नोबेल विजेती मलाला यूसुफजई काश्मीरवर काय म्हणाली?

१० ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा काढण्यात आलाय. हा विषय जगभरात चर्चेचा बनलाय. पाकिस्तानमधून भारताच्या या निर्णयावर जोरदार टीका होतेय. यातच शांततेचा नोबेल विजेत्या मलाला यूसुफजईची प्रतिक्रिया आलीय. काश्मीरबाबतच्या भूमिकेवरुन तिला बरंच ट्रोल व्हावं लागतंय.

जम्मू काश्मीरला कलम ३७० नुसार देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा रद्द करण्यात आलाय. जम्मू  काश्मीर आणि लडाख हे दोन केंद्रशासित प्रदेश बनवण्यात आले. ५ ऑगस्टपासून या एकाच विषयाभोवती जगाचं राजकारण फिरतंय. काहींना हा निर्णय योग्य वाटतोय. काहीजण विरोधातही बोलताहेत. या सगळ्यावर आता मलाला यूसुफजईनं ट्विटरवर आपलं मत मांडलंय. यावरुन तिला बरंच ट्रोलही केलं जातंय. मोठं मोठे सेलिब्रिटीही तिला ट्रोल करताहेत.

मलाला यूसुफजई हे नाव जगाला नवं नाहीय. पाकिस्तानमधल्या स्वात खोऱ्यात तिचं बालपण गेलं. इथंच तिनं तालिबान्यांची दडपशाही अनुभवली. पाकिस्तानमधे मुलींच्या शिक्षणासाठी या चिमुकलीनं लहान वयातच आवाज उठवला. त्यामुळे तिच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यातून ती वाचली. पुन्हा उभी राहिली. शांततेसाठी तिला नोबेल पुरस्कार मिळाला. ती जगभरात पोचली. कलम ३७० रद्द केल्यावर तिनं एक ट्विट केलं. त्यात काश्मीरमधल्या स्त्रिया आणि मुलांच्या प्रश्नावर ती बोलली.

हेही वाचाः काश्मीरच्या निमित्ताने द्वेषाचं कोडिंग करुन आपल्या मेंदूचं प्रोग्रामिंग सेट होतंय

तिच्या ट्विटचा मराठी अनुवाद

'जेव्हा मी लहान होते, माझे आई बाबा लहान होते, आजी आजोबा तरुण होते तेव्हापासून काश्मीरमधले लोक हे युद्धसदृश्य परिस्थितीत जगताहेत. गेल्या सात दशकांपासून इथली नवी पिढी हिंसेच्या वातावरणातच लहानाची मोठी होतेय. मला काश्मीरबद्दल बोलावं वाटतंय. कारण दक्षिण आशिया हे माझं घर आहे. १.८ अब्ज लोकांच्या घराची ही गोष्ट मी शेअर करतेय. यात काश्मिरीही सामील आहेत.

आपण सगळे एका वेगळ्या संस्कृती, धर्म, भाषा, खाद्य आणि प्रथा परंपरांचं प्रतिनिधित्व करतो. मला विश्वास आहे आपण सगळे शांततेत राहू शकतो. वेगवेगळी भिन्नता असलेली माणसं जगाला बऱ्याच गोष्टी भेट देतात. त्या सगळ्यांचं आपल्याला मोठं मोलं आहे.एकमेकांना धक्का लागावा किंवा त्रास व्हावा याची गरज नाही.

आज मला काश्मीरमधल्या महिला आणि तिथल्या मुलांच्या सुरक्षेची काळजी वाटतेय. कारण कोणत्याही लढाईचा, हिंसेचा सगळ्यात जास्त फटका महिला आणि लहान मुलांना बसतो. सगळे दक्षिण आशियायी, आंतरराष्ट्रीय समूह आणि संबंधित पक्ष काश्मिरींच्या अडचणींकडे लक्ष देतील, अशी मला अपेक्षा आहे. आपण कोणत्या एका मुद्याच्या बाजूनं असू अगर नसू हे तितक महत्वाचं नाही. महत्वाचं आहे ते मानव अधिकारांचं संरक्षण होणं. मुलं आणि महिलांच्या सुरक्षेला जास्त महत्व द्यायला हवं. सात दशकांपूर्वीचा काश्मीर मुद्दा हा शांततेनं सुटण्यावर लक्ष द्यायला हवा.'

आक्षेपाचे मुद्दे कोणते?

