वाचा मटका किंग रतन खत्रीची सगळी कुंडली

२० मे २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


मटकाकिंग रतन खत्री याचं नुकतंच निधन झालं. मटक्याच्या जुगाराशी हे नाव कायमचं  जोडलं गेलं होतं. छोट्यात छोट्या गावांपासून हायफाय महानगरांपर्यत मटक्याचं जाळं आणि जादू आजही ओसरलेली नाही. या मटक्याची आणि त्याचा राजा रतन खत्री ही जन्मकुंडली.

'महात्मा' ही ओळख होण्यासाठी किमान लोकहिताचा, लोककल्याणाचा विचार आचार असावा लागतो. तशी अट 'धर्मात्मा' होण्यासाठी नसते. म्हणूनच द्रौपदीला परस्पर द्यूताला लावून महाभारत घडवण्यासाठी कारण ठरलेला युधिष्ठिर हा 'धर्मराज' होतो. तर जुगाराचा नाद लावून लाखो संसार उद्ध्वस्त करणारा 'मटका किंग' रतन खत्री हा हिंदी चित्रपटवाल्यांसाठी 'धर्मात्मा' होतो.

मुंबईत वयाच्या ८८ व्या वर्षी नुकतंच निधन झालेल्या रतन खत्रीच्या आयुष्यावर बेतलेला 'धर्मात्मा' हा हिंदी चित्रपट प्रदर्शित झाला होता. तर 'रंगीला रतन' या हिंदी चित्रपटाचा रतन खत्री सहनिर्माता होता.

हेही वाचा : कामगारांसाठी बनवलेली जीन्स, स्टाईल स्टेटमेंट झाली

आणीबाणीतून घडलेले दोन नंबरी

१९६५ ते ७५ या काळात इंदिरा गांधी यांच्या राजवटी बरोबरच देशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली होती. कामगार, विद्यार्थी आणि सरकारी नोकर यांची आंदोलनं जोरात होती. त्याचबरोबर काळाबाजार, स्मगलिंग आणि भाववाढ यांनी उच्छाद मांडला होता. यातील 'दोन नंबरी' धंद्यात हाजी मस्तान, युसूफ पटेल यांच्या जोडीने 'मटका किंग' रतन खत्री याचं नावही चर्चेत होतं. 

या साऱ्याला आळा घालण्यासाठी १९७५ ते ७७ या काळात देशात आणीबाणीचा अंमल सुरू झाला. त्यात राजकीय आणि आंदोलक नेत्यांप्रमाणे हाजी मस्तान, युसूफ पटेल, रतन खत्री हे 'दोन नंबरी'ही गजाआड होते. आणीबाणी संपल्यावर ते तिघेही यथावकाश जेलमुक्त झाले. पण ते पूर्वीपेक्षा अधिक हुशार झाले. 

हाजी मस्तानने प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्या साथीने दलित- मुस्लीम ऐक्याचं राजकारण सुरू केलं. युसूफ पटेल बांधकाम व्यवसायात घुसला आणि रतन खत्री मटक्याचा बेकायदेशीर उद्योग नेकीने करीत अधूनमधून वृत्तपत्रातून 'नशीबवान' म्हणून नाव-फोटोसह झळकू लागला.

दिवसाला कोट्यवधींची उलाढाल

मटका हा खोटा, बेकायदेशीर धंदा. द्यूत, जुगार, सोडत, लॉटरी, बेटिंग या त्याच्या पुढच्या-मागच्या आवृत्या. पण त्यात मटक्याचा व्याप मोठा. एक रुपयापासून खेळला जाणाऱ्या या मटक्याने लाखोपती दुर्मिळ असणाऱ्या काळात दिवसाला करोडो रुपयांची उलाढाल केली आहे. 

० ते ९ आकडे आणि ३ आकड्यांची संख्या एवढ्यावर रतन खत्रीने मटक्याचं नेटवर्क देशभर निर्माण केलं होतं. रतन खत्री हा भारत-पाक फाळणीत कराचीतून मुंबईत आलेला सिंधी तरुण. पण डोकेबाज.

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

ये दोस्ता, लस कशी तयार केली जाते?

साथीच्या आजारात सारं जग समाजवादी वळण घेतं

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

हर्ड इम्युनिटी ठरू शकते का कोरोनाच्या युद्धातलं भारताकडचं ब्रम्हास्त्र?

मटका आधी कल्याणचा, मग वरळीचा

१९६०मधे कल्याण भगत याने मटक्याचा बेकायदेशीर व्यवसाय सुरू केला. तेव्हा रतन खत्री त्याच्याकडे मॅनेजर होता. भगतचा मटका 'कल्याण' नावाने ओळखला जायचा. १९६४ मध्ये रतन खत्रीने 'वरळी मटका' नावाने स्वतःचा व्यवसाय सुरू केला. 

वरळी पोस्ट ऑफिसच्या बाजूच्या बिल्डिंगमधे रतन खत्रीच्या मटक्याचं ऑफिस होतं. तिथून सकाळी नऊ ते रात्री बारा वाजेपर्यंत दर ३ तासांनी मटक्याच्या निकालाचे आकडे फुटायचे.

