निसर्गातल्या आनंदयात्रेची सफर घडवणारी टॉय ट्रेन

०१ सप्टेंबर २०२१

वाचन वेळ : ५ मिनिटं


प्रवाशांना हिरवा निसर्ग दाखवत हळूहळू धावणार्‍या टॉय ट्रेन सर्वांसाठी कुतूहलाचा विषय असतो. आपल्या देशात पाच ठिकाणी अशा ऐतिहासिक टॉय ट्रेन्स आहेत. महाराष्ट्रातल्या माथेरानमधली टॉय ट्रेन ही त्यापैकी एक. ‘युनेस्को’च्या जागतिक वारशांच्या संभाव्य यादीत माथेरानच्या टॉय ट्रेनची एण्ट्री झालीय. यादीतलं पक्कं स्थान मिळवण्यासाठी ती सज्ज होतेय.

झुकझुक धावणारी आगीनगाडी मुलांच्या भावविश्वाला समृद्ध करत असते. अर्थातच पूर्वी वाफेचं इंजिन असलेल्या रेल्वे धावत होत्या, त्यानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलंय. हवेत धुरांच्या रेषा सोडणार्‍या रेल्वेने आता कात टाकून बुलेट ट्रेन, मॅग्लेव अशी आधुनिक आणि वेगवान रूपंही घेतली असली, तरी जुन्या रेल्वेचं एक अप्रूप आहेच. त्यामुळेच जगभरातली काही हिलस्टेशनची शोभा वाढवण्यासाठी आणि पाहण्यासाठीही अशा ‘टॉय ट्रेन’चा वापर होत असतो.

जणू ‘घाटातली वाट, काय तिचा थाट, गिरकते मुरकते, लवते पाठोपाठ’ अशा ओळी गुणगुणत आणि ‘प्याशिंजर’ना ‘हिरवा निसर्ग हा भवतीने’ दाखवत हळूहळू धावणार्‍या ‘टॉय ट्रेन’ बालचमूपासून प्रौढांपर्यंत सर्वांनाच एका आनंदयात्रेचा अनुभव देत असतात. आपल्या देशात पाच ठिकाणी अशा ऐतिहासिक टॉय ट्रेन्स आहेत. त्या अतिशय जुन्या ‘माऊंटन रेल्वे लाईन्स’वरून धावतात.

हेही वाचा: रेल्वेचा हॅपी बड्डे, तिला विश केलंय ना!

पर्यटनाचं बलस्थान

१९ व्या शतकाच्या शेवटी आणि विसाव्या शतकाच्या सुरवातीच्या काळात ब्रिटिशांनी डोंगराळ भागातल्या आपल्या वसाहतींमधे साहित्याची ने-आण करण्यासाठी असे रेल्वेमार्ग निर्माण केले होते. या छोट्या रेल्वे अतिशय धीम्यागतीने धावत असल्या, तरी त्यांची ही गतीच पर्यटनासाठीचं 'बलस्थान’ बनलेली आहे.

आजूबाजूचं सुंदर, विहंगम दृश्य न्याहाळत डोंगर चढून वर जाण्याचा आनंद त्या प्रवाशांना देतात. देशातल्या तीन माऊंटन रेल्वेंचा ‘युनेस्को’च्या जागतिक वारशांच्या यादीत समावेश आहे. त्यामागे या रेल्वेमार्गांसाठीचं स्थापत्यकौशल्यही कारणीभूत आहे. महाराष्ट्रातल्या माथेरान इथंही अशी टॉय ट्रेन आहे. ती सध्या ‘युनेस्को’च्या संभाव्य यादीत असून, लवकरच यादीतलं पक्कं स्थान मिळवण्यासाठी सज्ज होतेय.

सिमलाची टॉय ट्रेन

काल्का-सिमला रेल्वे, नीलगिरी माऊंटन रेल्वे आणि दार्जिलिंग हिमालयन रेल्वे यांचा ‘युनेस्को’च्या यादीत समावेश आहे. काल्का-सिमला रेल्वे ही अतिशय सुंदर अशी टॉय ट्रेन आहे. ब्रिटिश काळात सिमला हे शहर उन्हाळी राजधानीचं ठिकाण होतं. त्यावेळी सिमल्याला जाण्यासाठी अशा ट्रेनचा वापर केला जात असे.

