किल्लारीतल्या भूकंपाला ३० सप्टेंबर २०२० ला २७ वर्ष पूर्ण झाली. भूकंपानंतर किल्लारी परिसरात मोठ्या प्रमाणात पूनर्वसनाचं काम उभारण्यात आलं. पण त्याच वेळी या आपत्तीतून आपण सरकारी, सामाजिक आणि व्यक्तिगत पातळीवर फार काही शिकलोय असं मात्र आजही जाणवत नाही. यावर अतुल देऊळगावकर यांनी ‘डळमळले भूमंडळ’ हे पुस्तक लिहिलंय. यानिमित्तानं त्यांच्याशी प्रसाद कुमठेकर यांनी साधलेला हा मुक्त संवाद.
प्रसाद कुमठेकरः 'सुवर्णमय पटलाने झाकलेल्या सत्यतत्वाचं दर्शन घडू दे,' हे इशावास्योपनिषदातलं सुभाषित तुमच्या ‘डळमळले भूमंडळ’ या पुस्तकाच्या अगदी सुरवातीला वापरलं आहे. सत्यतत्वाचं दर्शन घडण्यासाठी भूमंडळ डळमळावंच लागतं का सर?
अतुल देऊळगावकर: नाही. इशावास्योपनिषदामधे लिहिलंय ते विनोबांनी समजावून सांगितलं आहे, ते सत्यतत्व समजून घेणं हे खूप अवघड आहे. सत्य हे अनेक पटलांनी झाकलेलं असतं. त्यात जाण्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात. विविध उपायांनी आणि विविध अंगांनी ते सत्य बघायचा प्रयत्न करावा लागतो. भूकंपामधे असं व्हायचं की प्रत्येकाच्या दृष्टीकोनातून भूकंप दिसायचा, पुनर्वसन दिसायचं, विविध प्रकारच्या क्रिया, प्रक्रिया चाललेल्या दिसायच्या. यातून सत्य नेमकं कोणतं हा प्रश्न पडायचा. कारण प्रत्येकाचं सत्य वेगवेगळं असतं. मग आपण म्हणतो त्याप्रमाणे ‘चक्रधरांचे सात आंधळे आणि एक हत्तीची गोष्ट’ असू दे किंवा अकीरा कुरुसावा यांचा ‘रोशोमान’ हा चित्रपट असू दे, अंतिम सत्य काही आपल्या हाताला लागत नाही. सत्याचे वेगवेगळे तुकडे आपल्या हाताला लागतात. तर हे सत्य समजून घेण्याचा प्रयत्न या पुस्तकात केलेला आहे.
एकाच वेळेला किल्लारी, पारधेवाडी, लातूर, मुंबई, आणि युनायटेड नेशन्सच्या न्यूयॉर्क ऑफिसमधे भूकंपासंदर्भात काय काम चालू आहे, अशा अनेक पातळ्यांवरच्या घडामोडी समजून घेऊन आपल्याला या पूर्ण आपत्तीकडे पहायचं आहे. या अर्थाने मी अवतरण घेतलं होतं. तर या वेगवेगळ्या समाजाच्या, ज्याला आपण इंग्रजीमधे ‘क्रॉस सेक्शन्स’ म्हणतो, विविध स्तरांतून आपण या सगळ्या गोष्टींकडे पाहिलं तर आपत्तीच्या काळामधे आपलं जे वर्तन असतं, त्या वर्तनाला समजून घेतलं तर इतर वेळेला आपण कसं वागतो याचं विश्लेषण आपल्याला करता येतं.
हेही वाचा: मराठवाड्याच्या मागासलेपणात पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचं गुपित
प्रसाद कुमठेकर: ३० सप्टेंबर १९९३, सकाळी ३ वाजून ५५ मिनिटं, भूमंडळ डळमळलं. भूकंपापूर्वी १२,२६४ लोकसंख्या असलेल्या किल्लारी गावात दुपारी १२ वाजता, दीड लाख जनता भूकंप बघण्यासाठी जमली होती. लोकं नुसतं पाहण्याऐवजी कामाला लागली असती तर कीत्येक जीव वाचले असते. Disaster tourism आजही आहे आणि तेव्हाही होती. ‘डळमळले भूमंडळ’ मधे येणारी ही आंखो देखी आज वाचताना, आपण आपत्तीपासून काही शिकताना दिसत नाही असं वाटतं. पण शिकत आहोत तर काय शिकत आहोत?
