‘मिशन मंगल’ सिनेमा बघून आपलं मंगलयानही आत्महत्या करेल!

२० ऑगस्ट २०१९

वाचन वेळ : ६ मिनिटं


जगभरात कौतुक झालेल्या भारताच्या मंगळयान मोहिमेवर आधारित मिशन मंगल सिनेमा सध्या गाजतोय. बॉक्स ऑफिसवरही या सिनेमाची घसघशीत कमाई सुरू आहे. पण या सिनेमाने भारताच्या अवकाश संशोधनाबद्दल जनजागृती करण्याऐवजी गैरसमजच तयार होण्याची भीती व्यक्त केली जातेय. या सिनेमाचा हा रिव्यू.

सिनेमात लिबर्टी घेतोय, असं एकदा सुरवातीला स्पष्ट केल्यावर काहीही करता येतं. काहीही दाखवायला सिनेमा निर्माते मोकळे होतात. हे एका अर्थानं चुक नाही. मात्र काहीपण दाखवताना काही मुलभूत गोष्टी चुकीच्या दाखवू नयेत एवढीच अपेक्षा. 'मंगल मिशन' हा सिनेमा स्वतः मंगळयानाने बघितला तर तो स्वतः मंगळ ग्रहावर आपटून आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही, असं हा सिनेमा बघितल्यावर वाटतं.

सिनेमाचं यश कशात?

  • सिनेमामधे प्रत्यक्ष उपग्रह प्रक्षेपण करतानाची रॉकेटची हालचाल वगैरे हे सर्व अत्यंत उत्तम प्रकारे उभं करण्यात आलंय. सर्वसामान्यांच्या भाषेत अगदी हॉलिवुड वगैरे यांच्या तोडीचं हे काम झालंय.
  • किमान अशा वेगळ्या विषयांवर सिनेमा बनवताना या धाडसाचं स्वागत केलं पाहिजे.
  • तुलनेत जास्त वजनाचा उपग्रह मंगळग्रहाकडे कसा पाठवायचा हे विद्या बालनने गोफणीचा वापर करत अत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगितलं. याबद्दल डायरेक्टरचं अभिनंदनच. मंगळ मोहिमेवेळी इस्रोने साधं अनिमेशन देण्याचे कष्टही घेतले नव्हते. ती चूक आता चांद्रयान २ मोहिमेवेळी सुधारण्यात आलीय.
  • ही मोहीम कशी अत्यंत कमी खर्चात पार पडली हे ठसवण्यात किंवा लोकांना सांगण्यात सिनेमा यशस्वी झालाय.

आता अपयशावर बोलू काही

मुंबईत लोकलने प्रवास करणारी गृहिणी ही सकाळी लवकर उठून भाजी वगैरे करत जेवण करते. घर आवरते. रिक्षा पकडून रेल्वे स्टेशन गाठते. लोकल पकडून ऑफिसला पोचते. ऑफिसमधे कॉम्प्युटर सुरू करते. कित्ती सोपं ना. तसंच काहीसं विद्या बालन करते. सिनेमाची सुरवातच विद्या बालनच्या धावपळीने आहे.

म्हणजेच घर आवरुन जेवण तयार करुन धावत धावत स्वतःची गाडी काढत, ट्रॅफिकमधून वाट काढत इस्रोचं ऑफिस गाठते आणि जीएसएलवी एमके ३ रॉकेट उडवण्याच्या कामाला लागते. काऊंटडाऊनवेळी शेवटचे काही सेकंद असताना घाईघाईने का होईना ओके म्हणते आणि मोहीम पुढे सरकते आणि मग ओम फट स्वाहा.

रॉकेट लाँच करणं इतकं सोपं असतं का?  जीएसएलवी एमके ३ सारख्या रॉकेटचं प्रक्षेपण हा किमान ४५ दिवसांचा एक मोठा व्यायाम असतो. शास्त्रज्ञ तर शेवटचे काही तास कुटुंबियांपासून कटाक्षाने दूर असतात. २४ तास रॉकेटच्या डेवलपमेंटकडे लक्ष असतं. एखादा छोटा पक्षी, उंदीरही गडबड करु शकतो. पण सिनेमात रॉकेट लाँचिंग हे दिवाळीतला अग्निबाण सोडल्यासारखं साधंसोप्प काम असल्यासारखं दाखवण्यात आलंय.

