मुंबई का किंग कौन? मराठी मतदार तर नाही ना!

२७ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


सत्या सिनेमात भिकू म्हात्रे समुद्रकिनाऱ्यावरच्या खडकांवर उभं राहून ओरडतो, मुंबई का किंग कौन? आताच्या लोकसभा निवडणुकीत याचं उत्तर मिळणार आहे. मुंबईच्या सहा मतदारसंघातून कोण निवडून येणार, यावर मुंबईचं राजकीय भवितव्य ठरेल. इतर कुठल्याही समूहापेक्षा मराठी भाषकांचं मतदान निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. कारण इतरांच्या मतांचं ध्रुवीकरण आधीच झालंय. आता भांडण सुरूय ते मराठी मतांसाठी.

मुंबई तऱ्हेतऱ्हेच्या रंगात रंगलेली मायानगरी. पोर्तुगीज राजाने आपल्या पोरीच्या लग्नात इंग्लंडच्या राजाला हुंडा म्हणून ही मुंबापुरी दिली, तेव्हापासून जगभरातले लोक इथे चुंबकाला टाचण्या चिकटाव्या तसे खेचले जात आहेत. त्यामुळे तिचं रूप एका साच्यातलं कधीच नव्हतं. लोकशाहीची कवाडं उघडल्यानंतर सुरवातीला पारशांनी, नंतर गुजरात्यांनी तिच्यावर राज्य केलं.

हेही वाचाः मोदींना पंतप्रधान बनायचं, तर मुंबई जिंकावी लागेल

संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाने इथला मराठी माणूस जागा झाला आणि मराठी माणूस निवडणुकीत जिंकू लागला. त्यामुळे महापालिकेपासून लोकसभेपर्यंत बहुसंख्य मराठी प्रतिनिधी निवडून देण्याचा मुंबईचा इतिहास फार तर महाराष्ट्राच्या निर्मितीपासून १९६० पासूनचा आहे. आताचे मुंबईतले खासदारकीचे उमेदवार पाहिले तरी त्यात मुंबईचं कॉस्मोपॉलिटन मिक्श्चर दिसतं.

अशा आहेत मुंबईतल्या लढती

दक्षिण मुंबईत शिवसेनेचे अरविंद सावंत विरुद्ध काँग्रेसचे मिलिंद देवरा

दक्षिण मध्यमधे राहुल शेवाळे विरुद्ध काँग्रेसचे एकनाथ गायकवाड

उत्तर मध्यमधे भाजपच्या पूनम महाजन विरुद्ध काँग्रेसच्या प्रिया दत्त

वायव्य मुंबईत शिवसेनेचे गजानन कीर्तीकर विरुद्ध काँग्रेसचे संजय निरुपम

ईशान्य मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील विरुद्ध भाजपचे मनोज कोटक

उत्तर मुंबईत भाजपचे गोपाळ शेट्टी विरुद्ध काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर

यातल्या बहुसंख्य लढती थेट आहेत. अपवाद थोडाफार फक्त वायव्य मुंबईत बसपाचे सुभाष पासी यांचा. मुख्य १२ उमेदवारांचा विचार केला तर ७ जण मराठी आहेत. मराठी भाषकांची संख्या साधारण ३७ टक्के असल्याचं दिसतं. त्या तुलनेत हे प्रमाण बरंच म्हणायचं.

हेही वाचाः शरद पवारांसाठी बारामतीपेक्षा मावळ, शिरूर, शिर्डी महत्त्वाचे

शिवसेनेचे तीन आणि राष्ट्रवादीचा एक असे सगळेच उमेदवार मराठी आहेत. काँग्रेसच्या ५ पैकी एकनाथ गायकवाड, उर्मिला मातोंडकर हे मराठी, प्रिया दत्त पंजाबी, संजय निरुपम बिहारी आहेत. मिलिंद देवरा मारवाडी, पण त्यांच्या आई मराठी. भाजपचे गोपाळ शेट्टी हे कन्नड, मनोज कोटक गुजराती आणि पूनम महाजन मराठी. महाजनांचं मूळ तेलंगाणात. पण आता त्यांना मराठीच म्हणायचं.

उत्तर भारतीय मतांचं समीकरण

गेल्या वीसेक वर्षांत उत्तर भारतातून मोठ्या संख्येने आलेल्या गरीब मतदारांचं प्रमाण दखल घेण्याइतपत वाढलंय. त्यामुळे त्याचा टक्का कोणाकडे जाणार, याचा बराच विचार केला जात होता. २०१४ला हा टक्का एकगठ्ठा मोदींना मतदान करताना दिसला. कारण उत्तर प्रदेश आणि बिहार ठामपणे मोदींच्या पाठीशी होता. उत्तरेत जसं वातावरण फिरतं तसा मुंबईतला उत्तर भारतीय मतदान करतो.