या रेल्वेचं काम १९०३ ला पूर्ण झालं. तिने अत्यंत सुंदर अशा प्रवास दृश्यांची ओळख देशाला करून दिली. ही रेल्वे एकूण ९६ किलोमीटरचा प्रवास करते. वाटेत २० रेल्वेस्थानकं, १०३ बोगदे, ८०० पूल आणि तब्बल ९०० वळणं पार करून ही रेल्वे आपल्या मुक्कामी पोचते.

चंदीगडजवळच्या काल्का इथून तिचा प्रवास सुरू होतो आणि तो पाच तासांनी सिमला इथं संपतो. अनेक लोक या रेल्वेचा प्रवास बारोगपासून सुरू करतात. त्या ठिकाणी अतिशय लांब बोगदा आहे आणि आजूबाजूचं सुंदर निसर्गदृश्यही तिथून सुरू होतं.

हेही वाचा: पालघरचा भूकंप... कोट्यवधी वर्षांपासून आजपर्यंत!

जुनी हिस्टॉरिक माऊंटन रेल्वे

दार्जिलिंगची टॉय ट्रेनही हिमालयाचं असंच निसर्गसौंदर्य दाखवणारी आहे. ही ट्रेन १९६९ मधल्या राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर यांच्या ‘आराधना’ सिनेमातल्या ‘मेरे सपनों की रानी’ गाण्यामुळेही प्रसिद्ध झाली. पश्चिम बंगालमधली ही ट्रेन ‘दार्जिलिंग हिमालयन रेल्वे’ या अधिकृत नावाने ओळखली जाते. ती देशातली सगळ्यात जुनी ‘हिस्टॉरिक माऊंटन रेल्वे’ आहे.

तिचं काम १८८१ मधे पूर्ण झालं. हिरव्यागार चहाच्या मळ्यांमधून नागमोडी वळणं घेत ही रेल्वे हिमालयाच्या पूर्व पर्वतराजीत जाते. पश्चिम बंगालमधल्या जलपैगुडी इथून या रेल्वेचा एकूण ८८ किलोमीटरचा प्रवास सुरू होतो. सिलिगुडी, कुरसिआँग आणि घूममार्गे ही रेल्वे दार्जिलिंगला जाते. वाटेत ही रेल्वे पाच मोठ्या आणि सुमारे ५०० छोट्या पुलांवरून जाते.

अनेक लोक संपूर्ण दिवसभर रेल्वेतून फिरण्याऐवजी दार्जिलिंग ते घूम हा दोन तासांचा प्रवास या रेल्वेतून करतात. घूम हे या मार्गातल्या समुद्रसपाटीपासून ७४०० फूट उंचीवर असलेलं सगळ्यात उंच ठिकाण आहे. घूम आणि दार्जिलिंगदरम्यानचं बातासिया लूपचं निसर्गसौंदर्य प्रवाशांना भुरळ घालतं. कांचनगंगा शिखराच्या पार्श्वभूमीवर दार्जिलिंगचं दृश्य पाहणं हा एक अनोखा अनुभव असतो.

घनदाट जंगल दाखवणारी ट्रेन

तामिळनाडूतली नीलगिरी माऊंटन रेल्वे ही उटकमंड किंवा उटीच्या सुंदर हिलस्टेशनकडे नेते. तत्कालीन मद्रास प्रांतातलं ब्रिटिश सरकार उन्हाळ्यात उटी इथं आपलं मुख्यालय थाटायची. या रेल्वेचा प्रस्ताव १८५४ मधेच आला होता; मात्र प्रत्यक्षात तिचं काम १९०८ ला पूर्ण झालं.

अतिशय घनदाट जंगल आणि खडकाळ जमीन यामुळे रेल्वेमार्गाचं काम लवकर पूर्ण झालं नाही. हा ४६ किलोमीटरचा ट्रॅक मेटुपालैयमपासून कुन्नूरमार्गे उटीला जातो. या मार्गात ही रेल्वे २५० पेक्षाही अधिक पूल पार करते. त्यापैकी ३२ पूल मोठे आहेत, हे विशेष.

वाटेत १६ बोगदेही लागतात. मेटुपालैयम ते कुन्नूर या मार्गावर सर्वात सुंदर निसर्गदृश्यं पाहायला मिळतात. त्यामुळे अनेक पर्यटक या मार्गावरच टॉय ट्रेनने प्रवास करतात आणि नंतर कुन्नूरमधले चहाचे मळे पाहण्यासाठी जातात.

हेही वाचा: मुंबईच्या विकासात पर्यावरणाला धक्का लागणारच!

