मनु मास्टर: मोहब्बत भरी दास्तान

०३ ऑक्टोबर २०२१

वाचन वेळ : ७ मिनिटं


अब्दुल मनाफ म्हणजेच 'मनु मास्टर' भरतनाट्यम नृत्यशैलीतले एक ज्येष्ठ नर्तक. केरळमधल्या एका मुस्लिम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. भरतनाट्यम या नृत्यशैलीची ओढ लागली आणि पुढे परंपरा आणि नाविन्याचा अनोखा मेळ घालत त्यांनी या कलेला एक नवा आयाम दिला. त्यांच्या नृत्यकारकीर्दीवर एक डॉक्युमेंटरी आलीय. या अभिजात नृत्यशैलीचा आढावा घेणारी ओंकार थोरात यांची फेसबुक पोस्ट.

कोणत्याही कलेचा विकास अनेक मार्गांनी होत असतो. नवतेचा ध्यास घेत ज्याप्रमाणं कलेचं रूप बदलत जातं त्याचप्रमाणे परंपरेची चिकित्सा आणि शोधाभ्यास, पुनरुज्जीवन या मार्गानेही ती विकसित होते. अर्थातच हा दीर्घकालीन कलाव्यवहाराचा भाग असतो आणि त्याच्या 'विकासातलं सत्व' हे काळाच्या कसोटीवर सिद्ध होणार असतं.

भारतीय अभिजात नृत्यशैलींच्या बाबतीत हा विकास किती व्यापक प्रमाणात होत आहे हा त्या नृत्यशैलींच्या व्यासंगी अभ्यासकांच्या संशोधनाचा आणि मांडणीचा विषय आहे. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलींच्या विकासाचा हा भाग गृहीत धरला तरी काही नर्तक नर्तकींच्या विशिष्ट नृत्यशैलीविषयक चिंतनाने, एकल - समूह सादरीकरणानं आणि गुरु- शिष्य परंपरेद्वारे दिलेल्या योगदानाने आपण स्तिमित होतो.

अलीकडेच 'भरतनाट्यम्' नृत्यशैलीमधले ज्येष्ठ नर्तक आणि गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व असणाऱ्या 'मनु मास्टर' यांच्या नृत्यकारकीर्दीवर आधारित डॉक्युमेंटरी पाहण्यात आली. 'मनु मास्टर' यांच्या व्यक्तिगत आयुष्यातले तपशील जाणून घेतल्यानंतर वाटलेलं किंचितसं आश्चर्य त्यांच्या नृत्यविषयक चिंतनानं त्यांचा नृत्यविचार जाणून घेण्याच्या औत्सुक्यात कधी बदललं  हे लक्षातही आलं नाही.

भरतनाट्यम देवदासींचं नृत्य होतं

भरतनाट्यम नृत्यशैलीचा उगमस्थानाचा विचार करताना अभ्यासक प्रामुख्यानं तमिळनाडूमधल्या 'तंजावर' जिल्ह्याचा उल्लेख करतात. भरतनाट्यमशी समांतर असणार्‍या नृत्यशैलीचा प्राचीन उल्लेख इ. स. सुमारे दुसऱ्या ते तिसऱ्या शतकात 'शिलप्पधिकारम' या तमिळ ग्रंथात सापडतो. तंजावरच्या 'चोल' आणि पुढच्या काळातल्या 'नायक' राजांनी भरतनाट्यमच्या कलाकारांचे आश्रयदाते म्हणून महत्त्वाची भूमिका निभावली.

भरतनाट्यमला पूर्वीच्या काळात प्रामुख्यानं मंदिरांमधे सादर होणारं देवदासींचं नृत्य म्हणून 'दासीअट्टम' अशी ओळख होती. कालांतरानं तंजावरच्या भोसले घराण्यातल्या राजांनी त्यांच्या या नृत्यशैलीला गौरवाचं स्थान दिलं म्हणून 'सदरआट्टम' या नावानेही हे नृत्य प्रचलित होतं. विसाव्या शतकात 'भरत' या नावाच्या विविध संदर्भांचा परिपाक म्हणून या नृत्यशैलीला 'भरतनाट्यम' हे नाव रूढ झालं.