अतुल देऊळगावकर: समाजमनासंबंधी विनोबा भावे असं म्हणायचे की, 'आपल्याकडे समाजमनाची क्रांती, उत्क्रांती होत नाही किंवा झालीच तरी अतिशय हळू म्हणजे गोगलगायीच्या पावलानं होते. हालचाली अत्यंत हळू होत असतात.' १९९३ ला जे दिसलं होतं ते काय? आपल्याला कुठलाही अपघात झाल्यानंतर उत्सुकता असते ते पाहण्याची आणि सांगण्याची. म्हणजे 'मी ते बघितलं बरंका, बापरे बापरे' असं सांगायची घाई असणं, कुठे बघितलं, कीती भयानक बघितलं हे सांगण्यासाठी जावंसं वाटणं. मग तो पूर असू दे, भूकंप असू दे. १९६७ मधे कोयनेत भूकंप झाला. १९९३ ला महाराष्ट्रात भूकंप झाला. पण या मधल्या काळात या भूकंपाकडे कसं पाहिलं पाहिजे?
१९९० ला आपण, जगाने खाजगीकरण स्वीकारलं. त्यानंतर टीवी चॅनल आले, आणि एका अर्थाने जागतिकीकरणाची प्रक्रिया सुरु झाली. त्यानंतर झालेला लातूरचा भूकंप ही जगातली सगळ्यात मोठी आपत्ती होती. त्यामुळे किल्लारीचा भूकंप बीबीसीने दुसऱ्या दिवशी लगेच दाखवला. बीबीसीवर किल्लारीचे त्या काळातले सरपंच, डॉ शंकरराव पडसालगी हे दिसत होते. तिकडे चेन्नईहून ‘हिंदू’नं हेलिकॉप्टरने पत्रकारांना पाठवलं होतं. म्हणजे ही जशी देशाच्या दृष्टीने महत्वाची आपत्ती होती, तशीच जगाच्या दृष्टीनेही होती. पण इकडे लातूरात काय होत होतं? तसं किल्लारीमधे एक वर्षापासून छोटे छोटे भूकंपाचे धक्के बसत होते, पण पहाटे ३.५५ ला भूकंपाचा पहिला झटका बसला, तेव्हा पहिली अॅम्ब्युलंस साडेचार वाजता लातूरमधून किल्लारीकडे निघाली होती.
त्याचं महत्वाचं कारण असं की, त्या दिवशी अनंत चतुर्दशी होती आणि अनंत चतुर्दशी असल्यामुळे अजूनही मिरवणूक चालू होती. मिरवणूक गंजगोलाईपर्यंत गेली होती. पहिला धक्का बसला तेव्हा लोकांना पहिल्यांदा वाटलं की बॉम्बस्फोट झाला का काय? कारण त्यावेळेला मुंबईत बॉम्बस्फोट होत होते. किंवा फटाका फुटला का काय? नेमकं लोकांना काही कळत नव्हतं. जेव्हा लातूरच्या एसपीना किल्लारीहून फोन आला की किल्लारीला भूकंप झालाय, त्यांनी सगळं बंद करून किल्लारीला मदत पाठवा म्हटलं. तेव्हा तिथल्या डॉक्टरांनी, म्हणजे माझ्या माहितीत असलेल्या, ‘सदासुख’ हॉस्पिटलचे डॉक्टर सारडा यांनी पहिली अॅम्ब्युलंस पाठवली.
पहिलं वाहन जे लातूरवरून गेलं होतं त्यामधून मला जाता आलं. मी पण तिथं पोचलो होतो. पण नंतर केवळ बघण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात लोक आले. हे कामाला लागले असते तर खूप लोकांचे प्राण वाचले असते. काही अडकलेल्या कुटुंबांची नावं पण मला माहिती आहेत ज्यांना मी डोळ्यांनी ढिगातून 'सोडवा सोडवा' असं ओरडताना पाहिलं. आमच्या ओळखीचे डॉक्टर यंदे किल्लारीला पोचले होते. त्याच्यामुळे आम्हाला कोणत्या घरात कोण कोण आहे, काय करायचं आहे, आधी बातमी करायची की आधी त्यांना सोडवायचं, हे कळलं. कारण ती घरं दगड मातीची होती.
