माणिकराव जाधवांनी शरद पवारांना ईडीच्या फेऱ्यात कसं अडकवलं?

२९ सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ४ मिनिटं


विधानसभा निवडणुक आली. नेमका तेव्हाच शरद पवारांवर ईडीचा गुन्हा दाखल झाला आणि सत्ताधारी पक्षाकडे सगळ्यांचा रोष गेला. पण पवारांविरूद्ध कोर्टात याचिका  साखर कारखानदार, कामगार चळवळीचे नेते कॉम्रेड माणिकराव जाधव यांनी दाखल केली होती. पवारांविरूद्धचे सगळे पुरावे माणिक जाधव यांनी न्यायालयासमोर सादर केले आहेत. कोण हे जाधव, ज्यांच्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात खळबळ उडालीय?

आतापर्यंत महाराष्ट्राच्या किनाऱ्यावर असणाऱ्या ईडीच्या कारवाईने गेल्या महिनाभरापासून मराठी माणसाला आपल्या कवेत घेतलंय. राज्य सहकारी बँक घोटा प्रकरणी ईडीच्या एफआयआरमधे शरद पवारांचं नाव आल्याने तर देशभरातलं राजकारण ढवळून निघालंय. सरकारच्या सूडबुद्धीने पवारांना या प्रकरणात गोवलं जात असल्याचे आरोप होताहेत. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाकडून या कारवाईशी सरकारचा काहीएक संबंध नसल्याचं सांगितलं जातंय.

या सगळ्या प्रकरणात ईडीने हायकोर्टाच्या निर्देशावरून हा गुन्हा दाखल केलाय. माजी आमदार कॉम्रेड माणिकराव जाधव यांनी याप्रकरणी मुंबई हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल केलीय. या याचिकेवरील सुनावणीवेळी हायकोर्टाने गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिलेत. ऐन निवडणुकीच्या वेळी गुन्हा दाखल झाल्याने या साऱ्या कारवाईला राजकीय चष्म्यातून बघितलं जातंय. पण याचिका दाखल करणाऱ्या माणिकराव जाधवांचा सत्ताधारी पक्षाशी काहीएक संबंध नाही. जाधव यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा एक पोस्टवजा लेख ज्येष्ठ पत्रकार संजय जेवरीकर यांनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर शेअर केलाय. त्या लेखाचा हा संपादित भाग.

कोण हे माणिकराव जाधव?

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातलं जेवरी हे माझं गाव. याच गावचे रहिवासी कॉम्रेड माणिक जाधव यांनी गेल्या ४० वर्षांपासून महाराष्ट्रभर शेतकरी आणि कामगाराच्या आंदोलनाचं नेतृत्व केलंय. गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्रातली बुडत चाललेली साखर कारखानदारी हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता.

जेवरी गावाच्या मातीत बंडाची बीजे पेरली असावीत. माणिक जाधव याच मातीतले. साखर कारखाने, सूतगिरण्या आणि सहकारी संस्थांच्या बाबतीत एखाद्या वकीलापेक्षाही जास्त अभ्यास असलेला हा माणूस कधीच डगमगला नाही. लाचार होऊन कधी कुणाला सरेंडर झाला नाही. कामगारांच्या प्रश्नावर कायम बोलला. कधीही कुणाला याबद्दल भिक न घालणारा हा लढवय्या कामगार नेता आजही कामगारांच्या एक एक पैशातून उभारलेल्या कामगार भवनात राहतो.

आमदार झाला म्हणून कधी माजला नाही. तर पैसे नाहीत म्हणून कधी थकला नाही. एखादा लढा उभारला की त्याला शेवटपर्यंत न्याय देणारा हा मनुष्य गेल्या पाचदहा वर्षांपासून फारसा कुणाला भेटतसुद्धा नव्हता. अज्ञातवासात राहून त्यांनी कोर्टात शरद पवारांविरूद्ध लढा लढला. त्यासाठी महाराष्ट्र पिंजून काढून, सगळे बुडीत कारखाने धुंडाळून काढले. या सगळ्यानंतर आता हायकोर्टानेच या लढ्याची दखल घेतलीय.

हेही वाचाः ईडीच्या कारवाईचा फायदा पवार उठवणार की फडणवीस?

सध्याच्या सरकारचा दोष काय?

मागे मी आणि कॉम्रेड जाधव आम्ही दोघांनी मिळून किल्लारी साखर कारखान्याचा लढा उभारला होता. त्यावेळी जाधव यांनी शरद पवारांविरुद्धच्या या लढ्याविषयी सांगितलं. सगळे मोठे मासे गळाला लागणार असल्यामुळे यावर कोर्टात प्रचंड विचारविनिमय झाल्याचं जाधव म्हणाले. पवारांविरूद्ध जी याचिका दाखल झाली त्याला लागणारी सगळी कागदपत्रं माणिक जाधवांनी पुरवली आहेत.