हेही वाचा: सोनिया गांधींपुढे काँग्रेसला बांधून ठेवण्याचं आव्हान

दुय्यम नाही तर महत्त्वाकांक्षी मोहीम

मंगळयान ही इस्रोची एक दुय्यम मोहीम होती, असं या सिनेमात दाखवलंय. हे अत्यंत चुकीचं आहे. इस्रो ही अत्यंत प्रोफेशनल पद्धतीने काम करणारी सरकारी संस्था आहे, ही गोष्ट आपण ध्यानात घेतली पाहिजे. एखादी मोहीम जाहीर करताना तिचं लक्ष्य, दुरगामी परिणाम, भविष्यातील उपाययोजना यांचा अत्यंत काटेकोर असा विचार केलेला असतो. त्यामुळे इस्रोसाठी ही एक अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम होती.

सिनेमात मंगळयान मोहिमेसाठी बजेटमधे खूपच कमी रुपयांची तरतूद आहे. कमी पैशात भागवा, असं वरून सांगितल्याचंही दाखवलंय. माझ्या मते, या सिनेमातला हा दुसरा आत्महत्येचा मुद्दा आहे. उलट चांद्रयान १ मोहिमेचा एक यशस्वी टप्पा पार पाडल्यावर नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवडयात २००८ ला इस्रोचे तत्कालिन प्रमुख जी माधवन नायर यांनी मंगळ ग्रहावर उपग्रह पाठणार असल्याचं जाहीर केलं होतं.

पुढच्या तीन वर्षांत या मोहिमेचा अत्यंत काटेकोर अभ्यास करण्यात आला. या अभ्यासासाठीही आवश्यक बजेट देण्यात आलं. त्यानंतर १५ ऑगस्ट २०१२ ला लाल किल्ल्यावर भाषण करताना तत्कालिन पंतप्रधान मनोमहन सिंह यांनी ही मोहीम २०१३ मधे प्रत्यक्ष होणार असल्याचं जाहीर केलं. लगेचच या मोहिमेसाठी आवश्यक पैसेही देण्यात आले. कमी बजेटमधे भागवा असं दाखवल्यानं लोकं काय बोध घेत असतील, त्यांच्या मनात आपण काय ठसवतोय, याची मला भीती वाटते.

सध्या चांद्रयान २ मोहीम सुरु आहे. ही मोहीम २०११-१२ मधेच होणं अपेक्षित होतं. पण काही कारणांनी ही मोहीम पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे चांद्रयान २ मोहिमेचा पैसा मंगळयान मोहिमेसाठी वळवण्यात आला, असंही सिनेमात दाखवण्यात आलंय. हे अत्यंत हास्यास्पद आहे. हे काही पीडब्ल्यूडी खातं नाही की इकडच्या रस्त्यासाठी दिलेला पैसा हा दुसऱ्या रस्त्याच्या कामासाठी वळवून वापरला.

चुकीचं मत तयार होण्याची भीती

सिनेमात मंगळयान ही दुय्यम मोहीम दाखवली असल्यानं या मोहिमेवर काम करण्यासाठी मळकट, कळकट, प्रचंड धुळ असलेली जागा देण्यात आली. मग महिला शास्त्रज्ञांनी पदर कंबरेला खोचत जागा साफ केली. सर्व शास्त्रज्ञांनी रंगरंगोटी करत जागा चकाचक केली. हे बघून मंगळयान मोहिमेचा सिनेमातला प्रमुख अक्षय कुमारला धक्का बसतो. सिनेमातला हा सीन बघून मी खाली पडायचाच बाकी होतो.

ही साफसफाई बघितल्यावर मंगळयान प्रकल्पावर प्रत्यक्ष काम केलेल्या शास्त्रज्ञांची प्रतिक्रिया मला जाणून घ्यायला आवडेल. पण त्यापेक्षा आपण लोकांच्या मनात किती चुकीचं भरवत आहोत, एक चुकीचं मत तयार करत आहोत याची भीती वाटते.

सिनेमात दुय्यम ठरवलेल्या मंगळयान मोहिमेसाठी इस्रोच्या विविध विभागांकडून ज्युनियर शास्त्रज्ञ दिले जातात. हीसुद्धा एक हास्यास्पद गोष्ट आहे. मंगळ ग्रहावर यान पाठवण्याचा अनुभव अर्थात इस्रोकडे नसला तरी विविध मोहिमांमधे गेली काही वर्षांचा अनुभव असलेले अनुभवी शास्त्रज्ञ या मोहिमेकरता वळवण्यात आले हे सत्य आहे.

