मिशन मंगल सिनेमातल्या त्या ५ महिला वैज्ञानिक आहेत तरी कोण?

१४ ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


गेल्या काही वर्षांपासून अक्षय कुमारचे सिनेमे १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी रिलिज होतायंत. यंदाही मिशन मंगल हा इस्त्रोच्या यशस्वी मॉम अर्थात मंगळयान मोहिमेवर बेतलेला सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. याच्या ट्रेलरमधे आपल्याला ५ महिला वैज्ञानिक दिसल्या. कोण आहेत या पाचजणी?

येत्या गुरुवारी १५ ऑगस्टला स्वातंत्र्य दिन आणि रक्षाबंधन एकत्र आलेत. आणि याच दिवशी दोन नवेकोरे सिनेमे रिलिज होतायत. एक म्हणजे बाटला हाऊस आणि दुसरा ज्याच्या प्रमोशनच्या चर्चा सगळीकडे होतायत तो म्हणजे मिशन मंगल.

चांद्रयान २ मोहिमेत ३०% महिला

मिशन मंगल सिनेमाचा ट्रेलरच अंगावर शहारा आणणारा होता. हा सिनेमा काय कमाल करतो हे येत्या काळात समजेलच. यात अक्षरकुमारसोबत विद्या बालन, सोनाक्षी सिन्हा, तापसी पन्नू, निथ्या मेनन आणि किर्ती कुल्हारी यांनी भूमिका केलीय. आपल्याला आठवत असेल की इस्त्रोच्या महत्त्वाकांक्षी मॉम अर्थात मंगळयान मोहिमेची धुरा महिलांवर होती.

आपल्या बॉलिवुडच्या हिरोईन इस्त्रोतल्या त्याच महिला वैज्ञानिकांचं प्रतिनिधीत्व करताहेत. सध्या आपली चांद्रयान २ मोहिम सुरू आहे. येत्या १४ ते २० ऑगस्ट दरम्यान आपलं यान चंद्राच्या कक्षेत जाईल, अशी माहिती इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवान यांनी सोमवारी मीडियाला दिली. या मोहिमेतही जवळपास ३० टक्के महिलांचा सहभाग होता. आणि यात मंगळयानमधे काम केलेल्या महिला वैज्ञानिकांचाही समावेश आहे.

कमी खर्चातल्या अवकाश मोहिमा

आपली चांद्रयान २ मोहिम असो किंवा चांद्रयान १ किंवा मंगळयान यात आपण वेळोवेळी एक गोष्ट सिद्ध केलीय. कमी खर्चातही यशस्वी अंतराळात जाऊन यशस्वीरीत्या संशोधन करता येतं. आपलं मंगळयानाचं उड्डाण ५ नोव्हेंबर २०१३ ला झालं. आणि नासाचं मंगळयान मावेनचं १९ नोव्हेंबरला झेपावलं.

ही मोहिम नासाच्या मोहिमेपेक्षा पाचपट कमी खर्चात करण्यात आलं. या मिशनमधून मंगळावर मिथेन, कार्बन डाय ऑक्साईड आणि सोलार विंड इत्यादी गोष्टींचे अंश सापडले. तसेच मंगळ ग्रहाचे वेगवेगळे फोटोही काढण्यात आलेत. जे आपण इंटरनेटवर पाहू शकतो. या मोहिमेमागे ५ हजार वैज्ञानिक काम करत होते. त्यात महिला वैज्ञानिकांकडे महत्त्वाच्या जबाबदाऱ्या होत्या.

याच यशस्वी मोहिमेवरचा सिनेमा रिलिज होतोय. यामुळे सगळ्यांना या मोहिमेची प्रत्येक गोष्ट समजू शकते. सगळे वैज्ञानिक कसं काम करतात? काय तयारी करावी लागते? किती विभाग असतात वगैरे खूप काही समजेलच. अक्षय कुमारबरोबर पूर्ण वुमन आर्मीच काम करताना दिसतेय खरी. पण प्रत्यक्षात त्या महिला वैज्ञानिक कोण होत्या?

हेही वाचा: ती १५ मिनिटं ठरवणार आपल्या चांद्रयानाचं भवितव्य

सुट्टीच्या दिवशी येऊन काम केलं

मंगळयान मोहीमेच्या डेप्युटी ऑपरेशन डिरेक्टर म्हणून रितू कारिधाल  यांनी काम केलं. त्यांनी मीडियाला दिलेल्या माहितीनुसार, मंगळयान प्रकल्पावर एप्रिल २०१२ पासून काम सुरू होतं. देशासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प होता. यासाठी संपूर्ण टीमने खूप मेहनत घेतली. अगदी सगळ्यांनी सुट्टीच्या दिवशी येऊनही काम केलं.

