शरद पवारांसाठी बारामतीपेक्षाही मावळ, शिरूर, शिर्डी महत्त्वाची

२८ एप्रिल २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


सत्ताधारी भाजपने शरद पवारांच्या हातातून बारामतीचा किल्ला हिसकावून घेण्यासाठी सारी ताकद पणाला लावली. पण पवारांसाठी यंदाच्या निवडणुकीत बारामतीपेक्षा मावळ, शिरूर आणि शिर्डी हे मतदारसंघ महत्त्वाचे झालेत. शिर्डीत तर काँग्रेसचा उमेदवार आहे. तरीही पवारांनी विखे पाटलांचा बालेकिल्ला असलेल्या कोपरगावात सभा घेतली.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातल्या मावळ, शिरूर आणि शिर्डी मतदारसंघात सोमवारी २९ एप्रिलला मतदान होतंय. पुणे, रायगड आणि अहमदनगर जिल्ह्यांत येणाऱ्या या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना होतोय. पण इथे प्रतिष्ठा पणाला लागलीय ती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची.

मावळमधे पवार-ठाकरे फॅमिलीची प्रतिष्ठा पणाला

शरद पवार यांना ज्या व्यक्तीमुळे आपली माढ्याची उमेदवारी कॅन्सल करावी लागली, त्या पार्थ पवारांच्या जागेसाठी आता अख्ख्या फॅमिलीची प्रतिष्ठा पणाला लागलीय. पवारांचा नातू आणि अजितदादांचा मुलगा असलेल्या पार्थने आत्या खासदार सुप्रिया सुळेंसकट सगळ्यांना मावळमधे कामाला लावलंय. एवढंच नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्रातले सगळे मातब्बर नेते २८ वर्षांच्या पार्थसाठी कामाला लागलेत.

हेही वाचाः मोदींना पंतप्रधान बनायचं, तर मुंबई जिंकावी लागेल

शिवसेनाही इथे हॅटट्रिक करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी त्यांनी सगळी शक्ती लावलीय. राज्यभरातल्या भाजपच्या नेत्यांनाही मावळच्या मैदानात तैनात केलंय. मतदारसंघात शिवसेनेपेक्षा भाजपची ताकद अधिक आहे. त्यामुळेच भाजपने या मतदारसंघावर आपला दावा ठोकला होता. पण शिवसेनेने मावळचं मैदान आपल्याकडेच ठेवून घेतलं. कारण ठाकरे कुटुंबाचं कुलदैवत असलेल्या कार्ल्यातल्या आई एकवीरादेवीशी कनेक्ट सांगणारा मावळ मतदारसंघ शिवसेनेची नैतिक, आध्यात्मिक ताकद आहे.

मावळमधे रायगड जिल्ह्यातले पनवेल, कर्जत, उरण तर पुण्यातले मावळ, चिंचवड आणि पिंपरी हे सहा मतदारसंघ येतात. जवळपास २३ लाख मतदार आहेत. यामधे पनवेलमधे सर्वाधिक साडेपाच लाख, तर पिंपरी आणि चिंचवडमधे साडेआठ लाख मतदार आहेत. महत्त्वाचं म्हणजे गेल्या दोन महिन्यात नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांची संख्याही खूप आहे. पनवेल आणि चिंचवडमधे ही संख्या अधिक आहे.

हेही वाचाः मुंबई का किंग कौन? मराठी मतदार तर नाही ना!

अजितदादांसाठी मुलाची नाही तर स्वतःचीच लढाई

गेल्यावेळी शिवसेनेच्या श्रीरंग बारणे यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या लक्ष्मण जगताप यांचा मोदीलाटेत दीड लाख मतांनी पराभव केला होता. जगताप यांना ३ लाख ५५ हजार मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राहुल नार्वेकर १ लाख ८२ हजार मतं घेत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. शेकापला मनसेनेही पाठिंबा दिला होता. याआधी २००९ मधे शिवसेनेचे गजानन बाबर ८० हजार मतांनी जिंकून आले होते.