मोठ्या प्रमाणात आवाज येत होते. बरं तेव्हा कळत नव्हतं की कुठपर्यंत हानी झालीय. मधेच किल्लारीला कळलं की गांगलखेड्याला भूकंप झाला आहे. कोणी म्हणालं मंगरूळला पण भूकंप झालाय, आणि एवढं सगळं चालू असताना अर्ध्या तासामधे धरण फुटण्याची अफवा सुटली. सगळी लोकं लातूरच्या दिशेने पळायला लागली. मग कळलं की धरण फुटलेलं नाही. तेरणा धरण फुटल्याची अफवा सुटली होती. त्या काळात प्रचंड अफवा पसरल्या होत्या. मुद्दा फक्त हा होता की त्या वेळेला लातूर वरून वाहन मिळेल ते घेऊन 'लई मोठा भूकंप झालाय, लई नुकसान झालंय' असं म्हणून बघायला जाणारी लोक खूप होती. त्या वाहनांमुळे आणि त्या लोकांमुळे ट्रॅफिक जॅम झालं होतं.
प्रसाद कुमठेकर: लातूरमधे १९९३ ला ट्रॅफिक जॅम?
अतुल देऊळगावकर: हो. लातूर, अवसर रस्त्यावर ट्रॅफिक जाम. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार तिकडे येत होते तेव्हा त्यांना जायलाही अडचण निर्माण झाली. इतकी बिकट परिस्थिती होती. पण २७ वर्ष झाल्यानंतर लक्षात काय येतंय की कुठलीही आपत्ती आल्यानंतर होणारं हे आपत्ती पर्यटन आहे ते खूप घातक आहे. ती मनोवृत्तीच खूप घातक आहे. आता कदाचित ते सेल्फी मोडमधे गेलेलं असेल. इतरांना दाखवायचं असेल. पण सेल्फी मुळे होणारे जे मृत्यू आपल्या देशात आहेत, त्याचं जे कारण आहे, ती मानसिकता आपल्याला याच्याशी जोडता येते. मला ते बघायचं आहे. बाकी काही नाही. त्यापुढे मी मदत केली पाहिजे, मी इतरांना मदतीला नेलं पाहिजे ही भावनाच नाहीशी झालीय.
या वेळेला काय झालं होतं बघा, देशातल्या कानाकोपऱ्यातून लोक आले. तिसऱ्या दिवशी. म्हणजे ‘छत्तीसगड मुक्ती मोर्चा’चे बिचारे कष्टकरी कामगार किल्लारीला येऊन घर उपसून, घरातलं सामान काढून द्यायला लोकांना मदत करत होते. पहिले दहा दिवस तर नुसतंच घरातलं सामान काढून देणं यासाठी कीती तरी लोक मदत करत होते. एनएसएसचे लोक मदत करत होते. एनसीसीचे लोक मदत करत होते. आपल्याकडे काम करणाऱ्या लोकांची अजिबात ददात नव्हती. लोक गरजेचं आवश्यक सामान पाठवत होते.
पहिलाच भूकंपाचा प्रसंग असल्यामुळे काय करावं किंवा काय नाही हे लोकांना कळत नव्हतं. यामधे सुसूत्रता आणणं कठीण जात होतं. पहिले दोन दिवस हे सगळं सुरु होतं. मग मुख्यमंत्री शरद पवारांनी मिलीटरीला बोलवायचा निर्णय घेतला. तो निर्णय केवळ गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी घेतला. एका शिस्तीमधे भाग साफ करावा यासाठी मिलिटरी बोलावली गेली. आपल्या भागामधे आपण मिलटरी पाहिली होती ती १७ सप्टेंबर १९४८ ला हैद्राबाद मुक्तीच्या वेळेला. म्हणजे हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या अखेरच्या काळात सरदार वल्लभ भाई पटेलांनी मिलिटरी पाठवली.
१ ऑक्टोबर १९९३ च्या किल्लारी भूकंपाच्या वेळी आपल्याकडे मिलिटरी आली. त्यावेळी मी मिलिटरीतल्या अनेक लोकांना भेटलो होतो. ते इतक्या शिस्तीत काम करत होते. अगदी दोन ते तीन दिवसात त्यांना शक्य झालं. हे पोलिसांनाही शक्य झालं असतं पण त्या तश्या ऑर्डर्स देणं आणि त्या ऑर्डर्स पाळणं हे जर झालं असतं, तर ते नक्की शक्य होऊ शकलं असतं. मुद्दा एवढा आहे फक्त की तेव्हा काय आणि आत्ता काय काहीही फरक पडलेला नाही. लोकांची मानसिकता तशीच आहे.
