मतीन दिवाण: गांधीवादाशी प्रामाणिक ध्येयनिष्ठ कार्यकर्ता

२३ सप्टेंबर २०२०

वाचन वेळ : ६ मिनिटं


ज्येष्ठ गांधीवादी कार्यकर्ते आणि युसूफ मेहरअली सेंटरचे प्रकल्प संचालक मतीन दिवाण यांचं कोरोनामुळे नुकतंच निधन झालंय. कोरोनाच्या उपचारांसाठी त्यांना हॉस्पिटलमधे जागा मिळू नये हे जास्त क्लेशदायक. ग्रामोद्योगाचं प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगार निर्मिती या विषयावर काम करणाऱ्या युसूफ मेहरअली सेंटरमधे त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. स्पष्ट विचारांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची गरज असताना अशा माणसाचं निघून जाणं मनाला चटका लावणारं आहे.

विचारांशी प्रामाणिक राहून हयातभर विशिष्ट ध्येयासाठी काम करणारी माणसं सध्याच्या जमान्यात सहसा सापडत नाहीत. कोरोनानं चांगल्या माणसांनाही मृत्यूच्या कवेत ढकलण्याचा उद्योग सुरु केलाय. या जीवघेण्या साथीच्या आजाराला सहजतेनं घेणं, काही होत नाही असा फाजील आत्मविश्वास बाळगण्याच्या धाडसापायी अनेक जणांना लाख मोलाचा जीव गमावण्याची वेळ आली.

मुंबई गोवा हायवे जवळ पनवेलपासून पुढे तारा इथं युसूफ मेहरअली सेंटर आहे. याचे प्रकल्प संचालक असलेल्या मतीन दिवाण यांचं कोरोनामुळे शनिवारी १९ सप्टेंबरला निधन झालं. ते ६८ वर्षांचे होते. 
त्यांनी गांधीवादी विचारांशी बांधिलकी राखलीच शिवाय ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक युसूफ मेहर अली यांना अभिप्रेत असलेल्या समाजाच्या निर्मितीसाठी त्यांनी हयातभर काम केलं.  

साडेचार दशकं वेगवेगळ्या जबाबदाऱ्या

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी विचारवंत जी. जी. पारीख यांच्या पुढाकारानं युसूफ मेहर अली यांची आठवण म्हणून पनवेलजवळ तारा इथं युसूफ मेहेर अली सेंटर उभारलं गेलं. निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या तारा या गावात साठच्या दशकात युसूफ मेहेर अली सेंटर हे ग्रामोद्योगाचं एक आदर्श मॉडेल म्हणून निर्माण करण्यात आलं. त्याच सेंटरमध्ये गेली साडेचार दशकं मतीन दिवाण विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या पार पाडत होते. 

सहा महिन्यांपूर्वी ते या स्वयंसेवी संस्थेचे उपाध्यक्ष झाले होते. जी. जी. पारीख आणि मतीन दिवाण हे भारतीय संस्कृतीतलं उदात्त गुरु शिष्य परंपरेचं अनोखं नातं होतं. त्यामुळे वयाच्या ९७ वर्षीसुद्धा जी. जी. पारीख हे कोरोनाग्रस्त असलेल्या आपल्या शिष्याला पाहण्यासाठी पनवेलच्या हॉस्पिटलमधे गेले होते. मात्र कोरोनानं मतीन दिवाण यांच्या प्रकृतीवर मात करण्याचा उद्योग केला होता.

हेही वाचा : डॉ. रघुवंश प्रसाद सिंग : पिछडयांच्या हितासाठी झटणारे राजपूत नेते

शेवटपर्यंत कष्टकरी श्रमिकांना मदत

रायगड जिल्ह्यातले विविध समाजघटकांचे लढे, आंदोलनं, आदिवासी, कातकरी समाजाचे प्रश्न, स्पेशल इकॉनॉमिक झोन रद्द करण्याच्या मागणीपासून हायवेच्या रुंदीकरण आणि इतर अनेक प्रकल्पातल्या विस्थापितांना न्याय देण्यासाठी संघर्ष असो. कुणबी, आगरी, कोकणी मुस्लिम यांच्यापासून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा दळवी, अशोक सासवडकर, उल्का महाजन यांच्या सामाजिक लढ्यात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष सहभाग असो, अशा अनेक उपक्रमात हा हरहुन्नरी माणूस सहभागी असायचा. 

