कम्युनिस्ट रशियात लोकशाहीवादी क्रांती करण्याचं स्वप्न बघणाऱ्या मिखाईल गोर्बाचेव यांचा आज जन्मदिवस. १९१७ मधे युरोपात एका महाकाय प्रयोगातून भांडवलशाही आटोक्यात आणण्याचा प्रयत्न झाला. वसाहतवाद, साम्राज्यवादातून अनेक देशांची सुटका झाली. पण तो ‘प्रयोग’ फसला. असं असलं तरी या प्रयोगाचा अजूनही अभ्यास होतोय. विसाव्या शतकाच्या इतिहासाला वळण देणाऱ्या या घटनेचे शिल्पकार होते मिखाईल गोर्बाचेव.
ही आठवण आहे अत्यंत कडवट कम्युनिस्ट हुकूमशाहीत वाढलेल्या एका नेत्याची. जगभर लोकप्रिय झालेला हा नेता आपल्याच देशात मात्र त्याचवेळी विरोधाला सामोरं जात होता. सत्ताधीश होण्याची संधी असतानाही त्याने लोकशाही मुल्यांची रुजवणूक करण्याचा प्रयत्न केला. तसं पाहता स्वत:च्या पक्षात अत्यंत वरिष्ठ पदावर असणाऱ्या, ‘लाल सेनेचा सर्वोच्च पदाधिकारी’ असलेला पुढारी कसा असेल? साम, दाम, दंड, भेद यांचा वापर करून आपली स्वत:ची निरंकुश सत्ता प्रस्थापित करणाऱ्या सत्ताधीशासारखा? की निष्ठूरपणे सत्तेचा वापर करणाऱ्या जहाल मग्रूर सम्राटासारखा?
अशा सत्तापिपासू माणसांची अनेक उदाहरणे देता येतील. जगाच्या सारीपटावर अशा पध्दतीने सत्ता उपभोगलेल्यांची, भोगत असलेल्यांची भली मोठी यादीच तयार होईल. अनेक नावं आपल्या ओठांवर येतील. अशा प्रवृत्तीचे नेते आजही अनेक देशांत आहेत. पण मिखाईल गोर्बाचेव मात्र याला अपवाद होते. ते युनियन ऑफ सोव्हिएत सोशलिस्ट रिपब्लिक किंवा यूएसएसआरच्या कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस होते. सोविएत युनियनचे अध्यक्ष होते. त्यांनी सुरू केलेल्या ग्लासनोस्त आणि पेरेस्त्रोईका या उदारमतवादी धोरणांची जगाला हळूहळू ओळख होत होती.
गोर्बाचेव यांना रशियावर आपला एकछात्री अंमल स्थापित करता आला असता. पण तसं न करता त्यांनी आपल्याकडे असलेली सत्ता सोडून द्यायला सुरवात केली. कम्युनिस्ट राजवटीखालच्या देशात लोकशाही मुल्यांचा प्रयोग ते करू पाहत होते. नोकरशाही आणि सैन्याच्या मदतीने आपली सत्ता स्थापित करण्याऐवजी त्यांनी लोकशाही परिवर्तनाचा नवा प्रयोग सुरू केला. त्यांनी असं का केलं असेल? सत्ता सोडून द्यावी असं त्यांना का वाटलं असेल? त्यामागे त्यांच्या कुठल्या अभिप्रेरणा असतील?
असे प्रश्न जगभरातल्या अनेक देशांना, अनेक देशांच्या लष्कराला, अभ्यासकांना, वृत्तपत्रांच्या संपादकांना तसंच कम्युनिस्ट अभ्यासकांसोबत गोर्बाचेव यांच्या स्वपक्षातल्या अनेक नेत्यांना तेव्हा पडला होता. आजही त्यांच्या भुमिकेबद्दल अनेक अभ्यासक, राजकीय विश्लेषक चर्चा वा अध्ययन करताना दिसतात.