ट्विटरवर आपलं मत व्यक्त केल्यानंतर मलालाला ट्रोल केलंय. काही मुद्यांवर आक्षेपही घेतले जाताहेत. पाकिस्तानातल्या हिंदूंचा मुद्दा काढला जातोय. तर काहींनी बलुचिस्तानचा मुद्दा काढलाय. मलालाला विरोध करणाऱ्यांत सर्वसामान्य आहेत तसंच अनेक सेलिब्रिटीही आघाडीवर आहेत.

भाजपचे समर्थक असलेले अंकित जैन आपल्या ट्विटमधे म्हणतात,

आपण पाकिस्तानमधल्या ख्रिश्चन आणि हिंदूंच्या मानवी हक्कांसाठी बोलू नका. आपण बलुची लोकांच्या पाकिस्तानी सैन्यानं केलेल्या हत्याकांडावर बोलू नका. पाकव्याप्त काश्मीरमधल्या लोकांच्या मानवी हक्कांसाठी बोलू नका. तुम्ही ढोंगी आहात मलाला यूसुफजई.

सेवानिवृत्त आर्मी ऑफिसर मेजर गौरव आर्य यांनीही एक ट्विट केलंय. त्यांनी ट्विटरवर आपल्या बायोडेटात स्वतःची ओळख संरक्षण विश्लेषक म्हणून नमूद केलीय.  त्यांचं ट्विट जवळपास ५००० जणांनी शेअरही केलंय.

नमस्कार मलाला, तुम्ही कधी काश्मीर पाहिलेलं नाही. पण तुम्ही खूप आत्मविश्वासानं फील करत आहात. स्वातमधल्या आपल्या घरापासून बलुचिस्तान दूर नाही. आपण लहान होता तेव्हापासून बलुचींचाही संघर्ष सुरू आहे. तेव्हा आईवडील लहान होते आणि हो तुमचे आजी आजोबाही तरुण होते. घंटी वाजवा?

हेही वाचाः ३७० नाही, तर जम्मू काश्मीर केंद्रशासित करणं ही सगळ्यांत मोठी खेळी

कोण काय म्हणालं?

मानक गुप्ता आपल्या ट्विटमधे म्हणतात,

काश्मीरमधल्या पाकपुरस्कृत दहशतवादाविरुद्ध एक शब्दही नाही. जिच्यावर दहशतवादी हल्ला झाला तिची दहशतवादाविरुद्ध बोलण्याची हिम्मत नाही. मलाला तू आदर गमावलास.

अंशुल सक्सेना यांनी मलालाच्या ट्विटवर काही नवे मुद्दे उपस्थित केलेत. अंशुल हे राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र व्यवहाराचे विश्लेषक आहेत. ते लिहितात,

प्रिय मलाला, कृपया याबद्दलही  एक शब्द बोल.

१) पाकिस्तानी हिंदू मुली ज्यांचं अलीकडे अपहरण झालं आणि धर्मांतर
२) पाकिस्तानी ख्रिश्चन मुली ज्यांची चीनमधे तस्करी झाली
३) पाकिस्तानमधल्या अहमदी मुली ज्या भेदभावाला सामोरं जात आहेत.
४) पाकिस्तानच्या लष्करानं अपहरण केलेल्या मुली.

इन्फोसिसचे माजी सीएफओ मोहनदास पै यांनी मलालाचं वक्तव्य म्हणजे ढोंगीपणा असल्याचं म्हटलंय.

काय ढोंग, लज्जास्पद. मलाला पाकिस्तानच्या गरीब हिंदू मुलींच्या समर्थनासाठी उभी राहिली नाही. ज्यांना पळवून नेलं. बलात्कार केले. धर्मांतर केलं. आता निर्घृण भाष्य करत आहात. प्लिज भारताबद्दल बोलू नका. तुमची निवड, पूर्वग्रह, दुटप्पी भूमिका सर्व माहीत आहे.

आपल्या वादग्रस्त वक्तव्यानं नेहमी चर्चेत असणाऱ्या पायल रोहतगीनेही टीका करण्याची संधी सोडली नाही.

मलाला ही वीना मलिकची बीएफ बनलीय. स्त्रीवादी या मुळात ज्युनिअर आर्टिस्ट असतात. त्यांना दिवसाला ५०० रुपये पगार मिळतो. मलाला या ज्युनिअर कलाकारांच्या रिंग लीडर आहेत असं दिसतंय.

हेही वाचाः 

नरेंद्र मोदींच्या मॅन वर्सेस वाईल्डच्या ट्रेलरपेक्षा मिम्स जास्त इंटरेस्टिंग

सुपरहिरो खूप आहेत, पण ओबामांनाही आवडतो केवळ स्पायडर मॅनच!

विशेष दर्जा काढल्याने काश्मीरचा प्रश्न सुटला की अधिक गुंतागुंतीचा झाला?