यंदा उत्तर प्रदेशातलं वारं समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या महागठबंधनचं आहे. मुंबईत महत्त्वाचा ठरणारा कष्टकरी उत्तर भारतीय महागठबंधनकडे वळताना दिसतोय. ब्राह्मण ठाकूरांमधे अजूनही मोदींची क्रेझ आहे. पण राहुल बेटा आणि प्रियंका बिटियाविषयी ममत्व असणारे आणि मोदींविषयी अपेक्षाभंग झालेल्यांची संख्याही लक्षणीय आहे.

हेही वाचाः पुढचे चार टप्पे ठरवणार मोदी जिंकणार की हरणार?

विशेषतः वायव्य मुंबईत उत्तर भारतीय मतदार निर्णायक ठरतो. संजय निरुपमना त्यांच्या जिवावर निवडून यायचंय. पण मुंबईत उत्तर प्रदेशात जाऊन बसपाचे आमदार झालेले सुभाष पासी किती मतं खातात, त्यावर त्यांचं भवितव्य अवलंबून आहे. पण निरुपम मेहनतीत कुठेच कमी पडत नाहीत. प्रचारात ते पटाईत आहेत. आता ते मराठी मतांत किती फूट पाडू शकतात त्यावर त्यांचं भवितव्य अवलंबून आहे.

कोणता झेंडा घेऊ हाती?

मराठी मतांत फूट पडू शकते का? तर ती कायमच पडते. त्याची संख्या ३७ टक्के असली तरी मराठी हाच मुंबईतला सर्वात मोठा भाषिक समूह आहे. त्यांच्यात अल्पसंख्यांक मानसिकता रुजवायचा कितीही प्रयत्न केला तरी तसं वास्तव नसल्यामुळे ती रूजत नाही. त्यामुळे तो इतरांसारखं एकगठ्ठा मतदानही करत नाही.

शिवसेना, मनसे आणि आंबेडकरी पक्षांना मतदान करणारे मराठी मतदार बेंबीच्या देठापासून बोंबाबोंब करतात. त्यामुळे ते कळतात. बाकी काँग्रेस आणि भाजपचा मराठी मतदार हा सायलेंट वोटर आहे. तो २०१४ला मोठ्या संख्येने भाजपकडे गेला होता. आता मात्र तशी परिस्थिती नाही.

हेही वाचाः पुढचे चार टप्पे ठरवणार मोदी जिंकणार की हरणार?

शिवसैनिक यावेळेस शिवसेनेवर नाराज दिसतोय. तो मोठ्या संख्येने मैदानात उतरलेला नाही. परिणामी मुंबईतली निवडणूक नेहमीपेक्षा शांत आहे. त्याची मानसिकता प्रस्थापित विरोधी आहे. त्याला अंगावर आलेल्याला शिंगावर घ्यायला आवडतं. त्यामुळे विधानसभा आणि महापालिका निवडणुकांत तो पेटून उठला होता. भाजपशी युती झाल्यामुळे त्यावर बदाबदा पाणी ओतलं गेलंय. तो भाजपला मतदान करेल का, याविषयी शंका निर्माण व्हावी असं वातावरण मुंबईत फिरताना स्पष्टपणे दिसतं.

मराठी मतदानाचा एक नवा पॅटर्न

मात्र शिवसेनेला मतदान करायलाही शिवसैनिक पूर्वीच्या आवेशाने बाहेर पडण्याची शक्यता कमीच. त्याला राज ठाकरेंची भाषणं पटत आहेत. त्याचा प्रभाव पडून मोदींवरच्या रागापायी शिवसेनेपासून दूर राहिला. तर सेनेचे मुंबईतले तिन्ही उमेदवार अडचणीत येऊ शकतात.

मराठी मतदारांचा एक नवाच पॅटर्न २०१४पासून महत्त्वाचा ठरतोय. तो शिवसेनेला कंटाळलाय आणि त्याला भाजपचं आकर्षण आहे. विधानसभा आणि महापालिका निवडणुकांत मराठीबहुल भागांतही भाजपला झालेलं मोठं मतदान तेच दाखवते. आता हा मतदार शिवसेनेला मतदान करणार का? आणि त्यांचं भाजपकडूनही मोहभंग झालाय का? या प्रश्नांची उत्तरं दक्षिण मध्य, उत्तर आणि ईशान्य मुंबईतलं मतदान पाहिल्यावर मिळू शकतील.

हेही वाचाः एक्झिट अंदाजः १४ मतदारसंघात कोण जिंकतंय ते इथे वाचा

गुजराती, मुस्लिम मतदान ठरलंय

गुजराती आणि मारवाडी मतदार गेल्या वेळेसारखा एकगठ्ठा कमळाला मतदान करणार नाही. कारण त्यांच्यातला एक मोठा भाग मोदींवर नाराज आहे. त्यात मुकेश अंबानींनी काँग्रेसच्या मिलिंद देवरांना मतदान करण्याचं आवाहन केलंय. त्यांना रोल मॉडेल मानणाऱ्यांची मुंबईत मोठी संख्य़ा आहे. हे आणि असेच आणखी दोन चार फॅक्टर जरी शोधले तरी गुजराती, मारवाड्यांचं किमान ७५ टक्के मतदान भाजपकडेच जाऊ शकतं. शिवसेना असेल तिथे हे थोडं कमी होईल.

