डळमळले भूमंडळ : किल्लारीच्या आठवणींना उजाळा (भाग २)

२० नोव्हेंबर २०२०

वाचन वेळ : १५ मिनिटं


किल्लारीच्या आठवणींनी अंगावर काटा येतो. त्याहीपेक्षा जास्त अस्वस्थ वाटतं ते प्रशासनाचा ढिसाळपणा पाहून. हाच ढिसाळपणा आपण आज ३० वर्षांनंतरही टिकवून ठेवला आहे. किल्लारीच्या आठवणी सांगणाऱ्या ‘डळमळले भूमंडळ’ हे पुस्तक लिहिणाऱ्या अतुल देऊळगावकर यांच्याशी प्रसाद कुमठेकर यांनी साधलेला हा मुक्त संवाद.

प्रसाद कुमठेकर: तुमचं एक पुस्तक आहे ‘लॉरी बेकर’ नावाचं. त्यामधे आम्ही चित्र पाहतो त्यांची, त्यांचे विचार पाहतो. म्हणजे आम्हाला सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे की लॉरी बेकर यांनी कोणत्या पद्धतीचा आराखडा सांगितला होता? त्यांची गिलावा विरहित घरं ही जी संकल्पना आहे ती जर आपल्याकडे आली असती, तर त्याचा प्रसार झाला असता. आता तुम्ही जिथे बसला आहात, तुमच्या मागे जी भिंत आहे, तुमचं जे घर आहे ते लॉरी बेकर यांच्या संकल्पनेतूनच साकार झाल्यासारखं दिसत आहे. चंद्रमौळी. तश्या पद्धतीचे कारागीर आपल्याकडे मिळणं हे सुद्धा दुरापास्त आहे, अवघड आहे. तर तुमच्या घरासारखी चंद्रमौळी पद्धतीची, लॉरी बेकर यांच्या संकल्पनेतली घरं जर झाली असती, तर त्याचा प्रसार झाला असता, तसे कारागीर गवंडी तयार झाले असते का?

अतुल देऊळगावकर: त्या आधी बेकर यांची वास्तुकला काय आहे ते जाणून घेऊयात. बेकर कधीही ही माझी स्वतःची वास्तुकला आहे असं म्हणत नव्हते. सुदैवाने मला त्यांचं काम बघण्याची संधी मिळाली. ते ११ ऑक्टोबर १९९३ ला आले, आणि पहिल्या दिवशी मी त्यांच्यासोबत जाऊ शकलो होतो. ते लोकांना प्रश्न विचारून समजावून सांगायचे आणि चित्रं काढायचे. मग त्यांच्या पहिल्या दिवशीच लक्षात आलं की ही दगडमातीची घरं दगड मातीची होती म्हणून पडली नाहीत. कुठल्या तरी एका काळात हे बांधणारे कारागीर हे अकुशल आले. दगडांना बांधताना सांधेमोड करावी लागते. म्हणजे दोन सांधे एकाखाली एक येऊ द्यायचे नाहीत. सांधे मोडायचे. हे आपल्याकडचे प्रचलित शब्द आहेत. त्यानंतर एक चौरस मीटर काम झाल्यावर हेडर घालायचा, आपण त्याला हैदर म्हणतो. जो एक चौरस मीटर बांधकामाला घट्ट धरून ठेवेल. या सगळ्या आपल्याकडच्या पद्धती होत्या. 

जेव्हा भिंत वळते तेव्हा सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे बंध तयार करावे लागतात. हे जिथे केलं गेलं नाही तिथं ती घरं पडली. ती वाईट बांधकामाची होती म्हणून. दगड मातीची होती म्हणून पडली नाहीत. तर हे सगळं बेकर लोकांना समजावून सांगत होते की दगड वाईट नाहीये. तर तो नीट रचला नाहीये. पण लोकं तयार होत नव्हती. बेकर आधी म्हणले आपण दगडाची घरं बांधू. पण लोकांनी नाही ऐकलं. मग बेकर म्हणाले आपण विटांची घरं बंधू. कारण स्थानिक सामुग्रीचा उपयोग करून आपण बांधकामाचा खर्च कमी करायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं होतं.