जेठमलानींच्या वकिलीने रतन मोकळा

त्या बिल्डिंगखाली अधून-मधून पोलीस गाडी घ्यायची. थोडी धावपळ व्हायची. पण 'आपल्या सुरक्षेसाठीच पोलीस आलेत,' अशा थाटात रतन खत्री पोलिसांबरोबर जाताना दिसायचा. दोन-तीन दिवसांनी त्याला अटक केल्याची आणि न्यायालयाने त्याची सुटका केल्याची बातमी एकाच वेळी वृत्तपत्रातून यायची‌. 

त्याच्या सुटकेसाठी ॲडवोकेट राम जेठमलानी यांनी कोर्टात युक्तिवाद केलेला असायचा. 'खेळातल्या पत्त्यांची हाताळणी करणं किंवा पत्त्यांतून निवडक पत्ते काढणं, हा गुन्हा नाही,' हे ॲडवोकेट जेठमलानी कोर्टाला पटवून द्यायचे. न्यायाधीशांना ते पटायचं आणि रतन खत्री याची सुटका व्हायची. हेच राम जेठमलानी 'जनता पक्षा'च्या मोरारजी देसाई यांच्या सरकारात आणि पुढे अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारात कायदामंत्री होते. 

आकडा असा काढतात

५२ पत्त्यांतील राजा, राणी, गुलाम आणि जोकर हे पत्ते बाजूला काढून राहिलेल्या ४० पत्त्यांतून ३ पत्ते काढून आकडा जाहीर केला जायचा. उदाहरणार्थ- दुरी, पंजा, सत्ता आल्यास त्याची बेरीज १४ होते. यातील शेवटचा आकडा ४. म्हणून या आकड्याला दहा रुपयाला ९० रुपये मिळतात.

हे आकडेही मटक्याच्या भाषेत ४ म्हणजे चौक, ६ = छक्का, ७ = लंगडा, १० = मेंढी किंवा जिलबी असे होतात. ३ एक्के किंवा ३ नव्वे असे आकडे आल्यास त्याला 'संगम पाना'; तर २,२,४ किंवा २,२,८ असे आकडे आल्यास त्याला 'डीपी पाना' म्हणतात. १,३,९ किंवा २,४,९  या आकड्याला 'सिंगल पाना' म्हणतात. 

'संगम पाना'ला एक रुपयाला शंभर रुपये मिळत. तर 'डीपी पाना'ला एक रुपयाला २५० रुपये मिळत. या आमिषातूनच अधिक पैसे लावण्याचा मोह मटका खेळणार्यां ना व्हायचा. यात अनेक जण कर्जबाजारी झाले. घर, जमिनी विकून कंगाल झाले. दारूचं व्यसन एक वेळ सुटू शकत़ं; पण मटक्याचं व्यसन सुटता सुटत नाही.

हेही वाचा : जगाचा बिझनेस कोमात, डीमार्ट जोमात, F.Y.B.Com ड्रॉपआऊट काकांची सक्सेस स्टोरी

वरळी मटका सर्वात खात्रीचा

यातून पैसे देण्यावरून पूर्वी हाणामाऱ्या व्हायच्या. या साऱ्याबाबत त्याकाळात प्रमोद नवलकर, श्रीकांत सिनकर 'दोन नंबरी' धंद्यांवर लिहिणाऱ्या अनेकांनी खूप तपशिलात लेखन केलं आहे. या सगळ्यांनी 'मेन बाझार' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या रतन खत्रीच्या मटक्याला अधिक खात्रीचा म्हटलंय.

मटका हा गरीब, कष्टकरी, कामगार वर्गातील लोकांबरोबर उच्चभ्रू , पांढरपेशे लोकही खेळत. कारण त्या काळात अधिकचा पैसा सहजपणे मिळवायचे मार्ग मर्यादित होते. दलालीला आजच्यासारखी प्रतिष्ठा नव्हती. 

तरीही मटक्याच्या बेकायदेशीर व्यवसायातून करोडो रुपयांची उलाढाल होते, पण शासनाला काहीच लाभ होत नाही. उलट पोलीस दारूच्या अड्डेवाल्यांप्रमाणेच मटक्याच्या बूथवरून हप्ते घेतात म्हणून बदनाम झाले होते. यातूनच 'सरकारमान्य लॉटरी'ची कल्पना पत्रकार नारायण आठवले यांनी पुढे आणली. दैनिकातून प्रसिद्ध होणाऱ्या 'शुभांक'च्या माध्यमातून वृत्तपत्र व्यवसायाचं मटकेवाल्यांशी कनेक्शन होतंच; आजही आहे. 

एका लेखाने लॉटरीचा जन्म

१९६२ ते १९७४ या काळात नारायण आठवले 'दैनिक लोकसत्ता'चे सहाय्यक संपादक आणि नंतर रविवारच्या पुरवणीचे प्रमुख होते. त्या काळात त्यांचं 'अनिरुद्ध पुनर्वसू' या टोपणनावाने लिहिलेलं 'भारूड' हे सदर रविवारच्या पुरवणीतून गाजायचं - वाजायचं. त्यात ते सामाजिक, राजकीय, साहित्यिक विषयांवर लिहीत. 

