गांधीजींनी न लिहिलेली ही दोन भजनं गांधींच्या नावानं ओळखली जातात

३० जानेवारी २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या होऊन आज ३० जानेवारीला ७२ वर्ष झाली. वैष्णव जन तो हे गांधींचं आवडतं भजन आज भारतभर गायलं जाईल. गांधींना संगीताची विशेषतः भजनांची खूप आवड होती. मनात चांगली भावना असेल तर संगीत स्फुरतं असं ते म्हणत. आजच्या दिवशी म्हटली जाणारी दोन भजन तर गांधीजींची असल्याचं अनेकांना वाटतं. पण ते तसं नाही.

आज महात्मा गांधींचा स्मृतिदिन. आज देशभर त्यांची आठवण काढत वेगवेगळे कार्यक्रम भरवले जातात. गांधींना भजन म्हणायला फार आवडायचं. म्हणूनच त्यांच्या स्मृतिदिनी विशेषतः भजनाचं आयोजन केलं जातं. गांधींची आवडती भजनं गायली जातात. ‘वैष्णव जन तो तेणे काहीएजे’ हे भजन गांधींना खूप आवडायचं. ते भजन त्यांच्यामुळे लोकप्रिय झालं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.

गांधी अरसिक नव्हते. प्रत्येक गोष्टीकडे बघायचा त्यांचा दृष्टीकोन हा मानवजातीला कल्याणकारक काय ठरेल या विचारातून असायचा. क्रीडा, साहित्य, संगीत, कला अशा कशाचंही त्यांना वावडं नव्हतं. एखादं गाणं आपल्याला बऱ्यापैकी गाता आलं किंवा एखादं वाद्य नीट वाजवता आलं तर आपण त्याला संगीत म्हणतो. गांधींजींचं तसं नव्हतं. संगीत हे आयुष्याशी निगडीत आहे, असं त्यांना वाटे. मनात चांगली भावना असेल तरच गाणं सुचतं, स्फुरतं.

हेही वाचाः गांधीजींना तुकोबा भेटले होते

गांधींवर संत नरसी मेहतांचा प्रभाव

संगीत हे अध्यात्मावर आधारित आहे. संगीताचा प्रभाव मोठा आहे. ‘वैष्णव जन तो’ हे भजन गुजरातमधले सुप्रसिद्ध संत नरसी मेहता यांनी लिहिलंय. नरसी मेहता श्रीकृष्णाचे उपासक होते. वैष्णव होते. पण वैष्णव असण्याची व्याख्या करताना ते म्हणतात, ‘वैष्णव त्याला म्हणावं जो परपीडा जाणतो. दुसऱ्याचं दुःख समजतो आणि दुसऱ्यावर उपकार केले तरी त्याविषयी मनात अहंकार धरत नाही.’

यातला परपीडा हा शब्दप्रयोग गांधीजींना खूप भावला होता. माणसाने दुसऱ्या माणसाचं दुःख ओळखायला हवं, जाणून घ्यायला हवं. आपण दुसऱ्या माणसाच्या जागी जाऊन विचार केला पाहिजे. असं केलं तर साहजिकच माणसाच्या मनात दया उत्पन्न होईल आणि तो दुसऱ्या माणसाचा तिरस्कार, द्वेष करणार नाही. उलट त्याचं दुःख कमी करण्यासाठी त्याला मदत करेल. सगळ्यांनी असा विचार केला तर हे जग सुखशांतीनं भरून जाईल.

नरसी मेहतांचा मानवकल्याणाचा विचार सगळ्यांनी आचरणात आणायला हवा, असं गांधींना वाटायचं. वास्तविक चारशे वर्षांहून अधिक काळापूर्वी नरसी मेहता यांनी ही रचना केली होती. पण ती आजही जगाला दिशा दाखवणारी आहे. गांधी त्याकडे आकर्षित होणं साहजिकच होतं. हे भजन गुजराती भाषेत असल्यानं गांधी ते लहानपणापासून ऐकत होते. 