आजच्या परंपरागत भरतनाट्यम पद्धतीचं आद्यप्रवर्तक म्हणून चिन्नया, पोन्नया, शिवनन्‍दम आणि वडिवेलू या चारही 'पिळ् ळै' बंधूंनी अतिशय महत्त्वाचं काम केलंय, असं अभ्यासक म्हणतात. या 'पिळ् ळै' घराण्यातले नर्तक, नृत्यशिक्षक किंवा वादक असो किंवा बालासरस्वती सारख्या नृत्यांगना हे सर्वजण 'देवदासी' किंवा नटुवरम घराण्यांशीच संबंधित होते.

हेही वाचा: मार्शल आर्टचा अनभिषिक्त सम्राट ब्रुस ली खूप मोठा फिलॉसॉफरही आहे

आंतरराष्ट्रीय ओळख रुक्मिणीदेवींमुळे

साधारणपणे १९३० पर्यंत तथाकथित उच्चवर्णीय कुटुंबांमधल्या मुलींनी भरतनाट्यम शिकणं तसंच सादर करणं समाजामधे निषिद्ध मानलं जायचं. भरतनाट्यमला शिष्टसंमत करणं आणि त्याच्या सादरीकरणामधे विशिष्ट बदल करण्याचं श्रेय 'रुक्मिणीदेवी अरुंडेल' यांना जातं.

सुरवातीच्या काळात रुक्मिणीदेवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांमुळे तसंच पुढे अनेक नर्तक, नर्तिकांच्या प्रयत्नांमुळे भरतनाट्यम या नृत्यशैलीचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रचार प्रसार झाला. त्याला ओळख मिळाली.

मनु मास्टर यांचा नृत्यप्रवास

भरतनाट्यम नृत्यशैलीमधली नृत्यसाधना हा ज्यांच्या आयुष्याचा ध्यास आहे अशा 'मनु मास्टर' यांचं मूळ नाव 'अब्दुल मनाफ' आहे. केरळमधल्या एका मुस्लिम कुटुंबात त्यांचा जन्म झाला. मनु मास्टर यांचे वडील सुफी तत्त्वज्ञानाचे अभ्यासक असल्यानं विविध क्षेत्रातल्या मंडळींचं त्यांच्या घरी येणं-जाणं असायचं.

मनु मास्टर यांनी मंदिर कला मानल्या गेलेल्या भरतनाट्यमबद्दल आपली आवड जाहीर केली त्यावेळी त्यांच्या वडलांच्या या मित्रमंडळींकडून बरंच सहकार्य मिळाल्याचं ते सांगतात. केरळमधे भरतनाट्यमचं प्राथमिक शिक्षण घेतलं आणि पुढं ते तमिळनाडूला गुरु 'मुथ्थुस्वामी पिल्लई' यांच्याकडे नृत्याच्या पुढील शिक्षणासाठी गेले.

कालांतरानं त्यांच्या गुरू चित्रा विश्वेश्वरण यांनी मनु मास्टर यांना प्रचंड प्रभावित केलं आणि त्यांच्या नृत्यप्रवासाला एक दिशा मिळाली. मनु मास्टर यांच्याशी संबंधित माहितीपट पाहिल्यानंतर आणि पुढे त्यांच्याशी संवाद साधल्यावर त्यांच्याबद्दल काही गोष्टी मला प्रकर्षानं जाणवल्या.

केवळ मनोरंजनाचं माध्यम नाही

मनु मास्टर हे स्वतःला आणि पर्यायानं त्यांच्या नृत्य साधनेलाही भारतीय तंत्रमार्गाशी जोडून घेतात. भारतीय तंत्रमार्गाचा विशेषतः काश्मीरी शैव तांत्रिकांच्या तत्वविवेचनाचा त्यांचा अभ्यास आहे. याच परंपरेतल्या अभिनवगुप्त रचित 'अभिनवभारती' ही भरतमुनींच्या नाट्यशास्त्रावरची सगळ्यात प्राचीन टीका मानली जाते.