माणिकराव म्हणायचे, 'मी खूप मेहनत करतोय मात्र प्रशासन यात लक्ष घालत नाही. इतके दिवस कोर्टात जातोय, मला यश मिळावं’ असं ते म्हणायचे. आज पुन्हा त्यांच्याशी बोललो. ते म्हणाले, ‘संजय, हे सगळे चुकीचं सुरू आहे. कार्यकर्ते रस्त्यावर काय येत आहेत, निषेध काय करत आहेत. खरं काय घडलंय हे त्यांना कुणीही सांगायला तयार नाही. यात सध्याच्या सरकारचा काय दोष आहे?’

'दोन्ही कोर्टानं शरद पवार यांना दोषी ठरवलंय. त्यामुळे कितीही आंदोलनं केली तरी आता त्यांची यातून सुटका नाही. यात अनेकजण मनी लाँड्रिंग केसमधे अडकणार आहेत. करोडो रुपयांचं कर्ज असताना हे कारखाने कवडीमोल भावात विकलेत. यात आलेला पैसा कुठेही जमा नाही. माणिकराव जाधवांनी कोर्टाला सगळे पुरावे दिलेत. इतकं सगळं असताना राजकारण करून प्रकरणाची दिशा बदलणार नाही.’

मग कोट्यवधींची रक्कम गेली कुठे?

'शरद पवारांनी महाराष्ट्रातले अनेक साखर कारखाने त्यांच्या बगलबच्यांच्या घशात घातलेत. ज्या कारखान्याच्या जीवावर महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं अनेकवार सत्ता हस्तगत केली, त्याच कारखान्यांचे बळी देवून शेतकऱ्यांचे जीव घेतलेत. अनेक कामगार देशोधडीला लागले ते यामुळेच. कारखाने सहकारी असताना तोट्यात चालवायचे आणि तेच कारखाने खासगी झाले की विक्रमी उत्पादन करायचं यांचं गणित काही आजपर्यंत समजलं नाही.’

'हजारो एकर जमीन घशात घालायची. कर्जाचे डोंगर चढवायचे. अख्खी एक बँक संपून गेली तरी कोणत्याही नेत्याला त्याचं सोयरसुतक असू नये, याचं उत्तर कोण देणार? आज शरद पवार यांच्यावर कारवाई होते तर सगळ्यांना त्यांचा पुळका आला. मात्र इतकी कोटींची रक्कम गायब झाली कुठं? हा प्रश्न एकाच्याही मनात आला नाही.’

हेही वाचाः दोनच कायद्यांचे अधिकार असूनही ईडी पॉवरफुल कशी?

कोर्टाच्या निकालपत्रकात पवार दोषी

माणिक जाधव खऱ्या अर्थानं हा लढा लढतायत. अण्णा हजारे, अॅडवोकेट सतीश तळेकर ही सगळी मंडळी अत्यंत हिमतीनं या लढ्याला यशस्वी करतायत. त्यांचं अभिनंदन करायला हवं. इतक्या सगळ्या दिग्गज नेत्यांविरोधात लढायचं ही काही छोटी गोष्ट नाही. सगळेच दिग्गज, टोळीनं कारखाने आणि बँका संपवणारी ही मंडळी भ्रमात राहिली. आमचीच सत्ता असल्यानं कोण काय करेल असं त्यांना वाटलं. मात्र न्यायदेवता आंधळी असली तरीही तिने डोळे उघडे ठेवून न्याय दिलाय.

माणिकराव जाधव म्हणतात, ‘आम्ही गेल्या २० वर्षांपासून कायदेशीर लढा लढत आहोत. राज्य सरकारनं दखल न घेतल्यामुळं आम्ही कायदेशीर लढाई लढत होतो. आता त्या लढाईला यश आलंय. याबाबतीत हायकोर्टानं सर्व कागदपत्रांची तपासणी करुन २२ ऑगस्ट २०१९ ला ८४ पानांचं निकालपत्र दिलं. या निकालपत्रात पान ६८ आणि ७९  वर शरद पवार यांच्या नावाचा ४ ठिकाणी उल्लेख आहे. त्यामुळे कलम १०९, १२० ब नुसार शरद पवार यांना दोषी ठरवण्यात आलंय.’

याबाबत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. त्यावर कोर्टाने निर्णय दिलाय. कोर्ट योग्य कारवाई करतंय. या प्रकरणात कुणीही ढवळाढवळ करण्याची गरज वाटत नाही, असं जाधव यांनी स्पष्ट केलं. दिल्लीच्या तख्तापुढं कधीही न झुकलेल्या शरद पवार यांना ईडीच्या फेऱ्यात अडकवणाऱ्या जेवरीच्या या कॉम्रेडला माझा लाल सलाम.

हेही वाचाः 

शरद पवार सांगतायत, सरकार तर आरएसएस चालवतंय

राज ठाकरेंच्या ईडी नोटीसमागे घोटाळा आहे की राजकारण?

आजोबांच्या वयाच्या शरद पवारांची तरुणांमधे क्रेझ का वाढतेय?

खरंच, भगतसिंगांची फाशी रोखण्याचा गांधींजींनी प्रयत्नच केला नाही?

लग्नासाठी जातधर्माचा विचार न करणाऱ्या तरूणांच्या शोधात गणेश देवी

(लेखक हे ज्येष्ठ पत्रकार आहेत.)