कुणी म्हणेल, संत ज्ञानेश्वरांनी जे पसायदान मागितलंय तेही जगाचा विचार कऱणारं आहे. याबद्दल अर्थातच वाद नाही. पण गांधीजी गुजराती असल्याने त्यांच्या मुखी गुजराती भजन असणं स्वाभाविक आहे. अनेक कार्यक्रमात हे भजन गांधी म्हणत असत. याबरोबर ‘रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम’ ही रामधुनही त्यांची आवडती होती. या दोन रचना ते नेहमी म्हणत असत. आज त्यांच्याच नावाने ही भजनं जगभर लोकप्रिय झालीयत. १९३० ला दांडी मार्चमधे गांधींनी ही रामधून आपल्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात वापरात आणली. आणि हे भजन आज गांधी भजन म्हणून फेमस झालंय.

हेही वाचाः नथुरामायणः गांधीजी ज्या देशाचे रहिवाशी होते, तो देश नथुरामचा नव्हता

दक्षिण भारतावर गांधी विचारांचा पगडा

हळूवार, मनाला भिडणारी रचना गांधींना आवडायची. तसंच स्वरही त्यांना छान वाटायचे. सुप्रसिद्ध कर्नाटक संगीत क्षेत्रातल्या बुजूर्ग गायिका सुब्बलक्ष्मी यांचा स्वर त्यांना आवडायचा. सुब्बलक्ष्मी यांचा पुढे भारतरत्न देऊन गौरव करण्यात आला. एकदा सुब्बलक्ष्मी यांना गांधींनी ‘एक भवन हरी तुम हरो’ हे भजन गायची विनंती केली. आधी त्या तयार नव्हत्या. पण नंतर त्यांनी तयारी केली. रचना समजून घेऊन चाल रचली आणि मग त्या गायल्या. गांधीजी दक्षिणेतही तेवढेच लोकप्रिय होते. 

आजच्या काळातल्या अनेक गायक, गायिकांना गांधीजींचं कौतुक आहे. त्यांच्याविषयी आदर आहे. दक्षिण भारतातल्या पद्मभूषण प्राप्त गायिका सुधा रघुनाथन यांनी गांधींच्या सत्य, अहिंसा या विचारांना गाण्यातून मानवंदना दिलीय. त्यांना युनायटेड नेशन्स म्हणजे युएनने महात्मा गांधींचं टपाल तिकीट काढायचा एक कार्यक्रम ठेवला होता. तेव्हा त्या कार्यक्रमात गाण्यासाठी सुधा रघुनाथ यांना आमंत्रित केलं होतं. त्यांनी एक संस्कृत रचना आणि एक तामिळ रचना गायली होती. समोर वेगवेगळ्या भाषा बोलणारे रसिक होते. त्या सगळ्यांनाच या गाण्यांची भाषा परकी होती. पण सुधा रघुनाथन गाऊ लागल्या तेव्हा समोरच्या सगळ्यांनीच त्यांच्या सुरात आपला सूर मिसळला.

दक्षिण भारतातल्याच कृष्णकुमार आणि बिन्नी या गायक जोडप्याचं संगीत क्षेत्रात चांगलं नाव आहे. त्यांनाही गांधींवरच्या रचना, गांधींची भजनं गायला आवडतात. त्यांचे गुरु बालमुरलीकृष्णन यांनी वंदे मातरम् आणि मातरम् या रचनांना संगीत दिलं होतं. तेव्हा या दांम्पत्यानं त्यांना मदत केली होती. सुब्रमण्यम भारती आणि पिल्लई अशा थोर कवींवरही गांधींच्या विचारांचा पगडा होता. म्हणून गांधी दक्षिण भारतातही लोकप्रिय झाले.

हेही वाचाः गांधींच्या चातुर्वर्ण्याचं काय करायचं?

विरोधकही गांधींना आदरणीय मानतात

शोभा मुद्गल या सुप्रसिद्ध शास्त्रिय गायिका तर गांधींना खूप मानतात. त्यांच्यावर त्यांनी खास कार्यक्रमही केलेत. गांधीजी हे सत्याचे उपासक होते. सत्यापर्यंत पोचायचा त्यांचा प्रयत्न असायचा. त्यांनी स्वतःचं खासगी जीवन लपवून ठेवलं नाही. म्हणून शोभा मुद्गल यांना गांधींविषयी आदर आहे. गांधींचे टीकाकार किंवा विरोधकही एक माणूस गांधींना आदरणीयच मानतात. हे त्यांचं मोठं यश म्हणावं लागेल, असं मत त्या मांडतात.