नाट्यशास्त्रविषयक प्राचीन ग्रंथांचा व्यासंग ते आपल्या नृत्याशी जोडत असल्यामुळे स्वतःशी 'नृत्यसाधक' जोडणं त्यांना प्रिय वाटतं. भारतातल्या शास्त्रीय नृत्यकला या मनोरंजनासोबतच जीवनातल्या उदात्त उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी निर्माण झाल्यात, असं त्यांना वाटतं.

हेही वाचा: ईश्वरी अवतारापलीकडे माणूस म्हणून कृष्णचरित्र समजून घेऊया

नृत्यशैलीतल्या महत्वाच्या संकल्पना

एक नृत्यसाधक म्हणून मनु मास्टर यांनी भारतीय कलाक्षेत्राला दिलेलं योगदान मोठं आहे. भारतातल्या अभिजात नृत्यशैलींमधल्या 'लास्य' या संकल्पनेबद्दल जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला भारतातल्या प्राचीन संहितांचा आधार घ्यावा लागेल. भरतनाट्यमसाठी ज्या प्राचीन संहितांचा संदर्भग्रंथ म्हणून वापर केला जातो त्यामधे प्रामुख्यानं नंदिकेश्वराचं 'अभिनयदर्पण' भरतमुनींचं 'नाट्यशास्त्र' आणि शारंगदेवाचं 'संगीत रत्नाकर' यांचा समावेश होतो.

या ग्रंथांमधे लास्य किंवा लास्यांगाचे विविध प्रकार आणि त्यांचं स्वरूप विशद केलंय. भगवान शंकरानं केलेल्या नृत्याला 'तांडव' तर देवी पार्वतीनं केलेला नृत्याला 'लास्य' म्हटलं जातं. प्राचीन संहितांनुसार तांडव आणि लास्य ला अनुक्रमे भगवान शंकर आणि देवी पार्वतीशी जोडलं जात असलं तरी रूढार्थानं जोशपूर्ण, आवेशपूर्ण सादरीकरणाला तांडव तर सुकुमार, कोमल भावाभिव्यक्तीला लास्य म्हटलं जातं.

भरतमुनींच्या नाट्यशास्त्रात 'गेयपाद', 'स्थित-पाठ्य', 'आसिन', 'पुष्पगंडिक', 'प्रछेदक', 'त्रिशुल', 'सैन्धवाक्य', 'द्विधुधक', 'उत्तमोत्तम', 'उक्त-प्रयुक्त', 'विचित्रपाद', 'भवित' अश्या १२ लास्यांगांचा विचार केलाय. तर शारंगदेवाच्या 'संगीत रत्नाकर'मधे 'चाली' ,'चलिवाद' 'लाधी', 'सुक', 'उरांगन', 'धसक' 'अंगहार', 'ओथर', 'विहसी', 'मन:' या १० लास्यांगांच्या स्वरूपाचं विवेचन केलंय.

लास्यांग नृत्यशैलीचा प्रभाव

प्राचीन ग्रंथांपैकी अशोकमल्ल यांच्या 'नृत्याध्याया'मधे लास्यांगाची अधिक तपशिलात मांडणी करण्यात आलीय. अशोकमल्ल यांच्या मांडणीनुसार मार्गी लास्यांगाचे एकूण १२ प्रकार आहेत तर देशी लास्यांगाचे ३७ प्रकार सांगण्यात आले आहेत. भरतनाट्यमधे लास्यांगाचं सादरीकरण होताना विशिष्ट प्रकारच्या पदरचना, देहबोली, मुद्राभिनय, पदन्यास, तसंच विशिष्ट वाद्यांचा अंतर्भाव केला जातो.

