माझ्या घरी माझी आई किंवा मी मासिक पाळी आल्यावर बाजूला बसलो नाही. पण आजही अनेक घरांमध्ये पाळी आल्यावर घरात वावरताना बाईवर बंधनं येतात. बरं अशांना काही सांगायला जावं, तर देवाची भीती. आमच्या देवाला चालत नाही म्हणतात. बरं झालं, आमच्या देवाला पाळी आलेल्या महिलांचं वावडं नव्हतं. महिला दिन विशेष लेख.
मी शाळेत असताना माझ्या घरी मैत्रिणी जमा होत आणि मग आम्ही पुढे चौघी-पाचजणी मिळून शाळेत जात असू. एक दिवस आमच्यापैकी शशी नावाची मैत्रिण माझ्याच घरी खूप उशीरा पोहोचली. तिच्यामुळे आम्ही अक्षरशः रस्त्यावर ताटकळत उभे होतो. ती धावत येताना दिसली. आल्या आल्या लगेच म्हणाली, `आईला कावळा शिवलाय त्यामुळे मला आवरून यावं लागलं`.
मला खरंच कळलं नव्हतं कावळा शिवला म्हणजे नेमकं काय घडलं. असं पुन्हा एक दोन वेळा घडलं. शशी घरचं काम करुन शाळेत यायची. मी आईला विचारलं, `आई तुला कधी कावळा शिवलाय का?` आईने काहीबाही बोलून तो विषय टाळला. पण माझ्या मनातून हा कावळा काही जाईना. कावळा शिवल्यावर बाजूला बसतात आणि कुणीतरी दुसरी व्यक्ती जेवण करते. मग माझ्या आईला अजून कावळा का शिवला नाही.
कावळा शिवल्यावर शशीची आई कशी दिसते ही उत्सुकता माझ्या मनात होती. म्हणून कावळा शिवलेली बाई कशी दिसते, हे पाहण्यासाठी मी तिच्या घरी गेले. तर तिच्या छोट्याश्या खोलीवजा घरात शशीची आई एका कोपऱ्यात बसलेली होती. कावळा शिवलेली बाई बाजूला बसते तेव्हा ती कोपऱ्यात बसते. माझा झालेला हा समज. शशीच्या आईला महिन्याला कावळा शिवायचा. माझ्या आईला का शिवत नव्हता कोण जाणे, असंच वाटत राही.
अचानक एक दिवशी शशीला पण कावळा शिवला. त्यानंतर काही महिन्यांनी मला पण... अरेच्चा, हे काय! मला असंख्य प्रश्न या कावळ्याने पाडले होते. ते मासिक पाळीच्या रुपाने सुटले पण आमच्या घरात बाजूला बसण्याची पद्धत नव्हती. घर मोठ्ठं असल्याने आमच्या घरात देव्हारा एका बेडरूममध्ये होता. पण तिथे जायला कधीच कुणी मनाई केली नव्हती.
हेही वाचाः महात्मा बसवण्णाः ९०० वर्षांपूर्वी पाळीचा विटाळ झुगारणारा महापुरूष
पाळी येते म्हणून कावळा शिवतो. पण कावळा जवळ तर आलेलाच नव्हता. या कावळा शिवण्यामुळे मी एकदा दोनदा शाळासुद्धा बंक केली होती. खुप थ्रिलिंग वाटायचं बाईंना सांगताना पाळी आली घरी सोडा. पॅडचा जमाना नव्हता. जुन्या साड्यांच्या जमान्यातील पाळी होती, म्हणून बंक करता यायचं. `चुप चुप बैठे हो जरूर कोई बात हैं` या टीवीवरच्या जाहिरातीने माझं लक्ष वेधून घेतलं. खूपदा लागायची ही जाहिरात. तोपर्यंत एका पाळीला माझ्या हातात आईने एक पुडकं आणुन दिलेलं पॅड नावाच्या सखीचं. पॅडने नंतर खरंच खूप साधं सोप्पं होत गेलेलं.
पाळीचा बागुलबुवा आमच्या घरात नसल्याने बाजूला बसणं पाळणं हे काही माझ्या वाट्याला आलं नाही. पण एकदा गावी गेल्यावर मात्र मला बाजूला बसावं लागलं होतं. प्रचंड राग आलेला सर्वांचा. कुणालातरी काहीतरी फेकून मारावं असंच वाटलेलं. बाहेरून आलेले पाहुणेही वेगळ्याच नजरेने पाहायचे. बाहेरची झालीय, असं म्हणायचे. काळाबरोबर पाळीची सवय झाली. पाळीचं अवघडलेपण मला फार काही वाटलं नाही. अगदी सुरवातीच्या दोन ते तीन महिन्यांनंतर मात्र फार काही वाटलं नाही.