बेकरांना ‘बाणेगाव’ नावाचं गावं दिलं होतं. केरळ मधल्या आघाडीच्या ‘मल्याळम मनोरमा’ या वर्तमानपत्राच्या वाचकांनी दिलेल्या देणग्यामधून आलेल्या पैश्यांतून बाणेगाव दत्तक घेण्यात आलेलं होतं. बेकर यांना तिथे १६० घरं बांधायची होती. ते आधी गावकऱ्यांना एकत्र घेऊन बसले. प्रत्येकाला विचारलं तुझ घर कुठे होतं, तुला कसं घर पाहिजे, असं करत त्यांच्याशी बोलून गावाचा ले आउट तयार केला. तो आपल्या कॉलोनींच्या पेक्षा वेगळा तयार झाला. 

आपल्या कॉलोनीच्या पद्धतीला grid iron pattern म्हणतात. काटकोनातली घरं. ही अतिशय क्रूर रचना आहे. जी आपल्याकडे चंडीगढ नंतर प्रचलित झाली. गावागावात कॉलोन्या आल्या. त्यांनी गावकऱ्यांसोबत बसून गावाचा जो आराखडा तयार केला त्याला नेबरहूड पॅटर्न म्हणतात. आता त्याची उपयोगिता सांगतो. सरकारने तयार केलेला आराखडा होता त्यामधे आणि लॉरी बेकरांच्या कामात खूप फरक होता. लॉरी बेकरांनी गावातल्या रस्त्यांची लांबी ५ किलोमीटरने कमी करून दाखवली होती. रस्त्यांची लांबी कमी झाली त्यामुळे पाईप्सची लांबी कमी झाली, त्यामुळे विजेच्या तारांची, टेलिफोनच्या तारांची लांबी कमी झाली. 

ही सगळी बचत होऊन सामाजिक अभिसरण होण्याच्या दृष्टीने एकमेकांना दिसणं जे महत्वाचं आहे ते त्या नेबरहूड पॅटर्नमुळे शक्य झालं. म्हणजे लेआउटमधे मोठ्या प्रमाणात बचत केली. ती एका अर्थाने राष्ट्रीय बचत असते. मग घरांची रचना. ते प्रत्येक घरातल्या प्रत्येक सदस्याशी बोलून घराची रचना करतात. ही त्यांच्या कामाची  पद्धत आहे. त्यामुळे शेती संस्कृतीला साजेशी घरं त्यांनी द्यायचं ठरवलं होतं.

त्यांनी बांधलेल्या घरांमधे पावसाचं पाणी साठवायचा हौद, जुने दगड वापरून  घराच्या भोवती कंपाऊंड आणि जनावरांसाठी गोठा. एवढं सगळं ते १८० रुपये चौरस फुट खर्चात देत होते. त्यावेळी शासकीय खर्च गोठा, हौद आणि कंपाऊंड नसताना २५० रुपये चौरस फुट होता. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि बेकर त्यांच्या पद्धतीने हळूहळू पुढे चालले होते. पण ‘मल्याळम मनोरमा’ला असं लक्षात आलं की बेकरांना या भागात जास्त प्रसिद्धी, महत्त्व मिळतंय. आणि तसं होतही होतं. 

त्या भागात त्यावेळी २०० स्वयंसेवी संस्था काम करत होत्या. त्यांच्या समन्वय समितीचं मी समन्वयक म्हणून काम पाहत होतो. गवंड्यांचं प्रशिक्षण हे एक महत्त्वाचं कामही तेव्हा चालू होतं. आणि ते आम्ही बेकरांच्या मदतीने करत होतो. बेकर स्वतः गवंड्यांशी बोलत होते. आपल्याकडे खूप चांगले दगड काम करणारे गवंडी होते. वीट काम करणारे गवंडी होते. त्यांना काही बाबी लक्षात आणून द्यायच्या होत्या. जसं की corner strengthening म्हणजे काय? तेव्हा असा एक गैरसमज होता की उत्तम घर कोणतं तर ज्याला column structure आहे. ज्याला load bearing म्हणतात. column structure असेल तरच घर मजबूत होतं हा गैरसमज कसा हे बेकर पटवून देत होते. आणि त्या पद्धतीने गवंड्यांना शिकवत होते. 