मुद्गल यांचे वडील स्कंद गुप्ता हे गांधींचे टीकाकार होते. वडलांच्या निधनानंतर त्यांचं पुस्तकांचं कपाट स्वच्छ करताना वडलांची एक वही शोभा यांना मिळाली. त्या वहीत गांधींवर लिहिलेल्या सुंदर कविता होत्या. शोभा स्वतः कवितांना चाल लावून त्या गातात. देशभक्तीपर गीतं गायला त्यांना आवडतं. त्यांची बहुतेक गाणी सैनिक, फौज यांच्यावरची असतात. त्यातला ताल, लय आक्रमक असते. 

देशभक्तीसाठी अशीच चाल का हवी? असा त्यांचा प्रश्न आहे. हळूवारपणे सुद्धा देशभक्तीची गाणी गाता यायला हवीत. गांधीजींनी सत्य, अहिंसा या मुल्यांचा पुरस्कार केला. त्यावरची गाणी सहज देता येतात, असं शोभा मुद्गल यांचं म्हणणंय.

हेही वाचाः शस्त्र घेऊन गुंडागिरीचा सामना करायला सांगणारे गांधीजी माहीत आहेत?

भावना चांगली असेल तरच संगीत सुचतं

नीला भागवत यांनाही गांधी भावतात. आधी त्या एवढ्या गांधीमय नव्हत्या. पण काही वर्षांपूर्वी नेदरलँडची राजधानी एमस्टरडॅमला गेलेल्या. तिथे एका कार्यक्रमाआधी त्यांना तिथल्या गांधीजींच्या पुतळ्याला भेट द्यावी लागली. तिथे पुतळ्याला नमस्कार करताना त्यांना गलबलून आलं. हा एवढा थोर माणूस की आज परदेशी मंडळीही इथं मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. त्यानंतर त्यांनी गांधीजींवरची काही पुस्तकं वाचली. तेव्हापासून मराठी, गुजराती मधल्या गांधींना योग्य अशा काही रचना त्या आवर्जून आपल्या कार्यक्रमात सादर करतात.

रियाझ कव्वाल यालाही गांधीजींविषयी आदर आहे. अमेरिकेतला हा कव्वाल. त्याने युट्युबवर आपले काही अल्बम अपलोड केलेत. त्यात ‘वैष्णव जन तो’ या गाण्याचाही समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांचं हे गाणं अनेकांनी उचलून धरलंय. अनेकांनी ते आवडल्याची प्रतिक्रिया दिलीय. त्यात हिंदू आणि मुस्लिम धर्माचे लोक आहेत.

वैष्णव जन तो आज अनेक देशामधे लोकप्रिय झालंय. फक्त भारतीयच नाही तर परदेसातले गायक, संगीतकारही या भजनाच्या प्रेमात पडलेत. तेही हे भजन वेगवेगळ्या पद्धतीनं सादर करतात. त्यांचे उच्चार चुकतात. अनेकदा गाण्यांमधे दोष राहतात. पण तन्मयतेने ते ही रचना सादर करतात हे महत्त्वाचं. त्यांना यातला भावार्थ उमगलाय. 

गांधीजी म्हणतात, त्याप्रमाणे शेवटी चांगले विचार असतील तरच चांगलं संगीत सुचत. संगीत हे भाषा आणि जनधर्म या पलीकडचे आहे. आज टीवीवर विविध देशात गायलेलं ‘वैष्णव जन’ सादरीकरण प्रदर्शित केलं जाईल ते उगीच नाही.

हेही वाचाः 

बाप एकच असतो, तो कसा बदलणार?

महात्मा गांधी प्रत्येकाला वेगवेगळे उमगतात, त्याची गोष्ट

अयोध्येत भव्य मंदिर महात्मा गांधींना का नकोसं वाटलं असतं?

खरंच, भगतसिंगांची फाशी रोखण्याचा गांधींजींनी प्रयत्नच केला नाही?

डावे, आंबेडकरवाद्यांच्या टोकाच्या गांधीविरोधामुळे आरएसएसचं फावलं!