'माणूस असण्याच्या नोंदी’ हा कवी मेघराज मेश्राम यांचा कवितासंग्रह. गाव-शहर-महानगर, जात-धर्म-वंश या सगळ्यांतून पुढे जाऊन माणसाला माणूस म्हणून जगता यावं, हे कवीचं कवितेचं नितळ मागणं पुस्तकभर पसरत जातं. प्रचंड कोलाहलात माणूसपणाची ओल शोधत निघालेली त्यांची कविता दखल न घेतलेल्या माणसांविषयी बोलत राहते. भेदाभेदाच्या खुणा गौण व्हाव्यात म्हणून धडपडणारी ही कविता आशावादाचं बीज पेरते.
विशाल झगमगाटातल्या दुनियेत आपल्या अस्तित्वाचा शोध घेत पदरी पडलेल्या निराशेशी संघर्ष उभा करताना कवी अभावग्रस्त जगण्याच्या नोंदी घेत जातो. आपल्या जगण्याचा भोवताली संदर्भ शोधताना दुःखाच्या मुळांचा शोध लागत नाही, तरी आपल्या समदुःखी बांधवांचा आवाज व्यवस्थेच्या पटलावर उमटवण्यात कवी आणि कविता यशस्वी होते. जगण्याच्या प्रदीर्घ प्रवासात कविता साथीला घेऊन निघालेला कवी ‘स्व’चा काठ ओलांडून समष्टीशी आपलं नातं घट्ट विणत जातो.
उजेडाचं सर्जन मांडण्याच्या प्रवासाला निघताना, नात्याच्या आतबाहेर दाटून आलेला काळोख झटकण्यासाठी कवी म्हणतो-
‘तू चालत ये ना पुढे मीही सरकतो जरा
तुझ्या-माझ्या दरम्यान उगवलेली दरी भरून टाकू मुळातून
घडवून आणू जिवाचे जिवाशी मीलन
मग बघ कसा होतो अंधाराचा स्फोट आणि उजेडाचे सर्जन’
उजेडाचे सर्जन रस्ते शोधताना वेदनेचा लाव्हा अखंड वाहत असला, तरी चांगल्या जगण्याच्या सामर्थ्याचा शोधही सुरू आहे. कवितेचा स्वर उजेडाची तिरीप आपल्या हाती घेऊन दुःखाच्या रस्त्यावर शाश्वत सुखकणांशी जोडताना कवी नात्याचे दोरही घट्ट विणत जातो.
हेही वाचा: ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ने मराठी कादंबरीला साचलेपणातून बाहेर काढलं
आपल्या आत धुमसत राहणाऱ्या प्रलयाशी सामोरं जाताना कवी आईविषयीचा प्रगाढ विश्वास व्यक्त करताना म्हणतो-
‘मी मिटलो तरी पुन्हा घालशील जन्मास
या शाश्वत सत्यापाशी येऊन थांबतो तेव्हा
सूर्य हसू लागतो मंद मंद’
हा विश्वास कवीचा एकट्याचा राहत नाही, तर जगण्याशी लढा देणाऱ्या सगळ्यांचाच होत जातो. ‘स्त्री’विषयीची अपार करुणा घेऊन निघालेली मेघराज मेश्राम यांची कविता कष्टकरी आईच्या उदरात जगकल्याणाचं महाकाव्य अंकुरावं म्हणून प्रार्थना करते.
भोगवादी जाणिवेने कष्टकरी जगण्याला यंत्र समजून प्रचंड राबणाऱ्या जीवांना तुडवलं जातं. आपल्या वाटा खुल्या केल्या असल्या आणि बोलणाऱ्याचे आवाज दडपले जात असले तरी आपण बोललं पाहिजे. शाश्वत-अशाश्वत जगण्याच्या धडपडीत जात-धर्म-लिंग, गरीब-श्रीमंत या भेदापलीकडे मानवी अस्तित्वाचा आवाज गडद होऊन त्याच्या ‘माणूस असण्याच्या नोंदी’ घेतल्या पाहिजे, या सत्याचा आवाज बनू पाहणारी मेघराज यांची कविता आपल्या भोवती पसरलेल्या हिंसक काळोखाला प्रश्न विचारत राहते.
‘माझ्या डोळ्यांचा प्रदेश का असा उजाड झाला
कोण उपटून घेऊन गेला विसाव्याची हिरवी झाडं
हा भार जखमांचा हलका का होत नाही
या दर्दभऱ्या पापण्या गळाभेट का घेत नाही’
हेही वाचा: विष्णू खरे : कवी गेल्यावर सोबत काय राहिलं?