आता तुम्ही ही जी मागची भिंत बघताय ही काय सांगते आपल्याला की दोन विटा सांधणारं जे सिमेंट आहे ते खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. तो सांधा इतका मजबूत आहे की जर हे फोडायची वेळ आली तर सहजगत्या घणाने फुटणार नाही. आपण याला गिलावा करतो तेव्हा गिलावाच्या आत सगळं झाकलं जातं. म्हणून ते नीट रचलं जातच नाही. इतकं वाईट काम असतं. हे नंतर किल्लारीच्या कामात दिसून आलं. ज्या तीन कंत्राटदारांना शासनाने हे गिलाव्याच्या भिंती बांधण्याचं काम दिलं होतं, त्या भिंतींना बुक्का मारला तरी विटा पडत होत्या, बोटाने जरी उकरलं तरी सिमेंट निघत होतं. हे सगळे गैरप्रकार नंतर सुरु झाले. 

याची जाणीव बेकरांना आधीपासून होती. ते म्हणत होते की आपल्या इकडच्या गवंड्यांनी मातीत काम केलेलं आहे. मातीत काम कसं केलं जातं? माती कालवली, चला बसा थोडा वेळ. नंतर माती थापू. सिमेंट कालवून जर तुम्ही बसलात तर सिमेंटची strength कमी होते. सिमेंट कालवलं की ते अतिशय कमी कालावधीत लिंपावं लागतं. या सगळ्या गोष्टींचं लोकशिक्षण करत ते गवंड्यांना शिकवत होते. त्यांची या भागात पुढे राहण्याची इच्छा होती. त्यावेळेला ५०,००० घरं बांधली गेली. पण १,५०,००० घरं जवळ जवळ डागडुजी करण्याची होती. ते शिकवावं असं त्यांना वाटत होतं. त्यांना पाच वर्ष या भागात रहायच होतं. परंतु त्यांना इथल्या बिल्डर लॉबीने असेल, ‘मल्याळम मनोरमा’ने असेल, सगळ्यांनी मिळून अतिशय वाईट, अपमानास्पद पद्धतीने घालवलं. ते वेळच लावतायेत, सरकारला लवकर करून पाहिजे, हिशोब दिला नाही असे आरोप लावले. 

या सगळ्याला संतापून ‘मल्याळम मनोरमा’मध्ये लोकांनी प्रश्न विचारले. पण जगातला एक विद्वान, निःस्पृह ऋषीतुल्य माणूस आपल्या भागातून जातो ही आपल्या दृष्टीने अतिशय लज्जास्पद गोष्ट होती. हे जर झालं नसतं तर भूकंपातलं एक वेगळं विधान architectural statement ज्याला म्हणतात ते झालं असतं. त्यामुळे अनेक स्वयंसेवी संस्थांना शिकता आलं असतं. म्हणजे बेकर जरी इथून गेले असते तरी लोकांचं शिक्षण होऊन त्या पद्धतीने वागायला लागले असते. पण स्वयंसेवी संस्था त्या बाबतीत खूप काही प्रेशर आणावं अश्या मनस्थितीत नव्हत्या. प्रत्येक जण स्वतःपुरतं बघत होता. त्यामुळे हा ऋषितुल्य माणूस आला आणि निघून गेला.

हेही वाचा: डळमळले भूमंडळ : किल्लारीच्या आठवणींना उजाळा (भाग १)

प्रसाद कुमठेकर : 'भूमंडळ डळमळलं'चं शेवटचं पान मी पहात होतो. शेवटच्या पानावर मोजून पंधरा शब्द आहेत. त्यावरचे शब्द असे आहेत,'लातूर उस्मानाबाद जिल्ह्यातला भूकंप ही नैसर्गिक आपत्ती, पण त्या नंतरच्या काळातलं बरं वाईट वर्तन ही कहाणी माणसाची.' तर या मागच्या कहाणीला थोडं विस्तारीत करून कसं सांगता येईल? ती कहाणी बदलण्याची काही शक्यता आहे का? आणि ब्लर्ब संबंधीपण थोडं सांगा?