टिपिकल खादीचा नेहरु शर्ट घालून उर्दू भाषेची नजाकत दाखवत अत्यंत शांतपणे हसतमुख चेहऱ्याने आपलं म्हणणं मांडायचा. लॉकडाऊनच्या काळात कोरोनाचा संसर्ग झालेल्या कष्टकरी श्रमिकांना मदत करणारा हा माणूस अखेर त्यानेच काळाच्या पडद्याआड गेला. रायगड जिल्ह्यातल्या बारापाडा या गावात जन्मलेल्या मतीन दिवाण यांचं पार्थिव त्याच मायभूमीतल्या दफनभूमीत सामावून गेलंय. सतत माणसांच्या गराड्यात राहणारा हा अवलिया कार्यकर्ता शेवटच्या क्षणी काही मोजक्या लोकांच्या साक्षीने अनंतात विलीन झाला. 

लोकशाही मूल्यांचा पुरस्कर्ता

मतीन दिवाण हे अजब रसायन होतं. साधारण २७ वर्षापूर्वी मतीन दिवाण यांची तारा इथल्या युसूफ मेहरअली सेंटरच्या परिसरात पहिल्यांदा भेट झाली.

उर्दूची आदब आणि कोकणात राहूनही हिंदी भाषेचा वेगळा लहेजा उच्चारणारा हा माणूस गांधीवादी विचारसरणी, युसूफ मेहर अली आणि जी. जी. पारीख यांच्या विचाराने भारावून गेला होता. धर्मनिरपेक्ष विचारसरणी आणि लोकशाही मूल्यांचा पुरस्कर्ता म्हणून अयोध्या बाबरी प्रश्नावर न्यायालयाचा निर्णय मान्य करुनच तोडगा निघू शकतो असं त्यांचं म्हणणं होतं. वागण्या बोलण्यात साधेपणा, मितभाषी पण खुलल्यानंतर शांत पद्धतीने मांडणी करण्याची धाटणी हा मतीन यांचा स्वभाव न्यारा होता.

मतीन दिवाण हे मूळचे कोकणातले रायगड जिल्ह्यातले. हा माणूस धार्मिक होता. इस्लाम धर्म, संस्कृती आणि रितीरिवाज, मुस्लिमांना अन्य धर्मियांशी सलोख्याने आणि बंधुभावाने वागण्यातच सर्वांचं भलं आहे. खासकरुन प्रत्येकांना परस्परांच्या धर्माचा त्यांच्या भावनांचा आदर करायला हवा. त्याचवेळी प्रत्येक भारतीय नागरिकाला धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य आहे असं मतीन दिवाण यांचं म्हणणं होतं. 

हे कोरोना स्पेशलही वाचा : 

कोविड साथीचा हाहाकार अचानक का वाढला?

कोरोना कुटुंबातलं सातवं पोरच इतकं वात्रट कसं निघालं?

डॉक्टरांनी घातलेला सूट म्हणजे कोरोनाविरूद्धचं चिलखतच!

कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?

कोरोनाला रोखण्यासाठी तैवानकडून आपण काय शिकलं पाहिजे?

एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?

कोरोनाची शिकार कशी करायची हे वायरस हंटरकडून शिकायला हवं!

अस्सल बावनकशी साधा माणूस

एकीकडे इस्लाम, दुसरीकडे गांधीवाद, तिसरीकडे ग्रामसुधारणा, ग्रामोद्योग, ग्रामविकास करताना शेवटच्या घटकांना न्याय आणि चौथीकडे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जी. जी. पारीख यांच्या वैचारिक प्रवासाचा पांथस्थ असा मतीन यांचा स्वभावधर्म होता. 

भले ते हमीद दलवाई यांच्या किंवा जहाल विचारांच्या पंथातले नसतील पण भारतीय सहजीवनाच्या संस्कृतीचे युसूफ मेहर अली, जी. जी. पारीख ब्रँडचा अस्सल बावनकशी साधा माणूस होते.

यूसूफ मेहरअली कोण होते?

मतीन दिवाण यांच्यावर युसूफ मेहरअली यांचा प्रभाव होता. आज नव्या पिढीला मेहर अली यांच्याविषयी माहीत असण्याची शक्यता कमीच. ते महात्मा गांधींचे सहकारी आणि स्वातंत्र्यसैनिक होते. मेहरअली यांचं मूळ नाव युसूफ झफर मर्चंट होते. २३ सप्टेंबर १९०३ रोजी त्यांचा जन्म झाला. आणि २ जुलै १९५० मधे त्यांचा मृत्यू झाला. त्यांचं कुटुंब मूळ गुजरातच्या कच्छ भागातलं. 