प्रसाद कुमठेकर : तुमच्या पुस्तकातल्या सहाव्या परिशिष्टात विसाव्या शतकात जगभरात झालेल्या भूकंपांची यादी दिलीय. १९९३ पर्यंत झालेल्या भूकंपाची यादी त्यात आहे. जगभरातल्या भूकंपांच्या तीव्रतेनुसारचा क्रमही आहे. जगभरात १९ शतकाच्या सुरवातीपासून ते १९९३ पर्यंत १७ भूकंप झालेत, त्यात रिश्टर स्केलवर किल्लारीचा क्रम शेवटचा आहे. त्या परिशिष्टात कोणत्या भूकंपामधे कीती जीवितहानी झाली याचीही आकडेवारी दिली आहे. त्यातही किल्लारीच्या भूकंपाचा क्रम खालीच आहे. तरीही भूकंप म्हटला की जगभरात किल्लारीचा भूकंपच लोकांना लक्षात आहे. म्हणजे भूकंप आणि किल्लारी हेच समीकरण लोकांना आठवतं. याचं काय कारण असू शकतं? कारण १९७८ चा ही भूकंप आहे?
अतुल देऊळगावकर: त्याचं कारण मी आधी म्हटलं त्या प्रमाणे असा भूकंप थेट टीवी चॅनेलवरून दिसणं आणि त्याचं सर्वत्र रिपोर्टिंग होणं या बाबतीतला हा तिथला पहिला भूकंप होता. पण तसा आपल्याकडचा भूजमधे झालेला, सगळ्यात मोठा भूकंप, २६ जानेवारी २००१ चा आहे. तो ८ रिश्टर स्केलचा होता. त्यात जवळ जवळ २०,००० लोकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर तामिळनाडूला आलेली त्सुनामी मोठी आपत्ती होती. पुढे तर आपत्यांची वरचेवर होणारी तीव्रता आणखी वाढत गेलेली आहे.
किल्लारीचं वैशिष्ट्य असं होतं की, तुलनेन ६.४ रिश्टर स्केल वर तो भूकंपाचा झटका अतितीव्र नव्हता. ते अतितीव्र भूकंपाचे धक्के चीनमधे बसले होते. त्यात लाखो लोक मेलेले होते. किल्लारीचा भूकंप लक्षात राहण्याचं कारण असं की तो ग्रामीण भागातला भूकंप होता, दगड मातीच्या घरातला होता आणि मृत्यूची संख्या त्या मानाने जास्त होती. जगात त्यानंतरच संयुक्त राष्ट्र संघ, जागतिक बँकेनं पुनर्वसनासाठी मदत करणं ही प्रक्रिया सुरु झाली, या सर्व कारणांनी किल्लारीच्या भूकंपाची आपत्ती मैलाचा दगड मानली जाते, ती भूगर्भीय शास्त्रीय दृष्टीनेही मानली जाते आणि आंतरराष्ट्रीय इतिहास किंवा राजकारणाच्या दृष्टीनेही मानली जाते.
हेही वाचा: दोन वर्षांत महाराष्ट्र अन्नधान्यात स्वयंपूर्ण झाला नाही तर मला फाशी द्या : वसंतराव नाईक
प्रसाद कुमठेकर : या पुस्तकात तुम्ही लिहिलंय की आपत्तीकाळात पत्रकारांची चांदी असते. मनात तुंबलेलं कवित्व ओकण्याची सुसंधीच. प्रसार माध्यमांनी न दाखवलेल्या संयमामुळे प्रचंड आर्थिक नुकसान झालेलं होतं. पुस्तकात त्या बाबतीत फार व्यवस्थित येतं. त्यावर काही उजेड टाकू शकाल का?
अतुल देऊळगावकर: आपल्याकडे अजूनही, ज्याला पत्रकारितेतलं specialization असं आपण म्हणूया, ते झालेलं नाहीये. ते मी त्या काळात अनेक मित्रांना वारंवार सांगत होतो. एकाच पत्रकाराला भूकंपाचं रिपोर्टिंग द्या त्यामुळे त्याला तो भाग माहित होईल, प्रश्न माहित होतील, आणि तो त्यात अधिक पारंगत होत जाईल. मी तुलनेने सांगतो, आपल्यापेक्षा भूजमधे एक ‘कच्छमित्र’ नावाचं दैनिक आहे, जसं आपल्याकडे अनंत राव भालेरावांचं नाव आहे तसं तिकडे पत्रकार खत्रींचं नाव आहे. जबाबदारीची प्रादेशिक पत्रकारिता म्हणतात त्यात ते पारंगत आहेत.