अतुल देऊळगावकर:  मला अजिबात असं वाटत नव्हतं की मला पुस्तक वगैरे लिहिता येईल असं. मी या सगळ्या गोष्टी फक्त लोकांना सांगत होतो कारण मी ते जवळून बघत होतो. कधी कधी ‘महाराष्ट्र टाईम्स’मधे या विषयी वृत्तांत लिहित होतो. तर ‘ग्रंथाली’चे प्रमुख दिनकर गांगल मला म्हणाले की, तू जे बोलतो आहेस ते लिही. आणि मी ते लिहिल्यानंतर त्यांनी त्याला एक वळण लावलं. ते अतिशय उत्तम आणि उच्च दर्जाचे संपादक आहेत. त्यामुळे त्यांनी माझ्याकडून ते अतिशय चांगल्या पद्धतीने लिहून घेतलं. म्हणून मी लिहित गेलो. तर मलपृष्ठाचा जो मजकूर आहे तो त्यांनी त्यातून काढलेला आहे. 

माणसाचं बर, वाईट वर्तन हे त्या वेळेला दिसत असतं. चांगलं वर्तन पण आपल्याला दिसलं. एकमेकांना मदत करणारे, धाऊन येणारे लोक आपल्याला दिसले. त्याचवेळेला क्षुद्र, स्वार्थी असं वर्तन सुद्धा आपल्याला दिसलं. या सगळ्याचं दर्शन त्यात आपल्याला घडतं. एका अर्थी आपण म्हणूया एक विराट विश्वरूप दर्शन या भागाला झालं होतं. या पेक्षा अनेक गोष्टीं आहेत. जसं की ही संधी गमावली कशी? देशातले अनेक क्षेत्रातले अनेक तज्ञ विद्वान जे एरवी कधीही इथे आले नसते, पार चीनपासून ते देहरादून पर्यंतचे, देहरादूनचे रवी चोप्रा, चेन्नई मधले सी. वी. शेषाद्री, मुंबईचा श्याम आसोलेकर असे ठीक ठिकाणचे विद्वान तिथे येऊन काम करू इच्छित होते. 

विकास आमटे, शरद महाजन, कीर्ती शहा यांच्या सारख्या अनेक क्षेत्रातल्या लोकांना वाटत होतं की आपल्या ज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा, विज्ञानाचा उपयोग या भूकंपग्रस्तांना व्हावा. पण ती इच्छा स्वयंसेवी संस्थांची नव्हती, आणि सरकारची सुद्धा नव्हती. ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. तुलनेने भूज भूकंपात किल्लारीच्या भूकंपातून शहाणपण घेत खूप चांगल्या पद्धतीने काम केलं गेलं. मी हेही सांगतो की आपल्यापेक्षा गुजरातमधल्या स्वयंसेवी संस्था तुलनेने गुणवत्तेने चांगल्या आहेत. महाराष्ट्रातल्या वरचेवर बिघडत गेलेल्या आहेत. तर हे सगळं आपण कसं समजून घ्यायचं? आणि ते समजून घेऊन पुढे कशी वाटचाल करायची? ह. ना. आपटेंच्या 'पण लक्षात घेतो कोण?' कादंबरीच्या शिर्षकासारखं आहे. असं बघा, १९९३ च्या भूकंपात जागतिक बँकेने मदत केली. 

