आपण वापरत असलेल्या कॅलेंडरला आहे हजारो वर्षांचा इतिहास

०२ जानेवारी २०२०

वाचन वेळ : ३ मिनिटं


आज नवीन वर्षाची सुरवात होतेय. आपल्या कॅलेंडरवरचं वर्षही बदललंय. पण याच कॅलेंडरला अनेक वर्षांचा इतिहास आहे. रोमन, ज्युलियन, ग्रेगरियन कॅलेंडर असा प्रवास कॅलेंडरनं केलाय. कॅलेंडरवरच्या वेगवेगळ्या तारखांप्रमाणे जगभरातल्या देशांचं सेलिब्रेशनही बदलतंय.

कॅलेंडर ही अशी गोष्ट आहे जी आपल्याला नेहमी समोर लागते. त्याशिवाय दिवस जाणं तसं कठीणच! आपण रोज जे कॅलेंडर वापरतो त्याच्यामागे अनेक वर्षांचा इतिहास आहे, ही गोष्ट तक्वचितच कुणाला माहित असते. ज्युलियन आणि ग्रेगेरियन कॅलेंडर हे या इतिहासातले महत्वाचे टप्पे आहेत. ग्रेगरियन कॅलेंडर हे आज जगभरात फेमस झालंय. इतकंच काय संस्कृतीचा एक भागही बनलंय.

अगदी सुरवातीला रोमन कॅलेंडर प्रचलित होतं. रोममधल्या लोकांनी ते ग्रीकांकडून घेतलं होतं. हे  कॅलेंडर आत्तासारखं नव्हतं. तर १० महिने ३०४ दिवस असं त्याचं स्वरूप होतं. ज्युलियन कॅलेंडर हे इसवीसन पूर्व ४५ मधे अस्तित्वात आलं. या कॅलेंडरनुसार जानेवारी हा वर्षातला पहिला महिना ठरला. तेव्हापासूनच जगातील बर्‍याच भागात १ जानेवारी हा दरवर्षी नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून साजरा केला जातो.

ज्युलियस कॅलेंडरची कहाणी

रोमचा तत्कालीन राजा बनल्यानंतर ज्युलियस सीझरने आधीपासून अस्तित्वात असलेल्या रोमन कॅलेंडरमधे सुधारणा करायचं ठरवलं. इसवीसन पूर्व ७ व्या शतकापासून चालत आलेल्या रोमन कॅलेंडरमधे चंद्राच्या बदलत्या कालगणनेनुसार दिवस ठरवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु बर्‍याचदा वातावरणामुळे चंद्राचं चक्र थोडंसं बदलत असे आणि त्यानुसार दिवसही पुढे - मागे सरकवावे लागत होते.

नवीन कॅलेंडर डिझाइन करण्यासाठी सीझरने अलेक्झांड्रियाचा प्रसिद्ध खगोलशास्त्रज्ञ सोशिओजेन्सची मदत घेतली. त्याच्या सल्ल्यानुसार कॅलेंडरसाठी चंद्राच्या कालगणनेऐवजी सोलर सायकलचा आधार घेण्यात आला. त्याच्या या नवीन कॅलेंडरमधे ३६५ दिवसांचे एक वर्ष मानण्यात आलं. सौरवर्षाच्या कालावधीचा अंदाज मात्र यात १९ मिनिटं १४ सेकंदांनी चुकत होता.

असं आलं 'ग्रेगरियन' कॅलेंडर

इ.स.पू. ४४ मधे सीजरची राजकीय कारणांवरुन हत्या झाली. त्यानंतर ऑगस्टस सत्तेवर आला. जानेवारी ते जुलैपर्यंतच्या महिन्यांची नावं ही सीजरनं स्वत: लिहून ठेवली होती. त्याच्या मृत्यूनंतर ऑगस्ट महिन्याचं नाव सेक्टिलिस हे नाव बदललं. ऑगस्टसने आपल्या नावावरुन ते ऑगस्ट असं केलं.जानेवारीला नवं वर्ष साजरं होतं होतं. १५ व्या शतकाच्या मध्याला येईपर्यंत एका वर्षामधे दहा दिवसांचं अंतर आलं. रोमच्या चर्चने यात हस्तक्षेप केला.

त्यानंतर प्रत्यक्षात आलं ग्रेगरी कॅलेंडर. हे जगातलं सगळ्यात जास्त उपयोगात येणारं कॅलेंडर आहे. ज्युलियन कॅलेंडरचं हे त्याचं मूळ रूप होतं. आवश्यक सुधारणा करून पोप ग्रेगरी १३ वा याने ते नव्यानं आणलं.

हेही वाचा: कोलाजचा पहिला बड्डेः अभिनंदन नहीं करोगे हमारा!

ग्रेगेरियन कॅलेंडरमधले बदल

या कॅलेंडरनुसार ३६५ दिवसांचं एक वर्ष होतं. तर प्रत्येक चौथं वर्ष हे ३६६ दिवसांचं अर्थात लीप वर्ष म्हणून ओळखलं जातं. सूर्याच्या कालगणनेवर आधारलेलं हे कॅलेंडर होतं. १,४६,०९७ दिवसांनी ते बदलतं. एकूण ४०० वर्षांमधे ते विभागलंय. यात २०८७१ आठवडे असतील असं नमुद केलंय. या ४०० वर्षांमधे ३०३ वर्ष ही सर्वसाधारण असतील.उरलेली ९७ वर्ष लीप वर्ष असतील.

