्या विरोधात होते. मात्र टागोर गांधीजींनी केलेलं अतार्किक भाष्य स्वीकारायला तयार नव्हते. 

गांधीजी रोज एक तास तरी चरखा चालवा असं सर्वांना आवाहन करायचे. प्रत्येकाने चरखा हाती घेतला तर देश नक्की स्वतंत्र होईल असं ते सांगायचे. टागोर यावर हसायचे. ते म्हणायचे एक तास कशाला आठ तास आम्ही रोज चरखा चालवू मग काय लगेच देश स्वतंत्र होईल का?गांधीजी यावर प्रतिक्रिया द्यायचे नाहीत. त्यांना स्वदेशी चळवळ ब्रिटिशांना भारी पडेल याची खात्री होती.

हेही वाचा : नव्या पिढीनं गांधी-आंबेडकर मतभेदांकडे कसं बघावं?

पुणे कराराला टागोर साक्षी

१९३२ मधे गांधीजी येरवडा तुरुंगात असताना ब्रिटिशांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ ठेवून निवडणूक घ्यायची ठरवली होती. गांधीजींचा याला विरोध होता. बाबासाहेब आंबेडकर आणि गांधीजी समोरा समोर आले होते. गांधीजींनी मग उपोषण सुरू केलं. तेव्हा टागोरांना काळजी वाटायला लागली. त्यांनी पत्रानं नाही तर तार पाठवून कळवलं की, तुम्ही आम्हाला हवे आहात. अजून बरंच काम बाकी आहे.

त्याआधीच टागोर यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गांधीजींनी त्यांना चिठ्ठी लिहिली होती. 'माझा उजवा हात दुखत आहे. म्हणून हे पत्र मी डाव्या हाताने लिहितोय. त्यामुळे भराभर लिहिता येत नाही. पण मी ज्या उद्देशाने उपोषणाचा निर्णय घेतलाय त्याला तुमचे आशीर्वाद हवेत.' तो पर्यंत गांधीजींना तार मिळाली. त्याचा उल्लेखही त्यांनी या चिठ्ठीमधे केला. 

गांधीजींची खूप काळजी वाटू लागल्यावर टागोर स्वतः पुण्याला आले आणि येरवड्यात त्यांनी गांधीजींची तुरुंगात भेट घेतली. इथंच मग गांधीजी, आंबेडकर यांच्यात पुणे करार झाला. टागोर याला साक्षी राहिले. गांधीजींनी उपोषण सोडलं आणि त्यांच्या सांगण्यावरून टागोरांनी स्वतः रचलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गाणंही म्हटलं.

गांधीजींचा शांतिनिकेतनला आधार

१९४० मधे गांधीजी कस्तुरबांना घेऊन शांतिनिकेतनला गेले. तेव्हा टागोर थकले होते. त्यांना आपला उपक्रम चालवायला निधीची चणचण भासत होती. अनेकदा गांधीजींनी त्यांना निधी जमवून दिला होता. या भेटीत टागोर त्यांना विनंती करत होते की, आता गांधीजींनी शांतिनिकेतनला आपल्या कृपाछत्राखाली घ्यावं. गांधीजींनी त्याला नम्रपणे नकार दिला.

'तुमची ही निर्मिती वाया जाणार नाही. ती पुढेही राखली जाईल. चिंता करू नका,' असा दिलासा मात्र त्यांनी दिला. ७ ऑगस्ट १९४१ ला टागोर यांचं निधन झालं. गांधीजी फिरून १९४५ मधे शांतिनिकेतनला गेले होते. तिथली व्यवस्था त्यांनी लावली. इथंच गांधीजींना काकासाहेब कालेलकर आणि आचार्य कृपलानी यांच्या सारखे सहकारी मिळाले.

आज दाढी वाढवून कुणी गुरुदेव बनू इच्छित असेल आणि खादी वापरून महात्मा होऊ पाहत असेल, तर तो निव्वळ मूर्खपणा ठरेल. खऱ्या गुरुदेव आणि महात्म्यामधला जिव्हाळा समजून घेतला तर डमी गुरुदेवांचे खुजेपण लक्षात येईल.

हेही वाचा : 

गांधीजी पुन्हा वायरल झालेत

संत तुकाराम, महात्मा गांधी आणि कोरोनाची साथ

महात्मा गांधी म्हणजे आधुनिक काळातले महादेवच!

भगतसिंगांची फाशी रोखण्याचा गांधींजींनी प्रयत्न केला का?

नथुरामायणः गांधीजी ज्या देशाचे रहिवाशी होते, तो देश नथुरामचा नव्हता