आता पिंपरीतून आमदार असलेले जगताप भाजपसोबत आहेत. बारणेंशी छत्तीसचा आकडा असलेल्या जगतापांनी युतीधर्म म्हणून शिवसेनेला पाठिंबा दिलाय. कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमधे असलेले जगताप हे अजित पवार यांच्या जवळचे म्हणून ओळखले जायचे. पण २०१४ मधे भाजपची सत्ता आल्यावर चित्र बदलायला सुरू झालं. अजितदादांसोबत असलेल्या जगताप यांच्यासारख्या पुढाऱ्यांना सोबत घेऊन भाजपने राष्ट्रवादीची एकहाती सत्ता असलेली पिंपरी चिंचवड महापालिका हिसकावून घेतली.

पिंपरी चिंचवडमधली राष्ट्रवादी अजितदादांचं प्रोडक्ट म्हणून ओळखली जाते. त्यामुळेच मुलगा पार्थ यांनी राजकारणात आल्यावर मावळमधून लढायची तयारी सुरू केली. पण एकाच कुटुंबातले तिघं लोकसभा कसं लढवणार म्हणून त्यांना यंदा मैदानातून बाहेर ठेवण्यात येत होतं. पण कुठल्याही परिस्थितीत पार्थ यांना उमेदवारी द्यावी लागणार हे ठरल्यावर आजोबा यांनाच नातवासाठी आपली उमेदवारी मागं घ्यावी लागली.

अजितदादांसाठी मावळची लढाई ही मुलापुरती उरली नाही तर ती स्वतःची लढाई झालीय. इथल्या लढाईचं गांभीर्य ओळखूनच पक्षाचे स्टार कॅम्पेनर असतानाही ते फारसा दुसरीकडे फिरताना दिसले नाहीत. गेल्या काही आठवड्यांपासून त्यांनी पनवेलमधे आपला तळ ठोकलाय. गेल्या दोन निवडणुकांमधे पनवेल, उरण आणि कर्जत इथून राष्ट्रवादीला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. यंदा मात्र राष्ट्रवादीला रायगड जिल्ह्यात मोठा बेस असलेल्या शेकापचीही ताकद मिळालीय.

हेही वाचाः पुढचे चार टप्पे ठरवणार मोदी जिंकणार की हरणार?

मोदी वोटर शिवसेनेची ताकद

दुसरीकडे शिवसेनेनेही सारी शक्ती झोकून दिलीय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सभा घेऊन भाजपसाठीही मावळची सीट किती महत्त्वाची आहे हे आपल्या कार्यकर्त्यांना दाखवून दिलंय. पिंपरी, चिंचवडमधे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचंही तगडं नेटवर्क आहे. आयटीमधे काम करणाऱ्या तरुणांमुळे आपलं मत मोदीला हा फॅक्टरही इथे ठसठशीतपणे दिसतो. मोदी वोटर ही शिवसेनेची इथली सगळ्यात मोठी जमेची बाजू आहे. पाच लाख मतदार असलेल्या पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांनीही आगामी विधानसभा निवडणूक ध्यानात घेऊन ग्राऊंडवर काम केलंय.

हेही वाचाः एक्झिट अंदाजः १४ मतदारसंघात कोण जिंकतंय ते इथे वाचा

बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार कधी एकमेकांविरोधात लढताना दिसले नाहीत. पण आता पवार आणि ठाकरे फॅमिलीची प्रतिष्ठा पणाला लागल्याने मावळमधे कधी नव्हे एवढी चुरशीची निवडणूक होतेय. पवार फॅमिली स्वतः निवडणुकीच्या रिंगणात आहे. तर ठाकरे फॅमिलीने आपल्या उमेदवारासाठी ताकद लावलीय. दोघांसाठी मावळचा पेपर सोपा नाही. त्यामुळे दोघेही रविवारी सुट्टीच्या दिवशी साम, दाम, दंड या नीतिचा वापर करावा लागेल.