आपल्या भागामधे साधारणपणे २ तालुक्यात उमरगा आणि औसा तालुक्यांमधे किंवा लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यांमधे १९०० कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. त्यापैकी जवळ जवळ १००० कोटी गुंतवणूक बांधकामात गेली. बाकीची बाकीच्या खात्यांमध्ये. यातून काय होऊ शकलं नसतं? पुनर्निर्माण होऊ शकलं असतं, जर कल्पकता वापरली असती तर दुष्काळ पूर्णपणे हटवता आला असता, फ्लोरा आणि फौनाचा अभ्यास करा, म्हणजे आपल्या भागातल्या वनस्पती आणि प्राण्यांचा अभ्यास करा. आणि काय आणता येईल ते बघा. असं कितीतरी पद्धतीने करता आलं असतं.

विकास म्हणजे फक्त पैसा ओतणं नाहीये. विकास म्हणजे तुम्ही intellectual input आणि agricultural input किती घेताय याचा विचार करणं. हे जर प्रत्येक गावांनी घेतलं असतं, तर काहीतरी खूप सुंदर झालं असतं. ती इच्छा कोणातही नव्हती. सांगूनही नव्हती. सगळ्यांना घाई झालेली होती. भूकंपग्रस्तांना घरात जायची घाई झाली होती, राजकारण्यांना आम्ही लवकर काम केलं हे सांगायची घाई झाली होती, या सगळ्यांमधे आपण आता जर बघितलं तर बेकरांनी पूर्वी सांगितलेली सगळी दुखणी आता स्पष्ट दिसतायेत. 

किल्लारीला मेंटेनन्स करता येत नाहीये, वृद्धांना पूर्ण गावभर हिंडता येत नाहीये, गावाचं पूर्ण गावपण निघून गेलेलं आहे. अकाली ही गावं बकाल झालेली आहेत. हे सगळं आपण ओढवून घेतलेलं आहे. त्यामुळे याचं वर्णन असं करता येईल की हे पुनर्वसन भव्य होतं पण दिव्य नव्हतं. तुलनेने इथे भ्रष्टाचार अतिशय कमी, नगण्य झालेला आहे, इतर वेळा खोटी कामं दाखवून पैसा खाल्ला जातो. पण इथे निदान structures उभी राहिली. एवढं यश आपल्याला नक्कीच मिळालं. पण हे किती अर्थपूर्ण आहे? त्या पुनर्वसनात काही प्राण आहे का? 

प्रसाद कुमठेकर : निष्प्राण....

अतुल देऊळगावकर: बरोबर आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी मी ‘लोकसत्ते’त याला निष्प्राण पुनर्वसन म्हटलं होतं. Frontline मध्ये unbearable lightness of rehabilitation म्हटलं होतं. मिलान कुंदेरा यांची कादंबरी आहे..’Unbearable lightness of being’ अस्तित्वाविषयी त्यांनी म्हटलं आहे. म्हणजे तसं हे unbearable rehabilitation आहे. त्या भागामधे ते आता दिसतंय. एक आपत्ती आल्यानंतर जी सशक्तता येते ती अजून आली नाहीये. मनाने आणि इन्फ्रास्ट्रक्चरने आपण अजूनही सशक्त झालेलो नाही आहोत. 

प्रसाद कुमठेकर : किल्लारीत आलेला भूकंप ही नैसर्गिक आपत्ती होती. आता कोरोना ही आपत्ती आहे. तेव्हाचं आपत्ती व्यवस्थापन आपण सगळ्यांनी ऐकलं. त्याबद्दल काही सांगता येईल का? आपत्ती व्यवस्थापनाबाबत आम्हाला आज आणि कालचा ताळा बसवता येईल. म्हणजे काय बदललं आणि काय बदललं नाहीये?

अतुल देऊळगावकर: एक तर त्यावेळेला जागतिक पातळींवर आपत्ती व्यवस्थापन खूपच बाल्यावस्थेत होतं. १९९३ नंतर त्याविषयी चर्चा सुरु झाली. २००५ नंतर, जपानचा भूकंप आणि त्सुनामी नंतर यावर चर्चा व्हायला लागली. जागतिक पातळीवर काही परिषदा व्हायला  लागल्या. पण आपल्याकडे २००६ साली आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना झाली. त्याचं मूळ सांगणं हेच आहे की आपत्ती येण्याआधी तुम्ही प्रतिबंधात्मक उपाय काय करता? काय पद्धतीने शिकवता? अजून आपण या दृष्टीने काही शिकलो नाही आहोत. शिक्षणातून सुद्धा आपण काही शिकलेलो नाही. इंडोनेशियात शाळेत मुलांना भूकंप झाल्यानंतर काय करायचं हे प्रॅक्टीकलद्वारे शिकवलं जातं. म्हणजे मुलं बाकाखाली जाऊन बसतात. 