पारंपारिक धाटणीनुसार 'शृंगार', 'करूण' आणि 'हास्य' रस हे लास्यांगाचे प्रमुख रस मानले जातात. भगवान श्रीकृष्णाचं गोपिकांसोबतचं रासनृत्य यालाही काही अभ्यासक लास्याचाच भाग मानतात. भारतातील अभिजात नृत्यशैलींमधल्या लास्यांगाच्या प्रभावाचा जो भाग आहे त्याचं सिंहावलोकन केलं तर, असं म्हणता येईल की, कोमल, डौलदार, हळुवार, सुकुमार नृत्याभिव्यक्तीला 'लास्य' संबोधलं जात असलं तरी त्यातले सुक्ष्म बारकावे हे विस्तारानं समजून घेण्याची गोष्ट आहे.

सादरीकरणातलं वेगळेपण

आता 'मनु मास्टर' यांच्या प्रयत्नांविषयी जाणुन घेऊ, त्यांनी तमिळनाडू, कर्नाटक, आणि आंध्रप्रदेश या भागातल्या मंदिरांवरच्या नृत्यशिल्पांचा अभ्यास करून भरतनाट्यममधे काही महत्त्वाचे बदल केले. त्यांच्या नृत्यशिल्पांचा अभ्यास आणि सादरीकरणात त्याचा अंतर्भाव आणि शिष्यांना जागृत करणं, असा आजही प्रवास सुरू आहे.

भरतनाट्यमच्या 'तंजावर'शैलीला आधारभूत मानूनच त्यांचे हे प्रयोग सुरू आहेत. काळाच्या ओघात भरतनाट्यममधे जे बदल झाले त्यामुळे विशिष्ट संदर्भात हे लास्य कमी झालं होतं. मंदिरांवरच्या नृत्यशिल्पांना अनुसरून 'मनु मास्टर' यांनी सादरीकरणामधे जे बदल केले त्यामुळे भरतनाट्यमधे लास्याचा अंतर्भाव वृद्धिंगत झाला, असं काही अभ्यासकांचं म्हणणं आहे.

मनु मास्टर यांच्या प्रयत्नामुळे भरतनाट्यममधल्या लास्यांगाचा प्रभाव वाढला. त्यांना विचारल्यावर मात्र ते म्हणतात की,  भरतनाट्यममधे त्यांनी केलेला कोणताही बदल हा मंदिरशिल्पांना प्रमाण मानून केलाय आणि हे करताना लास्य आणि तांडव यांच्या सादरीकरणात कुठंही कमीपणा येईल याचा विचार त्यांनी केला नव्हता.

हेही वाचा: फ्रेडरिक नित्शेः देव नाकारणाऱ्या समाजाला नैतिकतेचं नवं परिमाण देणारा सुपरमॅन

लास्य नृत्यशैलीत बदल

आता इथं एक प्रश्न स्वाभाविकपणे उपस्थित होईल की मंदिरांवरच्या नृत्यशिल्पांच्या निर्मितीकाळात नृत्यसादरीकरणात दिसणारी शरीराची विशिष्ट ठेवण आणि मुद्राभिनय जो लास्याच्या अधिक जवळ जाणारा होता तो पुढच्या काळात का कमी झाला? अशाच प्रकारचा बदल ओडिसी नृत्यासारख्या अभिजात नृत्यशैलीत झाल्याचंही काही अभ्यासक नोंदवतात.

ओडिसी नृत्यशैलीत महारीनीं जे लास्य रूढ केलं त्यामधे पुढच्या काळात गोटिपुआंनी ताठरपणा आणला. ओडिसी नृत्यशैलीत देवदासीं नर्तिकांना महारी तर नर्तकांना गोटिपुआ म्हटलं जायचं. महारी आणि गोटिपुआंनी ओडिसी नृत्याची परंपरा जोपसण्याचं काम दीर्घकाळापर्यंत केलंय. भरतनाट्यममधे मनु मास्टर यांंच्या निमित्तानं लास्याच्या संदर्भात जे बदल समोर आले त्याची कारणं सामाजिक, राजकीय जडणघडणींमधे शोधता येतील का? असा विचार येतो.