हेही वाचा: काश्मीरवर तावातावाने मत मांडण्याआधी एकदा ही पुस्तकं वाचून तर बघा

कपाळावर हात मारण्याची वेळ

आता एक तांत्रिक गोष्ट. विद्या बालन ही मंगळयान हा उपग्रह बनवणाऱ्या प्रकल्पाची प्रमुख म्हणून या सिनेमात दाखवण्यात आलीय. म्हणजेच उपग्रह कसा असला पाहिजे, त्यावर कोणती उपकरणं असली पाहिजेत, उपग्रहांत इंधन किती असलं पाहिजे, उपग्रहात काय सुधारणा केल्या पाहिजेत वगैरे वगैरे यावर लक्ष ठेवणार. यासाठी विद्या बालनच्या हाताखाली वेगवेगळ्या टीम आहेत.

अक्षय कुमार हा संपूर्ण मंगळयान प्रकल्पाचा प्रमुख आहे. म्हणजेच हा उपग्रह कसा असला पाहिजे, या प्रकल्पाचं बजेट कसं असलं पाहिजे, कोणत्या रॉकेटद्वारे हा उपग्रह सोडला पाहिजे, नेमकी तारीख वेळ काय असली पाहिजे, आवश्यक कोणत्या पुरक यंत्रणा या मोहिमेसाठी विकसित केल्या पाहिजेत वगैरे वगैरे गोष्टी अक्षय कुमार बघणार असतो.

त्यातच उपग्रह रॉकेटद्वारे लाँच करणं ही एक स्वतंत्र गोष्ट आहे. रॉकेट तयार करणं, त्याची जोडणी करणं, इंधन भरणं आणि योग्य वेळी लाँच करणं यासाठी एक वेगळी यंत्रणा राबत असते. नेमकी याच ठिकाणी एक गल्लत या सिनेमात करण्यात आलीय. विद्या बालनचं काम हे उपग्रह बनवून तो रॉकेटच्या निर्मात्यांकडे सोपवणं आणि उपग्रह अवकाशात गेल्यावर त्याच्याकडून काम करवून घेणं एवढं आहे.

इथे रॉकेटच्या प्रक्षेपणाच्या प्रक्रियेत उगाचच विद्या बालन आणि तिच्या टीमला मधे घुसवण्यात आलंय. हे बघिल्यावर इस्रोच्या टीमने, मंगळयानच्या टीमने कपाळावर नक्कीच हात मारला असेल. महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने जर उद्या डंपिंग ग्राऊंडला जाणाऱ्या गाड्यांची मोजदाद करायला सुरवात केली तर कसं वाटेल तसंच काहीसं इथे दाखवण्यात आलंय.

इस्रो हा काय हवामानाचा अंदाज आहे?

आणखी एक भयानक तांत्रिक चूक आहे. उपग्रहाचे रॉकेटद्वारे प्रक्षेपण करताना विविध गोष्टींसह हवामानाचा अंदाज ही गोष्ट गृहीत धरलेली असते. आणि त्यानुसारच नक्की वेळ ठरवली जाते. अगदी खूप पाऊस पडत असेल, सुर्यप्रकाश नसल्यानं अंधार झाला असेल, जोरदार वारे वाहत असतील तर वाऱ्याचा वेग कमी होण्याची वाट बघितली जाते. सुर्यप्रकाश नाही, जोरात पाऊस पडत आहे म्हणून प्रक्षेपण कधी थांबवलं जात नाही. नेमकं हेचं सिनेमात दाखवलंय.

म्हणजे पाऊस पडत आहे, सुर्यप्रकाश नाही म्हणून मंगळयानचं प्रक्षेपण थांबवलं जातं. आणि सर्वजण आपापल्या घरी जायला निघतात. अक्षय कुमार गाडीत बसतो आणि अचानक पाऊस थांबतो. सुर्यप्रकाश उगवतो आणि मग पुन्हा सर्वजण धावाधाव करत कंट्रोल रुममधे येतात आणि रॉकेट लाँच करतात. हे बघितल्यावर हसावं की रडावं अशी माझी अवस्था झाली होती. मग इस्रोच्या शास्त्रज्ञांची अवस्था काय झाली असेल याची कल्पनाच करवत नाही. या सात गंभीर चुका आहेत.