मेहरअली यांच्या आजोबांचा मुंबईमधे कापडाचा व्यवसाय होता. मेहरअली फार कमी वयात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सामील झाले. तरुण वयात ते ब्रिटिश सरकारच्या गुलामगिरी विरोधात रस्त्यावर उतरले. ते सोशालिस्ट पार्टीचे संस्थापक सदस्यापैकी एक होते. 

१९४२ च्या चले जाव आंदोलनात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली. 'चले जाव' ही घोषणादेखील त्यांनीच दिली होती. १९४२ मधे महात्मा गांधी तत्कालीन ब्रिटीश सरकारच्या विरोधात मोठ्या आंदोलनाच्या तयारीत होते. त्यापूर्वी त्यांनी यासंदर्भात अनेक मोठ्या नेत्यांशी चर्चा केली. यात मेहरअली देखील होते. आंदोलनासाठी रणनीती आखण्यात येत होती त्याला साजेशी क्विट इंडिया ही घोषणा मेहरअली यांनी गांधींजीना सुचवलं.

हेही वाचा :  आपली ओळख का लपवत होता हा 'बिहार का बेटा'?

गांधींजींना ही कल्पना प्रचंड आवडली. 

त्यापूर्वी सायमन कमिशनच्या विरोधात यूसुफ आणि त्यांच्या तरुण क्रांतिकारकांनी दिलेला नारा असाच बुलंद होता की, त्याचा आवाज भारताच्या कानाकोपऱ्यात पोचला होता. त्यामुळे मेहरअली यांचं नाव देशभर झालं. महात्मा गांधींसोबत अनेकांच्या तोंडी सायमन गो बॅकची घोषणा आली. पनवेल मधल्या तारा या गावी त्यांची आठवण म्हणून ग्रामोद्योगाचं प्रशिक्षण, महिला सक्षमीकरण आणि स्वयंरोजगार निर्मितीसाठीचे व्यवसाय याचं प्रशिक्षण देण्यासाठी युसूफ मेहर अली सेंटर चालवलं जातं.

प्रामाणिक कार्यकर्त्याची अखेर क्लेशकारक

युसुफ मेहर अली सेंटरमधे शिक्षण घेतलेले मतीन दिवाण हा माणूस संस्थेचा हिशेब ठेवण्याच्या कामात बिनचूक होता. प्रकल्प संचालक आणि त्यानंतर सेंटरचे उपाध्यक्ष अशी त्यांची उत्तरोत्तर प्रगती होती. पण मतीन दिवाण यांचे पाय नेहमी जमिनीवर असायचे. मुस्लिमांच्या बहुतांश प्रश्नावर शिक्षणाची मात्रा उपयोगी पडू शकते अशी त्यांची धारणा होता. यातूनच त्यांनी सुरवातीला या भागात उर्दू शाळा आणि नंतर आपटा इथं कॉलेज सुरु केलं. 

शेवटपर्यंत त्यांनी समाजवादी आणि गांधीवादी विचारांसाठी काम केलं. सध्याच्या काळात अशा स्पष्ट विचारांच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांची गरज असताना ते आपल्यातून निघून गेले आहेत. वाईट याचं वाटतं की जो माणूस सामान्यांच्या हितासाठी हयातभर लढला, त्याला कोरोनाच्या उपचारासाठी दुकानदारी मांडलेल्या खाजगी हॉस्पिटलच्या बेफाम नफेखोर प्रवृत्तीमुळे अनेक हॉस्पिटलमधे जागा मिळू शकली नाही. कोरोनाच्या वैद्यकीय उपचाराचा बाजार आता तरी थांबायला हवा.  

क्यों डरे जिंदगी में क्या होगा
हर वक्त क्यों सोचे की बुरा होगा
बढते रहे बस मंजिलो की ओर
हमें कुछ मिले या ना मिले
तजुर्बा तो नया होगा

अलविदा मतीनभाई!

हेही वाचा : 

पुष्पा भावेंशी चिकित्सक गप्पांच्या निमित्ताने

आपली ओळख का लपवत होता हा 'बिहार का बेटा'?

भल्याभल्यांना घाम फोडतेय चीनची डिजिटल हेरगिरी

कॅगने दाखवलंय जलयुक्तमधलं झोलयुक्त शिवार (भाग १)

केंद्र सरकारने आणलेली तीन शेती विधेयकं शेतकऱ्याला तारणार की मारणार?

(लेख ज्येष्ठ पत्रकार असून ही त्यांची फेसबुक पोस्ट आहे)