माथेरानचं हिल स्टेशन

आपल्या महाराष्ट्रातलं माथेरान हिल रेल्वेही लोकप्रिय आहे. ही रेल्वे १९०७ ला पहिल्यांदा धावली. १९०१ ते १९०७ या काळात अब्दुल हुसेन आदमजी पीरभॉय यांनी हा मार्ग बांधला आणि त्यासाठी अर्थपुरवठा केला तो त्यांचे वडील सर आदमजी पीरभॉय यांनी. त्या काळात या रेल्वेमार्गाच्या बांधणीसाठी १६ लाख रुपये खर्च आला होता.

आदमजी पीरभॉय हे वरचेवर माथेरानला जात असत आणि प्रवास सुकर व्हावा यासाठी तिथे रेल्वेमार्ग असावा, असं त्यांना वाटलं. १९०० मधे या कल्पनेला योजनेचं रूप मिळालं आणि प्रत्यक्ष कामाला १९०४ ला सुरवात झाली. त्यावेळी सल्लागार इंजिनिअर होते एव्हेरार्ड काल्थरॉप.

१९०७ पासून हा मार्ग प्रवासासाठी खुला झाला. १५ एप्रिल २००७ ला या रेल्वेने आपला शतक महोत्सव साजरा केला. माथेरानच्या प्रदूषणमुक्त आणि हिरवाईने नटलेल्या डोंगराळ भागातून ही रेल्वे जाते. या ठिकाणी प्रदूषण टाळण्यासाठी इतर सर्वप्रकारच्या वाहनांना मज्जाव आहे. अगदी सायकलीचाही या ठिकाणी वापर केला जात नाही.

मुंबई आणि पुणेदरम्यानच्या नेरळमधून या रेल्वेचा प्रवास सुरू होतो. हा ट्रॅक केवळ वीस किलोमीटरचा असला, तरी तो अतिशय सुखद अनुभव देणारा आहे. नागमोड्या मार्गाने सावकाश धावत ही रेल्वे अडीच तासात डोंगरमाथ्यावर जाऊन पोचते.

आधुनिक जगाची सुंदर साखळी

हिमाचल प्रदेशातल्या कांगडा व्हॅली रेल्वे १९२८ ला सुरू झाली. ही देशातली शेवटचीच माऊंटन रेल्वे होती. पंजाबमधल्या पठाणकोट इथून या रेल्वेचा तब्बल १६४ किलोमीटरचा प्रवास सुरू होतो आणि तो हिमाचल प्रदेशातल्या जोगिंदरनगरपर्यंत जातो.

धर्मशालाजवळच्या कांगडा आणि पालमपूरमार्गे हा मार्ग जातो. पर्वतावर अधिक भगदाडे न पाडण्याच्या इंजिनिअरच्या उद्देशाने या मार्गावर केवळ दोनच बोगदे आहेत. हा संपूर्ण प्रवास दहा तासांचा आहे. पण कांगडापासून निसर्गसौंदर्याचं खरं दर्शन घडू लागतं.

पालमपूरपासून हा प्रवास अधिकच रमणीय होतो. धौलाधार पर्वतराजीचं डोळ्यांचं पारणं फेडणारं दृश्य या मार्गावरून पाहायला मिळतं. या मार्गावरचं सगळ्यात उंचीवरचं ठिकाण म्हणजे आहुज. ते समुद्रसपाटीपासून १२९० मीटर उंचीवर आहे. पॅराग्लायडिंगसाठीचं लोकप्रिय ठिकाण बिर-बिलिंग हे इथून जवळच आहे.

आजोबांच्या अंगाखांद्यावर खेळणार्‍या चिमुरड्या पोरीसारखं पर्वतराजीच्या अंगाखांद्यावर खेळणार्‍या या टॉय ट्रेनरूपी पंचकन्या आजही देश-विदेशातल्या पर्यटकांना निसर्गाचं मोहक रूप दाखवत आहेत. जुन्या काळाची आधुनिक जगाशी जोडलेली ही एक सुंदर साखळी.

हेही वाचा: 

पंच्याहत्तरीतही दिमाखात उभा हावडा ब्रिज

तर पूल बांधायची कामं लष्करावरच सोपवावी लागतील

पर्यावरण दिनः संवेदनशील कृती करण्यासाठी पावलं उचलूया

दोस्तांनो, आज सायकल डे, मग पुन्हा एकदा सायकल चालवूया?

(दैनिक पुढारीच्या बहार पुरवणीतून साभार)