आपल्याकडे असं काही होतं का याच्याविषयी मला शंका आहे. सर्वांचा सहभाग घेऊन काही गोष्टी शिकवाव्या लागतात. आज जर एखादी मोठी आपत्ती आली तर नेमकं काय करायचं? मध्यंतरी आम्ही आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून चाचणी घेऊन पाहिली होती. एखाद्या पेट्रोल पंपवरती समजा आग लागली तर काय करायचं, याचं मॉक ट्रायल घेतलं गेलेलं नाहीये. वास्तविक प्रत्येक शाळेत अग्निशमन दलाने जाऊन आग लागल्यानंतर काय करायला पाहिजे हे दाखवलं पाहिजे, अगदी चौथी पर्यंतच्या मुलांनाही. पण आपल्याकडे ते होत नाही. कोणतीही छोटी आपत्ती आली की त्यानंतर कसं वागायचं हे आपण शिकवलेलंच नाहीये. 

आपण आपत्ती म्हणजे भूकंप, चक्रीवादळ याबद्दलच बोलतो. किल्लारीच्या भूकंपाने आपल्याला अजून एक गोष्ट शिकवली. किल्लारीत भूकंप होण्याआधी ते गावं भूकंपप्रवण आहे असं कोणी मानतच नव्हतं. दुसरा मुद्दा यातला खूप महत्त्वाचा आहे, जो २६ जानेवारी २००१ च्या भूज भूकंपाने दाखवून दिला. भूजच्या भूकंप केंद्रापासून अहमदाबाद हे ४०० किलोमीटर आहे. तरी देखील तिथं ९० इमारती पडल्या होत्या आणि ११० मृत्यू झाले होते. पाच वर्षापूर्वी सिक्कीममधे भूकंप झाला होता, तेव्हा कलकत्यामधल्या इमारतींना तडे गेले होते. 

तर याचा अर्थ असा की तीन चारशे किलोमीटर अंतरावरच्या घरांना सुद्धा तडे जातात. याचं एक महत्वाचं कारण म्हणजे आपण आपत्तीची स्वतःहून पेरणी करतोय. कारण बांधकामाची गुणवत्ता खूप वाईट आहे. 

जसजसा काळ जातोय तसा हिमालयात ८ च्या पुढचा भूकंप होण्याची शक्यता सांगितली आहे. तो जर झाला तर दिल्लीपर्यंत नक्कीच घरांना तडे जातील. त्याला आपण सामोरे जाण्यासाठी काहीही तयारी केलेली नाहीये. कडक धोरण अमलात आणावं लागेल की वाईट गुणवत्तेचं काम आम्ही होऊ देणार नाही. आता आपण भिवंडीत पाहिलं, महाड, ठाणे जिल्ह्यात, कितीतरी ठिकाणी इमारती धडधड पत्याच्या बंगल्यासारख्या पडतायेत. त्या बांधकाम कर्त्यांना कुठे शिक्षा होते? आपण आपत्ती व्यवस्थापन काहीच करत नाही आहोत. आपल्याकडे आपत्ती अपघात नाही तर प्रघात व्हायला लागला आहे.

आपलं नेतृत्व हे आपत्ती स्फुरक आहे. ते आपत्तीची पेरणी करत जातं. कधी दुष्काळ, पूर, जंगलतोडीमुळे येणारे पूर आहेत, आणि या पद्धतीची बांधकामं त्यास अजून पूरक ठरतात. आता नुकताच डहाणूत भूकंप झाला. भाभा आटोमिक रिसर्च सेंटर डहाणू पासून ४० किलोमीटर अंतरावर आहे. या सगळ्यांच्या बाबतीत आपण किती जागरूक आहोत? हे प्रश्न पत्रकार, स्वयंसेवी संस्था किती पद्धतीने आणतात? विधानसभा, लोकसभेत या प्रश्नावर कोण बोलतं? हे कोणाचेच विषय नाहीयेत. हे पोरके विषय आहेत. त्यामुळे आपल्याकडे आपत्तीच कायम कारभार करणार आहे. आपत्ती व्यवस्थापानाचा कारभार नाहीच आहे. 