अनेक पातळ्यांवर अनेक नोंदी घेतल्या जातात. अनेक शोध लावले जातात; पण भुकेच्या शमनाचा शोध लावलाही जात नाही आणि भुकेनं तडपून मेलेल्या जीवाची नोंद कुठं दिसतही नाही. यापलीकडे जाऊन जगण्याचे परीघ भेदण्याचा आणि रस्त्यावर पडलेल्या बेवारस प्रेताला माणूस म्हणून ओळखावे, रंग-धर्म-जात-प्रदेश या खुणा गौण व्हाव्यात म्हणून धडपडणारी मेघराज यांची कविता आशावादाचं बीज पेरत राहते.
आपण जन्मलो तेव्हा जात-धर्म-रंगाचा शिक्का मारला गेला. स्त्री-पुरुष भेद असं खूप काही सांगून झाल्यावरही मी माणूस आहे हे कधीच सांगितलं गेलं नाही. त्याची नोंद केली गेली नाही. शाळेत झालेला रंगभेद कवितेच्या आणि कवीच्या मनावर कोरला गेलाय. त्याचे व्रण जगण्यात उमटत राहतात.
एकदा गुरुजींनी कविता म्हण म्हटल्यावर आपल्या आत दाटून आलेला जखमांचा काळोखी पाऊस जगणं खरवडून व्यक्त होत गेला. ती ‘काळ्या पोराची कविता’ त्याची एकट्याची राहिली नाही. समग्र वर्ण-वर्ग जाणिवेच्या विरोधात आवाज बनून कुठलाही धार्मिक-वांशिक तेढ निर्माण न करता सकल माणसांची माणूस म्हणून नोंद व्हावी यासाठी झगडत राहिली.
‘त्यांनी उजेडाच्या झाडावर कुऱ्हाड चालवली आणि निर्धास्त झाले
काही दिवसांनी झाडाच्या बुंध्याला असंख्य फुटवे फुटून आले’
हेही वाचा: 'लाल श्याम शाह' हे पुस्तक मी का लिहिलं?
या आशेच्या पालवीवर जगण्याला भिडलं पाहिजे, आपण आपल्यासाठी उजेड पेरला पाहिजे म्हणून ही कविता थांबत नाही. ती वर्तमान स्थितीत सरकारी तख्त कुठले आदेश काढतंय? जनहित डावलून आवाज रोखणाऱ्या व्यवस्थेला लिहिणाऱ्या हाताला अडवताना पाहून या कवितेची वाटचाल लेखणी धारदार करण्याकडे सुरू होते.
तसं व्यवस्थेच्या मुजोरपणाविरोधात खूप लिहिलं गेलंय. लेखणीनं तख्त पलटल्याच्याही गोष्टी आपल्याला माहीत आहेत; पण मेघराज यांच्या कवितेतून येणारी संवेदना ती कुठल्याही एका समुदायापाशी येऊन थांबत नाही. ती सकल पीडित समुदायाचं माणूस असणं लावून धरते.
या कवितेत गाव-शहर-महानगर-जंगलामधून सरपटत जाणारं जगणं आपल्या कवेत घेताना जगण्याची अस्सीम उमेद पेरत माय-बाप-लेक-बायको भोवतालच्या जगण्यात तग धरून राहिलेल्या आया-बायांची दुःखं दूर व्हावीत म्हणून बोलत राहते.
‘या बाया अख्खं शेत सपासप कापतात यांच्या उभ्या जिंदगानीला झोंबलेलं दुःख केव्हा आडवं होईल?’
हेही वाचा: आगळ ही कादंबरी गाव आणि शहर यांच्यातला संवादसेतू
नात्याच्या जाणिवेबरोबर जगण्याच्या संवेदना पेरताना दुःखाच्या आवाजाची ओल आपल्या आत उमटून येण्याऐवजी दंतकथा पसरत जातात; पण हुंदक्यांची नोंद केली जात नाही. ‘तुळसाबाई’ या कवितेत कवी म्हणतो- ‘तिथे उगवले वृंदावन सांगत नवनवीन कथा/मात्र तुझ्या हुंदक्यांची गाथा/कधी तरलीच नाही बाई!’
स्त्रीच्या आदिम दुःखाशी बोलताना कवी इमलाबाईनं आपल्या असह्य वेदनेवर मार्ग काढल्याची नोंद एक परिवर्तनीय पाऊल म्हणून घेतो.
‘जाताजाता एकच बोलली-
भाऊ, उरल्यासुरल्या बांगळ्याही फोळून फेकल्या
हाताला चावून तरास देतात फालतू…’
शूर्पणखेवर झालेल्या अन्यायाला वाचा फुटली नाही. आज शेकडो स्त्रियांवर अन्याय होतात. ते दाबले जातात. या अशा अहंकारी जाणिवेला वेळीच ठेचलं पाहिजे. बाई, तू स्वतःच लढलं पाहिजे म्हणत व्यवस्थेच्या आणि अन्यायाच्या विरोधात लढलेल्या बळी गेलेल्या शंबुका, चेंदरू मडावी, मधू कडुकुमन्ना, आसिफा या व्यक्तिरेखा आपल्या समोर नुसत्या येत नाहीत, तर जळजळीत वास्तवाचं भान देऊन जातात.