आजही पाळीच्या नावाखाली पाळणारी घरं आहेत. कुणी त्या दिवसात देव्हाऱ्याला पडदाच लावतं. एका नातेवाईकांच्या घरी गेले असताना त्यांच्या देव्हाऱ्याला पडदा लावलेला. माझ्या मुफट स्वभावानुसार मी विचारलं, `देव बुरख्यात का ठेवलेत?` त्यावर उत्तर मिळालं घरातली सून बाहेरची झालीय. मी तिथेही अगाऊपणा करुन म्हटलं, `अहो मग तुमचा देव सुनेला पाळी आल्यावर बघतो की काय?` त्या बाई जाम चिडल्या आईला म्हणाल्या, `अगं शिस्त लाव जरा पोरीला.` आईने नजरेने खुणावलं मी गप्प बसले. पण मला नातेवाईकांच्या देवाचं जाम हसू आलं. पाळी आल्यावर बाईला बघणारा देव, असं मी त्या घराला नाव ठेवलं.
हेही वाचाः मासिक पाळीविषयी आपल्या मुलामुलींशी कसं बोलायचं?
आज प्रवास करताना, ट्रेनमधून, बसमधून फिरताना अनेकजण देऊळ दिसलं की नमस्कार करतात. त्यांच्या बाजूला पाळी असलेली बाई असेल तर तो नमस्कार देवाला चालत नाही की काय? पाळीच्या नावाखाली पाळणारी घरं माझ्या तेव्हाही डोक्यात जायची आणि आजही जातात.
माझी सासू डाक्टर असल्यामुळे घरी काही पेशंट येतात. अशीच एक महिला पेशंट आलेली. तिला पाळी पुढे जायच्या गोळ्या हव्या होत्या. माझी सासू जवळपास तिला ओरडलीच. ती पेशंटला म्हणाली, `काय कौतुक करायचं पाळीचं? निसर्गाच्या नियमानुसार पाळी येणार आणि ठराविक वयात जाणार. त्यात कसलं कोडकौतुक?`
पाळी या विषयावर आता पूर्वीइतका टॅबू राहिलेला नाही खरंतर. पण तरीही अजुनही काही घरांमधे आम्ही पाळतो, हे अभिमानाने सांगितलं जातं. बरं पाळता म्हणजे नेमकं काय करता, तर घरची सून पाळीला घराबाहेर गेलेली चालते. पण घरात मात्र तिने कशालाही हात लावायचा नाही. आमच्या देवाला चालत नाही. उगाच विषाची परीक्षा कशाला? असं म्हटलं जातं. हे सर्व ऐकल्यावर खरंच प्रश्न पडतो, अजूनही अशी माणसं आपल्या आजूबाजूला आहेत.
कावळा क्षुद्र किंवा घाणेरडा पक्षी मानला जातो. इथे खरंतर आजही काही माणसं क्षुद्र विचार, परंपरा जोपासत आणि कुरवाळत बसलेत. बरं यावर काही विचारल्यावर यांचं उत्तर काय तर आमच्या देवाला चालत नाही म्हणून. म्हणजे पुढे काही बोलताच येत नाही.
हेही वाचाः मुलीच्या मासिक पाळीने देवाचं ब्रम्हचर्य भ्रष्ट होईल?
अशांना माझ्या आजीची गाठ घालून द्यायला हवी. ती म्हणते, देवापेक्षा माणसातलं देवपण जपायला हवं. ती सांगते, पाळीच्या दिवसात आम्ही शेतात राबलोय. अनेक महिला आजही तेव्हा काम करतातच. त्यात गैर काहीच नाही. त्यामुळे देवाच्या नावाने बाजूला बसवुन बाईचा अपमान करणं, चुकीचंच आहे. बाजारात पॅड नवीन आलेले असताना सर्व मुलींना आणि सुनांना आता तुमच्या मुलींचं टेन्शन मिटेल म्हणून आजीने पॅड आणायला लावलेलं. अशी आजी होती, म्हणून आमचा देवही तिच्यासारखाच झाला.
पाळी देवाला चालत नाही, असं आपण फक्त बोलतो. त्यावर विचार करत नाही. देव कोपतो म्हणजे नेमकं काय होतं, हे कुणी पाहिलंय का? त्यावर सविस्तर बोलायला हवं. त्याला प्रश्न विचारायलाच हवेत. आपल्या शंका विचारून घ्यायला हव्यात. सारासार विवेक वापरला की कळतं मासिक पाळी या शरीराच्या नैसर्गिक क्रियेला आपण टॅबुच्या मखरात बसवलंय. बाई आहे, म्हणजे पाळी येणारच आणि योग्य वयात जाणारच, हे इतकं साधं सोप्पं गणित आहे. त्यात कसलं आलंय पवित्र आणि अपवित्र?
हेही वाचाः
राधिका सुभेदार सांगत्येय, मासिक पाळीविषयी गुप्तता नको स्वच्छता बाळगा
(लेखिका मुक्त पत्रकार आहेत.)