एका 'भारूड'मधे त्यांनी 'मटक्याच्या व्यसना'चा आढावा घेताना, मटक्याचा बेकायदेशीर धंदा रोखण्यासाठी 'सरकारी मटका' सुरू करावा, अशी सूचना करणारं लेखन केलं होतं. त्यात आकडा लावण्यासाठी आणि लागलेल्या आकड्याची रक्कम 'कर वजा' करून देण्यासाठी पोस्ट कार्यालयाचा वापर करावा. दररोज एकेका मंत्र्याने आकडा जाहीर करावा आणि 'जॅकपॉट'चा आकडा मुख्यमंत्र्यांनी फोडावा, अशाही सूचना नारायण आठवले यांनी केल्या होत्या.

हेही वाचा : नेशन वॉन्ट्स टू नो अर्णब, ये जबां किसकी हैं?

मटक्याचे काळे लॉटरीत पांढरे

त्यातूनच 'महाराष्ट्र राज्य लॉटरी' हा सरकारी उपक्रम आकारास आला. त्याचा लाभ 'राज्य लॉटरीची एजन्सी' घेणाऱ्या 'मॅजेस्टिक प्रकाशना'च्या तुकाराम कोठावळे यांच्यासारख्यांना झाला. पण त्यापेक्षा अधिक लाभ रतन खत्रीला झाला.

बक्षीसपात्र लॉटरी धारकाच्या रकमेतून ३३ टक्के रक्कम कर म्हणून सरकार वजा करते. म्हणजे एक लाखाची लॉटरी लागली तर ६७ हजार रुपये मिळायचे. असे 'बक्षीसपात्र लॉटरी तिकीट' रतन खत्री ७० ते ७५ हजार रुपयांना मटक्यातली बेहिशेबी रक्कम वापरून विकत घ्यायचा आणि ते तिकीट सरकार जमा करून ६७ हजार रुपये 'व्हाईट' मिळवायचा. 

लॉटरीच्या सुरवातीला बराच काळ वृत्तपत्रांतून निकाल यायचे. तशा जाहिरातीही यायच्या. त्यात लक्षाधीशांचे फोटो नावासह प्रसिद्ध होत. त्यात 'विक्रमी नशीबवान' रतन खत्री दिसायचा. याचा फायदा त्याला मटक्याच्या व्यवसायासाठी व्हायचा.

जय बोलो रतन खत्री

१९९५मधे मनोहर जोशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी मटक्यावर कडक बंदी आणली‌. पण तोपर्यंत खत्री या व्यवसायापासून दूर झाला होता. पण या बंदीमुळे मटका अधिक फोफावला. आता अनेक गावांच्या नावाने मटका सुरू आहे. 'ऑनलाइन लॉटरी'लाही आता चांगलं वळण आहे. अगदी लॉटरीच्या आकड्यांवरही मटका खेळला जातो. 

बुद्धी- शक्ती- मेहनतीऐवजी 'नशीब- तकदीर- किस्मत' आजमावण्याची खोड लोकांत आहे, तोवर नानाप्रकारे मटका खेळला जाणार. आणि मटका म्हटलं, की रतन खत्रीही आठवणार. कारण 'नशिबाने मिळणाऱ्या पैशाला नो कात्री, जय बोलो रतन खत्री,' अशी खात्री त्याने जुगाऱ्यांना दिलीय.

हेही वाचा : 

चक्रीवादळाचं नाव कसं ठरवतात? बंगाल, ओडिशाला अम्फानचा धोका

मध्यम वर्गाला आर्थिक पॅकेज नाही, तर थाळी वाजवण्याचा टास्क पाहिजे

कर्ज खिरापतीनं २००८ मधे जगाला आर्थिक संकटात ढकललं, त्याची गोष्ट

डब्ल्यूएचओनं आधीचं कोरोनाचा इशारा दिला, तरीही ब्लेमगेम का सुरूय?

अमेरिकेला हवं असणारं मलेरियाचं औषधं भारतात कसं आलं, त्याची गोष्ट

दीपिका सांगतेय, लॉकडाऊनमधे मानसिक आरोग्य सांभाळण्याच्या १५ टिप्स

पोरांनो, घरी बसून काय करावं असा प्रश्न पडलाय. मग त्याचं उत्तर न्यूटन देतो

सरकारनं आपल्या मदतीला पाठवलेला 'आरोग्य सेतू' स्वतः सुरक्षित आहे का?

(लेखक साप्ताहिक चित्रलेखाचे संपादक आहेत. हा लेख २५ मे २०२० च्या अंकातल्या  संपादकीय लेखाचा भाग आहे.  लॉकडाऊनच्या काळात चित्रलेखाचे ताजे अंक वाचण्यासाठी Dnyanesh Maharao या फेसबूक अकाउंटशी कनेक्ट राहू शकता.)