कंबरेवर हात ठेवून वर्षानुवर्षे वाट पाहायला लावणाऱ्या विठ्ठलाला गाभारा सोडून येणार आहेस की नाही, असा थेट प्रश्न विचारत, तू नाही प्रतिसाद दिलास तर ‘शिलगावतोय मी माझ्या दुःखमाखल्या भाषेची वात’ अशी क्रांतीची भाषा बोलतानाही कवितेच्या आत संयम तग धरून राहतो.
हेही वाचा: तणसः संभ्रमित वर्तमानाचा तळशोध
सगळी परिवर्तनं आम्हाला मान्य आहेत. आपण चंद्रावर जाऊ, मंगळावर राहू, खूप काही करू पण ‘आज सुखानं कसं जगता येईल, एखादा इलाज सांग ना!’
उद्याच्या दिवसापेक्षा आजचा दिवस खूप महत्त्वाचा आहे. दिवसेंदिवस वेगवान झालेल्या आणि टोकदार जाणिवांना सामोरं जाताना आपण आपल्या घरातही व्यवस्थित पोचू शकत नाही. घरी उशिरा येताना बायकोला चिंता बाहेर मोकाट असलेल्या कुत्र्यांची वाटते आणि कवीला माणसाच्या जमावाची. हे भेदक वास्तव मेघराज मेश्राम यांची कविता मांडत जाते. रात्री अपरात्री जीव मुठीत घेऊन जगताना गावाची तीव्र आठवण कवीला येते. 'लहानशा गावात मी सुखी होतो, माणूस होतो महानगरात आलो आणि यंत्र झालो’
आपण माणूस असल्याची दखल गावाला आहे. गावातल्या माणसाला आहे. महानगरातलं जगणं वेगवान, नुसतं वेगवान, सारं यंत्र म्हणून भावभावना, सुख-दुःख सगळं गोठलेलं. फुटपाथवरचं जगणं त्याच्याही नोंदी घेताना महानगरीय उदासपण आणि यंत्रवत जगणं, इंटरनेटच्या जमान्यात कितीही जवळ आलो, आकाशात कितीही उंच गेलो तरी ‘भाकर करता येत नाही डाउनलोड’ म्हणत जगण्याच्या शाश्वतेवर आणि वास्तवतेवर जगताना माणूसपण शाबूत राहायला हवंय.
मानवी नात्याच्या खोल ओलीची गोष्ट करताना कवी आणि कविता स्त्रियांच्या जगण्यातल्या दुःखाबरोबर एवढी माया कुठून येते, यावर बोलण्याबरोबर महानगरीय आधुनिकतेची झूल पांघरणाऱ्या स्त्रिया लेकरांना दूध पाजवत नाहीत, याची चिंताही येते. आपल्या आत दाटून आलेल्या भावनांना वाट करून देताना कवी प्रार्थना करतो ती मनात घर करून राहते. ‘घेऊन चल मला त्या पवित्र स्थळी, घेऊन चल मला एखाद्या निरोगी शांतस्थळी जिथं गुडघे टेकून मी पसरवीन माझी रिकामी झोळी’
गाव-शहर-महानगर, जात-धर्म-वंश या सगळ्यांतून पुढे जाऊन माणसाला माणूस म्हणून जगता यावं, हे कवीचं कवितेचं नितळ मागणं पुस्तकभर पसरत जातं. प्रचंड वेगवान कोलाहलात माणूसपणाची ओल शोधत निघालेली मेघराज मेश्राम यांची कविता दखल न घेतलेल्या माणसांविषयी बोलत राहते. जगण्याचे खुले अवकाश शोधताना आपल्या वाट्याला आलेल्या असंख्य गोष्टी हिसकावल्या जातात. आपला भोवताल उजाड बनवला जातोय याची बोच कवितेबरोबर कवीलाही आहे.
कवितासंग्रह: माणूस असण्याच्या नोंदी
कवी: मेघराज मेश्राम
प्रकाशन: लोकवाङ्मय गृह
पानं: ७२ किंमत: १५०
हेही वाचा:
जे बोललो तेच लिहित गेलो: अनिल अवचट
तरुण संपादकांनी संपादित केलेले दिवाळी अंक
तंत्रज्ञानाच्या युगात अश्मयुगातल्या मानवी मेंदूचं काय होणार?
मराठीतलं ऐतिहासिक ललित लेखन म्हणजे फॅन फिक्शन: नंदा खरे
संमेलनाध्यक्ष फादर दिब्रिटोंच्या भाषणाचं सारः लेखक हुजऱ्या नसतो