नृत्यातली मोहब्बत भरी दास्तान

'मनु मास्टर' यांच्या नृत्यविचारातला एक भाग हा 'मोहब्बत' या भावनेनं व्यापलेला आहे. म्हणूनच मनु मास्टरना नृत्य ही उपासना आहे, असं वाटतं. नृत्यसाधनेद्वारे आपण प्रेमस्वरूप परमात्म्याशी एकरूप होतो, असा त्यांना विश्‍वास वाटतो. व्यक्ती-व्यक्तीमधल्या प्रेममय संबंधांपासून ते व्यक्तीच्या निसर्गाशी असणाऱ्या भावबंधापर्यंत प्रेमाच्या बहुविध छटा हा त्यांच्या आस्थेचा विषय.

भरतनाट्यमच्या सादरीकरणामधे अंतर्भूत असणार्‍या काही पदांमधे जीवात्मा आणि परमात्मा आणि सद्गुरू यांच्यासाठी अनुक्रमे प्रियकर-प्रेयसी आणि सखी अशा उपमा वापरल्या जातात. त्यात सुफी रचनांमधल्या मधुराभक्तीमधे आढळणारं एकसमान तत्त्व शोधण्याचा प्रयत्न मनु मास्टर करतात म्हणूनच त्यांना 'तू' 'मी' पेक्षा 'आपण' हे सत्व ईश्वराच्या अधिक जवळ नेणारं आहे, असं वाटतं.

याच प्रेमस्वरूप ईश्वराची आराधना ते नृत्यसाधनेद्वारे करतात, अशी त्यांची श्रध्दा आहे. मनु मास्टर यांच्या या नृत्यविषयक चिंतनाचा अनुबंध आपल्याला जसा एका बाजूनं त्यांच्या तंत्रमार्गाशी जोडता येतो तसाच तो त्यांच्या सुफी तत्वज्ञानाच्या आस्थेचीशीही जुळवून पाहता येतो. तांत्रिकांची एक शाखा ही अद्वैत सिद्धांताला प्राधान्य देणारी आहे आणि त्याचाच अविष्कार आपल्याला संतांच्या मधुराभक्तीवर आधारित रचनांमधे दिसतो.

परंपरा आणि नाविन्याचा मेळ

आपल्याकडे संत ज्ञानेश्वरांच्या विराण्यांमधे जो ईश्वराशी एकरूप होण्यासाठीच्या आर्ततेचा भाव दिसतो त्याच्याशीच समांतर असणारा भाग आपल्याला सूफी संतांच्या रचनांमधेही आढळतो. या प्रकारच्या रचनांमधे मिलनाची ओढ असते, स्त्री-पुरुषांमधल्या शृंगारीक संबंधांना प्रेमाविष्काराच्या उदात्त पातळीवर नेण्याचं काम या रचनांनी केलंय.

याप्रकारच्या भक्तीरचना या समर्पणाची अत्यंत झळाळती अनुभूती देतात. या अशा अनोख्या प्रेमानुभूतीची ओळख झाल्यावर एखादा कलावंत आपल्या कलेच्या माध्यमातून जगातल्या अनंत गोष्टींशी समरस होऊ शकतो, हे मनु मास्टर यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येतं.

अब्दुल मनाफ म्हणजेच 'मनु मास्टर' यांच्या कलाभिव्यक्तिमागच्या प्रेरणांचा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की, 'एखादा प्रतिभावंत कलाकार जेव्हा परंपरा आणि नाविन्याचा अनोखा मेळ साधत त्याच्या कलेला एक नवा आयाम देत असतो तेव्हा ते एकूणच कलासृष्टीला त्या कलावंताकडून दिलेलं अपूर्व योगदानच असतं.

हेही वाचा: 

धम्मदीक्षा समारंभात मध्यरात्री कूठून आणली बुद्धमूर्ती?

संत चळवळ म्हणजे जगणं सुंदर करण्याचा मनोमन प्रयत्न

संत नामदेवांच्या अभंगवाणीत भारतीय संविधानातल्या मूल्यांचा जागर

बुद्ध विचारात सर्वसामान्यांना आपलंसं वाटणारं लोकशाहीवादी तत्त्वज्ञान

लोकांचा विज्ञानावरचा विश्वास कमी व्हावा यासाठीच धडपडताहेत आपले राजकारणी