फक्त १८ महिन्यात हा प्रकल्प यशस्वी करायचं टार्गेट होतं. जे सगळ्यांनी मिळून पूर्ण केलं. करिधाल यांना लहानपणी आकाशातले ग्रह तारे नक्की कुठून येतात? चंद्राचा आकार कमी आणि जास्त कसा होतो? असे प्रश्न पडायचे. तसंच त्यांची विज्ञान आणि भौतिकशास्त्राशी गट्टी होती.

त्या वर्तमानपत्रात इस्रो आणि नासाबद्दलचे लेख वाचायच्या. एमएस्सी केल्यानंतर त्या इस्त्रोत रुजू झाल्या. आणि गेली २१ वर्ष त्या इथे कामाला आहेत. त्यांनी आतापर्यंत चांद्रयान १ आणि २, रडार अशा अनेक मोहिमेत सहभाग घेतलाय.

दोन मुलांची आई असलेल्या करिधाल यांनी करिअर आणि घर अशा दोन्ही जबाबदाऱ्या घरच्यांच्या पाठिंब्याने सांभाळल्या.

हेही वाचा: चांद्रयान २ : चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोचणारं पहिलं अंतराळयान

आई आणि मुलीची एकच परीक्षा

नंदिनी हरिनाथ  यांची आई गणित शिक्षिका आणि वडील इंजिनिअर आहेत. नोकरदाराच्या घरात वाढलेल्या हरिनाथ यांना लहानपणापासून विज्ञानात आवड होती. हरिनाथ यांनी बीबीसीला एक इंटरव्यू दिला. त्यात त्या म्हणाल्या, घरातले सगळेजण मिळून आम्ही टीवीवर विज्ञानविषयक कार्यक्रमत बघायचो. पण मला कधीच वैज्ञानिक व्हावं वाटायचं नाही.

शिक्षण झाल्यानंतर त्यांनी सहज जॉबसाठी इस्त्रोत अप्लाय केलं. आणि आता त्या गेल्या २३ वर्षांपासून इस्त्रोत काम करतायंत. मंगळयान मोहिमेत त्यांनी डेप्युटी ऑपरेशन डिरेक्टर म्हणून काम केलं.

त्या रोज १४ ते १५ तास काम करत होत्या. त्यावेळी बरेच देश भारतासोबत कोलॅब्रेशन करण्यासाठी तयार होते. त्या सगळ्यांसोबत त्या डिल करत होत्या. मोहिमेत आपल्या देशाचे आणि इतर देशांचे मिळून १०४ उपग्रह मंगळयानासह झेपावले.

मंगळयान मोहिमेच्या दरम्यानच त्यांच्या मुलीची बोर्डाची परीक्षा होती. नंदिनी यांच्यासाठी तो काळ अत्यंत कठीण होता. एकीकडे देशातला महत्त्वाचा प्रकल्प आणि दुसरीकडे मुलीच्या आयुष्यातला महत्त्वाचा टप्पा. पण मायलेकी या परीक्षेत शंभरपैंकी शंभर गुण मिळवत उत्तीर्ण झाल्या.

मंगळयान मोहिमेच्या यशानंतर स्पेस सायंटिस्ट म्हणून हरिनाथ यांना जगभरात ओळख मिळाली. आणि त्यांची मुलीने गणितात शंभरपैंकी शंभर मार्क मिळवले. हरिनाथ आवर्जून सांगतात, नोटबंदीनंतर नव्या नोटा चलनात आल्या. त्यावेळी २ हजाराच्या नोटेवर मंगळयान मोहिमेचं चित्र बघून समाधान वाटलं.

हेही वाचा: चंद्रावर पहिलं पाऊल कोण ठेवणार यावरुन वाद झाला होता

नील आर्मस्ट्राँगकडून मिळाली प्रेरणा

इस्रोतल्या सगळ्यात वरिष्ठ वैज्ञानिक अनुराधा टी के. यांचा उपग्रह अवकाशात पाठवण्यात महत्त्वाचा वाटा होतो. गेली ३४ वर्षं त्या इस्त्रोत इंजिनिअर म्हणून काम करतायंत. मंगळयान मोहिमेत त्यांनी सॅटेलाईट प्रोग्रॅम डिरेक्टर म्हणून काम केलं.

अनुराधा ९ वर्षांच्या असताना माणसानं चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. त्यांनी यावर कवितासुद्धा केली होती. नील आर्मस्ट्राँगमुळे त्यांना स्पेस सायंटिस्ट होण्यासाठी प्रेरणा मिळाली. आणि त्या १९८२ मधे इस्रोत काम करू लागल्या. त्यावेळी फक्त ५-६ महिला इंजिनिअर्स होत्या. आता १६ हजार महिला वैज्ञानिक आणि कर्मचारी आहेत.