मिखाईल गोर्बाचेव यांचं जगभरात प्रचंड कौतुक होत होतं. जगभरातली वर्तमानपत्रं त्यांच्या राजकीय मुत्सद्दीपणाबद्दल, त्यांच्या आधुनिक विचारांविषयी, त्यांच्या लोकशाहीच्या श्रध्देविषयी भरभरून लिहित होते. त्यांच कौतुक करत होते. त्याचवेळी सोव्हिएत रशियात सामान्य जनता मात्र त्यांच्याविरोधात जात होती. सामान्य जनतेला त्यांचं काही सोयरसुतक नव्हतं. असा विरोधाभास त्यांच्या राजकीय जीवनात होता.
मिखाईल गोर्बाचेव यांचा जन्म २ मार्च १९३१ ला दक्षिण रशियातल्या एका खेड्यात झाला. क्रांतिकारक रशिया निर्माण करण्यात गोर्बाहेव्ह यांचे आजोबा आणि वडिलांचा सहभाग होता. त्यांच्या गावातले ते कम्युनिस्ट कार्यकर्ते होते. त्यांच्या आजोबांनी आपल्या गावात लेनिनचा क्रांतिकारी विचार पहिल्यांदा आणला होता. गोर्बाचेव यांच्या वडिलांनी नाझी जर्मनीविरुध्दच्या लढाईत भाग घेतला होता. गोर्बाचेव यांना मात्र त्या बलाढ्य महासत्तेच्या विघटनाची जबाबदारी पार पाडावी लागली.
१९५२ मधे त्यांनी कम्युनिस्ट पक्षाचं सभासदत्व स्वीकारलं. ११ मार्च १९८५ ला पक्षाचे सचिव म्हणून ते निवडून आले. १९८९ मधे अफागानिस्तानातून सोविएत फौजा परत घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय त्यांनी घेतला. १९९० मधे ते सोविएत युनियनचे अध्यक्ष झाले.
१९९१ च्या अखेरीस त्यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर गोर्बाचेव फाऊंडेशनची स्थापना करून त्यांनी सामाजिक क्षेत्रात कार्य करण्यास सुरवात केली. शीतयुद्धाच्या समाप्तीत त्यांनी घेतलेल्या शांततापूर्ण भूमिकेबद्दल १९९० मधे त्यांना नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
१९८५ मधे त्यांनी पक्षाच्या सचिव पदाची आणि देशाची सूत्रं स्वीकारली. तेव्हा त्यांच्याबद्दल रशियन जनतेत प्रचंड आशावाद निर्माण झाला होता. लोक त्यांच्या कार्यपध्दतीवर, त्यांच्या विचारांवर आणि नव्या लोकशाही प्रयोगावर खूप आनंदी होते. रशियन सत्तेचा एक इतिहास राहिलाय. तिथे एक नवा नेता उदयास येतो तेव्हा त्याच्याबद्दल तिथली जनता प्रचंड आशावादी असते आणि कालांतराने त्या पुढाऱ्याच्या सत्तेला ती विरोधही करते. स्टालिन, क्रश्चेव, ब्रेझनेव ही त्याची काही उदाहरणं.
पण गोर्बाचेव यांच्या काळात दिवस पुढे जात राहिले तसंतसं समाजात आणि व्यवस्थेत काही बदल दिसेना. त्यांचा लोकशाहीचा प्रयोग फसल्याचं लोकांमधे बोललं जाऊ लागलं. आणि स्वपक्षही त्यांच्या विरोधात जायला सुरवात झाली. जगभरात त्यांचे कौतुक होत असताना रशियात त्यांची लोकप्रियता घटत होती. त्यांच्या अधिकाराला ओहोटी लागायला सुरवात झाली होती.
गोर्बाचेव यांच्या लोकशाहीच्या प्रयोगात सामान्य लोकांच्या जीवनमानात फारसा फरक पडला नव्हता. भ्रष्टाचार, टंचाई, महागाई, काळाबाजार अधिकच प्रमाणात वाढली होती. लोकशाहीच्या नावाखाली सुरू असलेल्या या कारभाराला सामान्य जनता कंटाळली होती.