शिरूरमधे अनुभवी विरुद्ध फ्रेश चेहरा

पुणे जिल्हा हा काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. जिल्ह्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधेही दबदबा आहे. पण जिल्ह्यातली बारामतीची जागा वगळता पुणे, शिरूर आणि मावळ इथे भाजप, शिवसेनेचे खासदार आहेत. शिरूरमधून तर शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील सलग तीनवेळा संसदेत गेले. पण यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने शिरूर आणि मावळची जागा मिळवण्यासाठी सारी ताकद पणाला लावलीय.

राष्ट्रवादीने शिरूरमधे स्वराज्यरक्षक संभाजी या टीवी सिरीयलमधे संभाजी महाराजांची भूमिका करणाऱ्या अमोल कोल्हे यांना मैदानात उतरवलंय. त्यांना मैदानात उतरवल्यामुळे अँटी इ्न्कम्बन्सीचा सामना करणारे आढळराव पाटील स्वतःहूनच कोल्हे माळी समाजाचे असल्याचं सांगून अडचणीत आले. तसंच मी शिवाजीचा मराठा असल्याचंही सांगितलं. त्यामुळे मतदारसंघात मोठ्या संख्येने असलेल्या माळी समाजात चुकीचा संदेश गेला.

हेही वाचाः प्रस्थापितांना धक्का हा महाराष्ट्रातल्या मतदानाचा ट्रेंड आहे?

आढळरावांचा दांडगा जनसंपर्क

गेल्यावेळी मोदीलाटेत तीन लाख मतांनी निवडून आलेल्या आढळराव पाटलांचा मतदारसंघात दांडगा जनसंपर्क आहे. मतदारसंघातल्या सर्वपक्षीय नेत्यांमधे उठबस असते. त्याचा त्यांना निवडणुकीत फायदा व्हायचा. स्वतःची कंपनी असलेल्या आढळरावांचा एमआयडीसी पट्ट्यात चांगला वावर आहे. हा त्यांचा प्लस पॉईंट आहे. त्यामुळे ते २००९ मधे दोनेक लाख मतांनी निवडून आले होते.

पण आता आढळरावांविरोधात अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर काम करतोय. शरद पवारांनी जातीने लक्ष घालत मतदारसंघातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना सक्रीय केलंय. दरवेळी अंतर्गत दुफळीमधे आढळराव सहज निवडून यायचे. पण राष्ट्रवादीचे विधानसभेसाठी इच्छुक नेते एकदिलाने कामाला लागल्याचं चित्र आहे. इथून इच्छुक असलेले भोसरीचे माजी आमदार विलास लांडे पाटील हेही सक्रीय झालेत. गेल्या वेळी लांडे इथून उमेदवार होते.

हेही वाचाः एक्झिट अंदाज: दुसऱ्या टप्प्यात कोण जिंकलंय, कोण हरलंय?

राष्ट्रवादी काँग्रेसमधे कधी नव्हे एवढी एकजूट

शिरूरमधे जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदी, शिरूर या ग्रामीण, तर भोसरी आणि हडपसर या शहरी मतदारसंघांचा समावेश होतो. या सहा मतदारसंघांमधे २१ लाख ७३ हजार मतदार आहेत. यामधे भोसरी आणि हडपसरमधे जवळपास नऊ लाख मतदार आहेत. ग्रामीण भागामधे शरद पवार यांचं स्वतःचं नेटवर्क आहे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून तगड संघटन आहे. हे नेटवर्क कामाला लावून पवारांनी शिरूर मतदारसंघात ताकद लावलीय.

४० टक्के शहरी आणि ६० टक्के ग्रामीण भाग असलेल्या शिरूरमधे बैलगाडा शर्यतीचा मुद्दा कळीचा आहे. इथल्या शेतकऱ्यांकडून बैलगाडा शर्यतींवरची बंदी उठवण्याची मागणी होते. यासाठी आढळरावांनी यंदाही संसदेत आवाज उठवणार असल्याचं आश्वासन दिलंय.