२६ जानेवारी २००१ च्या आधी जेव्हा छोटे भूकंपाचे धक्के बसत होते, तेव्हा खत्री साहेबांनी ‘कच्छमित्र’ मधे २१ अग्रलेख लिहून म्हटलं होतं की आम्हाला भूकंपाचा धोका आहे, आम्हाला वाचवा. ही जागरूक पत्रकारिता असते. मग वैज्ञानिकांशी बोलून, स्थापत्य इंजिनियरशी बोलून, विविध पर्याय सुचवत होते. जबाबदारीची पत्रकारिता कशाला म्हणतात तर आधी तुम्ही विज्ञान समजून घ्या, मग तुम्ही इंजिनियरींगचे मुद्दे समजून घ्या, मग लोकांचे प्रश्न मांडत, तुम्ही एका चांगल्या पर्यायाविषयी सूचवा. हे जबाबदार पत्रकारितेचं काम होतं.
आपल्याकडे अशी पत्रकारिता नाही. कारण कष्ट घ्यायचे नसतात. म्हणून फक्त करुण कहाण्या सांगतात. करुण कहाण्या तर असतातच प्रत्येक वेळेला. कोण गेलं, कीती गेले, सगळ्यात वृध्द कोण गेलं, सगळ्यात लहान कोण, एका घरात जास्त कोण गेले, मग त्यांचे विदारक फोटो, हे कीती काळ देणार तुम्ही? पुनर्वसनात काही टप्पे असतात. सुरवातीचा सुटकेचा आहे, तो साधारणपणे आठ दिवसांचा आहे. आठ दिवसानंतर सुद्धा एक नऊ, दहा महिन्यांची चिमुकली लहान मुलगी सापडली होती. त्याचा आनंद झाला होता सर्वांना. नंतरचा टप्पा मदत आहे. घरात काहीही नाहीये त्यांना ते द्यायचं आहे. मग तात्पुरतं पुनर्वसन आहे. मग दीर्घकालीन पुनर्वसन आहे.
प्रत्येक टप्प्यामधली कर्तव्यं आणि जबाबदारी वेगळी आहे. त्यामधे जवळच्या समाजाची, समाजसेवी संस्थांची, सरकारची, राजकीय नेत्यांची, प्रत्येकाची जबाबदारी वेगळी आहे, याचं भान कोणी आणून द्यायचं? प्रत्येक काळात हे करायला लागतं. खरी फॅक्ट अशी आहे की आपण एरवी जे वागतो, म्हणजे सर्वसामान्य काळात आपण जे वागतो, ते कोणत्याही आपत्तीत भिंगाखाली बघितल्या सारखं, म्हणजे मोठी प्रतिमा, होऊन दिसतं. कीतीही मोठ्या प्रमाणामधे. कारण सगळीकडचा प्रकाशझोत हा त्या भागावर आहे. त्यामुळे तुम्हाला अगदी छोट्या छोट्या गोष्टी अधिक स्पष्ट दिसायला लागल्या पाहिजेत. पण एरवी समाज कसा वागतोय, एरवी राजकीय नेते कसे वागतात, अधिकारी कसे वागतात, समाजसेवी संस्था कश्या वागतात, या सर्वांच्या वर्तनाचा उत्तम लेखाजोखा ताळेबंद म्हणजे आपल्या कडचं भूकंप पुनर्वसन आहे. तर पत्रकार काय, कोणीच जबाबदारीने वागलं नाही.
किल्लारीच्या भूकंपानंतर काय सांगता येईल की संस्था म्हणून कोणीही जबाबदारीने वागलं नाही. काही जण याला अतिशय नकारात्मक मांडणी म्हणतात. तर असं नाहीये. काही व्यक्ती, म्हणजे कुठले जिल्हाधिकारी, तहसीलदार असतील, कुठला पोलीस इन्स्पेक्टर असेल, कुठला कॉन्स्टेबल असेल, छोटी छोटी माणसं, एखादा स्वयंसेवी संस्थेतला असेल, एखादी अंगणवाडी कार्यकर्ता असेल हे खूप मोठ्या मनाने वागले. त्यांच्यामुळे अतिशय चांगली काम झालेली आहेत. पण एकत्रित चित्र पाहिलं तर काय दिसेल? एकत्रित मिळून काय केलं किंवा याचं आणखी वेगळ्या पद्धतीने उत्तर देता येईल की किल्लारी भूकंपाच्या चुकांची पुनरावृत्ती त्या नंतर कधीही झाली नाही का? हा किल्लारीचा धडा होता. हे धडे आपण स्वतः कडे तटस्थ बघण्याची एक संधी असते. आपण त्या आपत्तीमधून काही धडा शिकलोय असं वाटत नाही.