रशियातल्या कम्युनिस्ट पक्षाच्या हुकूमशाहीत स्थिरावलेला आणि ती स्वीकारलेला समाज तसंच कम्युनिस्ट नोकरशाही यांना लोकशाहीच्या प्रयोगाशी काही देणंघेणं नव्हतं. त्यांना भ्रष्टाचार, टंचाई, महागाई यातून सुटका हवी होती. याउलट नोकरशाहीला अधिकचे अधिकार हवे होते. गोर्बाचेव यांच्या लोकशाही प्रयोगात अन् धोरणात हे अधिकार कमी झाले होते.
गोर्बाचेव यांनी आपल्या अजेंड्याने सोविएत युनियनच्या अनेक नेत्यांना अडचणीत टाकलं होतं. सोविएत युनियनच्या प्रगतीची जी आकडेवारी सांगितली जातेय ती फसवी आहे. ती प्रचारकी स्वरुपाची असून त्यात फार तथ्य नाही. रशियातले उद्योगधंदे तोट्यात सुरु आहेत, असं ते जाहीरपणे सांगायचे.
‘उत्पादकता कमी झालीय. आर्थिक अडचणीत आपण आलो आहोत. वस्तू, साधनं यांची टंचाई निर्माण झालीय. अशावेळी आपण दुसऱ्या देशावर सैन्य कारवाई करणं योग्य नाही. इतर देशांसोबत आपण करत असलेल्या अण्वस्त्र स्पर्धेमुळे देशाचं अर्थकारण पूर्णतः बिघडलंय. त्यातल्या स्पर्धेमुळे जगाचंच अस्तित्वच धोक्यात आलंय. लोकांना विचार, जगण्याचा मुलभूत मानवी हक्क आहे. आपण हे सर्व हक्क जपले पाहिजेत. शांतता नांदण्यासाठी अमेरिकेशी स्पर्धा करणे हा योग्य मार्ग नव्हे.’
कम्युनिस्ट देशाकडून अशा पध्दतीची भाषा भांडवली देशाने कधी ऐकलीच नव्हती. या भूमिकेचं जगभरात कौतुक होत होतं. पण रशियन जनतेला त्यांचा आशावाद खोटा आणि नाटकी वाटला. काही कम्युनिस्ट पक्ष त्यांना अमेरिकेचा हस्तक म्हणायचे. रशियात वैचारिक गोंधळाची स्थिती दिवसेंदिवस वाढत होती.
ऑगस्ट १९९१ मधे रशियात सामाजिक गोंधळाने परिसीमा गाठली. कम्युनिस्ट पक्षातल्या काही नेत्यांनी आणि तिथल्या गुप्तचर संस्थेने संगनमत करून गोर्बाचेव यांना अटक केली. आणि अज्ञात स्थळी त्यांना हलवलं. रशियात आणीबाणी घोषित करण्यात आली. सैन्यास रस्त्यावर उतरवण्यात आलं. वृत्तपत्र, टीवीवर नियंत्रण आलं. तसंच लोकांचं सामाजिक स्वातंत्र्य गोठवण्यात आलं. पण याचा फारसा उपयोग झाला नाही.
गेल्या ४-५ वर्षांत गोर्बाचेव यांना अपेक्षित असलेल्या लोकाशाही मुल्यांचा विस्तार झाला. त्यामुळे लोक ते गमावण्यास तयार नव्हते. त्याचवेळी पूर्व युरोपात स्थापित होत असलेली लोकशाही रशियन लोक जवळून पाहत होते. त्यामुळे त्यांनी आणीबाणीच्या दडपशाहीला भीक घातली नाही. गोर्बाचेव यांच्या लोकप्रियतेमुळे जगातल्या कुठल्याही देशाने या दडपशाहीस समर्थन दिली नाही. तीन दिवसांतच गोर्बाचेव यांची मुक्तता झाली.
