प्लेगची साथ रोखण्यासाठी गांधीजींनी झोपडपट्टीत उभारलेल्या जुगाड हॉस्पिटलची गोष्ट

१५ एप्रिल २०२०

वाचन वेळ : ४ मिनिटं


शंभर वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. जोहान्सबर्गमधे भारतीय कामगारांच्या एका वस्तीत प्लेगच्या साथीनं धुमाकूळ घातला होता. महात्मा गांधी तिथं पोचले. आणि बघताबघता त्यांनी एका घरात प्लेगनं बेजार झालेल्यांसाठी शेकडो बेडचं हॉस्पिटलच उभं केलं. लोकांना सोबत घेतलं आणि एका आठवड्यात प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळवलं.

कोरोना वायरसचा विळखा वाढत चाललाय. नाही म्हटलं तरी जगभरात भीतीचं वातावरण आहे. आरोग्यसेवाही अपुऱ्याच आहेत. आज सगळे मतभेद बाजूला सारून कोरोना वायरस विरुद्धची लढाई लढावी लागेल. तब्बल १०० वर्षांपूर्वी अशीच आरपारची लढाई महात्मा गांधी लढले होते. दक्षिण आफ्रिकेत प्लेगची साथ पसरली होती. तिथल्या भारतीयांना गुलामीचं जीवन जगावं लागत होतं.

दक्षिण आफ्रिकेतले बहुतेक भारतीय लोक हे सोनं, हिरे आणि स्टील खाणींमधे काम करायचे. काही लोक उसाच्या शेतात मजुरी करायचे. त्यांच्यासोबत एक करार केला जायचा त्याला 'गिरमिट' म्हटलं जायचं. अशा लोकांची अवस्था अतिशय दयनीय होती. त्यांच्या वस्तीला दक्षिण आफ्रिकेतल्या गुलाम कामगारांची वस्ती असं म्हणायचे. गोरे लोक हिंदूंना गुलाम डॉक्टर, गुलाम बॅरिस्टर, गुलाम व्यापारीही म्हणायचे. अपमान करण्याचा तो एक मार्ग होता.

हेही वाचा : संत तुकाराम, महात्मा गांधी आणि कोरोनाची साथ

एका घराचं रूपांतर हॉस्पिटलमधे

१९०४ हे साल. दक्षिण आफ्रिकेच्या जोहान्सबर्गमधल्या गुलामांच्या वस्तीत अचानक प्लेग पसरला होता. भारतातल्या मजुरांना राहण्यासाठी ठरवून दिलेली जागा ही गुलामांची वस्ती म्हणून ओळखली जायची. हा परिसर खूपच गलिच्छ होता आणि तिथं स्वच्छताही नव्हती. अतिवृष्टीमुळे या वस्त्यांमधे प्लेग पसरला होता. अख्खी वस्तीच प्लेगच्या विळख्यात सापडल्याची बातमी गांधीजींपर्यंत पोचली. वस्तीला भेट देण्याची विनंती करण्यात आली. या वस्तीतले अर्ध्याहून अधिक कामगार हे खाणींमधे काम करायचे.

प्लेगच्या प्रादुर्भावामुळे अनेक मजुरांना मृत्यूला कवटाळावं लागलं होतं. अनेकांची प्रकृती अत्यंत नाजूक होती. परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन गांधीजी ताबडतोब त्या कामगार वस्तीत पोचले. २३ रूग्णांची सुटका केली. त्यांना उपचारासाठी जवळच्या एका रिकाम्या गोदामात नेलं. हा आजार इतरांपर्यंत पसरू नये हा त्यामागचा उद्देश. पण सकाळपर्यंत २० जणांचा मृत्यू झाला. दुसर्या  एका रुग्णाचाही प्लेगमुळे मृत्यू झाला. जवळपास हॉस्पिटलची सोयही नाही, हे बघून गांधीजींनी काही लोकांच्या मदतीनं एक बंद घर उघडलं. इथून तिथून काही ब्लँकेट आणि कॉट आणून घरालाच एका हॉस्पिटलमधे रूपांतरीत केलं.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?

