गणपती अथर्वशीर्ष २: पारायण करण्याआधी अर्थ समजून घेऊया

०२ सप्टेंबर २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


गणपती अथर्वशीर्षाची नुसती पारायणं करून काही अर्थ नाही. त्याचा अर्थ समजून घ्यायला हवा. तरच त्यातून भारतीय संस्कृतीतल्या महान संकल्पना समजून घेता येतील. हे आपण गणपती अथर्वशीर्षाच्या पहिल्या भागात पाहिलं. म्हणूनच आता या अथर्वशीर्षाच्या एकेका मंत्राचा अर्थ समजून घेऊया. सुरवात करुया ती शांतिपाठापासून.

अथर्वशीर्षात एकूण दहा मंत्र आहेत. त्यात बरेच पाठभेद आहेत. पण त्यामुळे अर्थात फार बदल होताना दिसत नाहीत. दहा मंत्रांच्या शेवटी फलश्रुती आहे आणि सुरुवातीला शांतिपाठ. आपण अर्थ समजून घेण्यासाठी सुरवात करणात आहोत, ती शांतिपाठापासून,

भद्रं कर्णेभिः श्रृणुयाम देवाः भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः।

स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाँसस्तनूभि व्यशेम देवहितं यदायुः।

असा सुरु होणारा शांतिपाठ अथर्ववेदातल्या सर्वच उपनिषदांची ओळख बनलेला आहे. ही एक मागणी आहे. `देवा, आम्हाला कानांनी चांगलं ऐकू दे, डोळ्यांनी चांगलं पाहू दे आणि आमच्या मजबूत शरीराने तुझी उपासना करत जे आयुष्य असेल ते दैवी कामांमध्ये जावं.` एक सकस आणि समर्पित आयुष्य जगण्याची प्रेरणा देणारी ही प्रार्थना आहे.

`पापाची वासना नका दावू डोळां, त्याहूनि आंधळा बराच मी` असं जगद्गुरू तुकाराम महाराजांचं मागणं याच प्रकारचं आहे. महात्मा गांधीजींची `बुरा मत देखो, बुरा मत सुनो, बुरा मत कहो` असं सांगणारी तीन माकडं याचाच आधुनिक प्रतिसाद आहेत.

यात आणखी दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे आपल्या उच्च ध्येयापासून विचलित होऊ नये यासाठीची तीव्र इच्छा यात आहे. दुसरं म्हणजे शरीराचं महत्त्व. शरीराला गौण मानून त्याला यातना देण्यापेक्षा ते चांगल्या कामांमध्ये गुंतवावं असं हा शांतिपाठ सांगतो आहे.

हेही वाचाः गणपती अथर्वशीर्ष १: हा तर मिनी संस्कृतीकोशच

स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः। स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः।

स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः। स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु।

शान्तिः शान्तिः शान्तिः।

शांतिपाठाच्या या दुसऱ्या मंत्रात वैदिक देवतांना कल्याण करण्याचं आवाहन केलेलं आहे. संपत्ती वाढवणारा इंद्र, जगाचं ज्ञान असणारा पूषा, वेगवान गरूड आणि बुद्धिचा देव बृहस्पती यांनी आमचं भलं करावं, अशी ही प्रार्थना आहे. पहिल्या मंत्रात चांगले विचार, सुदृढ शरीर आणि सकारात्मक संकल्प यांची मागणी केल्यानंतर संपत्ती, ज्ञान, गती आणि विद्या यांचीही मागणी केलेली आहे.

अध्यात्मिक आणि भौतिक अशा दोन्ही गोष्टी सारख्याच महत्त्वाच्या मानलेल्या आहेत. आम्हाला मजबूत शरीर हवं आहे, भरपूर पैसा हवा आहे. अल्पसंतुष्टीमुळे येणारी मंदपणा नकोय. जसं आत्मज्ञान हवंय तसंच जगाची माहितीही हवी आहे. रडत रडत नाही तर रसरसून जगण्याची प्रसन्न ऊर्मी येथे भेटते. वैयक्तिक, आध्यात्मिक, कौटुंबिक, सामाजिक आणि आर्थिक अशा सगळ्याच बाबतीत संतुलन असणारं यश हवं आहे. ही प्रॅक्टिकल शांतीची मागणी आहे. या नंतर अथर्वशीर्षाच्या मुख्य भागाची सुरवात होते.