मंगळयान मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यात त्यांना घरी जाणंही कठीण होतं. घर, संसार, मुलं आणि करिअर सांभाळताना घरातून भक्कम पाठिंबा हवा असं अनुराधा यांनी झी न्यूजला दिलेल्या इंटरव्यूमधे म्हटलंय. अजून अनेक ग्रह, तारे आणि आकाशगंगांना गवसणी घालायचीय, असंही अनुराधा यांनी आवर्जून सांगितलं.

हेही वाचा: इस्त्रोचे संस्थापक विक्रम साराभाईंना गुगलची डूडल सलामी

वर्तमानपत्रात चांद्रयानची माहिती वाचली आणि

मौमिता दत्ता  भौतिक वैज्ञानिक आहेत. इस्त्रोच्या स्पेस एप्लिकेशन सेंटरमधे त्या काम करतात. अंतराळ मोहिमांसाठी ऑप्टिकल आणि आयआर सेन्सर, इन्स्ट्रुमेंट्स, पेलोड बनवतात. आणि त्यांची चाचणीसुद्धा मौमिता घेतात.

मंगलयान मोहिमेतल्या पेलोडची संपूर्ण जबाबदारी त्यांनी घेतली. आणि ती यशस्वीपणे पार पाडली. मंगळयान मोहिमेत त्यांनी प्रोजक्ट मॅनेजर म्हणून काम केलं. त्यासाठी इस्त्रोकडून त्यांना उत्तम कामगिरीचं पारितोषिकही मिळालं.

दत्ता यांचा जन्म, शिक्षण सर्वकाही कोलकात्यामधे झालं. त्या नववीत असताना वर्तमानपत्रात चांद्रयान मोहिम होणार याची माहिती वाचली. आणि त्यांना अंतराळात काम करण्याची इच्छा झाली. पुढे त्यांनी अप्लाइड फिजिक्समधे एमटेक केलं. २००६ मधे त्या इंजिनियर म्हणून इस्त्रोत लागल्या.

दत्ता यांनी चांद्रयान १ आणि २ मधेसुद्धा काम केलं. तसंच मंगळयान मोहिमेत त्यांची महत्त्वाची भूमिका होती. जी आता मिशन मंगळ या सिनेमातूनही आपल्याला दिसणार आहे.

हेही वाचा: पहिल्या अग्निबाणाच्या यशस्वी उड्डाणाची आज पन्नाशी

टीवीवरच्या कार्यक्रमामुळे बदलला निर्णय

मंगळयान मोहिमेमधे मिनल रोहित  यांनी प्रोजेक्ट मॅनेजर आणि सिस्टीम इंजिनियर म्हणून काम केलं. त्या गुजरातच्या राजकोटमधे जन्मल्या. त्यांचं शिक्षण अहमदाबादमधे झालं. इलेक्ट्रॉनिक आणि कम्युनिकेशन इंजिनियरिंगमधे गोल्ड मेडल मिळवणाऱ्या मिनल यांना लहानपणी मात्र डॉक्टर व्हायचं होतं. मात्र टीवीवरचा अवकाशविषयक कार्यक्रम बघून त्यांचा कल बदलला.

पुढे मिनल यांची इस्त्रोमधे निवड झाली. त्या सॅटेलाईट कम्युनिकेशन इंजिनियर म्हणून काम पाहात होत्या. त्यांना २००७ मधे इस्त्रोचा यंग सायंटिस्ट पारितोषिकही मिळालं. आणि चांद्रयान २ मोहिमेत डेप्युटी प्रोजक्ट डिरेक्टर म्हणून त्या कार्यरत आहेत. मिनल रोहित यांचं नाव मीडियात काही ठिकाणी मिनल संपत असंही येतं.

अशा या ५ महिला वैज्ञानिक. वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या, स्वत:ला वेगवेगळ्या पातळ्यांवर सिद्ध केलं. आणि आज त्या घर सांभाळून देशातले महत्त्वाचे प्रोजक्टस सांभाळत आहेत. त्या देशातल्याच नाही तर जगभरातल्या मुलींच्या आयडॉल बनल्यात. त्यांच्या कामगिरीवर आता सिनेमा येतोय.

हेही वाचा: 

आज डावखुऱ्यांचं उजवेपण समजून घेण्याचा दिवस

मुंबईचा श्रेयस अय्यर टीम इंडियात चौथ्या नंबरची जागा घेईल?

आपल्याला वर्षही मोजता येणार नाहीत एवढा जुना पोपट सापडलाय