प्रत्येक वर्षात ३६५ दिवस, ५ तास, ४९ मिनिटं, आणि १२ सेकंद. हे सगळं पोप ग्रेगोरी याने लागू केलं. ज्युलियन कॅलेंडरमधे ज्या त्रुटी होत्या त्यामधे सुधार करून ग्रेगरीने त्याला नवं रूप दिलं. पोप ग्रेगरी तेरावा यांने हे कॅलेंडर प्रचारात आणलं. त्यामुळेच याला 'ग्रेगेरियन कॅलेंडर' असं म्हणतात. याला ख्रिस्ती, न्यू स्टाइल, इंग्रजी कालगणना अशीही नावं आहेत.

प्रत्येक संस्कृतीचं कॅलेंडर वेगळं असतं

आज अनेक देशांमधे ग्रॅगेरियन कॅलेंडरची चलती आहे. अनेक देश पारंपरिक कॅलेंडरचा वापर करतात. काळाप्रमाणे देशांनीही आपली कॅलेंडर बदललेली दिसतात. हिब्रू आणि इस्लामी प्रकारातली कॅलेंडर चंद्राच्या कालगणनेवर अवलंबून होती. इस्लामिक, संवत्सर, जैन, बुद्धिस्ट कॅलेंडरही वापरात होती. इजिप्त संस्कृती, बॅबोलियन संस्कृती, ख्रिश्चियन संस्कृती, ग्रीक संस्कृती, रोमन संस्कृती, तसेच भारतीय संस्कृती यामागे होत्या.

अनेक संस्कृतींचा आधार  घेऊन कॅलेंडर तयार होत होती. मॅक्सिकोतली मायन संस्कृती यांचं उदाहरण आहे. मॅक्सिकोच्या यूकाटन नावाच्या भागात कधीकाळी माया नावाचा समुदाय रहायचा. त्यांची एक संस्कृती होती. माया नावाचं त्यांचं एक स्वतंत्र कॅलेंडरही होतं. विशेष म्हणजे कॅलेंडरनुसार वीस-वीस दिवसांचे १८ महिने असायचे. तसेच ३६५ दिवस पूर्ण करण्याकरता ५ दिवस जास्तीचे जोडले जायचे. या ५ दिवसांना मायन संस्कृतीमधे अशुभ मानलं जायचं.

हेही वाचा: नव्या वर्षात यूएनने ‘झाडं जगवा, जीव वाचवा’ असा नारा का दिलाय?

भारतीय कॅलेंडरचा इतिहास

भारतात सध्या १२ कॅलेंडर वापरात आहेत. त्यातले शक संवत आणि संवत विक्रम हे प्रचलित आहेत. संवत विक्रमचा जनक हा सम्राट चंद्रगुप्त विक्रमादित्य मानला जातो. इसवी सन पूर्व  ५७ मधे उज्जयनीमधे शकांचा पराभव केल्यावर त्यानं हे सुरू केलं. या कॅलेंडरची कालगणना ही सूर्य, चंद्राचा विचार करून केली गेली. कॅलेंडरनुसार नवीन वर्षाची सुरवात चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून ते चैत्र नवरात्र अशी होते.

शक संवत ही आपल्या भारताची राष्ट्रीय कालगणना आहे. शक संवतची इसवी सन ७८ मधे सुरवात झाली. २२ मार्च १९५७ ला भारत सरकारने त्यात काही बदल करून त्याला राष्ट्रीय कालगणनेचं स्वरूप दिलं. त्यानुसार पहिला महिना हा चैत्र आणि अखेरचा महिना फाल्गुन ओळखला जातो.

कॅलेंडरच्या तारखांप्रमाणे नवीन वर्ष

श्रीलंकेत सिंहली आणि तमिळ हिंदू हे १३, १४ एप्रिलला आपलं नवीन वर्ष साजरं करतात. तर कंबोडिया आणि व्हिएतनाममधे १३ ते १५ एप्रिल दरम्यान नवीन वर्षाची सुरवात होते. वेगवेगळ्या धार्मिक ठिकाणांना भेटी देऊन नवीन वर्षाची सुरवात केली जाते. सर्बिया, रुस, युक्रेनचे लोक ग्रॅगेरियन नव वर्षासोबत ज्युलियन नवं वर्ष १४ जानेवारीला साजरं होतं.

तर म्यानमारला १३ ते १६ एप्रिल दरम्यान नवीन वर्षाचं जंगी स्वागत केलं जातं. त्याला 'तिंनाज' म्हणतात. कारण हा जल्लोष तीन दिवस असतो. चीनमधे तर २१ जानेवारी ते २० फेब्रुवारी दरम्यान वेगवेगळ्या तारखांत नवीन वर्षाची धूम असते. त्यासाठी ७ दिवसांची सरकारी सुट्टीही दिली जाते.

हेही वाचा: 

महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचे आठ सोप्पे अर्थ

२०१९ चा निरोपः जगाच्या सारीपाटावर परिणाम करणाऱ्या पाच घटना

राष्ट्रपती राजवटीसाठी तत्पर असणारे राष्ट्रपती सिनेमाबद्दल उदासीन का?

लोकसभा सदस्यांची संख्या वाढवून प्रतिनिधित्व मिळणार की वाद होणार?