नमस्ते गणपतये। त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि। त्वमेव केवलं कर्तासि। त्वमेव केवलं धर्तासि। त्वमेव केवलं हर्तासि। त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि। त्वं साक्षादात्मासि नित्यम् ।। १।।

गणपतीला नमस्कार करण्यापासून अथर्वशीर्षाची सुरुवात होते. भगवान पाणिनी स्पष्ट व्याख्या सांगतात गण म्हणजे संघ. बौद्ध साहित्यात लोकशाही मानणाऱ्या छोट्या राज्यांना गण म्हटलेले आहे. म्हणजेच लोकसमूहाचा नेता म्हणजे गणपती. गणपती ही देवता लोकांची, लोकांमधून आलेली, लोकांना सन्मान देणारी आहे.

धर्म अध्यात्म हे एकट्यादुकट्याचे काम नाही. त्यासाठीही लोकांनी एकत्र येऊन विचार आणि काम केले पाहिजे. त्यासाठीच गीतेतही लोकसंग्रहावर भर आहे. गणपती याच लोकसंग्रहाचा आणि संघटनेचा आग्रह धरणारा आहे. एस. के. कुलकर्णी यांनी `श्रीगणपति अथर्वशीर्ष` या पुस्तिकेत अथर्वशीर्षाच्या हवनविधीची सांगता `सत्यधर्मसंघं शरणं गच्छामि` या त्रिसत्य शरणागतीने होत असल्याचं नोंदवलंय. लोकसंघटनेच्या संदर्भात हा उल्लेख महत्त्वाचा आहे.

`देवा, तू तत्त्वमसि आहेस`, असं अथर्वशीर्ष सांगतं. तत्त्वमसि ही वेदांनी केलेली महान गर्जना आहे. तत् त्वम् असि. ते तू आहेस. ते जे काही महान तत्त्व आहे ते तूच आहेस, असा आत्मविश्वास सर्वसामान्य माणसाला देणारा अद्वैत तत्त्वज्ञानाचा हा महामंत्र आहे.

परंपरेनुसार प्रत्येक वेदाचं एक महावाक्य असतं. आजच्या भाषेत त्याला `टॅगलाईन` म्हणता येईल. वेदांचं सार त्या वाक्यात येतं. त्यापैकी सामवेदाचं महावाक्य `तत्त्वमसि` हे आहे. छांदोग्य उपनिषदातच्या सहाव्या अध्यायात उद्दालक आरुणी आणि श्वेतकेतू या तत्त्वज्ञ बापबेट्यांच्या चर्चेत `तत्त्वमसि`चं महान तत्त्वज्ञान रसाळ पद्धतीने मांडण्यात आलंय.

कोणत्याही माणसाने स्वतःला उन्नत केले तर तो आत्मज्ञान मिळवू शकतो. नराचा नारायण बनू शकतो, असा गौरव देणारे हे महावाक्य आहे. विशेष म्हणजे अन्य तीन वेदांची महावाक्यंही असाच अर्थ सांगणारी आहे. विविध आचार्यांनी या महावाक्यांचा अर्थ आपापल्या विचारधारेनुसार मांडला आहे. तो समजून घेण्यात एक वेगळीच मजा आहे.