आपल्याकडे कोणाला स्वतःकडे तटस्थ पणे बघायचंच नाहीये. पत्रकारांना नाही, स्वयंसेवी संस्थांना नाही, शासनाला नाही, ती जबाबदारीच कोणाची नाहीये. त्यामुळे आपल्या पुनर्वसनाचं आपण कठोरपणे, तटस्थपणे विश्लेषण करणं गरजेचं आहे. आपण समाज म्हणूनही काही शिकलो असं वाटत नाहीये, समाजाला कोणी शिकवलं नाही, शिक्षणामुळे काही फरक पडलेला नाही. महाराष्ट्रातल्या, मराठवाड्यातल्या समाजसेवी संस्थांची अवस्था वरचेवर वाईट होत गेलीय.
प्रसाद कुमठेकर : याचं काय कारण असेल असं तुम्हाला वाटतं?
अतुल देऊळगावकर: त्याची काही सामाजिक कारणं आहेत. मला असं वाटतं की खूप वेगवेगळ्या पद्धतीने ह्याचा अभ्यास व्हायला हवा. मला अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे. किल्लारी भूकंपाचा अभ्यास मराठवाड्या बाहेरच्या लोकांनी केला तेवढा मराठवाड्याच्या लोकांनी केला नाही. खूप मुद्द्यांनी या भूकंपाकडे बघायला पाहिजे होतं. भूकंपानंतर एकाही विधवेचा विवाह झाला नाही. सगळ्या विधुरांचे विवाह सहा महिन्याच्या आत झाले. त्यानंतर त्या भागात मानसिक ताण आलेल्या पुरुष किंवा स्त्रियांची अवस्था नंतर कशी होती? मात्र सगळ्यात चांगली एक गोष्ट झाली. ती म्हणजे सगळ्या अनाथ मुलांना आसरा मिळाला, सहारा मिळाला, त्या सर्वांचे करीयर चांगलं झालं. अपंगांचं खूप चांगल्या पद्धतीचं पुनर्वसन झालं.
अनेक नवे सामाजिक प्रश्नही निर्माण झाले. पुनर्वसित घरांच्या गावांचे प्रश्न निर्माण झाले. याबद्दल आपण विशेष अभ्यास केलेला नाहीये. तो करणं आवश्यक आहे. पुन्हा पुन्हा आपण म्हणायला पाहिजे की गावं तयार होणं ही सोपी गोष्ट नाहीये. त्यामुळे पुनर्वसनाचं धोरण ठरवताना कसं व्हायला पाहीजे त्या बाबतीत मी पुस्तकात एक उदाहरण घेतलेलं आहे. पेरू राष्ट्राचे राष्ट्रपती, हे आर्किटेक होते. त्यांचं नाव होतं बेलान्डो. तर त्यांनी तिथल्या कामगारांसाठी एक मोठी वसाहत करायचं ठरवलं. आता स्वतः आर्किटेक असलेला अध्यक्ष मनाला येईल तसं डिजाईन बनवू शकला असता. पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा बोलावली.
जगातल्या आर्किटेक्चरना सांगितलं की तुम्हाला पाहिजे तसे वसाहतीचे नमुने विलेज लेआऊट, घराचे डिजाईनचे नमुने द्या. वेगवेगळ्या पद्धतीचे नवीन नवीन नमुने यावेत, वेगवेगळं साहित्य वापरलं जावं. मग त्यामधून त्यांनी अनेक जणांना बक्षिसं दिली. त्यावेळी भारतातून चार्ल्स कोरिया यांची निवड झालेली होती. म्हणजे विविध प्रकारचे बौद्धिक इनपुट घेऊन तुम्ही पुनर्वसन करणं आवश्यक आहे. त्यात समाजशास्त्र आहे, मानसशास्त्र आहे, आर्किटेक्टस, इंजिनियर्स आहेत. या सगळ्यांचा विचार करायला हवा. नाहीतर घिसाडघाईने केलं तर त्याचं काहीतरी विचित्र भरीत होतं. जे आपल्याकडे झालेलं दिसतंय. याच्याबद्दल लोकांशी कोणी जाऊन बोलतं का?