हेही वाचा: थंडीच्या दिवसात कोरोनाला कसं ठेवायचं दूर?

प्रसाद कुमठेकर : किल्लारीचा भूकंप आणि कोरोना हे दोन्ही निसर्गाचेच वेगवेगळ्या स्वरूपाचे धक्के आहेत. आपत्ती व्यवस्थापनाविषयी बोलताना आपण घरांच्या रचनेविषयी बोललो. तर निसर्गाच्या पद्धतीने थांबवण्याचे काही मार्ग आहेत का?  भूजमधे भूकंप झाला तेव्हा ४०० किलोमीटर लांब असलेल्या अहमदाबादमधे रस्ते उखडून गेले, इमारती पडल्या, परंतु भूज मधल्या घरांची तेवढी पडझड नाही झाली. तर अश्या नैसर्गिक आपण कश्या पद्धतीने तयार राहायला हवं?

अतुल देऊळगावकर: कोरोना हा पूर्णपणे वेगळा विषय आहे. कोरोना ही नैसर्गिक आपत्ती नाहीये. ही मानवनिर्मित आपत्ती आहे. ही मुख्यतः आरोग्याशी निगडीत आपत्ती आहे. या बाबतीत इतर देशांनी ही आपत्ती कशी हाताळली आहे याचा विचार आपण करायला हवा. तर तैवान, विएतनाम  या सारखे देश चांगलं काम करतायंत. तर नेमकं ते काय करताय? ते आपल्याला करता येणार नाही का? ही आपत्ती जागतिक आहे. पण त्याला उत्तर स्थानिक पातळीवर द्यावं लागणार आहे.

जगामधे सर्वव्यापी परमेश्वर आहे की हे माहीत नाही पण विषाणू मात्र सर्वव्यापी आहे. जळी-स्थळी, काष्ठी-पाषाणी विषाणू आहेत. एक लिटर समुद्राच्या पाण्यात दहा अब्ज विषाणू आहे. त्याच्यापेक्षा  दहापटीने जास्त एक किलो मातीत आहे. पृथ्वीतलावर १० चा ३१ वा घात एवढे विषाणू आहेत. आणि विषाणू हा सतत बदलणार आहे. सतत जुळवून घेणारा आहे. उत्क्रांतीला एक मोठं आव्हान देणारा असा तो विषाणू आहे. एका नंतर एक असे नवीन विषाणू  म्युटेशन होऊन, उत्क्रांत होऊन येत राहणार आहेत.

कोरोना आला म्हणजे सगळं संपलं असं नाहीये. अजून अनेक विषाणू येणार आहेत. आपण काय करणार आहोत? तर विषाणू येतात कुठून? ते मांसाच्या  बाजारपेठेतून येतात, जंगलातून येतात. जंगल नष्ट झाल्यावर प्राण्यांत येतात. आधी त्या भागातल्या अशा ठिकाणच्या रक्ताची तपासणी विएतनाममधे केली जाते.

जंगलाजवळच्या लोकांमधे तो आधी येतोय का, तो सांडपाण्यात आधी येतोय का, याची तपासणी करण्यासाठी स्थानिक पातळीवरची आरोग्य यंत्रणा भक्कम करावी लागते. ‘आशा’ कार्यकर्त्यांना तुम्हाला मान द्यावा लागेल. तुम्हाला ग्रामीण उपकेंद्र भक्कम करावं लागेल. आपल्याकडे ग्रामीण उपकेंद्रामधे कुत्रा चावण्याची लस नसते, साप चावण्याची लस नसते. लोक त्यात पटापटा मरतात. शिक्षण हे गुत्तेदारांच्या हातात दिलं, आरोग्य मोठ्या दवाखान्यांच्या हातात दिलं. म्हणून सार्वजनिक आरोग्य व्यवस्था धोक्यात आलेली आहे. हा कोरोनाचा ईशारा आहे. 