तेच मुस्लिमांच्या मतदानाचंही आहे. ते काही बोलत नाहीत. पण यावेळेस त्यांनी एमआयएमच्या नादाला न लागता काँग्रेसकडे जाण्याचं ठरवलेलं दिसतंय. नवबौद्धांची एक स्वतंत्र वोटबँक आहे. त्यातले कट्टर कार्यकर्ते वगळता सर्वसामान्य मतदार काँग्रेसकडे जाण्याच्या मानसिकतेत दिसतोय. इतर छोटे छोटे भाषक गट हे मागच्या वेळेस मोदी लाटेचा भाग होते. आता ते पूर्वीप्रमाणे स्थानिक प्रभावातून मतदान करताना दिसतील.

हेही वाचाः प्रस्थापितांना धक्का हा महाराष्ट्रातल्या मतदानाचा ट्रेंड आहे?

मराठी एकगठ्ठा तरच शिवसेनेला यश

मुसलमान असोत किंवा गुजराती मारवाडी, सगळ्या समाजगटांनी आधीच आपलं मतदान कोणाला जाईल, हे ठरवलंय. अशावेळेस मुंबईतला मराठी मतदार महत्त्वाचा ठरणार आहे. तो एकत्र राहिला, तर शिवसेनेचे तिन्ही उमेदवार जिंकतात. पण त्यात फूट पडली तर एकही जिंकण्याची शक्यता नाही. अगदी हमखास जिंकतील असं वाटणारे राहुल शेवाळेंचीही हमी देता येणार नाही.

मिलिंद देवरांसाठी मुस्लिम मतदारांच्या सोबतीला मराठी मतदारांमधला एक भाग आला, तर तेही जिंकू शकतात. प्रिया दत्त यांनाही मुस्लिम मतांची खात्री आहे. त्यात शिवसेनेचे मतदार वळले तर मागच्या वेळेस खंडित झालेली दत्त घराण्याची विजयाची परंपरा त्या सुरू ठेवू शकतात. महाजन यांनी मराठी मतदार गृहित धरता येईल, अशी परिस्थिती नाही.

हेही वाचाः एक्झिट अंदाज: दुसऱ्या टप्प्यात कोण जिंकलंय, कोण हरलंय?

उत्तर, ईशान्येत मराठी मतांची परीक्षा

मात्र मराठी मतदारांचा सर्वाधिक महत्त्व आलंय ते उत्तर आणि ईशान्य या भाजपच्या बालेकिल्ल्यांत. आश्चर्य वाटेल पण ईशान्य मुंबईत मराठी मतदारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यामुळे त्या मतदारांसाठी किरीट सोमय्यांचं तिकीट कापण्यात आलं. उत्तर मुंबईचा तोंडवळा गुजराती असला तरी तिथेही मराठी भाषिक मतदारच सर्वाधिक संख्येने आहे.

या दोन्ही मतदारसंघात भाजपचा कट्टर मराठी मतदार भाजपकडे जाईलच. पण बाकीचे मराठी मतदार कोणाकडे जाणार हा प्रश्न आहे. कारण दोन्ही मतदारसंघात भाजपचे उमेदवार अमराठी आहेत. पण उत्तरेत काँग्रेसच्या उर्मिला मातोंडकर आहेत, तर ईशान्येत राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील आहेत. या दोन्ही उमेदवारांना मिळणारा प्रतिसाद भाजपला धडकी भरवणारा आहे. भाजपसाठी अजिंक्य ठरू शकतील अशा या दोन्ही सीट मराठी मतदारांमुळे चांगल्याच स्पर्धेत आल्या आहेत.

तिथे कोण जिंकणार हे मराठी मतदार ठरवणार आहे. खरं तर मुंबईतल्या सगळ्या सहाही जागा कोण जिंकणार हे मराठी मतदारच ठरवणार आहे. तरीही मराठी अस्मितेचं राजकारण करणाऱ्या शिवसेनेसाठी ही आनंदाची बातमी नाही. कारण हा परंपरागत शिवसेनेचाच मतदार आहे. तो शिवसेनेपासून हलत असेल, तर त्याचा दूरगामी परिणाम मुंबईच्या राजकारणावर होऊ शकतो.

हेही वाचाः 

वाराणसीत काँग्रेसने प्रियंका गांधींना तिकीट का दिलं नाही?

उर्मिला मातोंडकरसाठी उत्तर मुंबईचा गड अवघडच