आता किल्लारी गावं हे पूर्वीच्या गावापेक्षा २० पट मोठं गावं झालं आहे. हे त्यांना मेंटेन करता येत नाहीये. म्हणजे रस्त्याची लांबी, विजेच्या तारांची लांबी वाढली. गावं मोठी झाली. म्हणजे गावाचं जे गावपण आहे, त्या गावाच्या रचनेला नेबरहूड पॅटर्न म्हणतात, शेजारधर्म जपणारी रचना. ती यात नाहिशीच झाली.
हेही वाचा: समर्थन किंवा विरोध करण्याआधी शेती कायदे समजून तर घ्या!
प्रसाद कुमठेकर: आपल्याकडे गावाचं स्थलांतर केलं गेलं ज्यात वरवरची माहिती अशी मिळाली की घरं मिळाली, लोकांनी घरं घेतली. आता तुम्ही म्हणालात तसं की गावं वीसपट मोठी झालीत. प्रत्येक गावात वेगवेगळ्या पद्धतीची घरं आहेत, लहान, मोठी. पण कोनाडे असलेली घरंच दिसत नाहीत. भूकंपाच्या काळात लॉरी बेकर तिथं आले होते. त्यांना इथे काम करायचं होतं पण त्यांना काम करता आलं नाही. त्यांना काम येत नाही किंवा ते कामासाठी लायक नाहीत अश्या पद्धतीचा मुद्दाम ठरवून केलेला ठपका त्यांच्यावर लावून त्यांना बाहेर ठेवण्यात आलं होतं. अर्थात यात राजकारण होतंच. पण या सगळ्या पुनर्वसनाच्या, स्थलांतराच्या, घरांच्या विषयी थोडं सविस्तर सांगा.
अतुल देऊळगावकर: घर किंवा गाव हे नैसर्गिक दृष्ट्या वाढतं. म्हणजे घर आपण एकदम बांधत नाही. पैसे येतील तसं आपण घराला गिलावा करतो, मग कंपाऊंड करतो, मग एखादी रूम वाढवतो. गावं पण तशीच वाढत जातात. याला आपण नैसर्गिक वाटचाल म्हणतो. जगात आजपर्यंत कधीच भूकंपामुळे स्थलांतर झालेलं नव्हतं. किल्लारी नंतर मात्र ४४ गावांचं स्थलांतर केलं गेलं आणि त्याचा निकष काय ठरवला? आपल्या भूकंपाचं केंद्र होतं तेरणा नदीमधे एकुंडी गावाजवळ. तर सहसा नदीत फॉल्ट लाइन भूभ्रंश असते. जिथे जास्त मृत्यू तो भाग बशीसारखा खोलगट भाग आहे.
घरांची पडझड तिथे जास्त प्रमाणात झाली होती. तर या ठिकाणाहून ज्याला खडक युक्त भाग म्हणतात तिथे यायचं. थोडक्यात असं झालं की नदी काठाची गावं, नदी जवळची गावं ही रस्त्याजवळ गेली. पण त्यामुळे त्यांचं शेताचं अंतर पाच पाच कीलोमीटरने वाढलं, हा पहिला मुद्दा. आणि गावांची रचना पुर्णपणे बदलली. याचा जो विचार करायला पाहिजे, जो लॉरी बेकर यांनी केला, किंवा त्यावेळेला केंद्र सरकारने एक उच्च स्तरीय समिती नेमली होती. ज्यात समाजशास्त्रज्ञ सुमा चिटणीस होत्या, अशोक खोसला यांच्यासारखे लोक होते, लॉरी बेकर होते.
अनेक देशांतले तज्ञ येऊन सांगत होते की तुम्ही घाईने हे पुनर्वसन करू नका. शेतीला, शेती संस्कृतीला जोडून असणारं घर आणि गावं तयार करा. वेळ घ्या. पण स्थलांतर करण्याचा हा निर्णय का घेतला? तर लोकांची ती मागणी होती का? तर होती. लोक घाबरलेले होते. पण त्यानंतर अनेक भूकंप झाले. उत्तरकाशी, जबलपूर, भूज या कुठल्याही भूकंपानंतर स्थलांतर केलेलं नाही. एक आणि एकमेव फक्त किल्लारीच्या भूकंपानंतर स्थलांतर केलं गेलं. ती चूक होती हे आपल्याला नंतर लक्षात आलं. पण काही वेळेला तत्कालीन परिस्थिती बघून असे निर्णय घेतले जाऊ शकतात.