तूच घडवतोस, तूच सांभाळतोस आणि तूच संपवतोस, तू सर्वव्यापक आहेस, तूच साक्षात आत्मा आहेस, असं देवाचं वर्णन अथर्ववेदात पुढे येतं. उत्पत्ती, स्थिती आणि लय हे तुझ्यामुळेच. `गॉड` तूच कारण जी फॉर जनरेटर, ओ फॉर ऑपरेटर आणि डी फॉर डिस्ट्रॉयर. तूच सर्वव्यापक आत्मशक्ती असून सृष्टीत व्यापलेला आहेस आणि त्याचं चक्रही चालवतो आहेस, अशी ही भावना आहे.

हेही वाचाः गणपती अथर्वशीर्ष ३: पारायण करण्याआधी अर्थ समजून घेऊया

पूर्वमीमांसा, उत्तरमीमांसा, सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, बौद्ध, जैन आणि चार्वाक या प्रमुख नऊ दर्शनांमध्ये आत्मा, परमात्मा, सृष्टीची निर्मिती, त्यामागील नियामक शक्ती यामागील तर्क विविध दृष्टिकोनांतून समजावून सांगितलेला आहे. आजही ती चर्चा थांबलेली नाही. त्यावर नवनवे ग्रंथ येत आहेत. इंटरनेटवर आधुनिक परिभाषेत जोरदार काथ्याकूट सुरू आहे.

अथर्वशीर्ष सांगते कर्ता, धर्ता, हर्ता, ब्रह्म, आत्मा काय आहे, ते समजून घ्या. ते तुमच्यासाठीच आहे. विचार करा. प्रश्न पडले तर विचार करायला लावणारी उत्तरं मदतीला आहेत. विचार केलात तरच तुम्हाला सत्यापर्यंत पोचता येईल

ऋतं वच्मि। सत्यं वच्मि ।।२।।

या दुसऱ्या मंत्राचा अर्थ आहे, `मी खरं तेच बोलतोय. मी ऋत तेच बोलतोय.` तसं पाहिल्यास खरं बोलतोय हे सांगित असताना वेगळं ऋताशी सुसंगत आहे तेच बोलतोय, हे वेगळं सांगायची गरज नव्हती. पण अथर्वशीर्षाचे रचयिता द्रष्टे गणकऋषी ऋताचा आग्रह धरतात.

ऋतचा शब्दशः अर्थ सृष्टीमागील गती असा आहे. या विश्वात प्रत्येक गोष्टीला एक निश्चित गती आहे. ती बदलली तर विश्व टिकणार नाही. पृथ्वीची, सूर्याची, ग्रहताऱ्यांची, गुरुत्वाकर्षणाची, वाऱ्याची, पाण्याची, अशा सर्वांच्या गतीवर आपलं अस्तित्व अवलंबून आहे.

आपण ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली असं म्हणतो. पण त्या ब्रह्मदेवाची ओळख ऋतज म्हणजे ऋताचा मुलगा अशी आहे. इतकी या ऋताची थोरवी आपल्या संस्कृतीने मान्य केली आहे. थोडक्यात ऋत म्हणजे व्यवस्था, शिस्त, संतुलन. कोणतंही संतुलन, मग ते पर्यावरणाचं असो की माणसाच्या मनाचं, ते स्थिर ठेवेल तेच सत्य अंतिम आहे.

हत्तीच्या एकेका अवयवावरून हत्तीची कल्पना करण्यात तोकडं सत्य हाती लागतं. अशावेळेस अंतिम सत्याचा ताळा करून देणारं ऋत आहे. कट्टरता किंवा एकाच दिशेने झुकलेलं असताना सत्य सापडत नाही. त्यासाठी संतुलन हवं. ऋत हवं. सर्व बाजूंचा विचार हवा.

