प्रसिद्ध साहित्यिक अर्नेस्ट हेमिंग्वेने दुसऱ्या महायुद्धाचं वातावरण अनुभवलेल्या पिढीचं वर्णन 'लॉस्ट जनरेशन' म्हणजे शेवटची पिढी असं केलं होतं. आत्ताही आपण युद्धच लढतोय. आणि फक्त कोरोनाशी नाही तर आपल्या स्वतःशीही लढतोय. लॉकडाऊनच्या काळात कौटुंबिक हिंसा, मानसिक आजार अशा गोष्टी नव्याने डोकं वर काढतायत. त्यामुळंच कोरोनानंतरची ही पिढीसुद्धा शेवटची पिढी ठरेल की काय अशी शंका वाटतेय.
मुंबईतलं आयएनएस अश्विनी नौदल रुग्णालय आणि पुण्याच्या आर्मी मेडिकल कॉलेजनं एकत्र मिळून केलेल्या 'मॅथेमॅटीकल मॉडेलिंग ऑफ पोस्ट लॉकडाऊन’ या संशोधनात लॉकडाऊन ३० जूनपर्यंत वाढवणं गरजेचं आहे, असा निष्कर्ष काढलाय. लॉकडाऊनचा काटा अविरत धावणाऱ्या काळाच्याही पायाला टोचल्यामुळे ‘वक्त के पावो में काटा चुभता नही वो रुकता नही’, या गृहितकाला धक्का बसलाय.
'कोरोनाचा धोका महिलांना कमी आहे' या पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या विधानाचा आपण भरपूर काथ्याकूट केला. पण पुरुषांच्या तुलनेत खरोखर महिलांना कोरोनाचा धोका कमी आहे, असं म्हणता येईल. याचं कारण म्हणजे बहुतेक महिला घरीच राहतात. आणि दुसरं म्हणजे भारतात मुळातच महिलांची संख्या पुरुषांच्या तुलनेत कमी आहे.
दुसरीकडे मध्यमवर्गीयांना कुणीही वाली नसल्याचा मेसेज प्रचंड फॉरवर्ड होतोय. श्रीमंतांकडे पैसा आहे आणि गरीबांना सरकार आणि संस्था मदत करतात. मग मध्यमवर्गीयांच्या हालअपेष्टांना कोण विचारणार असं म्हणतायत. पण ताटावर बसलेल्याची वासना उष्टावळीवर जात असल्याचं शल्य या तथाकथित मध्यमवर्गीयांना बोचलं नाही.
थोडक्यात, कोरोनाने धार्मिक, सामाजिक, स्त्री पुरुष लिंगभेद आणि आर्थिक वर्गभेदाच्या सोशल डिस्टर्बिंगचे वेगवेगळे पैलू समोर आणलेत. त्याचप्रकारे कौटुंबिक आणि मानसिक पातळीवरचं डिस्टर्बिंगही समोर येतंय. या कोरोना संकटाचा सगळ्यांनी एकत्र मिळून सामना करण्याऐवजी आपल्या माणसांमधे अजून अंतर निर्माण होतंय. आज अशा अवस्थेला कोरोनाने आपल्याला आणून सोडलंय.
हेही वाचा : क्वारंटाईनमधेही लोकांना जातीची माती खाण्याची अक्कल कुठून येते?
'द सन अल्सो रायजेस' या आपल्या कादंबरीत प्रसिद्ध साहित्यिक अर्नेस्ट हेमिंग्वेने दुसऱ्या महायुद्धाचं वातावरण अनुभवलेल्या पिढीचं वर्णन 'लॉस्ट जनरेशन' म्हणजे शेवटची पिढी असं केलंय. आत्ताही आपण युद्धच लढतोय. फक्त कोरोनाशी नाही तर आपल्या स्वतःशीही लढतोय. त्याप्रमाणे कोरोनानंतरची ही पिढीसुद्धा शेवटची पिढी ठरेल की काय अशी शंका वाटतेय. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात वाढलेल्या मानसिक आजाराच्या, कौटुंबिक हिंसाचाराच्या आणि व्यसनाधिनांचा आकडा पाहिला की ही शंका खरी वाटू लागते.
एका राष्ट्रीय न्यूजसंस्थेनं देशातल्या प्रमुख दहा महानगरांच्या केलेल्या सर्वेक्षणानुसार लॉकडाऊनमधे अपघात, हत्या आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना ९० टक्क्यांपर्यंत घटल्यात. पण कौटुंबिक हिंसासाराच्या घटनांमधे मोठ्या प्रमाणात वाढ झालीय. सुरवातीच्या काळात आता आपल्याला एकमेकांना भरपूर वेळ देता येईल अशी उत्सुकता बहुतांश जोडप्यांना लागली होती. आता त्यांची हौसच फिटलीय.
कोरोनाची भीती आणि चिंतेमुळे, निर्माण झालेलं मानसिक असंतुलन त्यात आर्थिक टंचाई आणि व्यसनाची पूर्तता न झाल्याच्या क्षुल्लक कारणावरून मुलांवर आणि पत्नीवर ओरडणं, मारहाण करणं, मानसिक आणि शारीरिक छळ करणं, घटस्फोटाची धमकी देणं या घटनांमधे लक्षणीय वाढ झालीय.