हेही वाचाः यंदाच्या मतदानामधे मुस्लिमांची भूमिका कळीची, कारण

बैलगाडा शर्यत कोण जिंकणार?

कोल्हेही बैलगाडा शर्यतीचा मुद्दा हिरीरीने मांडताना दिसतात. बैलगाडा शर्यत अधिकृतरित्या सुरू करायला परवानगी मिळो किंवा न मिळो पण दोन्ही उमेदवारांनी आपलं घोडं मात्र पुढं दामटलंय. यात आढळरावांना अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर डोक्यात ठेऊन काम करावं लागतंय.

दुसरीकडे मतदारसंघातली महत्त्वाची सत्तास्थानं हाती असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला अजून शिरूर जिंकता आलं नाही. त्यामुळे राष्ट्रवादीने अमोल कोल्हेंसारख्या क्रेझ असलेल्या चेहऱ्याला मैदानात उतरवून सारी ताकद पणाला लावलीय.

हेही वाचाः माढा, अहमदनगरः जुनी घराणी विरुद्ध नवे राजकारणी या संघर्षाची कहाणी

शिर्डीत खरी लढत विखे आणि थोरातांमधेच

२००९ मधे मतदारसंघ फेररचनेमधे अनुसूचित जातींसाठी राखीव झालेला शिर्डी लोकसभा मतदारसंघ आतापर्यंत झालेल्या दोन्ही निवडणुकीत शिवसेनेच्या ताब्यात आहे. पण हा मतदारसंघ तसा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. पण राखीव प्रवर्गासाठी सुटल्याने तो काँग्रेसच्या हातातून निसटलाय. पण यावेळी काँग्रेसने इथे खूप ताकद लावलीय.

गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात किरकोळ संपर्क ठेवलेल्या खासदार सदाशिव लोखंडे यांनाच शिवसेनेने पुन्हा उमेदवारी दिलीय. काँग्रेसमधल्या अंतर्गत लाथाळ्यांमधे गेल्या दोन निवडणुकीत इथे शिवसेनेचा उमेदवार सहज विजयी झाला. पण आता ही जागा राखणं सेनेसाठी खूप कठीण होऊन बसलंय. तसंच लोखंडे हे स्थानिक उमेदवार नाहीत.

हेही वाचाः वाराणसीत काँग्रेसने प्रियंका गांधींना तिकीट का दिलं नाही?

शिवसेनेविरोधात अँटी इन्कम्बन्सी

काँग्रेसने श्रीरामपूरचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांना उमेदवारी दिलीय. काँग्रेस उमेदवाराला यंदा राष्ट्रवादीचं संघटन कधी नव्हे एवढी मदत करताना दिसतंय. त्यातच भाजपकडून इच्छुक असलेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे अपक्ष म्हणून मैदानात उतरलेत. २००९ मधे रिपब्लिकन पक्षाच्या रामदास आठवले यांना हरवण्याचा अनुभव असलेल्या वाकचौरेंनी लोखंडेंच्या अडचणी वाढवल्यात.

खासदार असताना केलेल्या कामांची पु्ण्याई वाकचौरेंच्या कामाला येताना दिसतेय. २०१४ मधे ते विखे पाटलांचं बोट धरून काँग्रेसचे उमेदवार झाले. पराभव झाल्यानंतर भविष्यातल्या शक्यता ओळखून ते भाजपमधे गेले होते. पण युती झाल्याने वाकचौरेंच्या तयारीवर पाणी फिरलं.

शिर्डीत २० उमेदवार रिंगणात आहेत. यामधे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे कॉम्रेड बन्सी सातपुते, बीएसपीचे सुरेश जगधने, वंचित बहुजन आघाडीचे संजय सुखदान आदींचा समावेश आहे. एकूण मतदार १५ लाख ६१ हजार ५५० इतके आहेत. शिर्डीमधे अकोले, संगमनेर, कोपरगाव, शिर्डी, श्रीरामपूर, नेवासे हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात.