अव त्वं माम्। अव वक्तारम्। अव श्रोतारम्। अव दातारम्। अव धातारम्। अवानूचानमव शिष्यम्। अव पश्चात्तात्। अव पुरस्तात्। अवोत्तरात्तात्। अव दक्षिणात्तात्। अव चोर्ध्वात्तात्। अवात्तरात्तात्। सर्वतो मां पाहि पाहि समन्तात् ।।३।।

इथे सर्वशक्तिमान भगवंताने आपलं रक्षण करावं अशी मागणी केलीय. `तू माझं रक्षण कर. वक्त्याचं आणि श्रोत्याचं रक्षण कर. देणाऱ्या आणि घेणाऱ्याचं रक्षण कर. अभ्यासू शिष्याचं रक्षण कर. पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या चारी दिशांकडून तसेच वरून, खालूनही तू माझं रक्षण कर. सर्व आसमंताकडून माझं संरक्षण कर.`

हे वाचून कुणालाही वाटू शकतं की हल्ला करणाऱ्या शत्रूपासून किंवा रानटी प्राण्यापासून रक्षणाची मागणी आहे. पण जे काम चार बॉडीगार्डमुळे होते त्यासाठी सर्वशक्तिमान परमेश्वराची याचना का करायची? विचार करून सत्य शोधून ते आपल्या जीवनात उतरवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तो रस्ता निसरडा आहे. अडचणींचा आहे.

`सत्य असत्याशी मन केले ग्वाही, मानियले नाही बहुमतां`, ही तुकाराम महाराजांनी दाखवलेली वाट आहे. तिथे माझ्या विवेकाचा कस लागतो आहे. सत्य निवडण्यासाठी ही विवेकाची मागणी आहे. म्हणून विचार सांगणाऱ्या आणि ऐकणाऱ्या, विचार देणाऱ्या आणि घेणाऱ्या तसंच प्रत्येक अभ्यासकाच्या विवेकाचं रक्षण येथे मागितलं आहे.

हेही वाचाः 'फँड्री'च्या दानपेटीने गणपती बाप्पा होतो प्रसन्न

विशेष म्हणजे येथे वक्ता –  श्रोता, दाता –  धाता या जोडगोळीनंतर गुरू – शिष्य अशा जोडीचं वर्णन अपेक्षित असतं. पण गणकऋषी इथे फक्त शिष्याच्या रक्षणाची मागणी करतात. माझा विवेक आणि विवेकाचं रक्षण करणारा परमेश्वर हेच माझे गुरू अशी त्यांची भावना असावी. अपरिपक्व गुरूंनी घातलेल्या गोंधळाची उदाहरणं सर्वत्र आहेत. त्यामुळे गुरू करण्यापेक्षा `कृष्णं वन्दे जगद्गुरूम` अशी देवालाच गुरू मानण्याची परंपरा आपल्याकडे आहेच. त्याचाच हा भाग असावा. जिथे विचारांना महत्त्व आहे. तिथे गुरूचं स्तोम माजवलं जात नाहीत. त्याचं हे उत्तम उदाहरण आहे.

सर्व दिशांकडून आणि आसमंताकडून रक्षण मागणेही या विचारांनाच धरून असावं. `आ नौ भद्राः क्रतवो यन्तु विश्वतः।` म्हणजे जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून सर्व दिशांमधून चांगले विचार येत असतील तर त्याचे स्वागत आहे, अशी ऋग्वेदाच्या भद्रसूक्ताची प्रार्थना आहे. आपल्या परंपरेतली ही सहिष्णुता आणि सर्वसमावेशकता हीच आपली सर्वात मोठी ताकद आहे.

पण आपण हे विसरत चाललो आहोत. दरवेळेस अथर्वशीर्ष म्हणताना आपण यावर पुन्हा पुन्हा विचार केला, तरी खूप झालं. बाप्पा आपल्यावर नक्की खुश होईल.

हेही वाचाः 

पुढच्या वर्षी लवकर आलाय माघी मोरया

आषाढी वारीनिमित्त पसरलेल्या वायरल विठ्ठलाची गोष्ट

उत्तर भारतातले रोहिदास भक्त मोदी सरकारवर एवढे नाराज का?

काश्मीरवर तावातावाने मत मांडण्याआधी एकदा ही पुस्तकं वाचून तर बघा

अमेझॉनच्या जंगलातली आग विझवण्यासाठी ब्राझीलने चक्क मिलिट्री पाठवली