कोल्हापूरचं युरोप कनेक्शन सांगणारं प्रदर्शन अमेेरिकेत

१९ जुलै २०२३

वाचन वेळ : ६ मिनिटं


कोल्हापूर म्हणजे फकस्त तांबडा आणि पांढरा रस्स्सा नाय, तर कोल्हापूरचं कनेक्शन थेट युरोपपर्यंत हाय. दोन हजार वर्षांपूर्वी त्यावेळच्या कोल्हापूरातून आणि तत्कालीन महाराष्ट्रातून युरोपशी व्यापार होत होता. त्याचे अनेक पुरावे १९४५-४६ मधे ब्रह्मपूरीच्या टेकडीवर झालेल्या उत्खननात सापडले होते. यात युरोपमधील शिल्पं आणि नाणीही आहेत. या महत्त्वाच्या वस्तूंचं प्रदर्शन सध्या अमेरिकेतील न्यू यॉर्क येथं भरलंय.

आपण आज जी गावं किंवा शहरं बघतो, त्या जमिनीवर आपल्याआधी कित्येक शतकं आधीही माणसं राहत होती. तेव्हा तिथले रस्ते वेगळे होते, धंदे वेगळे होते आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो काळ वेगळा होता. त्या काळानुसार प्रत्येक जागेचं स्वतःचं एक गणित होतं. तिथं आलेल्या व्यापाऱ्यांनी, स्थलांतरितांनी ती जागा घडवली किंवा बिघडवलेलीही असते. 

कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांनी नंतर ही शहरं, ही गावं पुन्हा बदलतात. पुन्हा नव्यानं सुरूवात होते. पण जमिनीवर आणि जमिनीखालीही त्याचे काही अवशेष शिल्लक राहतात. मग कोणत्यातरी बांधकामाच्या निमित्तानं किंवा कुठल्यातरी संशोधकाच्या नजरेला ते पडतात आणि इतिहासाची गोष्ट पुन्हा एकदा लोकांसमोर येते. मराठी राज्याची राजधानी असलेल्या कोल्हापूरबाबतही असंच घडलंय.

कसं सापडलं कोल्हापूरचं युरोप कनेक्शन?

कोल्हापुरातील ब्रह्मपुरी येथील प्राचीन टेकडीवर इ.स. १८७७ मध्ये इसवीसनाच्या आधीचे बौद्ध स्तुपाचे अवशेष मिळाले होते. त्याचा अधिक शोध घेण्यासाठी १९४५- ४६ च्या सुमारास भागात डेक्कन कॉलेजतर्फे उत्खनन करण्यात आले. ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ हसमुख धीरजलाल सांकलिया व मोरेश्वर गंगाधर दीक्षित यांनी या उत्खननाचं नेतृत्त्व केलं. 

या उत्खननात अनेक अद्वितीय वस्तू सापडल्या. त्यातून या प्रदेशाच्या तत्कालीन रचनेसंदर्भात आणि त्याचा जगाशी असलेल्या संदर्भात मोलाची माहिती हाती आली. विश्वकोशातील नोंदीनुसार, तिथं दुसऱ्या शतकातील विटांची घरं, सातवाहन राजांची नाणी, काळ्या-तांबड्या रंगांची मातीची भांडी सापडली. तसंच रोमन देवतांचे पुतळे, रोमन पुतळ्या, ब्राँझची भांडी, काचसामान यांचे विविध नमुने सापडले. 

एका मोठ्या हंड्यावर ठेवलेला एक लहान हंडा असे दोन हंडे, कढईत भारतीय आणि ग्रेको-रोमन बनावटीच्या कलात्मक वस्तू सापडल्या. यातील पोसायडन या ग्रेको-रोमन सागरदेवतेची ब्राँझची मूर्ती (१४.३ सेंमी. उंच) मूळ अलेक्झांड्रिया येथील असल्याचे स्पष्ट झाले. तिचा काळ इसवीसनाच्या पहिल्या शतकातील आहे. पोसायडनव्यतिरिक्त हत्तिस्वाराची एक ब्राँझमूर्ती (५.१ सेंमी. उंच), बैलगाडीची प्रतिकृती, आरसे व मद्यकुंभ अशा उल्लेखनीय वस्तू मिळाल्या.