पण तोवर परिस्थिती फार बदलली होती. गोर्बाचेव यांची त्यांच्यांच देशतली प्रसिध्दी कमी झाली होती. त्यांच्या अधिकाराला कात्री लागली होती. सोविएत युनियनच्या नियंत्रणाखाली असलेले लहान पूर्व युरोपीय देशांनी आपली डोकी वर काढली होती. तेथील आंदोलनातून कम्युनिस्ट पक्षाला होत असलेल्या विरोधातून सोविएत सैन्य रस्त्यावर येत नाहीत तेव्हा त्यांच्या विरोधाची धार अधिक तीव्र झाली.
पोलंड, हंगेरी, रुमेनिया, झेकोस्लोव्हेकिया, पूर्व जर्मनी आणि इतर देश कम्युनिस्ट राजवटीला कडाडून विरोध करू लागले. १९८९ मधे बर्लिनची भिंत पडली आणि सोविएत युनियनच्या पोलादी संघटनास उतरती कळा लागली. अशा वातावरणात सोविएत युनियनवरची कम्युनिस्ट पक्षाची पकड पूर्णपणे सुटली. सैन्य हतबल झालं होतं. २५ डिसेंबर १९९१ ला क्रेमलिनच्या चौकात गोर्बाचेव यांनी अखेरचं भाषण केले.
आपण राजीनाम देत असल्याचं गोर्बाचेव यांनी जाहीर केलं. सोविएत युनियनची अधिकृतपणे अनेक शकलें झाली. १५ नवी स्वतंत्र प्रजासत्ताक राष्ट्रं निर्माण झाली. स्टालिनच्या ध्येय धोरणातून निर्माण झालेला महाकाय सोवियत युनियन, लेनिनच्या क्रांतीतून उभा राहिलेला कडवा कम्युनिस्ट सोविएत रशिया जगाच्या नकाशावरून कायमचा पुसला गेला.
खरं सांगायचा तर गोर्बाचेव यांना अपेक्षित असलेलं लोकशाही परिवर्तन सोविएत युनियन व्यवस्थेत रुजू शकलं नाही. सोविएत युनियनमधील सर्व घटकराज्यांना स्वायत्तता हवी होती. तशी त्यांची जोरदार मागणी सुरु झाली होती. गोर्बाचेव यांची प्रशासनावरची पकड सुटत चालल्याचा तो प्रारंभ होता. स्थानिक पातळीवरे पुढारी बंड करू पाहत होते. गोर्बाचेव यांना अपेक्षित असलेला ‘लोकशाही आणि फेररचना’चा प्रयोग रशियात यशस्वी झाला नाही. त्यांना अपेक्षित असलेलं लोकशाही परिवर्तन तत्कालीन रशियातही मूळ धरू शकलं नाही.
गोर्बाचेव अखेरपर्यंत कुणालाही उमगले नाहीत. त्यांचा व्यापक दृष्टीकोन हा ना अमेरिकन लोकांना कळला ना रशियन जनतेला. ना त्यांच्या कम्युनिस्ट पक्षाला. प्रश्न उरतो तो हा की सोविएत युनियनचं हे विघटन गोर्बाचेव यांनी घडवून आणलं कि भविष्यात ते कधी तरी होणारच होतं?
लोकशाही, समाजवादी तसंच भांडवलशक्ती यांच्यावरचं नियंत्रण सुटल्यामुळे सोविएत युनियन विस्कटली की लोकं कम्युनिस्ट राजवटीला विटली? कम्युनिस्ट पध्दती आणि लोकशाही एकत्र नांदूच शकत नाही, हा जेष्ठ पत्रकार कुमार केतकर यांनी उपस्थित केलेले हे प्रश्न आजही अनुत्तरीत आहे.
संदर्भः
• कुमार केतकर, संपादकीय लेख २२-१२-२०००
• International foundation for social-economic and political studies ( the Gorbachev Foundation)
• Mikhail Gorbachev fast facts -CNN
(लेखक हे मुक्त पत्रकार आहेत.)