किल्लारीच्या भूकंपानंतर सगळ्यात महत्वाची चूक दिसतेय, त्याला निष्क्रिय पुनर्वसन म्हणतात. म्हणजे प्रत्येक भूकंपग्रस्त हा लाभार्थी झाला. म्हणजे त्याच्या हातात कील्ली द्या, त्याला काहीही त्रास देऊ नका. पण त्यामुळे त्याला कुठल्याही टप्प्यात काही सांगता येत नव्हतं. साधी गोष्ट आहे. घर बांधून देताना त्या घरामधल्या बाईला ओटा कुठे असावा, काय कुठे कसं असावं हे सांगता यायला हवं ना? लॉरी बेकर इथं आले, तेव्हा ते सांगायला लागले की तुम्ही शेतकऱ्यांना वन बेडरूम कीचनचं घर देणार आहात का? आणि तसंच झालं. त्या घरांना कप्पे नाहीत, कोनाडे नाहीत, शेतीची अवजारं कुठे ठेवायची? पोती कुठे ठेवायची हे कळत नव्हतं.
मानसशास्त्रीय दृष्ट्या असं सांगितलं जातं की आपलं घरासोबत जैविक सेंद्रिय नातं असतं. घराच्या रचनेसोबत, डिजाईनसोबत सेंद्रिय नातं असतं. मग गावामधली घराची रचना कशी असते? गावाच्या बाहेर समजा ढेलज आहे, तिथे सगळ्या लोकांनी येऊन बसावं, आतमधे मोठं अंगण आहे, त्याच्या पलीकडे खोल्या आहेत जिथे बायकांचा वावर असतो. त्यांची एक स्वतःची स्पेस आहे. प्रत्येकाची एक स्पेस ठरलेली आहे जिथे त्यांना सुरक्षित वाटत असतं. उबदार वाटत असतं. आता वन बेडरूम कीचनच्या घरात त्यांनी काय करायचं? मग त्यांनी त्याच्या भोवती पत्रे अश्या पद्धतीने टाकले आणि त्यांच्या मनातली जी स्पेस होती ती तयार केली. त्यामुळे चूल ही बाहेरच्या पत्र्यात आली.
घरात चूल पेटवली तर भिंती काळ्या पडतील. मग अजून काही पत्रे लावले गेले. त्या पत्र्यात पोती आली. मग याचा अर्थ, आपण त्यांना prestigious store room दिलेत का तयार करून? याच्या विषयी कोणी काही बोलत नाही.
वास्तुकलेचा मुख्य उद्देश उपयोगिता हा आहे. त्यात जर सौंदर्य आणलं तर उपयोगिता आणि सौंदर्याचं मिलन होऊन ती सुंदर वास्तुकला होते. हे आपल्याकडे झालेलं नाहीये. त्याशिवाय खूप चित्रविचित्र प्रकार झालेत. भूकंपग्रस्तांना मदत करायची, उदात्त दृष्टीकोन ठेवून प्रचंड पैसे खर्च केले गेले. पण घरांच्या भिंती मात्र फक्त दीड ते दोन इंच जाडीच्या आहेत. म्हणजे छत, RCC चा जसा स्लॅब असतो, तश्या स्लॅबच्या भिंती फक्त आहेत. म्हणजे भूकंपासाठी फक्त मजबूत, भूकंप रोधक घर एवढा एकच निकष ठेवायचा आहे का तुम्हाला? बरं त्यांना ती घरं दुरुस्त करता येत नाहीत.
२५० रुपये स्क्वेअर फुटात घरं होत होती तर एका संस्थेने ५०० रुपये स्क्वेअर फुटात घरं बांधली. आणि त्याला आपण assembled house म्हणतो. तसं भिंतीचं पॅनल तयार केलं, छताचं पॅनल तयार केलं आणि त्याची असेंम्बलिंग केली. फक्त सळ्या एकमेकांत घालून त्याला जोड देण्यात आले. पुढे हे खराब झालं तर दुरुस्त कोण करणार? ते निघून गेले. ती घरं गळतात आता. त्या घराला extent कसं करायचं? हे सगळे प्रश्न लॉरी बेकर विचारत होते.
हेही वाचा:
इंदिरा गांधीः गुंगी गुडिया ते देशाची दुर्गा
८९ व्या वर्षी अरण्यऋषी चितमपल्लींनी मांडलाय नवा डाव
जागतिक पुरुष दिन विशेषः लैंगिकतेला आधार बदलत्या माध्यमांचा
कमला हॅरिस : संघर्ष करण्याची तयारी असेल तर तुम्ही जगाला बदलू शकता!