नगररचना आणि व्यापारी मार्ग

ब्रह्मपुरी उत्खननातील विविध पुराव्यांच्या आधारे असे अनुमान करता आले की, या भागात सातवाहन काळातील सापडलेले घरांचे अवशेष, त्याच्या समकालीन असलेल्या उत्तरेतील घरांपेक्षा वेगळी आहेत. मात्र त्यातील कौलारू रचना सारखी आहे. भक्कम दगडी पायावर, भाजलेल्या आणि बिनाभाजलेल्या विटा वापरून ही घरे बनविली होती. सांडपाण्याची व्यवस्था पक्क्या विटांनी बांधलेल्या शोषणकुंडांच्या माध्यमातून केली होती.

उत्खननात उपलब्ध झालेल्या नाण्यांमुळे सातवाहन आणि महारठींच्या इतिहासावर नवीन प्रकाश पडला आहे. त्यात सातकर्णी राजाचे तांब्याचे चौकोनी नाणे सापडले. त्यावर षडारचक्र व स्वस्तिक आहे. शिवाय ब्राह्मी लिपीतील अक्षरे आहेत. नाण्यावरील अक्षरे अशोककालीन अक्षरांशी साम्य दर्शवितात. याशिवाय सातवाहन राजा गौतमीपुत्र सातकर्णी (कार. इ. स. ६२–८६) याचेही एक तांब्याचे नाणे सापडलं. त्यावरून गौतमीपुत्र सातकर्णीचा काळ निश्चित करता येतो. 

गौतमीपुत्र सातकर्णी याच्या काळात हे नगर वैभवाच्या शिखरावर होते. उत्खननातून प्राप्त रोमन देवतांचे पुतळे, रोमन नाण्यांच्या प्रतिकृती (पुतळ्या), रोमन मद्यकुंभ यांवरून इ. स. पहिल्या-दुसऱ्या शतकांत येथून रोमन साम्राज्याशी होणारा आंतरराष्ट्रीय व्यापार आणि सांस्कृतिक संबंध या बाबी उजेडात आल्या. ब्रह्मपुरीतील उत्खननात मिळालेले ऐवज नंतर कोल्हापूरातील टाउन हॉल शासकीय वस्तुसंग्रहालयात ठेवलेे गेले.

कोल्हापूरातील संग्रहालयातून न्यूयॉर्कमधे

पंचगंगा नदीकाठच्या ब्रह्मपुरी येथे असणाऱ्या या वैश्विक ठेव्याची सर्वांना ओळख व्हावी यासाठी ३० जानेवारी १९४६ रोजी कोल्हापूर वस्तुसंग्रहालयाची स्थापना करण्यात आली. पुढे १९४९ मधे हे वस्तुसंग्रहालयल टाऊन हॉल येथील कोल्हापूर नगर मंदिर येथे हलविण्यात आले. तेथे या वस्तू अत्यंत देखण्या स्वरूपात मांडून ठेवण्यात आल्या.

या संशोधनाची आणि वस्तूसंग्रहाची दखल आता जगानं घेतली असून, अमेरिकेतील न्यू यॉर्क येथे असणाऱ्या 'मेट्रोपोलिटियन म्युझियम ऑफ आर्ट या वस्तुसंग्रहालयात प्राचीन बौद्धकालीन वस्तुसंदर्भातील प्रदर्शनात त्या मांडण्यात आल्या आहेत.  सर्वांसाठी २१ जुलै ते १३ नोव्हेंबर असा या प्रदर्शनाचा कालावधी असून, त्या काळात जगभरातील अनेक संशोधक या शिल्पांचा आणि संग्रहाचा अभ्यास करतील.