या घटनांची दखल घेऊन केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी ८ एप्रिलला वन स्टॉप सेंटर म्हणजेच सखी केंद्राच्या व्यवस्थापकांना कारवाई करण्याचे आदेश दिलेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांत लवकरात लवकर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. नवरोबाच्या जाचाला आणि संपूर्ण कुटुंबाची दिवस रात्र सरबराई करायला वैतागलेल्या गृहिणीसुद्धा काली मातेचा अवतार धारण करतायत.
हे कोरोना स्पेशलही वाचा :
लस सापडल्यावर तरी कोरोना संपेल का?
कोरोनाग्रस्त मृतदेह जाळायचा की पुरायचा?
कोरोनाचा पेशंट वेंटिलेटरवर किती काळ जिवंत राहतो?
कोविड-१९ आजारावर औषध नसताना पेशन्ट बरं कसं होतात?
एकदा बरं झाल्यावरही पेशंटला का होतेय पुन्हा कोरोनाची लागण?
इंडियन सायकेट्री सोसायटीच्या एका अहवालानुसार लॉकडाऊनमधे लोकांना वेगवेगळ्या चिंता सतावतायत. मनोविकारांच्या रूणांमधे २० टक्क्यांपर्यंत वाढ झाली असल्याचंही या अहवालात लिहिलंय. स्वतःच्या मानसिक स्थितीशी अनभिज्ञ असल्यामुळे अनेक जणांचं वर्तन बिघडत चाललंय.
केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय आणि एम्स हॉस्पिटलच्या वार्धक्यशास्त्र विभागाने देशातल्या १८ कोटी ज्येष्ठ नागरिकांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन केलंय. असह्यता, जीवनाबद्दलची अस्वस्थता, युद्धजन्य स्थिती, व्यसन आणि अपराधी भावना अशा प्रचंड ताणतणावातून पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस डिसऑर्डर म्हणजे पीटीएसडी हा विकार उद्भवण्याची दाट शक्यता निर्माण होते, असा इशारा त्यांनी दिलाय. मनाच्या अस्वस्थतेमुळे सैरभैर झाल्याने या कोरोनाकल्लोळात ऑब्सेसिव कंम्पल्सिव डिसऑर्डर म्हणजेच ओसीडीचे पेशंट २० टक्क्यांनी वाढलेत.
तर दुसरीकडे व्यसनाधिन लोकांचे वेगळेच हाल सुरू आहेत. दारू किंवा ज्या गोष्टीचं व्यसन आहे ती गोष्ट न मिळाल्यानं अनेक लोक सैरभैर होतायत. कुटुंबातल्या अशा व्यक्तींना कुटुंबियांनी समजून घ्यावं, असं अल्कोहोलिस अॅनानिमस या व्यसनमुक्ती संस्थेकडून सांगण्यात आलंय. व्यसनी व्यक्तीसाठी कुटुंबियांनी हाल्ट थेरपी वापरण्याचा सल्लाही त्यांनी दिलाय. हाल्ट थेअरी म्हणजे व्यसनी व्यक्तीला उपाशी न ठेवणं, राग न येऊ देणं, एकटं न ठेवणं आणि थकवा न येऊ देणं यासाठी प्रयत्न करायचे.
हेही वाचा : कोरोनाचं युद्ध लढणाऱ्या आणि जिंकणाऱ्या महिला लीडर
थोडक्यात, कोरोनाच्या 'साइड इफेक्ट्स'च्या तडाख्यापासून वाचायचं असेल तर कुटुंबियांसोबत आनंदी वातावरणात राहणं, एकमेकांना समजून घेणं, सोशल मीडियाचा आणि न्यूजचॅनेलचा वापर कमी करणं, पाककला आणि वेगवेगळे आवडीचे छंद जोपासणं, सूर्यनमस्कार योगा प्राणायाम करणं, असे उपाय करता येतील.
काही जुने विनोदी आणि हलक्याफुलक्या विषयावरचे सिनेमे आणि मालिका बघून भूतकाळात रमत स्वतःला रेट्रो मुडमधे नेता येईल. आवडीचं संगीत ऐकणं, झुंबा डान्स करणं, मिळालेल्या एकांतवासात लेखन वाचन यासारखे छंद जोपासणं असंही करता येईल. प्लेगच्या साथीमुळे क्वारंटाइन अवस्थेत असतानाच विलियम शेक्सपिअर यांनी 'किंग लिअर'सारखी अदभूत साहित्यकृती निर्मिली होती.
याकाळात आरोग्यदायी, हलका आणि सात्विक आहार घेणं गरजेचं आहे. बाहयोपचार शरीराला बरे करतील पण मन निर्भय, निकोप, निर्मळ आणि सुदृढ ठेवण्यासाठी मनोनिग्रह आणि संयम यांची आवश्यकता आहे. केवळ वैयक्तिक पातळीवरच नाही तर समाजाच्या निकोप वाढीसाठी आणि समाजस्वास्थ्य अबाधित ठेवण्यासाठी सगळ्यांनीच हा निर्धार करणं गरजेचं आहे. तरच कोरोनाच्या फोबियानं बिथरलेल्या या पिढीलाला 'शेवटची' होण्यापासून वाचवता येईल.
हेही वाचा :
अब आया वाधवान सातारा के पहाड के नीचे
बाहेरून आणलेलं सामान वायरस फ्री करण्याचं साधंसोप्पं प्रॅक्टिकल
तू देवमाणूस आहेस, की खराखुरा देवच, एका कोरोना योद्ध्याला पत्र
आंबेडकरांनी नाकारलेला शब्द पंतप्रधानांनी वापरू नये : गणेश देवी आणि कपिल पाटील यांचं पत्र