हेही वाचाः सर्वपक्षीय सेफेस्ट सीट कशामुळे फाईटमधे आल्यात?

विखे पाटील घराण्याचा प्रभाव

शिर्डी मतदारसंघाची निर्मिती होण्याआधी हा भाग कोपरगाव मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा. काँग्रेसचे मातब्बर नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी कोपरगावचं प्रतिनिधित्व केलं. पण नव्याने अस्तित्वात आलेल्या आणि राखीव प्रवर्गासाठी सुटलेल्या शिर्डी मतदारसंघामुळे विखे पाटील यांची दावेदारी संपुष्टात आली. पण या मतदारसंघावर विखे पाटील घराण्याचा आजही चांगला होल्ड आहे. २००९ मधे निवडून आलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पाठीवर विखे घराण्याचाच हात होता.

त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसपासून दूर दूर राहण्याची भूमिका घेतलेल्या राधाकृष्ण विखे पाटील यांची भूमिका कळीचा बनलीय. मुलगा डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासाठी पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने अहमदनगरची जागा सोडली नाही. त्यामुळे डॉ. सुजय भाजपमधे गेले. त्यामुळे दुखावलेले राधाकृष्ण विखे आता नेमकी काय भूमिका घेतात हे अजून गुलदस्त्यातच आहे.

काल ते शिवसेना उमेदवाराच्या स्टेजवर दिसले. पण आज, शनिवारी लोणीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसमधून बाहेर पडण्याविषयी वेट अँड वॉचची भूमिका घेतली. त्यामुळे विखे पाटलांना काँग्रेस अजून सोडवत नसल्याचं दिसतंय. ते परिस्थितीचा अंदाज घेताहेत. अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर सक्रीय असलेल्या शिवसेना उमेदवाराच्या मागं राहून काही वेगळाच निकाल आला तर विखे पाटील घराण्याचा प्रभावही निकालात निघू शकतो. त्यामुळे विखे पाटील मुलाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन सावध पावलं टाकताना दिसताहेत.

हेही वाचाः लोकसभा निवडणुकीत सर्व पक्ष महिला उमेदवारांना विसरले

थोरात गटाला पवारांची ताकद

दुसरीकडे विखेविरोधी गटांनीही एकजूट होऊन काँग्रेसच्या उमेदवाराला बळ दिलंय. विखे नसतानाही आम्ही काँग्रेसचा उमेदवार निवडून आणू शकतो, हे दाखवून देण्यासाठी इरेला पेटल्यासारखं हा गट काम करतोय. बाळासाहेब थोरात हे या गटांचे नेते आहेत. शरद पवारांनीही कोपरगावमधे सभा घेऊन आपलं सगळं नेटवर्क थोरातांच्या मागे कामाला लावलंय, असं स्थानिक पत्रकारांनी सांगितलं.

रविवारी दिवसभरात विखे पाटीलही आपले पत्ते उघड करतील. किंवा आजच्या पत्रकार परिषदेतल्या त्यांच्या भुमिकेवरून ते झाकली मूठ ठेवतील. म्हणजे सुमडी सुमडीत बैठका घेतील. पण यंदाची निवडणूक शिवसेनेच्या सदाशिव लोखंडे यांना खूप जड जाताना दिसतेय. त्या तुलनेत काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे आणि अपक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांना चांगला प्रतिसाद मिळताना दिसतोय. परिस्थितीचा अंदाज घेऊनच विखे पाटील आपला कौल देतील. पण आता निवडणुकीचं वातावरण खूप पूढं सरकलंय. उमेदवार कुणीही असले तरी खरी लढत ही विखे पाटील विरुद्ध थोरात अशीच होणार.

हेही वाचाः ५ वर्षांत ३ लाख लोकप्रतिनिधी निवडून आणणाऱ्या राज्य निवडणूक आयोगाचा आज वाढदिवस