या कोल्हापूरातील उत्खननात सापडलेल्या एकूण आठ वस्तू आहेत. यात पोसायडन ही समुद्रदेवतेची प्रतिमा, हत्तीवरील स्वार, रोमन पदक, जैन मंगलाष्टक, जुने जगचे हँडल, एक भांडं, सापाची मूर्ती, गदेच्या मुठीवरील रिंग अशा वस्तू असतील. राज्य आणि केंद्र सरकारच्या संग्रहालय संदर्भातील सर्व नियमांचे पालन करून, सांस्कृतिक देवाणघेवाण व्हावी या उद्देशाने हा वस्तुसंग्रह अमेरिकेला पाठवण्यात आला आहे. न्यू यॉर्कनंतर हे प्रदर्शन कोरियामधे होणार आहे. त्यानंतर या वस्तू पुन्हा मायदेशी परत येतील.

पोसायडन पुन्हा पश्चिमेला गेलाय

या सर्व संग्रहामधील पोसाडयन हे ब्राँझमधील शिल्प हे गमतीशीर आणि चित्ताकर्षक गोष्ट आहे. पोसायडन ही ग्रीक काळातील समुद्रदेवता आहे. पोसायडनचा उल्लेख इलियड आणि ओडिसी या दोन ग्रीक महाकाव्यात आहे. पोसायडनच्या हातात त्रिशूळ असतो. तो त्याच्या मदतीनं तो समुद्रात त्सुनामी, मोठ्या लाटा, भोवरे निर्माण करतो. तो अतिशय रागीट आहे, असं मानलं जातं. त्यासाठीच त्याची उपासना करून व्यापारी समुद्रप्रवास करत, असं सांगितलं जातं.

साधारणतः १४.३ सेंटीमीटर एवढ्या उंचीची ही ब्राँझची मूर्ती तत्कालीन व्यापाऱ्यांसोबत कोल्हापूरात आली असावी. कोल्हापूरात सापडलेल्या या मूर्तीच्या हातातले त्रिशूळ गायब आहे. पण ही मूर्ती निश्चितपणे पोसायडनचीच आहे, यावर संशोधकांमधे एकमत आहे. कोल्हापूरात समुद्र नसला, तरी समुद्रदेवता मात्र नक्की पोहचलीय. जगभरात माणसांचा व्यवहार कसा होत होता, याची साक्ष देणारी ही मूर्ती तत्कालीन  बौद्धकाळाचा मोठा दस्तावेज आहे.

मुळचा पश्चिमेतील हा पोसायडन व्यापाऱ्यांसोबत महाराष्ट्रात आला. पण आता पुन्हा एकदा तो पश्चिमेला गेला असून, तिथल्या अभ्यासकांना दर्शन देऊन तो पुन्हा कोल्हापूरात परतेल. देश, राज्य या सीमा आपल्यासाठी, पण संस्कृतीसाठी ही सगळी पृथ्वी एकच भूमी असून संस्कृती समद्राच्या लाटांप्रमाणे अखंड वाहत असते. त्यामुळे कला, साहित्य आणि त्यातून उमलणाऱ्या मानवी मुल्यांचं भान प्रत्येकानं ठेवायला हवं.

या वस्तू फक्त कलेचा इतिहास सांगत नाहीत तर माणसाची गोष्ट सांगतात. पिढ्यानपिढ्या झालेल्या स्थलांतरामुळे माणूस जगभर गेला असला तरी त्याचं मूळ एकच आहे. त्यामुळे जात, धर्म, भाषा, पंथ याचा उगी संकुचित व्यर्थ अभिमान न बाळगता, माणसाशी माणसासारखंच वागायला हवं, हीच शिकवण  हे प्रदर्शन आपल्याला देत आहे.