सिनेमात ज्युनियर शास्त्रज्ञ शर्मन जोशी कसा कुंडलीवर विश्वास ठेवणारा आहे. त्याच्या लग्नपत्रिकेत मंगळ ग्रह कसा मारक आहे हे दाखवण्यात आलंय. हे कशासाठी? हवामाना विभाग जसा एक टिंगलटवाळीचा विषय झालाय तसं आपल्याला इस्रोचंही करायचंय का असा प्रश्न पडतो.

सिनेमात मंगळयान उपग्रहाची प्रमुख विद्या बालन देवाला प्रार्थना करताना दाखवलंय. अर्थात सर्वांपलिकडे देव असतो, श्रद्धा नावाचा भाग असतो वगैरे सांगण्याचा हा साळसूद असा प्रयत्न आहे. नास्तिक असल्यानं मला हे सर्व हास्यास्पद वाटतं.

खरंच ब्रेकिंग न्यूजने धोरण ठरतं?

एक सीन आहे. बैठक सुरू असते. इस्रोचे प्रमुख ही बैठक घेतात. बैठकीत अचानक अक्षय कुमार घुसतो आणि टीवीवर सुरू असलेली ब्रेकिंग न्यूज दाखवतो. चीनचा मंगळ ग्रहासाठी असलेला उपग्रह हा उड्डाण करतानाच रॉकेटचा स्फोट झाल्याने नष्ट झालेला असतो. तेव्हा चीन स्पर्धेत नाही. आता भारताला चांगली संधी आहे, असं अक्षय कुमार पटवून देण्याचा प्रयत्न करताना दिसतो. हे सर्व हास्यास्पद आहे.

मुळात इस्रोची स्पर्धा ना चीनशी आहे ना दुसऱ्या कोणत्या देशाशी. जगात अवकाश तंत्रज्ञानामधे जे बदल होताहेत त्यामधे मागे राहता कामा नये हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून इस्रोकडून पद्धतशीरपणे पावलं टाकली जातात. एखाद्या घटनेने किंवा ब्रेकिंग न्यूजने असं काही धोरण लगेच ठरवलं जात नसतं.

अशा सिनेमांवर टीकाच करायला हवी

अपोलो १३ सारखा अप्रतिम सिनेमा, आताच आलेला The martian, Gravity सारखे सिनेमा असो किंवा इतर अवकाश मोहिमांवर आधारलेले हॉलीवूडचे सिनेमा यामधे मसाला जरुर मारलेला आपल्याला दिसतो. मात्र हे सिनेमा साकारताना अवकाश तंत्रज्ञानातील मूळ संकल्पनांना, नियमांना कुठेही धक्का लावलेला नसतो. उलट ज्या संकल्पना सर्वसामान्यांच्या कल्पनेपलिकडे आहेत, डोक्याचा भुगा होईल अशा गोष्टी सांगणारे Interstellar सारखे सिनेमे तर अप्रतिमच म्हणावे लागतील.

आपल्याकडे अवकाश तंत्रज्ञानाच्या ज्ञानाबद्दल तशी बोंब आहे. इस्रोला तर आजही अशा गोष्टी सर्वसामान्यांना सांगाव्याशा वाटत नाहीत. किमान ही चूक चांद्रयान २ मोहिमेच्या निमित्ताने सुधारण्यात आलीय, असं म्हणावं लागेल. जी काही अवकाश तंत्रज्ञानाबद्दल माहिती लोकांकडे उपलब्ध आहे ती केवळ खगोल मंडळसारख्या विविध संस्थांच्या कामामुळे किंवा मोहन आपटे यांच्यासारख्या काही लेखकांमुळे.

असं असताना मंगल मिशनसारखे सिनेमा काही चुकीच्या संकल्पना ठासून दाखवत असतील तर अशा सिनेमांवर टीकाच केली पाहिजे.

तुम्हाला काय वाटतं?

हेही वाचा: 

कॅमेरा विकत घेताय, मग हे नक्की वाचा

विद्या सिन्हाचं मन सुंदर होतं म्हणून ती सुंदर होती

कोकणातलं पाणी मराठवाड्यात वळवणं खरंच शक्य आहे?

तंत्रज्ञानापासून रोखल्याने आपली मुलं गुगलचे सीईओ कसे होणार?

(लेखक हे झी २४ तास न्यूज चॅनलमधे विशेष प्रतिनिधी असून ते विज्ञानविषयक लिखाण करतात. हा लेख त्यांच्या ब्लॉगवरून घेतलाय.)