संयुक्त राष्ट्र संघ असु दे किंवा जागतिक आरोग्य संघटना यातले disease इकॉलॉजीस्ट जे आहे ते सांगत आहेत की  इथून पुढे तुम्ही स्थानिक आरोग्य यंत्रणा भक्कम करा, सतत तपासण्या करा, संशोधन करा आणि सर्वेक्षण करा आणि प्रतिबंधक उपाय करा ज्यामुळे साथ पसरणार नाही. हवा आणि पाणी याची अधिक काळजी घ्या.  हे आपण सगळे करतो का? केरळ राज्यात हे पटकन आटोक्यात आलं. लंडनच्या ‘इकॉनॉमिक्स’ने विएतनाम आणि केरळची तारीफ केली होती की त्यांनी खूप चांगलं काम केलं. फक्त काम दीर्घकालीन करावं लागतं.

सरकारं कोणत्या पक्षाचे येतं हा प्रश्न नाही. तिच्या ज्या यंत्रणा आहेत या यंत्रणेने त्यांचं काम व्यवस्थित करावं. कुठल्याही अनुभवातून शिकायचं असतं. पण अनुभवातून शिकायचंच नाही असं ठरवलं तर कितीही जरी वाईट अनुभव आले तरी आपल्याला काहीही अक्कल येणार नाही. आणि आपली वरचेवर हानी होत जाईल. मराठवाड्याला अनेक प्रकारच्या हानी माहीत आहेत्त. दुष्काळ पाचवीला पुजलेला आहे, भूकंप येऊन गेलेला आहे. 

आता कोरोनामधे रोजचे हजार एक मृत्यू होत आहेत. यातून मराठवाड्याची जनता जागी होणार आहे की नाही? कोणे एके काळी दुसऱ्या शतकात आपल्यात आणि पाश्चात्यांमधे व्यापार होत होता. त्या नंतर अत्यंत कुशल कामगार आपल्याकडे होते. हे आपण फक्त इतिहासात सांगण्यासारखं आहे. पण आत्ता वर्तमानात आपण काही करत नसलो तर आपण भविष्याची काय खात्री देणार आहोत? 

वर्तमानात मराठवाडा हा हवामान बदलामुळे कधी वाळवंटीकरणाकडे, कधी अतिवृष्टीमुळे शेतीच्या नुकसानाकडे जातोय, इथून पुढे मराठवाड्यामधे तरुण जनता का राहील? त्यांना नोकरी मिळणार आहे का? त्यांना उद्योग करायला मिळणार आहे का? याचा विचार कोणीही करायला तयार नाहीये. मोठ्या पर्यावरण तज्ञांनी सांगून ठेवलेलं आहे, एखाद्या भागाचा ऱ्हास हा पर्यावरणीय कारणांनी होतो. तो होऊ नये यासाठी आपल्याला वेळीच अक्कल यावी एवढंच आपण या निमित्ताने म्हणू शकतो. 

प्रसाद कुमठेकर : सर तुमच्या व्यस्त दैनदिनीतून तुम्ही वेळ काढून आमच्याशी ‘भूमंडळ डळमळले’ या तुमच्या पुस्तकाविषयी बोललात या बद्दल तुमचे मनापासून आभार.

हेही वाचा: 

कसा लावायचा बिहार निकालाचा अन्वयार्थ?

बायडनच्या विजयानं झालीय सर्वसमावेशक भविष्याची सुरवात

'ओबामा' नावाचा 'सक्सेस पासवर्ड' जगाला पुन्हा गवसतोय, तर!

जवाहरलाल, विजयालक्ष्मीः भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे बहीणभाऊ

कमला हॅरिसच्या विजयाचा भारतीयांना आनंद व्हायचं काहीही कारण नाही!