जगाच्या तुलनेत भारत कसा लढतोय कोरोनाशी?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

आठवड्याभरात प्लेगच्या साथीवर नियंत्रण

आजूबाजूच्या लोकांना एकत्र करून त्यांना मदतीचं आवाहन करण्यात आलं. शेजारच्या लोकांनी आणि दुकानदारांनी पैशांसह आवश्यक असलेल्या वस्तू दिल्या. एक भारतीय डॉक्टरही प्लेगच्या रुग्णांना मदत करण्यासाठी धावून आला. गांधीजी, डॉक्टर आणि इतर स्वयंसेवक रात्रभर जागून रुग्णांची काळजी घेत. त्यातल्या बर्या च रुग्णांची प्रकृती अधिकच खराब होत चालली होती. हे पाहून गांधीजींनी बाकीच्या रुग्णांवर नैसर्गिक पद्धतीनं उपचार केले.

गांधीजींना प्लेगच्या रुग्णांची सेवा करताना पाहून अनेक लोक आपल्या जीवाची पर्वा न करता मदतीसाठी पुढं आले. त्यांची ही जिद्द पाहून अनेक जण त्यांच्यापुढे नतमस्तक झाले. आठवडाभरात प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळवलं. अनेक रुग्ण यातून सहीसलामत बाहेर पडले. पण एक नवीन संकट पुढे आलं.

हेही वाचा : कोरोना रोखण्यासाठी डिग्लोबलाइज होणं ही तर आपली घोडचूक ठरेल

गुलाम कामगारांचे तारणहार गांधीजी

प्लेगच्या साथीला मुळासकट उखडायचं असेल तर गुलाम कामगारांची वस्तीच जाळायला हवी असं तिथल्या स्थानिक नगरपालिकेचं म्हणणं होतं. ते आवश्यक होतं आणि त्यावाचून काही उपायही नव्हता. गांधीजींना मात्र ही गोष्ट काही पटली नाही. पण नाईलाज होता. त्यांनी समजवल्यावर स्थानिक भारतीय लोक तिथून जायला तयार झाले. त्यांच्या आयुष्याची सारी जमापुंजी ही झोपडपट्टीखाली गेली. 

झोपडपट्टी पाडल्यावर तिथून लोकांनी पैसे गोळा केले. ते त्यांनी गांधीजींकडे जमा केले. त्याचा हिशोब केला गेला तेव्हा ती रक्कम ६०,००० पौंड म्हणजे सध्याच्या ६० लाखांहून अधिक मोजली गेली. गांधीजींनी ही रक्कम बँकेत जमा केली आणि तिथल्या लोकांना मदत पोचवली. स्थलांतरामुळे लोकांचं खूप मोठं नुकसान झाली. मदत म्हणून गांधीजींमुळे त्यांची आठवड्याभराच्या रेशनची सोय झाली. अशाप्रकारे गांधींजी या सगळ्यांचे तारणहार बनले.

आपण डिसेंबरमधे कोरोनाची साथ सुरू झाली तेव्हा चीननं कसं आठवडाभरातच भलं मोठं हॉस्पिटल उभं केल्याच्या बातम्या ऐकल्या. सर्व सोयीसुविधा असलेल्या चीनच्या या अजस्त्र हॉस्पिटलची खूप चर्चाही झाली. पण गांधीजींना आत्तासारख्या कुठल्याच अत्याधुनिक यंत्रणा नसताना शंभर वर्षांपूर्वी हॉस्पिटलचा जुगाड जमवला होता. आणि लोकांना सोबत घेऊन बघता बघता प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळवलं.

हेही वाचा : 

अब आया वाधवान सातारा के पहाड के नीचे

बाहेरून आणलेलं सामानं वायरस फ्री कसं करावं?

कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

अमेरिकेला हवं असणारं औषधं भारतात कसं आलं, त्याची गोष्ट

ट्रम्प यांच्या धमकीला घाबरून भारतानं औषधावरची निर्यातबंदी उठवली?